भारताचं ‘हे’ यश अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचं सर्वात मोठं अपयश म्हणून गणलं गेलंय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


१९९८ मध्ये भारताने अमेरिकन सॅटेलाईटला चकमा देऊन ५ अणुचाचण्या केल्या होत्या. या परिक्षणाची बातमी लपवण्यात भारताला आलेलं यश हे पाश्चात्य देशातील व अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांचे अपयश म्हणून गणले गेले होते.

या अणुचाचणीची नोंद जगातील सर्वात सफल सिक्रेट ऑपरेशन्समध्ये केली जाते. परंतु भारत अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएच्या नाकाखाली या ऑपरेशनला कशाप्रकारे यशस्वी करू शकला, याची कथा फार रंजक आहे.

११ मे १९९८ ला दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी एकाच वेळी ३ अणुचाचण्या करण्यात आल्या.

जगाला या चाचणीविषयी कुठलीच कल्पना नव्हती. अमेरिकन आणि पाश्चात्य गुप्तचर संस्थादेखील यापासून सर्वस्वी अनभिज्ञ होत्या. परंतु या अणुचाचण्यांच्या यशाची बातमी जगाला देऊन भारताला शक्ती प्रदर्शन करणे अत्यावश्यक होते. यासाठी यशस्वी अणुचाचणी नंतर दोन तासांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी टीव्हीच्या माध्यमातून जगाला ही माहिती दिली.

वाजपेयी म्हणाले, “आज ३ वाजून ४५ मिनिटांवर भारताने पोखरण रेंजमध्ये ३ भूमिगत अणु परीक्षण केले. आज एक फिशन, एक स्लो यिल्ड डिव्हाईस आणि एका थर्मान्यूक्लिअर डिव्हाईसच्या मदतीने परीक्षण करण्यात आले.”

यानंतर ४५ तासांनी १३ मे रोजी दुसऱ्यांदा पोखरण रेंजमध्ये अजून दोन सब किलोटीन डिव्हायसेसची सफलतापूर्ण चाचणी करण्यात आली.

११- १३ मे दरम्यान झालेल्या ५ अणुपरीक्षणांनी जगाला दाखवून दिले की भारत एक आण्विक शक्ती असलेला देश म्हणून नावारूपाला आला होता.

या अगोदरही १९९५ साली भारताने अणुचाचणी करण्याचा भारताने प्रयत्न केला होता. परंतु अमेरिकन सॅटेलाइटच्या दृष्टिक्षेपात आल्याने हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. १९९८ साली वाजपेयी सरकार भारताला अणुशक्ती संपन्न बनवण्यासाठी कटिबद्ध होते. त्यांनी यासंबंधी घोषणा केली त्यावेळी अमेरिकन गुप्तचर संस्थांनी कान टवकारले.

१९९५ नंतर पोखरण परिसरावर नजर ठेवण्यास अमेरिकेकडून सुरुवात करण्यात आली होती. यासाठी अमेरिकेने आपल्या नॅशनल इमेजरी अँड मॅपिंग एजन्सी आणि नॅशनल जियोस्पॉटियल इंटेलिजन्स एजन्सी यांना निरिक्षणाच्या कामावर लावले होते.

अमेरिकन सॅटेलाईट ‘केएस’ पोखरणच्या क्षणाक्षणाच्या परिस्थितीवर नजर ठेवत होती. पेंटागोनचे अब्जो डॉलर्स किंमतीचे दोन केएस-१२ सर्वेक्षण उपग्रह हबल स्पेस दुर्बिणी प्रमाणे पृथ्वीवर नजर ठेवत होते.

१९९८ साली सीआयएची ‘सॅटेलाईट इमेज ग्रॅबिंग टेक्निक्स’ इतकी प्रगत होती की भूमिपासून २६४ किमी उंचीवर असलेले त्यांचे ऑप्टिकल सेन्सर ती जमिनीवरील एखाद्या मनुष्याच्या हातातील घड्याळातील वेळसुद्धा स्पष्टपणे होती.

भारताच्या पोखरण क्षेत्राच्या चारी दिशांनी फिरणारे ४५ मीटरपर्यंत फैलाव असणारे सौर पॅनल बसवलेले दोन लैक्रॉस सॅटेलाईट ढग, धुळीचे वादळ या वातावरणातदेखील स्पष्ट चित्रण करू शकण्यास सक्षम होते. याद्वारे काढण्यात आलेले प्रत्येक छायाचित्र अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या टेबलावर सादर केले जात होते.

अणुचाचणीच्या १० दिवस आधी भारताने अमेरिकेचे लक्ष विचलित करण्यासाठी जम्मू काश्मीरमधील पाकिस्तान सीमेवरच्या आपल्या सैन्य कारवाया वाढवल्या, यामुळे पाकिस्तानचे धाब दणाणले व ते भारताच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी करू लागले. पण याअगोदर त्यांनी भारताच्या गतिविधींचे सगळे पाठ अमेरिकेसमोर वाचले. परिणामत: अमेरिकेने पोखरणवरून सर्व लक्ष जम्मू-काश्मीरवर केंद्रित केले.

इकडे भारतीय शास्त्रज्ञांनी आपली ओळख लपवून सेनेच्या वर्दीत पोखरणमध्ये काम करायला सुरुवात केली. अमेरिकेला ते सैन्याचे पदाधिकारी वाटले.

भारतीय शास्त्रज्ञांनी अमेरिकन सॅटेलाईटला चकमा देण्यासाठी त्याच्या रियल टाईम गतिविधींची माहिती काढली. यात शास्त्रज्ञांनी हे सॅटेलाईट पोखरणच्या रेतीय भागातून किती वेळ व कसे मार्गक्रमण करतात याची नोंद केली.

पोखरणच्या परीक्षण रेंजमध्ये अमेरिकन सॅटेलाईट दोन ते तीन वेळा लक्ष ठेवत होती. त्या सॅटेलाईटच्या नजरेत येऊ नये असे कुठलेच काम भारत सरकारने केले नव्हते. जेव्हा सॅटेलाईट या भागापासून लांब निघून जात, तेव्हा शास्त्रज्ञ त्याचा फायदा घेत परिक्षणाची तयारीच्या कामात स्वतःला गुंतवून घेत होते. सॅटेलाईट पुन्हा आपल्या मूळस्थानी येईपर्यंत काम थांबवून पुन्हा पूर्वस्थितीत करून ठेवत.

अमेरिकी आधिकारी संभ्रमात होते की पोखरणमध्ये अणु परीक्षणाच्या संबंधित काही संदिग्ध कार्य होताना दिसले तर ते लगेचच त्यांच्या सॅटेलाईटच्या निदर्शनात येईल. परंतु त्यांचा हा भ्रम लवकरच दूर झाला.

या सॅटेलाईटला चकवा देण्यात भारतीय शास्त्रज्ञ यशस्वी झाले. या सॅटेलाईटची नजर चुकवत पोखरणमध्ये चाचणी सर्व तयारी व्यवस्थित पार पाडली.

अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्याला झुगारून लावत भारताने गुप्तपणे यशस्वी केलेले हे आण्विक मिशन अमेरिकन गुप्तचर यंत्रणांची व परराष्ट्र धोरण आखाणाऱ्या लोकांची एक मोठी विफलता होती.

या परीक्षणानंतर १३ मे रोजी अमेरिकन सिनेटच्या गुप्तचर विभागाच्या अध्यक्षाने याला दशकातील सर्वात मोठे गुप्तचर अपयश म्हणून घोषित केले.

याच बरोबर अमेरिकी केंद्रीय गुप्तचर विभागाचे तत्कालीन प्रमुख जॉर्ज टेनेट यांनी सेवानिवृत्त एडमिरल डेव्हिड इ यिर्मयाह यांना पोखरण परीक्षण स्थळावरील गुप्तचर अपयशाचा तपास करण्याचे आदेश दिले.

जॉर्ज टेनेट यानंतर म्हणाले होते “भारताच्या आण्विक कार्यक्रमावर आम्ही गेले कित्येक वर्षे नजर ठेवून होतो, परंतु आमची नजर हटल्यावर भारताने हे परीक्षण यशस्वी केले, हे सर्वस्वी आमचे अपयश होते.”

या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन शक्ती. या अणुपरीक्षणानंतर अमेरिकेसहित इतर ताकदवान देशांनी भारतावर कठोर दंडात्मक कारवाई करत बरेच आर्थिक व औद्योगिक निर्बंध लादले.

अणुपरीक्षणाच्या ४८ तासात पाकिस्तानने देखील ६ अणुपरीक्षण करत भारताला उत्तर देण्याचा प्रयत्न केला परंतु भारत थांबला नाही, पाश्चात्य देशांच्या तमाम निर्बंधामुळे खचला नाही, प्रगती करत राहिला आणि जगातील एक मोठी लष्करी शक्ती म्हणून उदयास आला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!