आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अरविंद घोष यांचा जन्म बंगाल प्रांतातील कलकत्ता येथे झाला. त्यांचे वडील कृष्णधनु घोष हे तत्कालीन ब्रिटीश सरकारची चाकरी करत होते. ब्रिटीश सरकारच्या अखत्यारित त्यांचे काम असल्याने त्यांना ब्रिटीश संस्कृती, त्यांचे एकंदर वागणे, बोलणे याबद्दल आकर्षण होते.
याच विचारातून त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवलं. आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं, मोठा अधिकारी व्हावं, असं प्रत्येक सामान्य बंगाली माणसाप्रमाणे त्यांचं देखील स्वप्न होतं. त्यांचा अट्टाहास होता की मुलांनी खिश्चन संस्कृतीचा परिपूर्ण अभ्यास करावा आणि पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीत शिकून यश प्राप्त करावे.

म्हणूनच त्यांनी इंग्रजांच्या संस्कृतीचे मुख्य केंद्र असणाऱ्या दार्जीलिंग येथील लोरेट बोर्डिंग हाउसमध्ये अरविंदबाबूंना शिक्षणासाठी पाठवलं. पण अरविंद हे बालपणापासून आपल्या आजोबांच्या प्रभावात होते. आपण आपल्या देशासाठी-संस्कृतीसाठी योगदान द्यावे, सामाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करावे, असे त्यांना नेहमी वाटायचे.
पण त्यांच्या वडिलांनी मात्र त्यांना वयाच्या ७व्या वर्षी लंडनच्या विद्यालयात पाठवून दिले. १४ वर्ष म्हणजेच जवळपास त्यांचे संपूर्ण शिक्षण तेथेच झाले.
भेटलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करावं या उक्तीप्रमाणे अभ्यासात असलेली गोडी, वाचन व त्यातील परिपक्वता यामुळे अरविंदबाबू भारतीय सनदी सेवा (आयसीए) परीक्षा उत्तीर्ण झाले.
१८९३ साली बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांच्याकडून नोकरीचे पत्र आल्यानंतर ते भारतात परतले. १२ वर्ष त्यांनी शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडले, काही काळ ते बडोदा संस्थानात सचिव म्हणूनही राहिले.
इंग्रज सरकारने कशा पद्धतीने भारतीय संस्कृतीवर घाला घातला असून भारतीयांवर अत्या*चार करत आहेत, याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आला आणि येथून त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली.
त्यांनी आपल्या कार्याबरोबरच भारतीय राजकारण व तत्कालीन स्वातंत्र्य आंदोलनात लक्ष देण्यास सुरुवात केली. १९०५ साली व्हाईसरॉय लॉर्ड कर्जनने बंगालचे विभाजन केले. संपूर्ण बंगालमध्ये याविरोधात एक आंदोलन सुरु झाले.
देशाप्रती आपली जबाबदारी व देशभक्तीने ओतप्रोत भारावून गेलेला एक तरूण यात मागे कसा राहील? अरविंद थेट बंगालच्या लढ्यात सहभागी झाले.
प्रथमतः एका सामान्य नागरिकाप्रमाणे त्यांनी इंग्रज सरकारच्या धोरणांचा विरोध केला पण कालानुरूप ते या लढ्याचे खास अग्रणी बनले. अनेक क्रांतिकारक, स्वतंत्रसेनानी यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी अरविंदबाबूंवर सोपवण्यास सुरुवात केली. ते अनुशिलन समितीत कार्यरत झाले.
त्यांनी आपल्या कार्यातून अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा दिली, त्यांच्या मुळे अनेक तरुण या देशकाऱ्यात झोकून काम करू लागले. १९०६ साली दादाभाई नौरोजी यांच्या नेतृत्वात झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी सहभाग घेतला.

राष्ट्र विचारांनी प्रेरित होऊन १९०७ साली त्यांनी वंदे मातरम् नावाचे एक वृत्तपत्र सुरु केले. इंग्रज सरकार, त्यांची ध्येय-धोरणे यांच्या विरोधात या माध्यमातून जोरदार आवाज उठवला जाऊ लागला.
वंदे मातरम्-मुळे भारतीयांमधील असंतोष वाढतोय असे ब्रिटीश सरकारला वाटले. त्यांनी अरविंद यांना नोटीस बजावून पेपरवर बंदी घातली.
अरविंद पुन्हा कॉंग्रेसमध्ये कार्यरत झाले. कॉंग्रेसमध्ये लोकांचा सहभाग वाढत होता. पण त्याच बरोबर अनेक विषयांवर मतभेदही निर्माण झाले होते. काही का असेना पण मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचे आहे, हा विचार अरविंदांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या मार्गदर्शनात काम सुरु ठेवत स्वराज्य, स्वदेश, बहिष्कार हा पवित्र घेतला.
१९०८ साली भारतीय क्रांतिकारी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या युवकांनी जुलमी ब्रिटीश अधिकारी किंग फोर्डचा वध केला. यामुळे ब्रिटीश सरकार धास्तावले त्यांनी खुदिराम बोस व सहकाऱ्यांची धरपकड सुरून केली.
खुदिराम बोस यांना फाशी दिली तर अनुशिलन समितीतील त्यांचे सहकारी असणाऱ्यापैकी अरविंदबाबूंची ‘अलीपूर’ येथील तुरुंगात अज्ञात वासाची शिक्षा दिली.
या काळात अरविंद यांनी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या, आपण जे करतोय त्यातून बदल होतोय, लोकांमध्ये जागृती वाढतेय, आपण केलेलं काम देशहितासाठी होतं, पण आपले आयुष्य हे अध्यात्म आणि जनकल्याणासाठी आहे, असे त्यांना वाटू लागले. बराच विचार केला अखेर या सर्वातून थोडीशी फारकत घेत त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला.
तुरुंगातून सुटल्यानंतर ते थेट पुद्दुचेरीत गेले. त्यांनी तिथे प्रचंड साधना केली.
अध्यात्म हाच मुक्तीचा खरा मार्ग आहे याची जाण त्यांना झाली. त्यांनी तेथेच योगाश्रम सुरु केला. लोकांना एकांतात स्वतःची ओळख होते. असं म्हणतात कदाचित अरविंद बाबूंना ती झाली होती.
अखेर जनकल्याण व राष्ट्रहितासाठी कार्य करावे या उद्देशाने त्यांनी अध्यात्म व योग यांचा परिपूर्ण अभ्यास करून, आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत अरबिंदो आश्रमाची स्थापना केली.
अरविंद यांची प्रचिती एवढी वाढली की त्यांचे अनुयायी दूरवरून अरविंद आश्रमात येऊन ध्यानधारणा करू लागले. त्यांचा अध्यात्मावर पूर्ण निष्ठा व विश्वास होता.
अध्यात्मातील अभ्यासामुळे त्यांनी दी लाईफ डीव्हाईन, भारतीय नवजीवन वेद – रहस्य, यौगिक समन्वय, अहिंसात्मक प्रतिकाराचा सिद्धांत, असे अनेक प्रसिद्ध ग्रंथ लिहिले.
ज्यातून अध्यात्म हाच समाधानी जीवनाचा खरा मार्ग आहे याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, याची जाणीव त्यांना झाली. अरविंदबाबूनी मांडलेले विचार व त्यांचे सिद्धांत यांचा लोकांवर प्रभाव पडू लागला.
त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात वाढत होता, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देखील अरविंद यांच्या कार्याचे जाहीर कौतुक केले होते.अरविंदबाबूंनी अध्यात्मात योगदान देताना लोककल्याणाचा जो संकल्प केला होता तों सिद्धीस नेला. यातून आपले कार्य आपण प्रामाणिक पाने निभावले असा आनंद त्यांच्या चेहर्यावर नेहमी असायचा.
त्यांनी केलेली सेवा,अध्यात्मात दिलेल योगदान आणि राष्ट्राप्रति असलेली त्यांची निष्ठा यासाठी प्रत्येक भारतीय त्यांना सदैव आठवत राहील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.