एका इंजिनिअरच्या बुद्धीचातुर्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आज भारतात ‘अभियंता दिन’ साजरा केला जातो आहे. १५ सप्टेंबर हा दिग्गज अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस, ज्यांनी आपल्या ज्ञानाच्या बाळावर आणि कमी संसाधने वापरून असे काही चमत्कार करून दाखवले होते, ज्याने इंग्रजांना चकित केले होते. त्यांनी असंभव आणि अशक्य वाटणाऱ्या अनेक प्रोजेक्ट्सला वास्तवात निर्माण करून दाखवले होते.

ते म्हैसूर संस्थानाचे दिवाण होते. १९१२ ते १९१८ या काळात त्यांनी हे पद भूषविले होते. त्यांना १९५५ साली भारत रत्न प्रदान करण्यात आला.

इतकंच नाही तर त्यांना सार्वजनिक जीवनात केलेल्या अद्वितीय कार्यासाठी पंचम जॉर्जने त्यांना भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या ‘नाईट’ म्हणजे ‘सरदार’ ही पदवी बहाल केली होती.

मांड्या जिल्ह्यातील कृष्णराज सागर बांधाच्या निर्मितीत त्यांनी मोठे अमूल्य योगदान दिले होते. हैद्राबादला पूरपरिस्थितीपासून वाचवणाऱ्या प्रणालीची निर्मिती त्यांनी केली होती. इंग्रज सरकारने सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी ज्या समितीची नेमणूक केली होती त्यात विश्वेश्वरय्या होते.

त्यावेळी त्यांनी ब्लॉक सिस्टमची निर्मिती केली ज्याद्वारे त्यांनी लोखंडी दरवाजे तयार करून पाण्याचा वेगवान प्रवाह रोखला होता.

त्यांच्या सिस्टमने ब्रिटिशांना भुरळ घातली होती. याचे कौतुक ब्रिटिश अधिकारी नेहमी करायचे. मुसी आणि एसी नावाच्या दोन नद्यांवर बांध बांधून पाण्याला रोखण्याची योजना आखण्यात आली होती. हे काम देखील विश्वेश्वरय्या यांनीच केले होते. पुढे त्यांना म्हैसूर संस्थानात वयाचा ३२ व्या वर्षी चीफ इंजिनिअर म्हणून नेमले गेले.

त्या अगोदर सिंधू नदीचे पाणी सुसकुबे या लहान गावापर्यंत पोहचवण्यासाठीची योजना त्यांनी आखली होती, जी ब्रिटिशांच्या पसंतीस उतरली होती.

विश्वेश्वरय्या हे अत्यंत प्रतिभावंत अभियंते, प्लॅनर आणि उत्तम इक्झिक्युटर होते, या तिन्ही गुणांमुळे त्यांनी सर्वत्र अलौकिक कीर्ती कमावली. त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम प्रोजेक्ट होता त्यांनी म्हैसूर या आधुनिक शहराच्या निर्मितीचा !

दक्षिण भारताची तत्कालीन राजधानी असलेल्या म्हैसूरला एका आधुनिक शहरात बदलणाऱ्या अनेक अभियांत्रिकी आश्चर्याना निर्माण करण्यात विश्वेश्वरय्या यांनी अमूल्य असे योगदान दिले होते. कृष्णराज सागर, भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, म्हैसूर सँडल अँड सोप फॅक्टरी, म्हैसूर विद्यापीठ आणि बँक ऑफ म्हैसूर या संस्थांची निर्मिती त्यांच्या प्रयत्नातूनच करण्यात आली होती.

विश्वेश्वरय्या यांचे वडील एक संस्कृत अध्यापक होते. ते १२ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. चीकबल्लापुरमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बेंगळुरूमध्ये १८८१ साली बीए चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.

विश्वेश्वरय्या हे औद्योगिकीकरणाचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांनी सिल्क, चंदन, मेटल आणि स्टील या उद्योगांच्या विकासासाठी जापनीज आणि इटालियन इंजिनिअरिंग फर्म्सचे सहाय्य घेतले. बँक ऑफ म्हैसूरची स्थापना त्यांनी या उद्योगांना अर्थसहाय्य मिळावे म्हणून केली होती. १९१८ मध्ये ते म्हैसूरच्या दिवाण पदावरून निवृत्त झाले.

विश्वेश्वरय्या यांच्या आयुष्याशी निगडित एक रंजक किस्सा :-

एकदा एका ब्रिटिश रेलगाडीने ते प्रवास करत होते. या गाडीत त्यांच्या सोबत सर्व ब्रिटिश होते, ते एकटेच भारतीय होते. त्यांच्या सावळ्या रंगामुळे आणि देहबोलीमुळे अनेक लोक त्यांची मज्जा घेत होते. परंतु ते फार गंभीर मुद्रेत चिंतन करत बसले होते.

अचानक ते उभे राहिले आणि त्यांनी ट्रेनची चेन ओढली, ज्यामुळे रेल्वे जागेवर थांबली. त्यांनी चेन ओढल्यामुळे सर्व इंग्रज त्यांना शिव्या शाप देऊ लागले. काही वेळात रेल्वेचा गार्ड त्यांच्या जवळ चेन कोणी ओढली हे जाणून घेण्यासाठी येऊन पोहचला. त्यावेळी विश्वेश्वरय्या यांनी त्याला सांगितले की ‘रूळावरील पुढील काही पटऱ्या उखडल्या गेल्या आहेत’ हे ऐकून गार्ड थक्क झाला आणि त्याने विश्वेश्वरय्या यांना विचारले की तुम्हाला हे कसं कळालं? त्यावर विश्वेश्वरय्या यांनी उत्तर दिले की,

ज्या वेगाने गाडी पुढे जात होती आणि पटऱ्यांचा जो आवाज होता. यात अचानक बदल झाला असून ह्या गाडीची गती देखील मंदावली आहे, हे पुढील बाजूचे रेल्वे रूळ उखडले गेल्यामुळे झालं असावं!

गार्डला हे पटलं नाही पण तो विश्वेश्वरय्या यांना घेऊन पुढील रेल्वे पटरीची तपासणी करायला गेला असता त्याला आढळून आले की रेल्वे रूळ खरंच उखडले गेले होते व त्याचे नट बोल्ट निघालेले होते.

आपल्या बुद्धीचातुर्याच्या बळावर शेकडो प्रवासी ब्रिटिशांचे प्राण वाचवले म्हणून विश्वेश्वरय्या यांचे मोठे कौतुक करण्यात आले आणि त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली.

विश्वेश्वरय्या यांच्या प्रमाणे असंख्य भारतीयांनी भारताच्या जडणघडणीत अमूल्य असे योगदान दिले आहे. विश्वेश्वरय्या यांचे भारतातील असंख्य अभियंत्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!