आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
हर्षद शांतीलाल मेहता.
मुंबईचं प्रतिष्ठित स्टॉक मार्केट आपल्या बोटांवर नाचवणारा. ज्या शेअर बाजाराने मी-मी म्हणणाऱ्यांना जेरीस आणलं, प्रसंगी कित्येक लोकांना रस्त्यावर आणलं त्या शेअर बाजाराचा बेताज बादशाह म्हणून त्याला ओळखलं जात होतं.
- सेल्स पर्सन ते बॉम्बे स्टॉकचा दलाल.
- गुंतवणूकदारांना नफ्याची १००% हमी देणारा.
- स्टॉक मार्केटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार.
- ७२ गुन्हेगारी स्वरूपाचे खटले.
हे त्याचं प्रगतीपुस्तक.
लोक पैसे कमवण्यासाठी स्वतःचा पैसा शेअर बाजारात लावतात, मेहताने मात्र पैसे कमवण्यासाठी संपूर्ण शेअर बाजारालाच कामाला लावलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
त्याने जेव्हा-जेव्हा शेअर्स (कंपन्यांचे समभाग) विकत घेतले तेव्हा-तेव्हा स्टॉक मार्केटच्या निर्देशांकाने (SENSEX) ‘न भुतो न भविष्यती’ उसळी घेतली आणि जेव्हा त्याने स्वतःकडील शेअर्स विकायला काढले तेव्हा निर्देशांकात ऐतिहासिक घसरण नोंदवली गेली.
हा असा हर्षद मेहता काय एका रात्रीत तयार झाला नाही. त्याचा सेल्स पर्सन ते दलाल हा प्रवास अचंबित करणारा आहे. मेहताने सुरुवातीच्या काळात होजीअरी, सिमेंट, हिरे व्यापार क्षेत्रामध्ये सेल्सचं काम केलं.
१९८० च्या दशकात एनआयएसीएल (New India Assurance Company Limited) मध्ये सेल्सचं काम करताना त्याला स्टॉक मार्केटविषयी कुतुहुल निर्माण झालं. सेल्सची नोकरी सोडून त्यानं एका कंपनीमध्ये दलाल (broker) म्हणून काम सुरू केलं.
तिथे त्याची ओळख ‘प्रसन्न प्राणजिवनदास’ नावाच्या कसलेल्या दलालाशी झाली. पुढे हाच मेहताचा ‘गुरू’ झाला व त्याने त्याला शेअर बाजाराची बाराखडी शिकवली. पुढील दहा वर्षे मग त्याने वेगवेगळे अनुभव घेण्यात, शिकण्यात घालवले.
१९८४ साली मेहताने अधिकृत दलाल म्हणून स्वतःचं नाव नोंदवून घेतलं आणि ‘ग्रो मोअर रिसर्च अँड असेट मॅनेजमेंट’ नावाची कंपनी स्थापन केली आणि पुढील काही वर्षात सामान्य लोकांसोबतच अति महत्वाच्या व्यक्तीही त्याच्या फर्ममध्ये पैसे गुंतवू लागल्या.
त्याने ACC (Associated Cement Company) या नवख्या कंपनीच्या शेअर्सची प्रचंड प्रमाणात खरेदी सुरू केली आणि तीन महिन्यातच खरेदी केलेल्या त्या शेअर्सची किंमत ₹२०० प्रति शेअर पासून ₹९००० प्रति शेअर इतकी प्रचंड झाली. विकत घेतलेले शेअर्स परत विकून त्याने यातून खूप नफा मिळवला.
त्यानंतर एक सत्रच सुरू झालं मेहता ज्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायचा त्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती भविष्यात गगनाला भिडत असत. त्याचं हे शेअर बाजारातील नैपुण्य पाहून त्याला ‘द बिग बुल’ असं म्हटलं जाऊ लागलं.
त्याने नवीन, डबघाईला आलेल्या व फारसं भविष्य नसलेल्या कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी करून त्यांना शेअर बाजाराच्या तक्त्यावर वरचं स्थान मिळवून दिलं.
पण हे त्याला जमायचं कसं…?
मेहता कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर खरेदी करायचा ज्याच्यामुळे शेअर्सची बाजारातील मागणी वाढायची आणि बाजारात त्या कंपनीच्या शेअर्सचा कृत्रिम तुडवडा निर्माण व्हायचा. स्वाभाविकपणे मागणी जास्त असलेल्या पण तुलनेने कमी पुरवठा असलेल्या शेअर्सच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ व्हायची आणि या संधीचा फायदा घेऊन मेहता स्वतःकडील शेअर्स विकून त्यातून बक्कळ कमाई करायचा.
पण एवढ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायचे म्हटल्यावर भरपूर पैसे लागणार ही एक मोठी समस्या होती. परंतु मेहताने त्यासाठी एक शक्कल लढवली.
त्याकाळी बँकांना शेअर बाजारात प्रत्यक्ष गुंतवणूक करायची परवानगी नसायची त्यांना त्यासाठी दलालामार्फत पैसे गुंतवावे लागत. मेहताने स्वतःचे नाव व ओळखीचा वापर करून बँकांना लक्ष्य केलं. मेहता बँकांना नफ्याचं आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करत असे व बँकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपये स्वतःच्या खाजगी खात्यात घ्यायचा व या पैशांच्या साहाय्याने प्रचंड प्रमाणात शेअर्सची खरेदी करायचा आणि नंतर फायदा मिळवून बँकांना त्यांचे पैसे परत करायचा.
त्याने बनावट बँक रिसीटच्या माध्यमातून बँकांकडून हजारो कोटी रुपये मिळवले व त्या पैशांच्या जोरावर तो संपूर्ण शेअर बाजार नियंत्रित करू लागला.
थोड्या काळातच तो प्रसिद्ध झाला. मोठमोठ्या वर्तमानपत्रांमध्ये, नियतकालिकांमध्ये त्याच्या यशाची गाथा सांगणारे लेख व त्याच्या मुलाखती झळकू लागल्या. त्याचं राहणीमानही श्रीमंतांना लाजवेल असे आरामदायक आणि भव्य झालं.
मेहताचं भिंग फुटलं ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखामुळे. सुचेता दलाल नावाच्या पत्रकाराने लिहिलेल्या या लेखात मेहता कसं शेअर बाजराला चुकीच्या पद्धतीनं वापरून घेतो आणि लागणारा पैसा कसा बँकांना फसवून मिळवतो याचं सविस्तर वर्णन केलं आणि मग मेहताच्या कारकिर्दीचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली.
CBI आणि सेबीने मेहताची कसून चौकशी केली. त्याच्यावर ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले.
१९९९ साली न्यायालयाने मेहताला दोषी ठरवून एका खटल्यात त्याला ५ वर्षाच्या सश्रम कारावसाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा भोगतानाच त्याचा २००१ साली मृत्यू झाला.
आताही विविध न्यायालयामध्ये मेहता आणि त्याच्या सहकाऱ्यांवर खटले चालू आहेत. या घटनेने बँकिंग प्रणाली व स्टॉक मार्केटमधील अनेक त्रुटी, कच्चे दुवे आणि पळवाटा समोर आणल्या. यातून शिकवण घेऊन सेबी आणि बँकांनी नियमांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले.
अशा या शेअर बाजारातील मोठया घोटाळ्याने शेअर बाजारचं चित्रच पालटून टाकलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.