“फुल खिले हैं गुलशन गुलशन” या शोमधून तबस्सुमने फिल्म इंडस्ट्रीच्या बातम्या घराघरात पोहोचवल्या होत्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


सेलिब्रिटी टॉक शो म्हटल्यावर आपल्यासमोर करण जोहरचा “कॉफी विथ करण” उभा राहतो. करण जोहरच्या या शोच्या 15-16 वर्ष आधी अभिनेत्री सिमी गरेवालचा “रॉन्देव्हू” नावाचा एक टॉक शो यायचा. अत्यंत शांतपणे सिमी गरेवाल एक-एक प्रश्न विचारते आणि समोर बसलेले सेलिब्रिटीज तिच्या प्रश्नांना उत्तरे देतात असे या शोचे स्वरूप होते. कसल्याही प्रकारचे गॉसिप नाही, कसल्याही प्रकारची गडबड नाही असा हा शो होता. हा संपूर्ण शो इंग्लिश भाषेतून प्रसारित होत असे.

त्यानंतर आलेला करण जोहरचा कॉफी विथ करण बरीच वर्षे चालतो आहे. या शोमध्ये अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी हजेरी लावली आहे. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या जाहीर कुचाळक्या करत बसणे असे या शोचे स्वरूप असल्यामुळे करण जोहर अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा शो इंग्लिश भाषेतून प्रसारित होत असल्यामुळे भारतातील आणि परदेशातील जो एक सोफीस्टीकेटेड लोकांचा समूह असतो त्या समूहालाच हा शो अपिल होतो. सर्वसामान्य भारतीय लोकांना या शोचे वावडे आहे. सर्वसामान्य भारतीय लोकांच्या आवडीचा शो म्हणजे कपिल शर्माचा “द कपिल शर्मा शो”.

क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा म्हणजे जगभरातील सगळ्याच लोकांचे आवडीचे विषय. या क्षेत्रातील लोकांबद्दल सगळ्यांना प्रचंड कुतूहल असते. त्यातल्या त्यात प्राधान्य क्रम लावायचा झाला तर चित्रपट आणि त्याच्यानंतर क्रिकेट मध्ये असणाऱ्या लोकांना देवाचा दर्जा दिला जातो. या क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांचे जगभरामध्ये करोडो फॉलोवर्स असतात. त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल लोकांना प्रचंड आकर्षण आणि उत्सुकता असते.

हे सेलिब्रिटीज काय करतात, कसे राहतात, कसे वागतात, कसे बोलतात याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक नेहमी उत्सुक असतात.

हे असे लोक जेंव्हा मुलाखत देतात तेव्हा त्या मुलाखतींना खूप प्रसिद्धी मिळते आणि असे शो वर्षानुवर्षे चालू राहतात. टीआरपी वाढावी म्हणून मुद्दामून वादग्रस्त वक्तव्य केली जातात. मुद्दामून खोटी भांडणे केली जातात. शोमध्ये एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक केली जाते. ज्यामुळे पुढे अनेक दिवस त्याभागाची चर्चा सुरु असते.

आज आपण जे हे “सेलिब्रिटी टाॅक शो” बघतो याची सुरुवात पहिल्यांदा 1972 साली झाली होती. हिंदी चित्रपटातील नटखट अभिनेत्री तबस्सुमने सत्तरच्या दशकात असा पहिला सेलिब्रिटी टॉक शो आणला होता त्याचं नाव होतं “फुल खिले है गुलशन गुलशन”

तबस्सुम हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जन्माला आलेली आणि इथेच मोठी झालेली अभिनेत्री आहे. तिने लहान वयापासून चित्रपटात काम करायला सुरुवात केलेली होती. वयाच्या तिसऱ्या वर्षी ती सुहाग नावाच्या हिंदी चित्रपटात झळकली होती. त्यानंतरहिरोची गोंडस चुलबुली बहीण किंवा हिरोईनची नटखट अवखळ मैत्रिण अशा भूमिका तिला मिळायच्या. तबस्सुम मुख्य अभिनेत्री म्हणून कधी फारशी दिसली नाही मात्र तिने हिरो आणि हिरोइनच्या बाजूला उभे राहून बरेच चांगले रोल केले.

तबस्सुमला खरी प्रसिद्धी मिळाली ती “फुल खिले है गुलशन गुलशन’मुळे. हा टीव्ही शो 1972 साली दूरदर्शनवर आला. त्या काळामध्ये फक्त दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. लोकांच्या घरांमध्ये कृष्णधवल टीव्ही संच असायचा. फुल खिले है गुलशन गुलशन या कार्यक्रमाची रुपरेखा साधारणपणे एका मुलाखतीच्या कार्यक्रमाची होती. तबस्सुमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रचंड ओळखी होत्या. त्यामुळे तिने स्वतःच या शोचे लेखन-संकलन-संशोधन केले होते. हा शो हिट होऊ शकतो असा तिला विश्वास होता. आणि तसेच झाले सुद्धा.

तेव्हा चित्रपटातील तारे चित्रपटांच्या बाहेर जास्त लोकांच्या नजरेस पडायचे नाही ना सोशल मीडिया आणि इतर माध्यमे होती. चित्रपटाचा पडदा सोडला तर फक्त टीव्हीच्या आणि रेडिओच्या माध्यमातून तसेच मासिके आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून जी काही माहिती मिळेल तेवढीच या सेलिब्रिटीची माहिती लोकांपर्यंत पोहोचायची.

फुल खिले है गुलशन गुलशनमध्ये पहिल्यांदाच लोक चित्रपटातील आपल्या आवडत्या सेलिब्रिटिजना भूमिकेच्या बाहेर, त्यांच्या खर्‍या रूपामध्ये बघू शकत होते.

या शोमध्ये अनेक कलाकारांनी आपली हजेरी लावली होती. दिलीप कुमार देवानंद वहिदा रहमान पासून राजेश खन्ना अमिताभ बच्चन रेखा जॅकी श्रॉफ अनील कपूरपर्यंत चित्रपट क्षेत्रातील सर्व नामवंत इथे येऊन गेले होते.

या कार्यक्रमात तबस्सुम कलाकारांना त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलते करण्याचा प्रयत्न करायची. या कलाकारांच्या जीवनाचा जो भाग लोकांसमोर कधीच आलेला नसायचा त्याबद्दल ती त्या कलाकारांना बोलायला लावायची उदाहरणार्थ अमिताभ बच्चनचे शिक्षण आणि दिल्लीमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून मुंबईमध्ये आल्यानंतर त्याने केलेला स्ट्रगल याचे रोचक वर्णन त्याने तबस्सुमच्या कार्यक्रमामध्ये केले होते.

असेच एकदा मीनाकुमारीचे पती कमाल अमरोही तबस्सुमच्या शोमध्ये आले होते त्यांनी तबस्सुमला अगोदरच बजावून ठेवले होते की मीनाकुमारी संदर्भात कुठलाही प्रश्न विचारायचा नाही. पण तरीही तबस्सुमने मीनाकुमारीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा कमाल अमरोही यांनी सांगितले की मीनाकुमारी एक चांगली अभिनेत्री आहे.

तबस्सुमनी गुगली टाकली “मग मीनाकुमारी बायको म्हणून कशा आहेत?” त्यावर कमल अमरोही ताडकन उत्तरले “बायको म्हणून ती वाईटच आहे. घरामध्ये देखील ती स्वतःच्या अभिनेत्रीच्या भूमिकेतून बाहेर येत नाही.” मुलाखतीमधील त्यांचे हे वाक्य त्यावेळी चांगलेच वादग्रस्त ठरले होते.

फुल खिले है गुलशन गुलशन हा कार्यक्रम तब्बल एकवीस वर्षे चालला. 1972 साली सुरू झालेला हा शो 1991पर्यंत दूरदर्शनवर चालू होता. या शोमुळे तब्बसूमचे नाव घराघरात पोहोचले होते चित्रपटात काम करून जितकी प्रसिद्धी तिला मिळाली नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रसिद्धी तिला या एका शोमुळे मिळाली. यावरुन या शोची लोकप्रियता लक्षात यावी.

आज कितीही सेलिब्रिटी टॉक शो आले तरीही फुल खिले है गुलशन गुलशनचे स्टॅंडर्ड कुठलाही शो गाठू शकत नाही हे नक्की!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!