कोणे एकेकाळी मॉडेलींग करणारा संदीप माहेश्वरी आज प्रसिद्ध ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ बनलाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


संदीप माहेश्वरी म्हटलं की डोळ्यासमोर येते आयुष्य मनमुराद जगण्याची उमेद. संदीप माहेश्वरी यांच्या आवाजातच असणारी प्रेरणा बऱ्याच तरुणांसाठी आशेचा स्त्रोत ठरलेली आहे. आपला आवाज, वाचन आणि जीवनाच्या शिकवणीचा अनुभव एकत्र करुन त्यांनी मांडलेले विविध मुद्दे तरुणाईच्या मनाचा ठाव घेतात. पण संदीप माहेश्वरी नेमके कोण आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नाही. ते फक्त प्रेरणादायी वक्तेच नाही तर एक उत्तम उद्योजक, उत्तम छायाचित्रकार आहेत हे खुप कमी लोक जाणतात.

भारतातील प्रसिध्द युट्युबर्सपैकी एक असलेले संदीप माहेश्वरी हे त्यांच्या प्रेरणादायक चर्चा आणि यूट्यूब व्हिडिओंसाठी ओळखले जातातच, परंतू भारतात सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या उद्योजकांपैकी एक म्हणुनही त्यांना ओळखले जाते. त्यांनी इमेजेसबाजार.कॉम या संकेतस्थळाची स्थापना केली. संदीप माहेश्वरी हे भुवन बाम, आशिष चंचलानी यांसारख्या देशातील सर्वात मोठ्या युट्युबर्सपैकी एक आहेत. त्यांच्या सब्सक्राईबरची संख्या आता १७ दशलक्ष एवढी मोठी झाली आहे.

संदीपच्या स्वत:च्या वेबसाइटवर, स्वतःची ओळख करुन देताना ते असे सांगतात –

‘संदीप माहेश्वरी हे कोट्यावधी नावापैकी एक आहेत ज्यांनी संघर्षाच्या, अयशस्वी झालेल्या आणि यशाच्या शोधात प्रगती केली आहे. कोणत्याही मध्यमवर्गीय मुलाप्रमाणेच त्यांनाही अनेक अस्पष्ट स्वप्ने आणि जीवनातील ध्येयांची अस्पष्ट दृष्टी होती. स्वत: चे रक्षण करण्यासाठी म्हणुन नविन गोष्टी शिकण्याची त्यांना आवड होती. आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांनीच त्यांना खरे आयुष्य जगण्याची पद्धत शिकवली.’

संदीप माहेश्वरीच्या वेबसाइटनुसार त्यांच्या कुटुंबाचा अल्युमिनियमचा व्यवसाय होता, पण नंतर तो फसला होता. त्यानंतर सर्व जबाबदारी संदीप माहेश्वरी यांच्यावर पडली. अशा परिस्थितीत संदीप माहेश्वरीने एका तरुणाने कुटूंबासाठी कराव्या अशा सर्व गोष्टी केल्या. अगदी एका बहुस्तरीय मार्केटिंग कंपनीत काम करण्यापासून ते घरगुती वस्तू बनविणे आणि विक्री करणे सगळं केलं.

दरम्यान, संदीप माहेश्वरीला ‘आयुष्य नेमकं चालतं कसं..?’ या विषयाची आवड निर्माण झाली. नंतर त्यांनी दिल्लीतील किरोडीमल कॉलेजमधून बी. कॉमची पदवी अर्धवट सोडली.

वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी काही दिवस मॉडेलिंगही केली. पण मॉडेलिंग विश्वातील शोषण पाहून त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी निर्णय घेतला की ते आयुष्यात मॉडेल्सचे जीवन बदलण्यासाठी कार्य करतील आणि त्यांना शोषणाच्या बळी पडू देणार नाहीत.

त्यानंतर त्यांनी फोटोग्राफीचा कोर्स घेतला आणि ते फोटोग्राफर झाले. त्यानंतर त्यांनी ‘माश ऑडिओ व्हिज्युअल प्रायव्हेट लिमिटेड’ नावाची कंपनी उघडली आणि मॉडेल्सचा पोर्टफोलिओ तयार करण्यास सुरवात केली.

२००२ मध्ये त्यांनी आपल्या तीन मित्रांसह आणखी एक कंपनी उघडली, जी केवळ ६ महिन्यांतच बंद झाली. त्यावेळी संदीप फक्त २१ वर्षांचे होते. २००३ मध्ये त्यांनी केवळ १० तास ४५ मिनिटांमध्ये १२२ मॉडेल्सचे १०,००० छायाचित्र काढले आणि विश्वविक्रम रचला.

२००६ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी संदीपने इमेजेसबाजार.कॉम सुरू केले. संदीप माहेश्वरीच्या संकेतस्थळावर असा दावा करण्यात आला आहे की हा भारतीय छायाचित्रांचा सर्वात मोठा संग्रह आहे आणि त्यावर १० लाखाहून अधिक छायाचित्रे उपलब्ध आहेत. संकेतस्थळानुसार, या संकेतस्थळाचे ४५ वेगवेगळ्या देशांमध्ये ७००० ग्राहक आहेत.

एक यशस्वी उद्योजक, उत्तम छायाचित्रकार तर ते आहेतच पण या व्यतिरिक्त, ते लाखो तरुणांसाठी एक मार्गदर्शक आणि आदर्श आहेत. अनेक खचलेल्या तरुणांसाठी आशेचे प्रतीक आहेत. ‘जीवन खूप अवघड आहे’ हे अगदी खोटे असुन ते किती सोपं आणि सुंदर आहे हे संदीप आपल्या व्हीडीओमधून लोकांना पटवून देत असतात. जीवन जगायचं कसं हे सांगणं सोपं आहेच, त्यापेक्षाही जास्त सोपं आहे ते जगणं असं ते सांगतात.

संदीप माहेश्वरी हे १.७ कोटी यूट्यूबचे ग्राहक असणारे पहिले भारतीय नाहीत. त्यांच्याआधी अनुक्रमे अमित भडाना, भुवन बाम, गौरव चौधरी आणि आशिष चंचलानी यांनी ही कामगिरी केली आहे.

तथापि, संदीपने इतर क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आणि त्यांच्या यशासाठी त्यांना २०१३ मध्ये ‘आंत्रप्रेन्योर इंडिया समिट’कडून ‘क्रिएटिव्ह आंत्रप्रेन्योर’ पुरस्कार मिळाला. ‘बिझिनेस वर्ल्ड’ मासिकाने त्यांचे वर्णन भारताच्या ‘अत्यंत प्रतिबद्ध उद्योजकांपैकी एक’ म्हणून केले आहे. बर्‍याच टीव्ही चॅनेल्स आणि मासिकांनी त्यांची मुलाखतही घेतली आहे.

डॉक्टर, इंजिनिअर, वकील, शिक्षक या मोजक्या क्षेत्रात काहीतरी करुन दाखविण्याची उमेद असणाऱ्या भारतीय तरुणांना यापलीकडे असलेलं अफाट विश्व दाखवण्यात संदीप माहेश्वरी यांचा खुप मोठा हात आहे. स्वत:ची आवड जोपासत पैसाही कमावता येतो हे त्यांनी भारतीय तरुणांना दाखवून दिले. स्वत: काहीतरी मिळवलं की त्याचं गुपित स्वत:कडेच न ठेवता ज्याला त्याची गरज आहे त्याला ते मिळावं म्हणुन ते नेहमी प्रयत्न करत असतात. आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांपासुन काय शिकावं आणि कसं शिकावं हे समजून घेण्यासाठी ते एक ऊत्तम प्रेरणास्त्रोत आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!