अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मापात पाप!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करत असताना ‘मी माफी मागणार नाही, कारण मी गांधी आहे सावरकर नाही’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर उजव्या वर्तुळातून टीकेची झोड उठवण्यात आली.

सावरकरांच्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच उरलेल्या अनुयायांनी आपल्याला परीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

प्रकरण तापलेलं असतानाच मुंबईच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् चे संचालक, अभिनेते योगेश सोमण यांनी राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करणारा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून प्रसारित केला.

या व्हिडीओनंतर विरोधी गोटातून तिखट प्रतिक्रिया आल्या, पण परवा आलेल्या बातमीने या वादात योगेश सोमण यांच्या थेट संचालकपदावरच गंडांतर येणार असल्याचे कळते आहे.

या पूर्ण प्रकरणाचे वार्तांकन आणि अर्थांकन पाहिले तर एक दावा प्रत्येक ठिकाणी केला जात आहे तो म्हणजे, काँग्रेसने योगेश सोमण यांना काढून टाकण्याच्या केलेल्या मागणीमुळे ‘अभिव्यक्ती’ स्वातंत्र्याचा संकोच होतो आहे.

 

www.jagran.com

अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् मध्ये शिकणाऱ्या आणि न शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी, काँग्रेसची एनएसयुआय, कम्युनिस्ट पक्षाची एसएफआय या विद्यार्थी संघटनांच्या पाठिंब्याने योगेश सोमणांना संचालक पदावरूनच काढून टाकण्याची मागणी केली आहे.

राहुल गांधी यांच्यावर टीका करणारा व्हिडीओ फेसबुकवरून प्रसारित केला म्हणून त्यांना संचालकपदावरून काढलं जावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेली टीका, आणि सोमण यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेली टीका किती चूक किंवा बरोबर, हा मुद्दा तूर्तास बाजूला ठेवला तरीही एक प्रश्न शिल्लक उरतोच!

तो प्रश्न असा, की कलावंतांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाजपच्या दमनकारी राज्यात जातायेता संकोच होत असताना या परिस्थितीत भारताचे एकमेव आशास्थान असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच दुर्लक्षणीय कारणावरून एका कलाकाराला घरी बसवण्याची भाषा करत असतील, तर आता भारताने कुणाच्या आशेवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या इमारती उभारायच्या?

देशाच्या वैचारिक आणि राजकीय पटलावर काँग्रेस हा एक आणि एकच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तमा बाळगणारा पक्ष शिल्लक असताना आता इथल्या अभिव्यक्तीचं काय होणार हा प्रश्न आ वासून उभा राहतो!

त्यामुळे खास काँग्रेसच्या ठेवणीतलं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सध्या त्याच्यासमोर असलेलं आव्हान यावर विचार करणं गरजेचं ठरतं.

 

Jansatta

मुळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि त्यातही भारतासारख्या अनेकांगी विचारधारा असणाऱ्या देशातलं मोडकळीस आलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा विषय एका लेखात संपणारा नाही.

त्यामुळे तूर्तास फक्त कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भारतात काय परिस्थिती होती आणि आहे यावर बोलू.

अगदी इतिहासात जायचं म्हटलं तर गीतकार मजरुह सुल्तानपुरी यांना त्यांच्या कवितांवर आक्षेप घेत खुद्द नेहरू पंतप्रधान असताना तुरुंगवास भोगावा लागल्याचं प्रकरण स्मरणात असेल.

पुढे तर इंदिरा गांधींच्या काळात आणीबाणी आणि त्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी असलेलं पोषक वातावरण यावर प्रकाश टाकणारं साहित्य ढिगाने उपलब्ध आहे.

काँग्रेसी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा इतिहास सर्वज्ञात असूनही आपण सध्याच्या अवघड काळात केवळ काँग्रेसकडेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे एकमेव रक्षक म्हणून पाहतो ही गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही. त्यात सोमण यांच्या बडतर्फीच्या मागणीचे सध्याचे प्रकरण ताजे असताना तर काँग्रेसी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे.

एका बाजूला हा दैदिप्यमान इतिहास खांद्यावर बाळगणारी काँग्रेस समोर असताना समोर नक्की कोण उभं ठाकलंय म्हणून पाहायला जावं तर थेट योगेश सोमण आणि त्यांची प्रिय भाजप!

सोमण यांना काढून टाकल्याची मागणी करण्यात आली म्हणून शेपटीवर पाय दिल्यासारखे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नावाने गळे काढणारे उजव्या गोटातील बहाद्दर!

 

हेच बहाद्दर काही वर्षांपूर्वी आलेल्या पद्मावत चित्रपटावरील वादानिमित्त दीपिका पदुकोणचे नाक कापायला निघालेल्या कर्णी सेनेच्या, आणि तिला पाठिंबा देणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वळचणीला बसलेले होते.

एरवीही हे भाजप समर्थक विरोधी मतांना किती सन्मानाने एकूण घेतात हेही आपण वेळोवेळी पाहिलं आहेच!

आज सोमण यांना काढून टाकण्याची मागणी झाली म्हणून थेट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नैतिक मैदानात उतरून युद्धास सज्ज झालेल्या या वीरांनी गेल्या काही वर्षात किती वेळा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हत्या केल्या याची मोजदाद करणेही अवघड आहे.

मुळात सोमण यांच्या अभिव्यक्तीच्या दर्जा किती दखलपात्र हाही वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. सातत्याने सत्ताधारी पक्षाच्या पथ्यावर पडणारी भूमिका घेणारा कलाकार समोरून विरोध झाला की अभिव्यक्तीचा संकोच वगैरे गावगप्पा मारतो हेच हास्यास्पद आहे!

त्यात राजकीय वक्तव्ये करूनही त्यावर प्रतिक्रिया आल्यानंतर ‘कलात्मक स्वातंत्र्य’ धोक्यात असल्याची आरोळी ठोकणारा विनोदी अभिनय सोमण आणि त्यांच्या पाठीराख्यांनी केला आहे.

आपल्याला सोयीचं असतं तेव्हा कलाकार, लेखकांना थेट धमक्या द्यायच्या आणि आपली गैरसोय होते तेव्हा अभिव्यक्ती वगैरे गोंडस संकल्पना वापरून सहानुभूती पदरात पाडून घेण्याचा नेत्रदीपक सोहळा सध्या चालू आहे.

“आता कुठं गेलं तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य?” हा प्रश्न मोठ्या अभिनिवेशात विचारला जात असताना दोन गोष्टी प्रकर्षाने लक्षात घ्याव्या लागतील.

पहिली – ‘तुमचं’ म्हणजे कॉंग्रेसचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य नक्की कोणत्या काळात अस्तित्वात होतं? दुसरी – भाजप समर्थक नक्की कोणत्या नैतिक अधिकाराने काँग्रेसला जाब विचारत आहेत?

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना वेळोवेळी फुटणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यप्रेमाचे धुमारे शेवटी कोणत्या टोकावर येऊन थांबतात? यापैकी खरंच कुणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चाड आहे का हा विचार आपण करायचा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

1 Comment
  1. Shekhar says

    सावरकरांच्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच उरलेल्या अनुयायांनी आपल्याला परीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

    Veer Savarkaranche carodo hat aahet

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!