आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपल्यापैकी बऱ्याच जणांना पृथ्वीची भौगोलिक रचना माहितीच आहे. ७१ टक्के जलयुक्त असणाऱ्या आपल्या पृथ्वीवर भूभागाचे प्रमाण केवळ २१ टक्के आहे. पण हे सर्व भूभागसुद्धा एकप्रकारचे नाहीत. काही प्रदेश हे शुष्क सपाट प्रदेशात मोडतात, तर काही पाणथळ स्वरूपाचे, तर काही बर्फाच्छादित प्रदेश आहेत. त्यापैकीच एक असलेल्या पाणथळ प्रदेशाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. एकेकाळी इंग्लंडच्या अधिपत्याखाली असणारा “स्कॉटलंड” देश तुम्हाला ठाऊक असेलच पण या देशाचा मोठा भूभाग हा पाणथळ व दलदलीने व्यापला आहे याची तुम्हाला कल्पना आहे का?
तुम्ही म्हणाल, मग त्यात काय वावगे?! तर हा प्रदेश वरवर जरी उपयुक्त नसलेला व पडीक वाटत असला तरीही पृथ्वीच्या इकोसिस्टीममध्ये खूप मोठी भूमिका बजावतो. ते कशाप्रकारे हे सांगण्यासाठीच हा प्रपंच. तत्पूर्वी दलदलव्याप्त क्षेत्रे नेमकी कशी तयार होतात हे जाणून घेऊया.
दलदल म्हणजे चिखल आणि गाळ यांपासून बनलेली एक पाणथळ जागा. दलदल ही मुख्यतः नद्यांच्या, समुद्राच्या खाडीलगत किंवा आटत आलेल्या सरोवराच्या खोलगट भागात बनू शकते. पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या सपाट भूप्रदेशातसुद्धा दलदली बनतात. काही दलदलींचे प्रदेश हे हंगामी तर काही दलदली या कायमस्वरूपी असतात. जगात विविध देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दलदली आढळतात. त्या निरनिराळ्या नावांनी ओळखल्या जातात. उदाहरणार्थ, अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यात त्यांना एव्हरग्लेड्स, कॅनडातील उत्तर ध्रुवाजवळील प्रदेशांत त्यांना मस्केग, तर इंग्लंडमध्ये त्यांना मूर, बॉग, फेन अशी नावे आहेत.
स्कॉटलंडमधील एकूण जमिनीच्या “वीस टक्के” भूभाग दलदलयुक्त प्रदेशाने म्हणजेच ‘बॉग’ने व्यापला आहे. व्यावसायिक दृष्ट्या अगदी पडीक असलेला हा परिसर नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहे. इथल्या या प्रदेशात अनेक वर्षांपासून असलेल्या दलदलीपासून कच्च्या कोळश्यासदृश्य एक इंधन प्राप्त होते, त्यास “पीट” असे संबोधतात. त्यामुळेच या प्रदेशाला “पीटलँड” असे नावसुद्धा पडले आहे. काही काळापासून येथील लोक या इंधनाचा वापर आपल्या दैनंदिन कामकाजासाठी करतात.
या दलदलयुक्त प्रदेशाची दुसरी उपयुक्त बाजू मात्र अगदी जागतिकीकरणापर्यंत अनभिज्ञ होती. त्याच सुमारास सुरु असलेल्या दुसऱ्या महायुद्धामुळे अन्नधान्याच्या गरजासुद्धा वाढल्या होत्या. त्यामुळेच स्कॉटलंडमधील स्थानिकांनी ‘पीटलँड’सुद्धा कसायला सुरवात केली. या जमिनीत अधिकची भर घालून, तिथे साठलेल्या पाण्याचे पाट बाजूला काढून त्यांनी हे प्रदेश काही प्रमाणात सुकवले. एकेकाळी दलदलयुक्त असणारे हे प्रदेश त्यांनी शेतपिकांची लागवड आणि वसाहती वसवण्यास योग्य असे केले.
या सगळ्या घडामोडींदरम्यान एक गोष्ट मात्र सर्वांच्या नजरेतून सुटत होती ती म्हणजे या दलदलीच्या प्रदेशातून मुक्त होण्यास सुरु झालेला “कार्बन डायॉक्साईड”. होय. मुळात या दलदलीवर पाण्याचा एक जाडसर थर कायम असलेला आपल्याला आढळून येतो, त्याने होते काय तर, हवेमधील ऑक्सिजन हा आत खोलपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे या दलदलीत अनादी काळापासून अडकून असलेल्या काही वनस्पती, प्राण्यांचे अवशेषसुद्धा कित्येक दिवस “डीकम्पोज” होत नाहीत.
सेंद्रिकरणाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन या वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांना मिळू शकत नाही व या अवशेषांमध्ये अडकून असलेला कार्बन डायॉक्साईडसुद्धा बाहेर पडू शकत नाही. सेंद्रिकरणाच्या प्रक्रियेस अशी दलदलयुक्त क्षेत्रे प्रतिरोध करत असल्यानेच इथे साठत असलेल्या कार्बन डायॉक्साईडचे प्रमाणसुद्धा अधिक आहे. याशिवाय या दलदलीमध्ये असणारे विशिष्ट असे “स्फॅगनम” हे शेवाळसुद्धा अँटीऑक्सिडंटचे काम करते. त्यामुळे इथे असलेल्या वनस्पती सहजासहजी डिकम्पोज होत नाहीत व तिथे कार्बन साठून राहतो आणि हा साठलेला कार्बन किती असावा? तर तो “४०० मिलियन टन्स” इतका प्रचंड आहे. जवळपास पूर्ण ब्रिटनच्या जंगलामध्ये साठून असलेल्या कार्बनच्या तीनपट अधिक! आहे की नाही आपल्या कल्पनेपलीकडील वास्तव.
जसे हे दलदलयुक्त प्रदेश स्थानिकांच्या अतिक्रमणामुळे शुष्क होत जाऊ लागले तशी इथे असणाऱ्या “स्फॅगनम” शेवाळाच्या संख्यासुद्धा कमी होऊ लागली व सेंद्रिकरणास चालना मिळून, इथे साठून असलेला हा कार्बन डायॉक्साईडसुद्धा पुन्हा हवेत मुक्तपणे मिसळण्यास सुरुवात झाली. अजून एक गोष्ट म्हणजे ज्या दलदलयुक्त प्रदेशामध्ये अशा ‘पीट’ या इंधनाचे साठे असतात अशा ठिकाणी जंगली वणव्याचासुद्धा धोका असतो. २०१९ साली या पीटलँडच्या परिसरात लागलेल्या एका आगीमध्ये पृथ्वीच्या वातावरणामध्ये कार्बन डायॉक्साईड सोडल्या जाण्याचे प्रमाण हे एकट्या स्कॉटलंड शहराच्या “कार्बन इमिशनपेक्षा” दुपटीने अधिक होते.
आधीच ग्लोबल वॉर्मिंग व हवामान बदलांमुळे त्रस्त असलेल्या संशोधकांसमोर हे एक नवीनच संकट उभे टाकले आहे. पण हा धोका वेळीच ओळखून स्कॉटलंडमधील पर्यावरण समितीने मात्र कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. हा धोका होऊ नये म्हणून आणि इकडे जगाचे लक्ष वेधले जावे म्हणून गेल्या काही वर्षापासून या संघटना सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
पाणथळ प्रदेशाचे एक संशोधक “अँडरसन” म्हणतात, “बाह्यजगापासून अलिप्त अशा क्षेत्राचे लोकांना आकर्षण नसले तरी, ही दलदलयुक्त क्षेत्रेसुद्धा त्यांचे आयुष्य सुखकर करण्यात एक मोलाची भूमिका बजावत आहेत, पण दुर्दैवाने जगाने संवर्धित करण्यायोग्य अशा क्षेत्रामध्ये प्रेक्षणीय स्थळांची गणना तर केली परंतु, अधिक उपयुक्त अशा या स्थळांची गणना मात्र केली नाही.” त्यांच्या या मताचा स्कॉटलंड सरकारने विचार केला असून येणाऱ्या २०२३ च्या संवर्धित होणाऱ्या स्थानांच्या यादीमध्ये आता “पीटलँडचे” नाव सुचवण्याचे ठरवले आहे, जेणेकरून ही दलदलक्षेत्रे पूर्णपणे नष्ट होणार नाहीत.
एक गोष्ट बाकी राहते ती म्हणजे सृष्टीला निर्माण झालेला हा धोका टाळता येऊ शकेल का? या शुष्क पडत चाललेल्या दलदलयुक्त प्रदेशामधून निघणारे कार्बन व इतर ग्रीनहाऊस गॅसेस ग्लोबल वॉर्मिंगसाठी किती प्रमाणात कारणीभूत आहेत या प्रश्नांची उत्तरे तर काळच देईल, पण अशा झालेल्या चुका आता टाळण्याच्या दृष्टीनेसुद्धा शास्त्रज्ञ कसोशीने प्रयत्न करत आहेत.
संशोधकांच्या मते या दलदलीच्या प्रदेशातून कार्बनच्या उत्सर्जनावर आपण उपाय करू शकलो तरी “इकडे आड, तिकडे विहीर” अशी परिस्थिती याठिकाणी उद्भवली आहे. कारण दलदलयुक्त प्रदेशांची समस्या ही दोन्ही बाजूंनी आपल्याला आव्हान देणारी आहे. म्हणजे हे प्रदेश जर आपण शुष्क होण्यापासून वाचवू शकलो नाही तर कार्बन उत्सर्जित करून ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतील आणि या क्षेत्राचे आपण संवर्धन करू शकलो आणि ही क्षेत्रे जर अधिक ओली झाली तर या ठिकाणी निर्माण होणारा “मिथेन” हासुद्धा आपल्याला घातक ठरू शकेल. सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणावर कार्बन साठवून ठेवलेली ही दलदलयुक्त क्षेत्रे वाचवणे हेच आपल्यासमोर असणारे मोठे आव्हान आहे.
पृथ्वीवर एवढ्या प्रचंड प्रमाणात कार्बन साठवून ठेवलेली ही दलदलयुक्त क्षेत्रे आजपर्यंत दुर्लक्षितच होती, आज मात्र आपल्याला त्यांची महती कळलेली आहे. खरेतर दोन्ही बाजूंनी आव्हानात्मक असलेल्या या क्षेत्रांचे संवर्धन करताना मात्र आपल्याला तारेवरची कसरत करावी लागणार आहे, पण पृथ्वीवरील पर्यावरणाचे आणि आपले भविष्य जर सुरक्षित करायचे असेल तर ही संवर्धनाची कसरत करणे आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.