आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
क्रिकेट म्हणजे भरपूर पैसा मिळवून देणारे क्षेत्र. आजच्या अनेक आघाडीच्या क्रिकेट खेळाडूंची कमाई कोट्यवधीच्या घरात आहे, हे तर आपल्याला माहिती आहेच. पण आपला चरितार्थ चालवण्यासाठी कधी कोणत्या क्रिकेटरला क्रिकेटसोडून वेगळे काही तरी काम करताना पहिले आहे काय? क्रिकेटरना वेगळे काही तरी काम करण्याची गरजच काय पण? त्यांच्या व्यवसायातून त्यांना रग्गड पैसा मिळतो अशीच आपली समजूत असते. हो ना? पण श्रीलंका आणि झिम्बाम्ब्वेतील या तीन खेळाडूंना आपल्या चरीतार्थासाठी क्रिकेटसोडून बस ड्रायव्हिंगचे काम करावे लागत आहे. तेही स्वतःचा देश सोडून ऑस्ट्रेलियामधे. कोण आहेत हे तीन खेळाडू आणि ते क्रिकेटसोडून बस ड्रायव्हिंगचे काम का करत आहेत? जाणून घेऊया या लेखातून.
श्रीलंका संघामधील आघाडीचा स्पिनर सुरज रणदिवचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. आज सुरज रणदिव कुठे आहे? काय करतो? माहित आहे का? आयसीसीच्या २०११च्या वर्ल्डकप मधेही सुरज श्रीलंका संघाकडून खेळला होता. आज तो आपला चरितार्थ चालवण्यासाठी ऑस्ट्रेलियामधे बस ड्रायव्हर म्हणून काम करतोय.
फक्त सुरजच नाही तर श्रीलंकेचा क्रिकेटर चिंतका नमस्ते आणि झिम्बाब्वेचा क्रिकेटर वॅडिंग्टन म्वाएंगा हे देखील सध्या ऑस्ट्रेलियामधेच राहत असून त्यांनीही हेच बस ड्रायव्हिंगचे काम स्वीकारले आहे. फ्रांसमधील ट्रान्सदेव नावाच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या बसवर हे तिघेही ड्रायव्हिंगचे काम करतात.
तिघेही ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट क्लब्जच्या वतीने खेळतात मात्र त्यांचा उदारनिर्वाह या बस ड्रायव्हिंगच्या जोरावरच चालतो.
ट्रान्सदेव या ट्रान्सपोर्ट कंपनीने वेगवेगळ्या क्षेत्रातील १२०० लोकांना आपल्या कंपनीत सामावून घेतले आहे. त्यामधे या तिन्ही क्रिकेटर्सचा समावेश आहे. नजीकच्या भविष्यात पब्लिक ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडेही त्यांच्या स्वतःच्या क्रिकेट टीम असतील असा त्यांचा अंदाज आहे. ट्रान्सदेवही भविष्यात आपली स्वतःची क्रिकेट टीम तयार करू शकते.
श्रीलंकन टीमकडून सुरज रणदिवने एकूण १२ कसोटी सामने खेळले आहेत. या कसोटी सामन्यात सरासरी ३.०७ याप्रमाणे त्याने एकूण ४३ विकेट घेतल्या आहेत. शिवाय, सरासरी ९.२ याप्रमाणे त्याने १४७ धावा केल्या आहेत. सुरज एक चांगला स्पिन बॉलर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने एकूण ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने सरासरी ५.०६ प्रमाणे ३६ विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण ७ टी-ट्वेंटी खेळले असून त्यातही ७ विकेट घेतल्या आहेत.
रणदिव सध्या ऑस्ट्रेलियाच्या जिल्हा स्तरावरील क्रिकेटमध्येही खेळतो आहे. व्हिक्टोरिया प्रीमिअर क्रिकेटशी संलग्न असणाऱ्या डँडॉंग क्रिकेट क्लबसाठीही तो खेळला आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टेट कॉम्पिटिशनसाठीही तो खेळत असतो. रणदिव आयपीएल मधेही चेन्नई सुपर किंग्जच्या वतीने खेळला होता.
सुरजने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या खेळाडूंसोबत नेट प्रॅक्टिस बॉलर म्हणूनही काही दिवस काम केलं आहे. यापुढेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याला प्रॅक्टिस बॉलर म्हणून काम करण्याचं आमंत्रण दिलं आहे, यावर तो म्हणतो, “मला ऑस्ट्रेलियन संघासोबत खेळण्याची संधी मिळत आहे आणि ही संधी मला अजिबात दवडायची नाही.”
क्रिकेटमधे करिअर करण्यासाठी सुरजने खूप लहानपणापासून मेहनत घेतली होती. पंधरा वर्ष आणि एकोणीस वर्षाच्या गटातही तो खेळला होता. २००३-०४ मधे तेवीस वर्षाखालील सामन्यात त्याने भाग घेतला होता आणि या सामन्यात त्याने एकूण २३ विकेट घेतल्या होत्या. त्याच्या या दमदार खेळामुळेच त्याला श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले.
२०१० साली भारताविरुद्ध सामना खेळत असताना त्याने एक चुकीचा बॉल टाकून प्रसारमाध्यमांचे लक्ष आपल्याकडे वळवून घेतले होते. १६ ऑगस्ट २०१० रोजी भारताविरुद्धच्या त्या सामन्यात वीरेंद्र सेहवागला सुरज बॉलिंग करत होता. भारताला विजयासाठी एका बॉलमधे एक धाव हवी होती आणि बॅटिंग करत असलेल्या सेहवागला शतक पूर्ण करण्यासाठीही एका धावेची गरज होती. तर यावेळी सुरजने जाणीवपूर्वक नो बॉल टाकून सेहवागचं शतक रोखलं होतं. यावरून बराच गदारोळ झाला. आणि त्यासाठीच त्याच्यावर काही सामन्यांसाठी बंदी देखील घातली होती.
बस चालवणारा दुसरा क्रिकेटर चिंताकाने श्रीलंकेच्या वतीने ५ टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. पाच सामन्यात त्याने ४९ धावा केल्या आहेत. आणि वॅडींग्टन हा तर झिम्बाब्वे संघाचा फास्ट बॉलर होता. त्यानेदेखील २००५ आणि २००६च्या दरम्यान तीन एकदिवसीय सामने खेळले होते.
तिघांनीही क्रिकेटसोडून सध्या बस ड्रायव्हिंगचा व्यवसाय निवडला आहे. पण, तिघेही पुन्हा एकदा क्रिकेटमधे परततील अशी त्यांच्या चाहत्यांना (जर असतील तर) आशा असेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved