या एका युक्तीमुळे वाॅशिंग पावडर निरमा ‘सबकी पसंद’ बनली

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


“हेमा रेखा जया और सुषमा,
सबकी पसंद निरमा
वॉशिंग पावडर निरमा…”

आजही हे गाणं घराघरात लोकप्रिय आहे. तुम्ही निरमा पावडर वापरत असाल किंवा नसाल पण तुम्हाला हे गाणं माहिती असायलाच पाहिजे.

हे गाणं, जाहिरातीमध्ये पांढरा शुभ्र फ्रॉक घालून गोलगोल फिरणारी छोटीशी मुलगी याच्या जोरावर संस्थापक करसनभाई पटेल यांनी संपूर्ण भारतातील गृहिणींचं लक्ष निरमाकडे वेधलं होतं. त्यांनी लवकरच त्याकाळी असलेल्या सगळ्या मोठ्या ब्रॅण्ड असलेल्या कंपन्यांना मागे टाकले.

१९६९च्या काळात हिंदुस्तान लिव्हर लिमिटेडच्या (हिंदुस्तान युनीलिव्हर) “सर्फ” या पावडरने सगळं मार्केटवर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले होते.

एका साबणाच्या वडीचे त्याकाळात १०-१५ रुपये लागायचे. पण ही वडी तुमच्या कापड्यांवरील सगळे डाग लगेच तर काढायचीच पण या वडीने तुमचे हातसुद्धा रखरखीत होत नसत.

कितीही फायदेशीर असली तरी ७०च्या दशकात १०-१५ रुपये एका साबणाच्या वडीसाठी खर्च करणे ही खूप मोठी गोष्ट होती. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला न परवडणारी. त्यामुळे बहुतांश लोक अजूनही साध्या साबणालाच प्राधान्य देत होते.

करसनभाई पटेल हे सुद्धा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य होते. ते गुजरात सरकारच्या खनिकर्म आणि भूविज्ञान विभागात रसायनशात्रज्ञ होते. त्यांनासुद्धा हा महागड्या साबणाचा खर्च परवडणारा नव्हता.

डिटर्जंटच्या बाजारात उतरण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यांचं उद्दिष्ट एकच होतं की सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा किंमतीचं पण चांगल्या दर्जाचं साबण उपलब्ध करून द्यायचं. त्यांनी याची सुरुवात स्वतःच्या घरातच केली.

अहमदाबादला आपल्या घरातच त्यांनी हे साबण बनवायला सुरुवात केली. त्यांनी एक सूत्र विकसित केलं ज्याचं फळ होतं पिवळ्या रंगाचं डिटर्जंट पावडर. या पावडरची किंमत होती फक्त ३ रुपये.

पटेल यांनी या साबणाचं नाव आपली दिवंगत मुलगी निरुपमा पटेल हिच्या नावावरून निरमा ठेवलं.

त्यांनी हे साबण अक्षरशः घराघरात पोहचवलं. शेजारीपाजारी जाऊन ते हे साबण विकत घ्यायला लोकांना मनवायला लागले. त्यासाठी त्यांनी नाही पटलं तर पैसे परत करण्याचीसुद्धा तयारी दर्शवली.

हळूहळू निरमाचं नाव सगळीकडे पसरू लागलं. कमी किंमतीत पण चांगल्या दर्जाचा माल असल्यामुळे निरमा अहमदाबादमध्ये चर्चेचा विषय ठरला.

निरमाचे हे यश बघून पटेल यांनी आपली सरकारी नोकरी सोडून याच धंद्यात उतरण्याचा निर्णय घेतला. पण कुठलाही व्यापार करणे इतके सोपे नसते. सरकारने काही नियम घालून दिलेले. पण ते पाळून, व्यापार उभा करणे त्यावेळी पटेलांना शक्य नव्हते. तसे केले असते तर त्यांना प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असते.

पण हार मानेल तो गुजराती माणूस कसला.

त्यांनी यातूनही एक मार्ग काढला. अहमदाबादमध्ये निरमाचा खप चांगला होता, पण निरमाला भारताच्या घराघरात पोहचवण्यासाठी एक उपाय त्यांना दिसत होता.

त्याकाळी टीव्ही जवळजवळ सगळीकडे पोहोचला होता. याचाच फायदा करून घ्यायचं पटेल यांनी ठरवलं. त्यांनी टीव्हीवर जाहिरात दाखवायला सुरुवात केली.

तेव्हापासूनच पांढऱ्या फ्रॉक घालून गोलगोल फिरणारी मुलगी “सबकी पसंद” बनली.

ही जाहिरात सगळ्यांना प्रचंड आवडली. बाजारात निरमा साबण खरेदी करायला एकच गर्दी उसळली. पण करसनभाईंनी ९०% माल बाजारातून काढून घेतला. जेणेकरून लोकांना असं वाटेल की खप जास्ती आहे आणि मागणी अजून वाढेल.

याचा त्यांना हवा तो परिणाम झाला. जवळपास महिनाभर लोक “सबकी पसंद” टिव्हीवर बघत होते पण बाजारात निरमा फार कमी प्रमाणात उपलब्ध असायचं. साहजिकच लोकं दुकानदारांकडे सारखी चौकशी करून माल मागवण्यासाठी मागे लागायचे.

शेवटी सगळे दुकानदारांनी पटेलांना निरमाचा माल उपलब्ध करण्याची विनंती केली. त्यांनी बरोबर महिनाभर जाहिरात चालवून साठवून ठेवलेला माल बाजारात आणला.

इतके दिवस लोकांनी वाट बघितल्यामुळे सहाजिकच लोक खरेदी करायला लगेच बाजारात धावले. निरमाचा खप एकदम वाढला.

त्यावर्षी सर्फला मागे टाकत निरमा भारतात सगळ्यात जास्ती विकलं जाणारं डिटर्जंट पावडर बनलं. या एका युक्तीमुळे जवळपास संपूर्ण दशक त्यांनी मार्केटमधील आपली जागा कायम ठेवली.

व्यवसाय म्हटला की चढउतार आलेच. तसे निरमाच्या बाबतीतही झाले. पण पटेलांनी फार त्याची काळजी नाही केली. त्यांना फक्त पावडरवर थांबायचं नव्हतं. त्यांनी साबण वडी, शाम्पू, टूथपेस्ट सगळं काही बनवायला सुरुवात केली.

यातले सगळेच उत्पादन चाललेच असं नाही. पण निरमाने मात्र आपले मार्केटमधले स्थान अढळ ठेवले. आजही जवळपास ५५% मार्केट शेअर निरमा साबण आणि पावडरच्या नावावर आहेत.

१९९५मध्ये पटेलांनी अहमदाबाद येथे निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरू केले तर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि निरमा युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी उघडले.

त्यांच्या मुलीच्या नावानी सुरू करण्यात आलेला हा व्यवसाय उत्तरोत्तर वाढत जातो आहे.

पटेलांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१०मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव केला. २००७-२०१७ पर्यंत फोर्ब्स मासिकाच्या सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीतदेखील त्यांचे नाव होते.

कुठलीही मॅनेजमेंटची पदवी नसताना, व्यवसाय करण्याचा काहीही अनुभव नसताना. अगदी घरात माल बनवायला सुरुवात करून करसनभाईंनी केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर लोकांची नस पकडून सगळ्या मोठमोठ्या ब्रँडला मागे टाकले.

अक्षरशः दारोदारी विकून नाव कमावलेल्या निरमाने आज भारतात “सबकी पसंद” म्हणून आपलं एक अढळ स्थान निर्माण केले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!