सर्वांना बावळट वाटणारा शेख चिल्ली खरंतर या मुघल राजपुत्राचा आध्यात्मिक गुरु होता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आपल्याकडे एखादा मनुष्य फक्त आपल्या कल्पनांचे मनोरे उभारत असेल आणि प्रत्यक्षात कृतिशून्य असेल तर त्याला शेख चिल्ली म्हटले जाते. शेख चिल्लीच्या अनेक कथा प्रचलित आहेत.

एका कथेत तर असं सांगितलंय की शेख चिल्ली एकदा झाडावर बसलेला असतो आणि तो ज्या फांदीवर बसलेला असतो तीच फांदी तोडतो. यावरून तरी शेख चिल्ली हा एखादा मूर्ख मनुष्यच असला पाहिजे असा आपला समज होतो. परंतु वास्तव फार वेगळेच होते.

कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमात एक प्रश्न विचारण्यात आला होता की शाहजहाँचा मोठा मुलगा आणि औरंगजेबाचा थोरला भाऊ दारा शुकोहचा गुरू कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर तेव्हा स्पर्धक देऊ शकला नव्हता, त्या प्रश्नाचे उत्तर कंप्युटरजीने सांगितले-“शेख चिल्ली”.

होय! हा शेख चिल्ली ज्याला आपण मूर्खपणाचा शिरोमणी म्हणून त्याची चेष्टा करतो, तो मुळात एक सुफी संत होता. दारा शुकोहचा हा शेखचिल्ली एक आध्यत्मिक गुरू देखील होता. दारा शुकोह त्याचा मोठा सन्मान करायचा!

शेख चिल्ली या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या इसमाचे मूळ नाव सूफी अब्द-उर-रज्जाक होते. शेख चिल्ली आपल्या ज्ञानासाठी व उदारतेसाठी प्रसिद्ध होते.

शेख चिल्ली मुघल राजपुत्र दारा शुकोहचा गुरू होता. मुघल बादशहा शहाजहाँ त्यांचा मोठा प्रशंसक होता. शेख चिल्लीने त्याला अनेक गोष्टींचे प्रशिक्षण आणि शिक्षण दिले होते. दारा शुकोह शेख चिल्लीचा मोठा प्रशंसक होता. शेख चिल्लीला अब्द-उर्र-रहीम, अलैस-अब्द-उइ-करीम, अलैस-अब्द-उर्र-रज्जाक या नावाने देखील ओळखले जात होते. त्यावेळी लोक त्याला एक महात्मा मानायचे. हरियाणाच्या कुरुक्षेत्रातील थानेश्वरामध्ये त्याचा मकबरा देखील उभारण्यात आला आहे.

शेख चिल्ली यांचा जन्म बलुचिस्तानात झाला होता. ते खानाबदोष या जमातीत जन्माला आले होते. ही जमात सदैव भटकत असायची, या भटकंती दरम्यानच शेखचिल्ली भारतात आले. शेखचिल्ली अनेक वर्षांपासून अशा कथांचे नायक राहिले आहेत, ज्यात सामान्य माणसाचे आयुष्य व त्या माणसाचा संघर्ष चितारला गेलेला आहे. शेखचिल्ली हा नायक वारंवार संघर्ष, इमानदारी, निष्ठा, मर्यादा व परिस्थितीनुसार विवेक या गुणांनी नटलेला आहे.

शेख चिल्ली भारतीय उपखंडात एक मूर्ख व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झाला कारण तो फारच बेफिकीर होता. कुठल्याही गोष्टीचा परिणाम विचारात न घेता, ती पार पाडण्यावरच शेख चिल्लीचे लक्ष असायचे.

शेख चिल्ली प्रचंड स्वप्नाळू व आत्ममग्न व्यक्ती होते. तो लोकांशी फार कमी संबंध ठेवायचा. यामुळेच त्याच्याबद्दल लोकांच्या मनात असंख्य गैरसमज होते. या गैरसमजातूनच त्यांच्यावरील विनोदी कथा निर्माण झाल्या.

शेख चिल्लीच्या अस्तित्वाची साक्ष देणारा एक मकबरा कुरुक्षेत्रातील एका उंच टेकडीवर उभारण्यात आला आहे. हा मकबरा वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. या मकबऱ्याला तयार करायला बलूआ दगड वापरण्यात आला आहे. हा मकबरा परिपत्राच्या आकाराचा असून त्या मकबऱ्याचा घुमट नाशपतीच्या आकाराचा आहे.

या मकबऱ्याचा एकदम तळाशी या शेख चिल्लीची कबर असून त्याच्या बाजूलाच त्याच्या बायकोची संगमरवरी कबर आहे. हा मकबरा थोडाफार ताजमहालासारखा दिसतो, पुरातत्व विभागाने याला संरक्षित इमारतीचा दर्जा प्रदान केला आहे.

तर तात्पर्य हे की शेख चिल्ली नावाची व्यक्ती अस्तित्वात होती इतकेच काय तर ती व्यक्ती प्रचंड ज्ञानी व श्रीमंत देखील होती, म्हणूनच त्याच्यासाठी इतका विशाल मकबरा उभारण्यात आला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!