आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
“डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाऊड” असे फलक लावणाऱ्या ब्रिटिशांना भारतीयांनी त्यांना त्यांची “लायकी” वेळोवेळी दाखवून दिली. कित्येकदा हे ब्रिटिश भारतीय सामान्यांच्या आर्थिक दारिद्र्यावर छिद्म हास्य करीत, या भारतीय दारिद्र्याचे जनकसुद्धा तेच होते, चोर तो चोर वर शिरजोर अशी त्यांची अवस्था होती.
भारतीयांना तुच्छ मानून ब्रिटिशांनी मोठी चूक केली होती. अशाच चुकीमुळे ब्रिटिशांच्या रोल्स रॉयस कम्पनीच्या तीन मोटार गाड्यांना राजस्थानच्या एका शहरातील कचरा साफ करावा लागला होता. एकेकाळी जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीवर असलेल्या भारत देशाला ब्रिटिश धार्जिण्या शिक्षणाने आणि ब्रिटिश राजवटीने संपत्तीच्या बाबतीत पिछाडीवर टाकलं होत. पण याला अपवाद होते ते संस्थानिकांची राजघराणी! रोल्स रॉयस आणि राजा जयसिंगचा प्रसंग तर सर्वश्रुत आहे. पण अशाच एका राजघराण्याच्या महाराणीच्या संपत्तीने अनेक ब्रिटिशांचं लक्ष वेधलं होतं. हे राजघराणं होतं बडोद्याच्या गायकवाडांचं.
या संस्थानच्या तत्कालीन महाराणी सीता देवी यांचा मृत्यू १५ फेब्रुवारी १९८९ रोजी फ्रांसमध्ये झाला. त्यावेळी त्यांच्या पॅरिसमधील ड्रेसिंग रूममध्ये तब्बल हजारापेक्षा जास्त साड्या आणि प्रत्येक साडीसाठी वेगवेगळे बूट आणि फर होते!
या महाराणीसाहेबांसाठी मोन्सऊर एरिग्वा नावाच्या फ्रेंच महिलेने सारी अँड कंपनी नावाची फ्रेंच शिफॉन साड्यांची निर्मिती करणारा कारखाना सुरु केला. महाराणीचा मृत्यू होण्याआधी तिने तब्बल २६० विशेष निवडक साड्यांची ऑर्डर दिली होती. महाराणीच्या मृत्यूनंतर मात्र साड्यांच्या या कंपनीला कायमचं टाळं लागलं. वॅन क्लिफ आणि अरपेल्स हे या महाराणीचे आवडते सोनार होते.
ज्यावेळी अनेक भारतीय महाराण्या आपला चेहरा झाकून छायाचित्र काढत असत, त्यावेळी महाराणी सीता देवी मात्र ‘न्यू यॉर्क’ येथील ‘वाल्डोर्फ अस्टॉरीया’ किंवा ‘लंडन’ येथील ‘द डोरचेस्टर’ या पंचतारांकित हॉटेल्समध्ये आपल्या कानातले दागिने आणि गळ्यातील हार दिसण्यासाठी मागे केस मोकळे सोडून फोटोग्राफी करताना दिसत. तर हातातील ब्रेसलेट्सकडे लक्ष वेधण्यासाठी तिचे हात सतत ब्रेसलेट्सवर असत. इतकंच काय तर तिच्या सिगारेटचा डबासुद्धा रत्नांनी मढवलेला असे.
महाराणी सीता देवीला मोटार गाड्यांचं फार वेड होतं. तर मर्सिडीज बेंझ कंपनीने तिच्यासाठी मर्सिडीज डब्लू-216 ही कस्टमाइज्ड कार तयार केली होती. तिने १९६९ मध्ये झालेल्या अस्कोट गोल्ड कप या हॉर्सरेसिंगमध्ये आपल्या हातात असलेल्या ३० कॅरेटच्या नीलम मणीला स्पर्श करण्यासाठी पाहुण्यांना निमंत्रण दिलं. तिच्या मते या नीलम मण्याच्या स्पर्शाने त्यांचं नशीब फळफळणार होतं.
अशी ही शान-शौकतीत राहणारी महाराणी ही बडोद्याच्या प्रतापसिंगराव गायकवाडांची दुसरी पत्नी होती. प्रतापसिंगराव गायकवाड हे बडोद्याचे अंतिम शासक असलेले महाराज. १९३९ मध्ये त्यांच्या आजोबांच्या अर्थात सयाजीराजे गायकवाडांच्या मृत्यूनंतर प्रतापसिंग गादीवर आले.
प्रतापसिंगरावांनी आपल्या कारकिर्दीत महाराजा सयाजीराव विद्यापीठाची स्थापना केली, यालाच पूर्वी बडोदा कॉलेज म्हणून ओळखले जात असे. त्यांची पहिली पत्नी शांतादेवी ही कोल्हापूरच्या सरदार मानसिंगराव घोरपड्यांची कन्या. तर सन १९४३ मध्ये त्यांनी मद्रासच्या सीता देवीबरोबर विवाह केला. सीता देवी ही महाराजा सूर्य राव आणि महाराणी चीनम्मा यांच्या पोटी मद्रास येथे जन्मलेली राजकन्या.
सन १९४३ मध्ये महाराजा प्रतापसिंगानी मद्रासला झालेल्या हॉर्सरेसिंगला उपस्थिती लावली आणि तिथेच त्यांची आणि सीता देवीची भेट झाली प्रतापसिंगानी स्वतःवरचा ताबाच गमावला, जरी सीता देवीला नवीन नातं मान्य होतं, तरी आपल्या राजाने दुसऱ्याच्या पत्नीबरोबर विवाह करू नये, असा विचार करून वकिलांनी एकत्र येऊन सीता देवीचं इस्लाममध्ये धर्मांतर केलं. सीता देवीने तिच्या जमीनदार पतीला वारंवार तिच्या धर्मात येण्याची मागणी करूनही त्याने तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं.
एका आठवड्यानंतर सीता देवीने तिच्या या हिंदू पतीकडून इस्लामिक पद्धतीने काडीमोड केला. आणि लवकरच तिने आर्य समाजाच्या अधिकाराने घरवापसी केली आणि तिच्या प्रियकराबरोबर लग्न केलं. यावेळी बडोद्यामध्ये महाराजा प्रतापसिंगची पत्नी शांतादेवी आपल्या चार मुलांसह त्यांची वाट पाहत होती.
बडोदा संस्थानच्या ‘पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्या पत्नी करता येणार नाही’ या सयाजीराजांनी केलेल्या कायद्याप्रमाणे महाराजा प्रतापसिंगराव गायकवाडांनी अपराध केला होता, आणि त्यासाठी त्यांना ब्रिटिश व्हाइसरॉय समोर उभं करण्यात आलं. त्यावेळी उत्तर देताना महाराज प्रतापसिंगराव म्हणाले होते, हा कायदा बडोद्यातील लोकांना लागू होतो, शासकांना नाही. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या कायदेतज्ज्ञांनी प्रतापसिंगाच्या उत्तराला दुजोरा दिला. पण तरीही ब्रिटिशांनी सीता देवीला महाराणीचा दर्जा देण्याचे अमान्य केले, आणि तेव्हापासून ज्यावेळी सीता देवी दरबारात येत, तसे तेथे उपस्थित ब्रिटिश अधिकारी दरबार सोडून निघून जात.
सन १९४६ मध्ये द्वितीय वैश्विक महायु*द्ध संपल्यानंतर या दाम्पत्याने फ्रांसमधील मोनेक्को शहरात स्थलांतर केले. पण महाराणी सीता देवीने बडोदा राजघराण्याची दागिन्यांच्या माध्यमातून किती “लूट” केली याची गणती कुठेच नाही.
शेकडो अमूल्य दागिने आणि साड्या या महाराणीने तयार करून घेतल्या.
१९४७ मध्ये अन्य संस्थानांसह बडोदा संस्थानाचंही भारतामध्ये विलीनीकरण करण्यात आलं, त्या वेळी भारत सरकारच्या वतीने संस्थानच्या खाजगी दाग-दागिने इत्यादी संपत्तीची आणि सार्वजनिक कर रूपातील संपत्तीची मोजदाद करताना सार्वजनिक संपत्तीत काहीच नसल्याचे उघड झाले.
महाराष्ट्रात पाळंमुळं असलेल्या या राजघराण्याने समाजसेवेसाठी मोठे प्रयत्न केले, महाराज सायजीराजे गायकवाड हे त्यातलं मोठं नाव. महाराणी सीता देवी सारखे लोक या संस्थानात अत्यल्प प्रमाणात होते. आजही बडोद्यामध्ये गायकवाड घराण्याचं कीर्ती मंदिर डौलाने उभं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.