सॅमसंग-अ‍ॅपलच्याही आधी सोनीने भारतीय बाजारपेठेवर राज्य केलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


‘सोनी’ हे नाव बहुतांश भारतीयांना परिचित आहे. गेली तीन दशके भारतीयांच्या रोजच्या वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये एक तरी ‘सोनी’चे प्रोडक्ट असते, इतकेच काय तर सोनीच्या ‘टीव्ही चॅनेल्स’ला आणि त्यांनी निर्माण केलेल्या विविध चित्रपटांना देखील भारतात मोठा दर्शक वर्ग लाभला आहे.

मूळ जपानच्या या कंपनीने भारताच्या आर्थिक उदारीकरणानंतर भारतात प्रवेश केला आणि त्यानंतर सोनी हा भारतातील एक लोकप्रिय गैर-चिनी इलेक्ट्रॉनिक ब्रँड बनला.

सॅमसंग आणि इतर चिनी ब्रँड जेव्हा मार्केटमध्ये नव्हते त्यावेळी सोनीने भारतीय बाजारपेठेत आपला साम्राज्य विस्तार केला होता. भारताप्रमाणे सोनी या जपानी कंपनीने अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशात आपला साम्राज्य विस्तार केला होता. खरंतर दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेल्या जपानच्या उदयाचे सोनी हे सर्वोत्तम उदाहरण आहे.

१९८६ साली सोनीने बाजारात आणलेल्या ‘सोनी वॉकमन’ने लोकांच्या मनावर अधिराज्य तर गाजवलेच पण सोनीने अमेरिकन कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या इलेक्ट्रॉनिक बाजारात एक वेगळेच ‘मेड इन जपान’ ब्रँड आणले, ज्याने काही काळातच लोकांचा मनाचा ताबा घेतला.

या सोनीची सुरुवात आणि आजपर्यंतचा सोनीचा एक ब्रँड म्हणून झालेला विकास यावर आज आपण नजर टाकूया..

मे १९४६, जपानला दुसऱ्या महायुद्धात सपशेल शरणागती पत्करून ९ महिने उलटले होते. त्यावेळी मासारू इबुका यांनी टोकियो डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये एक इलेक्ट्रॉनिक वस्तू रीपेअरिंगचे दुकान सुरू केले. काही काळातच अकिओ मोरिता हे त्यांच्या व्यवसायात सहभागी झाले.

या दोघींनी त्यांच्या कंपनीचे नाव ‘टोकियो त्सुशिंग क्योगो’ असे ठेवले ज्याचे इंग्रजी रूपांतर ‘टोकियो टेलिकम्युनिकेशन अँड इंजिनिअरिंग कॉर्प’ असे होते.

१९५८ साली त्यांनी आपल्या कंपनीचे नामकरण ‘सोनी’ असे केले. हे ‘सोनस’ या लॅटिन शब्दावरून तयार करण्यात आले असून पुढे याचा अमेरिकेत ‘सोनी’ असा उच्चार करण्यात येऊ लागला.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ‘अ सोनी बॉय’ असा उल्लेख जपानमधील तरुण योध्यांसाठी केला जात होता.

खरंतर सुरुवातीला जपानची मुख्य बँक या नावावर संस्थेला कर्ज देण्यास तयार नव्हती, पण मोरिता यांनी शेवटपर्यंत आशा सोडली नाही. कंपनीने जपानमधील पहिले टाईप-जी रेकॉर्डर लोकांसमोर आणले होते.

पुढे १९५५ मध्ये कंपनीने टी आर 55 हा ट्रान्झिस्टर रेडिओ जपानी बाजारपेठेत आणला. हा रेडिओ इतका प्रसिद्ध झाला की दोनच वर्षात याचे अपडेटेड टी आर 63 हे नवीन सुधारित व्हर्जन लॉन्च करण्यात आले.

हे सोनीचे पहिले प्रोडक्ट होते, ज्याची अमेरिकेत विक्री होण्यास सुरुवात झाली होती.

हा रेडिओ आकाराने जरा मोठा होता आणि लोकांच्या खिशात बसत नव्हता. यावर उपाय म्हणून कंपनीने हा रेडिओ लोकांच्या पाकिटात बसेल असे शर्ट तयार करून त्याची विक्री केली.

या माध्यमातून कंपनीला हेच दाखवुन द्यायचे होते की त्यांनी जगातील पहिला पॉकेट साईज रेडिओ बनवला आहे.

या प्रॉडक्टने अमेरिकन बाजारपेठ हादरवून सोडली, अमेरिकन तरुणपिढीला हा पॉकेट साईज रेडिओ अगदी हवा हवासा वाटू लागला. १९५५ ला ज्या प्रॉडक्टचे फक्त १ लाख रेडिओ विकले गेले होते, त्याचीच १९६८ मध्ये ५० लाखाहून जास्त संख्येने विक्री झाली.

आपली वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन १९६० साली सोनीने आपली अमेरिकन शाखा सुरू केली. यामुळे कंपनीला चांगला प्रॉफिट पण मिळाला आणि किंमत देखील वाढवता आली.

खऱ्या अर्थाने सोनीसाठी सर्वात चमत्कारिक प्रॉडक्ट होते त्याचा “वॉकमन”, ज्याला १९७९ साली लॉन्च केले. याबरोबरच सोनीने आपली एक लाईफ इन्शुरन्स कंपनी देखील सुरू केली, जिच्या बळावर सोनीने इलेक्ट्रॉनिक वगळता इतर क्षेत्रात हात पाय पसरायला सुरुवात केली.

१९८० च्या सुरुवातीचा काळ इलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी फार आव्हानात्मक होता. त्यावेळी कंपन्यांना जागतिक मंदीने ग्रासले होते. परंतु या काळात देखील सोनीने मागे वळून पाहिले नाही.

कंपनीचे नवीन संचालक नोरियो ओहगा यांनी कंपनीच्या क्रांतिकारी ठरलेल्या कॉम्पॅक्ट डिश फॉरमॅटची निर्मिती करायला घेतली, यातूनच १९९० साली त्यांनी प्ले स्टेशनची सुरुवात केली. ज्याने गेमिंग सेक्टरमध्ये एक क्रांती आणली.

डिसेंबर ४, २०१९ रोजी जगभरात प्ले स्टेशन हे सर्वाधिक विक्री करण्यात आलेले व्हिडीओ गेम सेटअप होते. गेल्या २५ वर्षात ४.५ कोटी प्ले स्टेशनची यशस्वी विक्री कंपनीने केली आहे. सध्या यांच्याच अत्याधुनिक प्ले स्टेशन ५ ची प्रचंड क्रेझ आहे.

परंतु एकीकडे सोनीला यश मिळत होते, तसे अपयश देखील मिळाले. सोनीच्या बेटामॅक्स हे त्यांच्या इतिहासातील सर्वात अपयशी प्रॉडक्ट म्हणून गणले जाते.

बेटामॅक्स हा टेप व्हिडीओ रेकॉर्डिंग फॉरमॅट होता जो १९७५ मध्ये जपानमध्ये लॉन्च करण्यात आला होता. सहा महिन्यात हे प्रॉडक्ट अमेरिकेत लॉन्च करण्यात आले. परंतु ज्यावेळी बेटामॅक्स लॉन्च करण्यात आले त्यावेळी जेव्हिएसचा ‘व्ही एच एस’ हा रेकॉर्डिंग फॉरमॅट जो त्याचा प्रतिस्पर्धी होता, तो देखील लॉंच करण्यात आला होता. या दोन्ही फॉरमॅट मध्ये एक प्रकारे बाजारपेठेतील युद्धच छेडलं गेलं होतं.

बेटामॅक्सची पिक्चर क्वालिटी जरी चांगली होती, तरी लोकांनी स्वस्त दर असल्यामुळे व्हिएचएसला संधी दिली. व्हिएचएस एकीकडे १२० मिनिटे रेकॉर्ड करू शकत होता तर बेटामॅक्स फक्त ६० मिनिटे यामुळे बेटामॅक्स या स्पर्धेतुन बाहेर फेकला गेला.

२००२ पर्यंत हे प्रॉडक्ट पूर्णपणे तोट्यात गेले, असं असून देखील कंपनी याचे २०१६ पर्यंत उत्पादन करत होती. १९८० मध्ये सोनीने अजून मोठ्या प्रमाणवर विक्री करायला सुरुवात केली.

त्यांनी इलेक्ट्रॉनिक, म्युझिक, फिल्म, गेमिंग अशा कित्येक क्षेत्रात आपले हातपाय पसरले. १९८८ साली त्यांनी सीबीएस रेकॉर्ड्सची खरेदी केली आणि पुढच्याच वर्षी ३.४ अब्ज डॉलर्सला कोलंबिया पिक्चर्स खरेदी केले.

प्रत्येक डिलनंतर सोनीच्या वाट्याला यश येत होते असं नाही, बऱ्याचदा नुकसान ही सहन करावे लागत होते. अशावेळी नुकसान टाळण्यासाठी सोनीने एक पारंपरिक पद्धत बदलून २००५ साली हॉवर्ड स्ट्रिंजर यांची प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली. स्ट्रिंजर हे पहिले गैर जपानी होते, ज्यांची या पदावर नियुक्ती झाली होती. तसं तर स्ट्रेंजर यांना या पदाचा मोठा अनुभव होता पण  कंपनीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत होते.

स्ट्रिंजर यांनी सोनीच्या आर्थिक पडझडीला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी ९००० लोकांची कामावरून गच्छंती केली, त्यांनी कंपनीत बऱ्याच सुधारणा घडवल्या. प्रसिद्ध स्पायडरमॅन सिरीजचे मालकी व प्रदर्शन हक्क विकत घेतले. सोनीच्या परंपरेतून आलेले काही प्रॉडक्ट तरी देखील अपयशी ठरत होते.

सोनीचा महत्वपूर्ण भाग असलेला रोबोटिक्स मधील ‘ऐबो’ हा रोबोट डॉग सपशेल अपयशी ठरला होता. त्याची अत्यंत अत्यल्प विक्री झाल्याने कंपनीने त्याचे प्रोडक्शन बंद केले.

स्ट्रिंजर यांनी अनेक प्रयत्न करून देखील ते सोनीची पडझड थांबवू शकत नव्हते, हे लक्षात घेता २०१२ साली त्यांच्या जागी काझुओ हिरारी यांची नेमणूक करण्यात आली. त्यावेळी कंपनीत अशी भावना होती की गैर जपानी व्यक्तीपेक्षा जपानी व्यक्ती जास्त चांगल्या प्रकारे कंपनीत समन्वय साधू शकते.

हिरारी यांनी जबाबदारी स्वीकारली व ‘वन सोनी’ पॉलिसी हातात घेतली.

याद्वारे त्यांनी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक व्यवसायावरच जास्त लक्ष केंद्रित करून मोबाईल आणि गेमिंग तंत्रज्ञान विकासावर लक्ष केंद्रित केले. काही काळात त्यांनी व्हायो ही कॉम्प्युटर निर्मिती कंपनी विकली व तिचे २० दुकान बंद केले.

पुढे कंपनीची पडझड थांबून थोडी स्थिरता आल्यावर ३० वर्षीय केईचिरो योशिडा यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वर्णी लागली. त्यांच्या निवडीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण त्यांनी आपली जबाबदारी लीलया पेलली आहे असं दिसून येतं.

२०१९ च्या पहिल्या तिमाहीत सोनीने मोठा नफा कमावला होता. त्यांचं प्ले स्टेशन हे गेमिंग युनिट दिवसेंदिवस अपग्रेड होत चाललं आहे. त्याचा प्रतिसाद दुणावत चालला. भविष्यात अजून नवनवीन गोष्टी सोनी बाजारात आणणार आहे. काही त्यांच्या वॉकमन प्रमाणे क्रांतिकारी असणार आहेत.

दुसऱ्या महायुद्धानंतर एका साधारण दुकानापासून सुरू झालेला ‘ब्रँड’ नव्या युगाचा वाहक बनला, हा एकूण प्रवासच थक्क करणारा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!