आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
गेली पन्नास वर्षे अमूल हा देशातील नंबर वन ब्रँड राहिला आहे. ‘द टेस्ट ऑफ इंडिया’ ही अमूलची टॅगलाईन आज एक वास्तव बनले आहे. देशपातळीवर दुग्धजन्य पदार्थांची एवढी मोठी व्हरायटी उपलब्ध करून देणारा अमूल हा एकमेव ब्रँड असावा असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. पण, अमूलचा आयकॉन बनलेली छोट्या ठिपक्याठिपक्यांचे पालके घालणारी वर रिबीन लावलेली अमूल गर्ल देखील आज पोलक्यातील अमूल गर्लची निर्मिती कशी झाली हे जाणून घेणेही गमतीशीर वाटेल.
आजही ही अमूल गर्ल हजारो भारतीयांचा गळ्यातील ताईत आहे. तिच्या विडंबनात्मक शैलीने आजही ती आपले लक्ष वेधून घेते.
इतर जाहिराती आणि अमूलची जाहिरात यात मुलभूत फरक आहे तो या अमूल गर्लच्या विडंबनात्मक भाषाशैलीचा.
डॉ. वर्गीज कुरियन यांना देशातल्या श्वेतक्रांतीचे जनक मानले जाते. अमूलचे खरे शिल्पकार डॉ. कुरियन हेच आहेत. १९४९ साली भारत सरकारने गुजरात मधील आनंद येथे डेअरी व्यवस्थापन पाहण्यासाठी त्यांची नेमणूक केली. त्यांचा प्रेरणेतून जगातील एक मोठी डेअरी प्रकल्प सुरु झाला. १९५५ साली म्हशीच्या दुधावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ बनवणारी पहिली डेअरी सुरु झाली.
अमूल्य या संस्कृत शब्दापासून अमूल हा शब्द जन्मास आला. अमुल्य म्हणजे मौल्यवान. कैरा युनियन तर्फे बनवल्या जाणाऱ्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी या नावाचा ब्रँड वापरला जाऊ लागला.
१९५७ मध्ये हा ब्रँड रजिस्टर करण्यात आला. पण, त्यांची जाहिरात मोहीम सुरु झाली ती १९६६ मध्ये. मुंबईतील दाकुन्हा या जाहिरात एजन्सीला अमूलच्या ब्रँडची जाहिरात करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याकाळात टेलीव्हिजन किंवा प्रिंट मिडियातून जाहिरात करणे फारच खर्चिक बाब होती. म्हणून दाकुन्हा कम्युनिकेशन्सच्या संस्थापक चेअरमन असलेल्या सिल्वेस्टर दाकुन्हा यांनी अमूलच्या जाहिरातीसाठी होर्डिंगचा वापर करण्याचे ठरवले. जाहिरातीसाठी वापरण्यात आलेला हा पर्याय थोडाफार स्वस्तही होता.
दाकुन्हा कम्युनिकेशन्समध्ये आर्ट डिरेक्टर म्हणून काम पाहणारे युस्टेस फर्नांडीस यांनी अमूल गर्लची संकल्पना पुढे आणली.
सिल्वेस्टर यांच्या पत्नी निशा दकुन्हा यांनी त्यावर्षी साधीसोपी पण थोडी आकर्षक वाटणारी अटर्ली बटर्ली अमूल ही फ्रेज पहिल्यांदा वापरली. बटर्ली हा शब्द इंग्रजी व्याकरणाच्या दृष्टीने चुकीचा असल्याने थोडाफार वाद झाला पण, नंतर हा शब्द असाच कधी रुळला ते कळले देखील नाही. या टॅगलाईनने अमूल ब्रँडला इतकी प्रसिद्धी मिळवून दिली की, ही जाहिरात क्षेत्रातील एक अविस्मरणीय टॅगलाईन ठरली.
१९६६ साली दकुन्हा आणि फर्नांडीस यांनी अमूलगर्लचे चित्रमय रूप पहिल्यांदा जगासमोर आणले. या पहिल्या जाहिरातीत ही गोड अमूल गर्ल आपल्या गुढग्यावर बसून प्रार्थाना करत आहे. यात तिचा एक डोळा झाकलेला आहे आणि दुसरा डोळा अमूल बटरच्या पॅकवर आहे. त्यावरील शब्द होते,
“Give us this day our daily bread with Amul Butter”.
या होर्डिंग जाहिरातीला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
परंतु दाकुन्हा यांचा हे लागलीच लक्षात आले की, अन्नाबद्दल काही सांगण्याजोगे इतरांकडेही खूप काही आहे. आपल्याला डेअरी उत्पादनांबद्दल वेगळ्या पद्धतीने आणि असे काहीतरी सांगितले पाहिजे जे थेट लोकांच्या मनाला भिडेल. पावसाळ्याच्या दिवसांत त्यांनी “Pitter-patter, pick-a, pack-a Amul butter” अशी लाईन वापरली. १९६० मध्ये कलकत्त्यामध्ये एक संप झाला होता त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ”Bread without Amul —cholbe na, cholbe na” अशी लाईन वापरली. प्रत्येक बंगाली माणसाच्या चेहऱ्यावर या लाईनने हसू आणले होते.
असे वेगवेगळ्या विषयांना धरून केलेल्या अमूलच्या जाहिरातीं प्रचंड लोकप्रिय ठरत होत्या. पण, अशा तत्काळ घटनेवर व्यक्त होत जाहिरात करायची असेल तर जाहिरात पटकन प्रसिद्ध होणे आवश्यक असते. म्हणून दाकुन्हा यांनी डॉ. कुरियन यांना आपली ही अडचण सांगितली. जाहिरात केल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यासाठी परवानगी मिळेपर्यंत तो विषय थंड झालेला असतो. म्हणून या परवानगीच्या प्रक्रियेत जाहिरात प्रसिद्ध करण्यास विलंब होतो असे दाकुन्हा यांचे मत होते.
डॉ. कुरियन यांनी त्यांना परवानगी शिवाय जाहिरात प्रसिद्ध करण्याची मुभा दिली. म्हणजे दाकुन्हा यांनी जाहिरात बनवल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यासाठी परवानगीची वाट पाहण्याची गरज नव्हती.
दाकुन्हा यांना डॉ. कुरियन यांनी तेव्हा दिलेले स्वांतत्र्य आजही बरकरार आहे. म्हणूनच कोणत्याही घटनेवर आपले विचार व्यक्त करण्यात ही अमूल गर्ल कधीच मागे राहत नाही. १९९० मध्ये दाकुन्हा कम्युनिकेशन्सची धुरा राहुल कुन्हा यांच्याकडे आली. पण, जाहिरातीचे हे स्वातंत्र्य आणि नात्यातील विश्वासाची परंपरा मात्र कायम आहे. राहुल यांनी अमूलच्या जाहिरातीची सूत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर स्पोर्ट्स, राजकारण आणि सिनेमा या क्षेत्रातील समकालीन घटनांवर अमूल गर्लचे विडंबनात्मक पंच हमखास लोकांना आकर्षित करू लागले. अगदी लोकप्रिय व्यक्ती आणि संस्थांनी देखील त्यांच्या या विडंबनात्मक पंचचे मोठ्या मानाने स्वागत केले.
काही काही जाहिरातींच्या बाबतीत मात्र थोड्याफार कुरबुरीही झाल्या. त्यामुळे या जाहिरात कंपनीला अनेकदा कायदेशीर नोटीस देखील बजावण्यात आली आहे. पण, अशा किरकोळ अडचणींनी या जाहिराती मागे हटल्या नाहीत.
जगमोहन दालमिया, सुरेश कलमाडी, सत्यम काम्पुटर्स आणि सुब्रता रॉय यांना लक्ष्य करून बनवलेल्या जाहिरातींना कायदेशीर नोटीसा बजावण्यात आल्या. पण, याबद्दल अमूल किंवा जाहिरात एजन्सीला कधीच पश्चाताप झाला नाही. कॉपीराईटर मनीष झवेरी आणि चित्रकार जयंत राणे यांनी जाहिरीतीतून व्यक्त होणारी निर्भयता कित्येक वर्षी जपली आहे. झवेरी यांनी या जाहिरातीसाठी वापरलेला शब्दभांडार अगदी वेगळ्या धाटणीचा आहे. त्यांचा शब्दात एकाच वेळी कोटी देखील असते आणि बोलण्यातील शब्दांचा लहेजाही.
प्रादेशिक आणि औपचारिक भाषेचे एक अनोखे मिश्रण देखील यातून पाहायला मिळते. ही सरमिसळ भाषाशैली हेच अमूलच्या जाहिराती लोकप्रिय होण्यामागचे खरे गमक आहे.
निळे डोळे, गोबरे गाल, मोठे डोळे, लांब पापण्या पण नाकाचा पत्ता नाही, असा हा अमूल गर्लचा एक ठरलेला ट्रेडमार्क आहे. हा ट्रेडमार्क गेली तीस वर्षे राणे यांनी आपल्या कुंचल्यातून जिवंत ठेवला आहे. अगदी आजच्या चित्रकारांनाही अमूल गर्लची ही सर्व एकमेवाद्वितीय वैशिष्ट्ये अचूकपणे रेखाटता यावीत म्हणून जुन्या मासिकातील चित्रांचा संदर्भ घ्यावा लागतो.
अनेक वर्षांच्या अनुभवातून अमूल बटरच्या जाहिरातीसाठी कोणता विषय निवडावा आणि त्यावर मार्मिकपणे कसे व्यक्त व्हावे याची एक अद्भुत कला या त्रयींना नेमकी अवगत झाली आहे. गेले अर्ध शतक अमूलचीही अटर्ली बटर्ली गर्ल होर्डिंगच्या माध्यमातून सतत आपल्या जीवनात डोकावत असते.
अमूल गर्लच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून दा कुन्हा कम्युनिकेशन्सने अमूल गर्लच्या नजरेतून विकसित भारताचे चित्र रेखाटणारे एक कॉफी टेबल बुक प्रसिद्ध केले आहे. अमुल्स इंडिया असे या पुस्तकाचे शीर्षक आहे. यामध्ये अमूलच्या या जाहिराती बद्दल प्रसिद्ध व्यक्तींची मतेही यातून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरूख खान, दीपिका पदुकोन, अशी स्टार मंडळी आणि सुनील गावस्कर, राहुल द्रविड, असे क्रिकेटस्टार यांचाही समावेश आहे. गोबऱ्या गालाच्या या अमूल गर्लविषयी सामान्य लोकांमध्ये असलेला लळा यापुढेही कायम राहील अशी अशा करूया.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.