आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जर्मनी आज ओळखला जातो ते त्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत जगाला लोटणारा देश म्हणून. जर्मनी ओळखला जातो तो त्याच्या वंशशुद्ध्त्वाच्या कट्टर कल्पनांसाठी, जर्मनी ओळखला जातो तो १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात जगावर राज्य करण्याची महत्वाकांक्षा असणारा देश म्हणून. जर्मनी ओळखला जातो तो जगाला हिटलरसारख्या क्रूर राक्षसकर्मी हुकुमशहाची भेट देणारा देश म्हणून.
भले आज परिस्थिती बदलली असेल, आज युरोप मध्ये सगळेच देश पुढारलेले आहेत आणि जर्मनी सुद्धा त्यामध्ये मागे नाही. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मेडिकल सुविधा असतील, शिक्षण असेल अशा अनेक विषयात या देशाने प्रगती केली आहे. मात्र तरीही लोक दुसरे महायुद्ध आणि हिटलरला विसरायला आजही तयार नसतात. हिटलर या नावाभोवतीच वलय दिवस जाईल तसं वाढत चाललेलं आहे.
हिटलरच्या पूर्वीही इतिहासात चंगीझ खान, अल्लाउद्दीन खिलजी असे अनेक क्रूर हुकुमशहा होवून गेले, हिटलरनंतर सुद्धा जनरल गदाफी, सद्दाम हुसेन, किम जोंग उन अशी या हुकुमशहाची साखळी आहे. पण तरीही क्रूर हुकुमशहा म्हटला की लोकांना हिटलरच आठवतो.
जर्मनी या देशाची प्रतिमा या हिटलरमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब आहे. ही प्रतिमा सुधारण्यासाठी त्या देशाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.
आज जर्मनी जगात अमेरिका आणि जपान नंतर एक मजबूत अर्थव्यवस्था म्हणून जरी उदयाला आलेली असली तरी भूतकाळाच्या खुणा तिला पुसून टाकता येत नाहीत.
अनेक वेळा हिटलरचा उदय होण्यासाठी कोण कारणीभूत होते किंवा हिटलरला प्रकाशझोतात कुणी आणले, कुणाच्या मदतीने हिटलरने पहिल्यांदा राजकरणात प्रवेश केला, जेंव्हा तो कुणीच नव्हता तेंव्हा त्याच्यामागे कुणी आर्थिक आणि राजकीय सत्ता उभी केली यावर देश विदेशात, तसेच अनेक प्रकारच्या चर्चा सत्रात चर्चा होत राहतात. त्यामध्ये एक नाव ठळकपणे समोर येत. ते म्हणजे हिंडेनबर्ग.
तुम्ही म्हणाल कोण आहे हा हिंडेनबर्ग? हा जनरल हिंडेनबर्ग म्हणून पण ओळखला जातो. हा पहिल्या महायुद्धात जर्मनीचा सरसेनापती होता. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा दारुण पराभव झाला. त्या देशाचे मनोधैर्य खच्ची झाले तेंव्हा याचं जनरल पॉल व्हॉन हिंडेनबर्गने जर्मन सैन्याचे नव्याने संघटन बनवले, खच्ची झालेल्या सैनिकांच्या मनाला उभारी दिली.
जर्मनीमध्ये हिटलर ची सत्ता येण्यापूर्वी कुप्रसिद्ध असे वायमार प्रजासत्ताक होते. हे सरकार भ्रष्ट होते. या सरकारच्या काळातच जर्मनीमध्ये चलन फुगवटा भयानक वाढला.
हा चलन फुगवटा इतका भयानक होता की जर्मनीचे मार्क्स नावाचे जे आंतरराष्ट्रीय चलन आहे ते तर नोव्हेंबर १९२३ मध्ये ४.२ ट्रिलीयन मार्क्सला एक अमेरिकन डॉलर येत होता!
या सरकारच्या काळात देशात १७ ते १८ पार्टी होत्या आणि त्यांची एकमेकात प्रचंड भांडणे होती. देशाला पुढे नेण्याचा अजेंडा कुणाकडेच नव्हता.
हिंडेनबर्गने पहिल्या महायुद्धात जर्मनीचे नेतृत्व केले. मुळचा प्रशिया देशात जन्माला आलेला हा माणूस वयाच्या १८ व्या वर्षी जर्मन सैन्यात भरती झाला. खरे पाहता पहिले महायुद्ध सुरु होण्याच्या अगोदर हिंडेनबर्ग रिटायर झाला होता, पण पहिले महायुद्ध सुरु झाल्यावर देशाला आपली गरज आहे हे उमजून तो परत सैन्यात भरती झाला.
त्याच्या अधिपत्याखाली जर्मन सैन्याने १९१४ साली ताहीनबर्गची लढाई जिंकली. ही लढाई रशिया आणि जर्मनी या दोन देशात झाली होती.१७ ऑगस्ट १९१४ ते २ सप्टेंबर १९१४ च्या दरम्यान जर्मन आणि रशियन सेना एकमेकांना अलेनस्टेन नावाच्या ठिकाणी सीमाप्रदेशात भिडल्या.
या युद्धात रशियन सैन्याचा पूर्ण पराभव झाला आणि हिंडेनबर्गचे नाव जर्मनीभर गाजले पण हा आनंद अल्पकाळ टिकला कारण त्यानंतर जर्मनीचा युद्धात दारुण पराभव झाला. हिंडेनबर्ग युद्ध संपल्यानंतर रिटायर झाला. मात्र १९२५ साली तो जर्मनीचा चान्सेलर म्हणून पुन्हा निवडला गेला.
खरे पाहता हिंडेनबर्ग जेंव्हा जर्मनीचा चान्सेलर होता त्यावेळी देशात वायमार प्रजासत्ताक होते आणि सरकारचा कारभार अत्यंत भोंगळ चाललेला होता. देशात त्यावेळी नेमका नाझी पार्टीचा उदय सुरु झालेला होता. हिटलरने हे वायमार प्रजासत्ताक संपवण्याची शपथ घेतलेली होती.
जेंव्हा हिंडेनबर्ग आणि हिटलरची पहिली भेट झाली तेंव्हा त्याला हिटलर अजिबात आवडला नव्हता. १९३२ साली जेंव्हा पुन्हा एकदा चान्सेलर निवडण्याची वेळ आली तेंव्हा हिंडेनबुर्गचे वय ८४ वर्षे इतके होते पण त्याला पुन्हा निवडणुकीला उभा राहण्यासाठी आग्रह करण्यात आला कारण यावेळी निवडणुकीला अॅडोल्फ हिटलर उभा होता. हिटलरला हरवण्यासाठी हिंडेनबर्गने देशव्यापी प्रचार सुद्धा केला. हिंडेनबर्गला नाझी पार्टीचे वाढते अस्तित्व मान्य नव्हते.
हिंडेनबर्ग निवडून आला खरा पण त्यानंतर सरकार अस्थिरच राहिले. १९३२ च्या निवडणुकीत नाझी पार्टी बहुमताने निवडून आलेली होती. हिंडेनबर्गचे वय ८५ झाले होते त्यामुळे त्याच्यानंतर कुणाला तरी चान्सेलर पदाची शपथ द्यावीच लागणार होती. याचा अंदाज हिटलरला आलेला होता. अगदी शेवटापर्यंत हिंडेनबर्ग हिटलरला चान्सेलर बनवायला नाखूष होता, पण त्याचा निर्णय फार काळ टिकला नाही.
१९३३ ला नाझी पार्टीने बहुमताने आधीच्या चान्सेलरला काढून टाकण्याचा ठराव सभागृहामध्ये मांडण्याचे ठरवले होते. त्यामुळे अशक्त आणि आजारी हिंडेनबर्गने हिटलरला ३० जानेवारी १९३० रोजी जर्मनीच्या चान्सेलर पदाची शपथ दिली.
त्या दिवशी हिंडेनबर्गवर दबाव आणण्यासाठी नाझी पार्टीचे समर्थक मोठ्या प्रमाणावर संसदेच्या गेटवर जमले होते. हिटलरचा प्रचारप्रमुख गोबेल्स स्वत: समर्थकांच्या समुदायात हजर होता.
संध्याकाळपर्यंत २० हजार लोकांचा समुदाय त्या ठिकाणी हिटलरला चान्सेलर बनवण्यात यावे या मागणीसाठी जमा झाला. त्याच्या काही तास अगोदर वृद्ध हिंडेनबर्गने हिटलरला चान्सेलर पदाची शपथ देवून टाकली होती. हिटलरने त्यानंतर बाहेर येवून स्वत:ची नियुक्ती झाल्याचे जाहीर केले आणि लोकांमध्ये जल्लोष सुरु झाला.
त्या रात्री हिटलरची भव्य मिरवणूक सुद्धा निघाली. याला गोबेल्सने अत्यंत मोठ्या चमत्काराची रात्र असे नाव दिले. हुकुमशहा असलेल्या हिटलरची नियुक्ती मात्र संविधान संमत असलेल्या तरतुदीनुसार केली गेली होती हा इतिहासातील एक काळा विनोद आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.