जेव्हा इंग्रज या मांजराला सलाम ठोकायचे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


इंग्रजांची सत्ता भारतात स्थिरावत होती यादरम्यान आपल्याकडे झालेला सत्ता बदल स्वीकारत असताना अनेक गमती जमती घडलेल्या बघायला मिळतात. अशीच एक गोष्ट आहे ‘मांजराच्या रॉयल सॅल्युटची’.

मांजराला मिळणारा ‘रॉयल सॅल्युट’ हे ऐकून नक्कीच गंम्मत वाटेल. पुण्यामध्ये दापोडी येथे ‘दापोडी वर्कशॉप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ आहे. या सोसायटीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यांचे बंगले होते तसेच आजही काही बंगले अस्तित्वात आहेत.

याच ठिकाणी मुंबईचे गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट देखील काही काळ वास्तव्यास होता. हा सर रॉबर्ट ग्रँट म्हणजे ज्याच्या नावाने आज मुंबईमधील ‘ग्रँट मेडिकल कॉलेज’ आहे तोच. तसेच मुंबईमधील प्रसिद्ध ‘ग्रँट रोड’ स्टेशन आणि रस्ता देखील याच्याच नावाने ओळखला जातो.

या सर रॉबर्ट ग्रँटचा आणि दापोडीचा खूप जवळचा संबंध आहे.

मुंबईहून पुण्याला आल्यावर सर रॉबर्ट ग्रँट हा दापोडीला राहत होता. इथेच दिनांक ९ जुलै १८३८ रोजी त्याचे दापोडी येथील निवासस्थानामध्ये निधन झाले. सर रॉबर्ट ग्रँट याचे संध्याकाळी ज्या खोलीमध्ये निधन झाले तेव्हा त्या क्षणीच एक मांजर त्याच्या खोलीमधून बाहेर आले.

तेव्हा खोलीच्या दरवाज्या बाहेर उभ्या असलेल्या सर रॉबर्ट ग्रँटच्या नोकराला वाटले की आपल्या साहेबांचा आत्मा या मांजरामध्ये शिरला असावा म्हणून त्या नोकराने मांजराला ‘रॉयल सॅल्युट’ ठोकला.

‘सर रॉबर्ट ग्रँट’ हा ‘दापोडी’ येथे राहत होता. (छायाचित्र आंतरजालावरून घेतलेले आहे.)

त्यानंतर रोज संध्याकाळी सर रॉबर्ट ग्रँटच्या खोलीतून हे मांजर ज्या ठराविक वेळी बाहेर पडत असे तेव्हा तो नोकर त्या मांजराला ‘रॉयल सॅल्युट’ ठोकत असे. ते मांजर रोज सर रॉबर्ट ग्रँटच्या खोलीमधून बाहेर येत असे यामुळे त्या नोकराची खात्री पटली होती की हे मांजर म्हणजे आपला मालक ‘सर रॉबर्ट ग्रँट’च आहे.

असंच एकदाजेव्हा सर रॉबर्ट ग्रँटच्या खोलीमधून ते मांजर बाहेर पडले तेव्हा या नोकराने त्याला रोजच्या प्रमाणे त्याला ‘रॉयल सॅल्युट’ ठोकला. तेव्हा आजूबाजूला असलेल्या इतर नोकरांनी हा प्रकार पाहिला आणि सगळ्या इंग्रजांच्या छावणीमध्ये ही ‘मांजर’ आणि त्याला मिळणाऱ्या ‘रॉयल सॅल्युटची’ बातमी वाऱ्यासारखी पसरली.

मांजराला मिळणाऱ्या या रॉयल सॅल्युटची बातमी एका मोठ्या अधिकाऱ्यांच्या कानावर जाऊन पोहोचली. त्या मोठ्या अधिकाऱ्याचा पहिले या मांजराला मिळणाऱ्या ‘रॉयल सॅल्युटच्या’ गोष्टीवर अजिबात विश्वास बसला नाही.

परंतु हे प्रसिद्ध मांजर हे रोज एका ठराविक वेळी ग्रँटच्या खोलीमधून बाहेर पडते हे त्या इंग्रज अधिकाऱ्याने देखील पाहिले आणि त्याने ती मांजराची गोष्ट ही त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला देखील सांगितली.

‘सेंट मेरीज चर्च’ येथे ‘सर रॉबर्ट ग्रँट’ याला पुरले गेले.

असे करत करत ही बातमी इंग्रज गव्हर्नरच्या कानापर्यंत जाऊन पोहोचली. हे सर्व ऐकून शेवटी इंग्रज गव्हर्नरने या मांजराच्या एक नावाने जीआर काढला की “जोपर्यंत हे मांजर सर रॉबर्ट ग्रँटच्या खोलीमधून बाहेर पडत राहील, तोपर्यंत त्याला रोज ‘रॉयल सॅल्युट’ दिला जाईल”.

या जीआरचे तंतोतंत पालन सगळ्या लोकांनी केले. रोज हे मांजर सर रॉबर्ट ग्रँटच्या खोलीतून बाहेर पडत असे आणि रॉयल सॅल्युट घेऊन बाहेर फिरायला जात असे. काही दिवसांनी हे मांजर दिसेनासे झाले. तेव्हा मांजराला इंग्रजांकडून मिळणारा रॉयल सॅल्युट थांबला.

तसेच दापोडीपासून जवळ असलेल्या सेंट मेरीज चर्च येथे सर रॉबर्ट ग्रँटला पुरले गेले. तसेच  या मांजराच्या रॉयल सॅल्युटच्या चर्चेला जे उधाण आले होते ते अखेरीस थांबले आणि इतिहासाच्या पानांमध्ये हे ऐतिहासिक मांजर आणि रॉयल सॅल्युट कायमचे लपले गेले.


संदर्भग्रंथ:-
१) पुणे अँड ईट्स राउंड अबाऊट- १८५६.
महत्वाचे:-
  • सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.
  • कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.
  • सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.
  •  धबधब्यामध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
 फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!