आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार रोखण्यासाठी देशात २२ फेब्रुवारी २०२०पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. सुरुवातीला फक्त सात दिवस असणारा हा लॉकडाऊन नंतर वाढतच गेला. कित्येकांना कोरोनाची लागण झाली, दवाखान्यात रुग्णांना ॲडमिट करून घ्यायला बेड्स शिल्लक नव्हते. कित्येकांनी या कोरोना महामारीत आपले आप्तस्वकीय गमावले. डॉक्टर, नर्स, अशा आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर महिनोनमहिने घरापासून, कुटुंबापासून दूर राहावे लागले. आपली गावे सोडून दूर शहरात आलेल्या कामगारांना मैलोनमैल चालत प्रवास करावा लागला. त्यांचे हाल तर बघवत नव्हते. आता २०२१ उगवलाय, परिस्थिती आटोक्यात येतेय असं वाटतच होतं की पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं.
२०२० हे अनेकांसाठी आयुष्यातील सर्वात वाईट वर्ष ठरले. फक्त आपल्याच देशात नाही तर, जगभरात या महामारीने लोकांना जीव मुठीत धरून जगायला भाग पाडले. २०२० सारखे वर्ष कधीही झाले नसेल आणि भविष्यात पुन्हा असे वर्ष येऊ नये म्हणून सर्वजण प्रार्थना करत आहेत.
एका वर्षात आपण फक्त एका विषाणूच्या प्रसारामुळे इतके खडतर आणि कष्टप्रद अनुभव घेतलेत की, पुन्हा त्याची आठवणही नको असे आपण म्हणतोय. पण, इतिहासात असे एक नाही तब्बल दहा वर्षे लोकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागले होते. मृत्यू कधी येईल, कुठे येईल याची शाश्वती नव्हती. किमान या काळात आपण आपापल्या घरात तरी सुरक्षित राहू शकलो. पण, तेंव्हा तर कधी उठून आपलेच राहते घर रिकामे करण्याची वेळ येईल याचीही लोकांना खात्री नव्हती. सगळीकडेच फक्त अनिश्चितता, मृत्यूचे तांडव, आणि एका मागून एक उभे राहणारे संकटांचे डोंगर.
१९३०चे संपूर्ण दशकच त्याकाळच्या लोकांसाठी खूपच भयावह होते. डब्ल्यू. एच. ऑडनने तर या दशकाला, ‘अत्यंत खोटारडे दशक’ म्हटले.
जणू काही विश्वातील सर्व वाईट शक्तींनी एकत्र येऊनच या संपूर्ण दशकात पृथ्वीवरील मानवजातीला छळण्याचा कट रचला असेल.
प्रत्येकाच्या मुलभूत गरजा देखील पूर्ण होत नव्हत्या. खायला अन्न, अंघोळीला पाणी इतकेच काय पण, मोकळा श्वास घेण्याचीही चोरी होती.
या संपूर्ण दशकात या पृथ्वीवर ज्या काही घटना घडल्या त्याचे परिणाम आपण आजही भोगतो आहोत. या काळात अनेकांनी वाईट लोकांच्या वाईट वर्तणुकीला खतपाणी घातले आणि त्याचे समर्थन केले. खरे तर सगळ्यात मोठी चूक होती ती हीच. या दशकाने मानवतेला आणि माणुसकीला कायमची मान खाली घालायला लावली.
जागतिक पातळीवर उदारमतवादी मुल्ये पायदळी तुडवली गेली. अनेक देशात वैचारिक दिवाळखोरी इतकी तीव्र झाली की माणसापेक्षा त्याची विचारधारा श्रेष्ठ ठरवण्याची स्पर्धा सुरु झाली. जागतिक अर्थव्यवस्था पुरती मोडकळीस आली होती. जगभर अस्वस्थता, अशांतता आणि असुरक्षितता पसरली. या सगळ्यामागे खूप छोट्यामोठ्या कारणांची एक अखंड मालिकाच होती.
१९२९ मध्ये संपूर्ण जगभर निराशेचे वातावरण निर्माण झाले. ही निराशा इतकी खोलवर पसरलेली होती की, १९३२ पर्यंत फक्त एकट्या अमेरिकेतच २५% लोकांना कसलाही रोजगार नव्हता. उद्योगधंद्यांची क्षमता फक्त ६०% राहिली होती. याच निराशेने जर्मनीलाही ग्रासले होते. याच वर्षी जर्मनीतील बेरोजगार लोकांचा आकडा सहा दशलक्ष इतका मोठा होता.
जगभरातील लोकांच्या हाताला काहीही काम नव्हते आणि त्यांच्या प्रश्नांवर कुणाकडेच उत्तरे नव्हती. सगळीकडे फक्त अस्वस्थता होती. या सगळ्या गोंधळातून एकीकडे नाझीवादाचे समर्थक वाढले तर दुसरीकडे साम्यवादाचे. संपूर्ण जग अशा दोन टोकात विभागले गेले.
पुन्हा एकदा साम्राज्यवादाचे आकर्षण वाढत होते. कारण, प्राप्त परिस्थितीवर ताबडतोब असा कुठलाच उपाय नव्हता. अशा संपूर्ण असहाय्य अवस्थेत फक्त साम्राज्यवादच आपल्याला तारू शकेल असाही काहींचा समज झाला आणि त्यांचे त्या दिशेने प्रयत्न सुरु झाले.
जर्मनीने आत्मनिर्भरतेच डंका वाजवायला सुरुवात केली. आपल्या जनतेला त्यांचे शासक फक्त स्वतःला पुरेल, स्वतः निर्माण करू आणि स्वतः सक्षम होऊ त्यावरच भर देण्यास सांगू लागले. आर्थिक स्वावलंबनसारख्या कल्पनांना भरपूर खतपाणी घातले जाऊ लागले. जग मुठभर लोकांत विभागले जाईल आणि आपण त्यावर महासत्ता बनून नियंत्रण ठेवू अशी स्वप्ने जर्मनीला पडू लागली. आधीच असलेल्या भेदाभेदात आणखी दरी कशी निर्माण करता येईल हे ते पाहू लागले.
यासाठी त्यांनी वंशश्रेष्ठत्वाच्या भावनेला खतपाणी घालण्यास सुरुवात केली. त्यांनी युजेनिस्क्सच्या कल्पनेला जन्म दिला. युजेनिक्स म्हणजे सुप्रजननशास्त्र. या संकल्पनेच्या समर्थकांनी असे चित्र निर्माण केले की, या एकाच गोष्टीमुळे समाजातील सर्व समस्या नाहीशा होणार आहेत. आपल्या या मताला त्यांनी छाद्मविज्ञानाचा आधार घेऊन जैवशास्त्रीय आणि वैद्यकशास्त्राचे पुरावेही द्यायला सुरुवात केली.
याचा प्रभाव खूप मोठा होता. अनेक लेखकांनी याच कल्पनेवर कादंबऱ्याही लिहल्या. अल्डस हेक्झले याची ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ ही कादंबरी याच कल्पनेवर आधारलेली आहे.
नाझीवादाच्या आणि वंश्श्रेष्ठत्वच्या उदयाने संपूर्ण जगाला काय किंमत चुकवावी लागली होती, ते आपणही जाणतोच.
१९३५ साली मुसोलिनीनेही इथिओपियावर हल्ला केला. त्याला या देशातून जुन्या लोकांना हद्दपार करून नवा देश वसवायचा होता. १८९६ मध्ये इथिओपियाने इटालियन लोकांचा पराभव केला होता. मुसोलिनीला तोही सूड उगवायचा होता. इथियोपियावर हल्ला करण्यासाठी मुसोलिनीने हवेतून विषारी वायू सोडला.. इथियोपियातील लोकांची काय अवस्था झाली असेल विचार करा. १९३६ मध्ये हा देश पूर्णतः इटलीच्या ताब्यात आला.
हिटलरने मुसोलिनीच्या या कृत्याचे तोंडभरून कौतुक केले होते. यामुळे जर्मनी आणि इटलीतील संबध आणखी दृढ बनले. यातूनच अक्ष राष्ट्रांची युती जन्माला आली.
याच दशकात जपानने देखील साम्राज्यवाद स्वीकारला. जपानच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर आशियाई देशांवर त्यांनी जपानी संस्कृती लादायला सुरुवात केली. जपानच्या शुद्ध वंशत्वाचा पुरस्कार केला जाऊ लागला. इतर आशियाई देशांनी त्यांचे नेतृत्व मान्य करावे म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जाऊ लागला. याच दशकात मंचुरियन संघर्ष, म्युकडेनची घटना आणि रेल्वेरूळ उध्वस्त करण्याच्या घटना घडल्या.
चीनमध्ये दहशतवादी कृत्ये वाढल्याची कारणे देऊन त्यांनी चीनवर कब्जा करण्याचा प्रयत्नही केला. लीग ऑफ नेशनने जपानच्या या कृत्यावर खडे बोल सुनावले तेंव्हा जपान या लीगमधून बाहेर पडला. चीनवर हल्ला करण्याचे धोरण तरीही त्यांनी सोडले नाही. १९३७ साली जपान आणि चीनमध्ये युद्ध सुरु झाले आणि हे युद्ध सुमारे आठ वर्षे चालले.
१९३७ साली जपानने नानकिंगवर हल्ला केला. इतिहासातील सर्वात क्रूर हल्ला म्हणून ही घटना ओळखले जाते. याला नानकिंगवरचा बलात्कारही म्हटले जाते. या हल्ल्यात जपानने अक्षरश: हजारो लोकांच्या सामुहिक हत्या घडवून आणल्या. या शहरातील नागरिकांचा अमानुष छळ करण्यात आला.
याच काळात १९३६-३९ दरम्यान स्पॅनिशमध्ये अंतर्गत युद्धाला तोंड फुटले. जनरल फ्रांसिस्को फ्रँकोने रिपब्लिक ऑफ स्पेनविरुद्ध बंडखोरी केली. या घटनेने फॅसिस्ट विचारसरणीला आणखीनच खत पाणी मिळाले. स्पॅनिश रिपब्लिकला लोकशाहीवादी, समाजवादी, आणि शासनविरोधकांचा पाठींबा होता.
या युद्धाने देखील जागतिक पटलावर दोन गट निर्माण केले. एकीकडे फॅसिस्ट नाझी आणि इटली तर दुसरीकडे लोकशाही, समाजवादी आणि अराजकीयतेचे समर्थक. मुसोलिनी आणि हिटलरने फ्रँकोला आणि त्याच्या बंडखोरीला पाठींबा दिला.
१९३९ साली फ्रँको यशस्वी झाला आणि त्याने स्पेनमध्ये कडक निर्बंध लागू केले. या निर्बंधांची तर आपण कल्पनाही करू शकणार नाही.
जगभरात हुकुमशाही सत्ताधीशांची सरशी होत असताना काही जागतिक नेते मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत बसले. यानंतर दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले आणि त्याचे परिणाम काय झाले हे तर आपण सर्वचजण जाणतो. पण, या महायुद्धाआधी सुमारे दशकभर सगळीकडेच महायुद्धाची झलक दिसून आली होती.
संपूर्ण मानवजातीसाठी महाभयंकर ठरलेल्या दुसऱ्या महायुद्धाची बीजे १९३०च्या दशकातच रुजली होती.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.