आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
पृथ्वीवरील बेटं बऱ्याचदा आपल्या आकर्षणाची केंद्रबिंदू ठरतात, चहू बाजूंनी असीमित समुद्र, नारळाची गगनचुंबी झाडं, स्वछ सूर्यप्रकाश आणि झोंबणारं समुद्री वारं, यांमुळे कोणत्याही बेटावर गेल्यानंतर स्वर्गसुखाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. बेटं बोलतात. होय. कदाचित आश्चर्य वाटेल, पण ऐकण्याची क्षमता असेल तर निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आवाज तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकतो.
जसं सह्याद्रीत फिरणाऱ्या लोकांच्या कानात तो प्राचीन पर्वत काहीतरी गुणगुणत असतो, आणि मग त्या मुळेच पुढे जाऊन इतिहासाची पुस्तकंच पुस्तकं लिहिली जातात. त्याच प्रमाणे ही बेटं, त्यांच्या भोवतालचा समुद्र आणि अशाच अन्य काही निसर्गातील मानव”पीडित” गोष्टी माणसाला आपल्या व्यथा सांगण्याचा प्रयत्न करताहेत.
असाच एक द्वीपसमूह मार्शल द्वीपसमूह, या द्वीपसमूहात २३ बेटं सुमारे ५९४ स्क्वेअर किलोमीटरवर पसरली आहेत. बिकिनी ऐटोल याच द्वीपसमूहातील जवळजवळ निर्मनुष्य असलेली जागा. कोरल रिफ म्हणजे समुद्रतळामध्ये दगडांच्या विशिष्ट रचनेमुळे आणि शेवाळांच्या अनियंत्रित वाढीमुळे तयार झालेला भूभाग.
जमिनीवरील समुद्रकिनारी जसा भूभाग आपल्याला पाहायला मिळतो तसाच तरी गोलाकार असलेलं हे बिकनी ऐटोल नावाचं कोरल रिफ. बिकनी ऐटोल हे रॅलीक चेनचं उत्तरेकडील टोक आहे, जे रिपब्लिक ऑफ मार्शल आईसलॅंड्स या देशाच्या मजूरो या राजधानीच्या शहरापासून ८५० किलोमीटरवर आहे.
पूर्वी या ठिकाणी वस्ती असल्याचं आपल्याला आढळून येतं, पण दुसऱ्या वैश्विक युद्धानंतर, १९४६ मध्ये ऐटोलच्या मूळ रहिवाश्यांना स्थलांतरित करण्यात आलं, आणि १९४६ ते १९५८ दरम्यान अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी याच ठिकाणी तब्बल २३ अणुचाचण्या केल्या. १९७० मध्ये बिकनी ऐटोलवर सुमारे १०० रहिवासी असलेल्या तीन कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात आलं. पण ज्या ठिकाणी अणुचाचण्या झाल्या आहेत तिथे किरणोत्सारी पदार्थांचा प्रभाव हजारो वर्षंसुद्धा राहू शकतो.
७ वर्षांनंतरच मे १९७७ मध्ये वैज्ञानिकांना तिथल्या विहिरीच्या पाण्यात स्ट्राँटियम – ९० या किरणोत्सारी पदार्थाचे मोठे प्रमाण आढळले. स्ट्राँटियम – ९० हा स्ट्राँटियमचा आयसोटोप अणू विखंडनाच्या (न्यूक्लिअर फिशन) प्रक्रियेतून तयार होतो, त्या प्रमाणेच स्थानिकांच्या शरीरातही मोठ्या प्रमाणात सिजियम-१३७ हा सिजियमचा आयसोटोप मोठ्या प्रमाणात सापडला. या स्थानिकांना १९८० साली तिथून बाहेर काढण्यात आलं.
अधूनमधून काही वैज्ञानिक आणि डायव्हर्स या ठिकाणी भेट देतात. आपण सर्वानीच लहानपणी स्पन्जबोब स्क्वेअरपॅन्ट्स हे कार्टून नक्कीच पाहिलं असेल, त्यातील सतत दिसणाऱ्या समुद्रतळाची कल्पना याच बेटावरून आणि कोरल रिफ वरून आली आहे. तसेच बिकनी ऐटोलला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
जर्मन न्यू जिनुआ या वसाहतीचा भाग असताना या कोरल रिफचं नामकरण बिकिनी एटॉल असं झालं, हे जर्मन नाव मार्शलीज या भाषेतून भाषांतरित करण्यात आलं आहे, हे मार्शलीज नाव ‘पिकिनी’ असं होतं, पैकी पिक म्हणजे पृष्ठभाग आणि नी म्हणजे नारळ. अर्थात नारळांचा पृष्ठभाग!
सुमारे ३६०० वर्षांपासून या ठिकाणी मानवाचा अधिवास असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. अमेरिकी सैन्यदलातील अभियांत्रिकी विभागात काम करणारा पुरातत्त्वशास्त्रज्ञ चार्ल्स स्ट्रॅकला या ठिकाणी कोळशाचे तुकडे, माशांची हाडं, शिंपल्यासारखी काही कवचं आणि काही कलाकृती भूगर्भात १ मीटर वर सापडल्या. या कलाकृतींचं कार्बन डेटिंग केल्यानंतर त्यांचं काळ सुमारे ख्रिस्तपूर्व १९६० आणि १६५० दरम्यानचा असल्याचं निदर्शनास येतं.
सप्टेंबर १५२९ मध्ये स्पॅनिश खलाशी आल्वारो-डे-सावेद्रा हा या बेटांचं दर्शन झालेला पहिला युरोपीय माणूस होता. तो त्याच्या ला फ्लोरिडा या जहाजावरुन न्यू स्पेन या ठिकाणी जात होता. या नंतर १७८८ मध्ये ब्रिटिश नौदलाधिकारी जॉन मार्शल आणि थॉमस गिल्बर्ट यांनी मार्शल्स बेटे अंशतः शोधून काढले.
ऐटोल पाहणारा सर्वप्रथम पाश्चिमात्य माणूस जर्मन कॅप्टन आणि शोधक प्रवासी ओटो कोटझेब्यू रशियन साम्राज्यासाठी नौकानयन करत १८२०च्या दशकात सर्वप्रथम येथे आला. त्याने ऐटोलला १८१६ आणि १८१७ दरम्यान तीन भेटी दिल्या. त्याने या एटॉलचे नामकरण आपल्या जहाजावरील निसर्गवादी व्यक्तीच्या नावावरून केले आणि या ऐटोलला एस्कोल्ट्झ ऐटोल म्हणून ओळखले जाऊ लागले. जर्मन लोकांनी या ऐटोलचा उपयोग खोबरेल तेलाच्या निर्मितीसाठी केला. आणि मोठ्या प्रमाणात येथे नारळाचे उत्पादन येत असल्याने त्यांनी स्थानिकांना आपल्या व्यापारात सामील करून घेतले.
पुढे १८५७च्या सुमारास या ठिकाणी ख्रिश्चन मशिनरींचं येणं सुरु झालं आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात या द्वीपसमूहांवर धर्मप्रसार करून स्थानिक धर्म हळू हळू संपवला.
१८९९ च्या स्पॅनिश-जर्मन तहानुसार कॅरोलिन द्वीपसमूह, मारियाना द्वीपसमूह, पलवू द्वीपसमूह हे जर्मनीला विकले आणि त्या नंतर हा द्वीपसमूह जर्मन न्यू जिनुआ या वसाहतीच्या अंमलाखाली आणण्यात आला.
पहिल्या महायु*द्धादरम्यान सन १९१४ मध्ये इंपिरियल जपानी नौदलाने बिकिनी ऐटोलचा ताबा मिळवला, त्यांनी ‘साऊथ सी मॅंडेट’नुसार बेटांचं प्रशासन चालवलं, पण तरी दुसऱ्या वैश्विक यु*द्धापर्यंत बहुतांश निर्णय त्यांनी स्थानिक नेत्यांवरच अवलंबून ठेवले होते.
दुसरं महायु*द्ध सुरु झाल्यानंतर जपानसाठी मार्शल द्वीपसमूह रणनैतिक दृष्टीने महत्वाचं ठिकाण बनलं, जपानी मुख्यालय असलेल्या क्वाजेलिन ऐटोलच्या सुरक्षेसाठी जपानी सैन्याने याच ठिकाणी एक टेहळणी बुरुज उभारून त्यावर सैन्य तैनात केलं, अमेरिकेकडून होणाऱ्या संभाव्य ह*ल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली.
सन १९४४ पर्यंत हे द्वीपसमूह यु*द्धापासून यु*द्धविरहित होते. पण अमेरिकन सैन्याने फेब्रुवारी १९४४ मध्ये या द्वीपसमूहावर ताबा मिळवला. यु*द्धाचा परिणाम असा झाला, फक्त पाच जपानी सैनिक बिकिनी ऐटोलवर राहिले होते त्यांनीही शरणार्थी होण्यापेक्षा आत्मह*त्येचा पर्याय स्वीकारला.
या नंतर १९४६ ते १९५८ दरम्यान जागतिक अ*ण्वस्त्रस्पर्धेमुळे अमेरिकेने या बिकनी ऐटोलचा उपयोग अ*ण्वस्त्र चाचण्यांसाठी केला, ज्यामुळे तिथलं समुद्री जीवन धोक्यात आलं, आणि अन्य सजीवसृष्टीवरही मोठा परिणाम झाला. यानंतर अनेक वेळा अमेरिकेच्या असंवेदनशीलतेमुळे स्थानिक लोकांना अन्नपाण्याविना, रोगी प्रकृतीत जगावं लागलं, अनेकदा या स्थानिकांना एका बेटावरून दुसऱ्या बेटावर स्थलांतरित व्हावं लागलं, महासत्तेकडे लक्ष असणाऱ्या जगाने या “माणसांना” बहुधा जगण्याचे “हक्कच” देऊ केले नाहीत.
सन १९४८ मध्ये हवाई विद्यापीठातील एक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉक्टर मसून यांनी या द्वीपसमूहातील रोंगेरीक ऐटोलला भेट दिली, आणि तिथली परिस्थिती पाहून ते भयभीत झाले. एका स्थानिकाने त्यांना सांगितले: “आम्हाला काहीच मासे इथे मिळतात, मग संपूर्ण समुदायाला तुटपुंज्या प्रमाणातील ते अन्न वाटून घ्यावं लागतं, इथले मासेही खाण्यायोग्य नाहीत, त्यांनी खाल्लेल्या अन्नामुळे ते विषारी बनलेत, ज्यामुळे आम्ही आजारी पडतो, आम्हाला काही जाणवतच नाही आणि हात पाय सुन्न पडून जातात. जास्त आजारी असल्याने सकाळी उठून आमच्या नावांकडे जाईपर्यंत आम्ही आम्ही वाटेत कुठेतरी पडतो. त्यानंतर आम्ही या अमेरिकी माणसांना अन्न आणायला सांगितलं होतं, आम्ही मरणासन्न अवस्थेत आहोत, पण त्यांनी काही आणलं नाही”.
यानंतर डॉक्टर मसून यांनी अमेरिकेत या ठिकाणी अन्न पोहोचवण्याची विनंती केली, पण अमेरिकी प्रशासनाने आणि नौदलाने अनेकदा या लोकांना कधी युजेलान्ग एटॉल, कधी एनेवेटक एटॉल, कधी क्वाजलेन एटॉल अशा ठिकाणी स्थलांतरं सुरु ठेवली.
या सगळ्याचा विचार करून १९४७ मध्ये अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने ‘ट्रस्ट टेरिटरी ऑफ पॅसिफिक आइसलँड’ नावाचा एक स्ट्रॅटेजिक ट्रस्ट स्थापन केला, जेणेकरून या द्वीपसमूहांना मदत होऊ शकेल. १९५१ पर्यंत अमेरिकेच्या नौदलाने या ट्रस्टचं नेतृत्व केलं, त्यानंतर युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ इंटेरियर ने याचं नेतृत्व १९९४ पर्यंत केलं.
१९४८ मध्ये या स्थानिक लोकांनी किली बेट हे आपलं राहण्याचं ठिकाण म्हणून निवडलं, त्यांनी याची दीर्घकालीन निवड केली होती. जून महिन्यात त्यांच्या पैकी काही जणांनी केली बेटावर येऊन गावांचं बांधकाम करायला सुरुवात केली. आणि नोव्हेंबर १९४८ मध्ये सुमारे १८४ लोक किली बेटावर स्थलांतरित झाले. येथे सुयोग्य पद्धतीने मासेमारी करता येत नाही हे स्थलांतरित झालेल्या लोकांना लवकरच समजलं. किली बेटावर येणं हे त्यांच्या दृष्टीने त्यांच्या संस्कृतीला मारक ठरलं.
१९४९ मध्ये ट्रस्ट टेरिटरी ऑफ पॅसिफिक आइसलँडने या स्थानिकांना १२ मीटर लांब बोट देऊ केली, जेणेकरून ते किली बेटावरून जॅलूट एटॉल या ठिकाणी खोबरं आणि काही फळं पोहोचवू शकतील, पण काही महिन्यातच ती बोटही खोबरं आणि अन्य फळांच्या ओझ्याने निकामी झाली. त्या नंतर ट्रस्ट टेरिटरी ऑफ पॅसिफिक आइसलँडच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हवेतून अन्न पुरवठा सुरु करण्यात आला. पण या अन्नपुरवठ्यावर अवलंबून राहणं हे स्थानिकांवर एक प्रकारे “थोपलं” गेलं होतं.
१९५६ मध्ये पुन्हा ट्रस्ट टेरिटरी ऑफ पॅसिफिक आइसलँडने काही बोटी त्यांना देऊ केल्या, अतिशय कठीण हवामानात आणि सतत उसळलेल्या समुद्रात या बोटींनी तग धरली नाही. या नंतर अमेरिकेने स्थानिकांना जॅलूट एटॉल या ठिकाणी स्थलांतरित व्हायचा सल्ला दिला, काही लोकांनी तो एकलाही, पण बहुतेकांनी ते नाकारलं.
१९६८ मध्ये शास्त्रज्ञांनी बिकिनी एटॉलवरील किरणोत्सर्गाचा स्तर कमी झालाय असं सांगितलं, पण १९७७ मध्ये किरणोत्सर्गाचा प्रभाव जाणवल्याने पुन्हा या लोकांना किली बेटावर स्थलांतरित करण्यात आलं
१९७५ नंतर अमेरिकेने ट्रस्ट टेरिटरी ऑफ पॅसिफिक आइसलँडसारखे अनेक ट्रस्टस स्थापन करून किली बेटावरील लोकांना आर्थिक आणि बाकी सर्व प्रकारची मदत देऊ केली.
२०१३ नंतर याठिकाणी प्रयत्न व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढला. आणि आता हे द्वीपसमूहाचे देश प्रगतीपथावर आहेत.
जागतिक अण्वस्त्र स्पर्धेमुळे आणि हानिकारक अणू कार्यक्रमांमुळे मानवाच्या होणाऱ्या नुकसानीचा हा फक्त ट्रेलर आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, अजूनही मानवाने आण्विक शक्तीचा गैरवापर सुरूच ठेवला तर संपूर्ण जगाची स्थिती या द्वीपसमूहांसारखी होण्यास वेळ लागणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.