आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कोणतेही क्षेत्र, संस्था, कंपनी, टीम ही काही एका रात्रीत यशस्वी होत नाही. तिच्या यशामागे कैक हात, न दमता परिश्रम करत झिजत असतात. जितके महत्वाचे कष्ट असतात तितक्याच, किंबहुना अधिक महत्वाचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीचे नियोजन असते.
भारताला ‘अंतराळ तंत्रज्ञानात’ प्रगती पथावर अग्रेसर करण्यात डॉ. सतीश धवन यांची मोलाची भूमिका आहे.
एका रॉकेट साइंटिस्ट बरोबरच त्यांना भारतातील ‘एक्सपेरिमेंटल फ्लुईड डायनॅमिक्स रिसर्चचे’ जनक म्हणून ओळखले जाते. सतीश धवन यांचा जन्म २५ सप्टेंबर, १९२० रोजी श्रीनगर येथे एका प्रतिष्ठित घराण्यात झाला. त्यांचे वडील हे भारतीय नागरी सेवेत उच्च पदाधिकारी होते व फाळणी दरम्यान ‘रीसेटल्मेण्ट कमिशनर’ म्हणून निवृत्त झाले.
धवन यांनी श्रीनगर येथूनच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले व पंजाब विद्यापीठातून, ‘बी. ए. मॅथेमॅटिक्स अँड फिजिक्स, एम. ए. इंग्लीश लिटरेचर, आणि बी. ई. मेकॅनिकल इंजिनीयरिंग’ या पदव्या प्राप्त केल्या. पुढे १९४७ साली त्यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा’ येथून “एरॉनॉटिकल इंजिनीयरिंग” या शाखेत ‘एम. एस.’ केले. त्यानंतर कॅलीफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून “एरॉनॉटिकल इंजिनीयर” ची पदवी मिळवली.
एवढ्यावरच न थांबता, त्यांनी १९५१ साली ‘एरॉनॉटिकल इंजिनीयरिंग व मॅथेमॅटिक्स’ हे विषय निवडून त्यात ‘पी. एच.डी.’सुद्धा केली.
‘शिक्षणाची प्रचंड गोडी असली व ध्यास असला की ज्ञानार्जन हेच आयुष्याचेही ध्येय बनते!’ धवन याचेच एक उदाहरण होते.
जसे पक्षी सायंकाळी घरट्यातच परततात, त्याच प्रमाणे आपले शिक्षण संपवून धवनसुद्धा मायदेशी परतले व १९५१ साली “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स” येथे रुजू झाले. एका दशकानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या डायरेक्टर पदाचा मान स्वकर्तुत्वावर मिळवला. त्यांनी इथून कधीच मागे वळून पहिले नाही.
यशाची नवनवीन शिखरे ते गाठत गेले. १९७२ साली डॉ. विक्रम साराभाईंनंतर ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइज़ेशन’चे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली व ‘इंडियन स्पेस प्रोग्राम’ची धुरा त्यांनी अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना सांभाळली. याचबरोबर ते ‘इंडियन स्पेस डिपार्टमेंट’चे अध्यक्ष व केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या ‘डिपार्टमेंट ऑफ स्पेस’चे सेक्रेटरी म्हणूनसुध्दा योगदान देत होते.
एकाच वेळी इतक्या विविध जबाबदाऱ्या पार पाडणे काही सोपे नव्हते, पण धवन यांनी ही तारेवरची कसरत अगदी जीव ओतून केली. “हर्मन श्लीचिन” लिखित ‘बाउण्ड्रि लेयर थियरी’ या पुस्तकात डॉ. सतीश धवन यांच्या, भारतीय अंतराळ मिशनला असलेल्या योगदानाबद्दल व त्यांच्यात असलेली दूरदृष्टी, ध्येयवेडेपणा, जिद्द, चिकाटी आणि त्यांच्या मल्टिटास्कींग पर्सनॅलिटीबद्दल आपल्याला सविस्तर माहिती मिळते.
भारतातील पहिले ‘सुपरसॉनिक विंड टनेल’ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे स्थापित करण्याचे श्रेयसुद्धा धवन यांना जाते. डॉ. धवन हे ‘एक्सपेरिमेंट ईन रूरल एज्युकेशन, रिमोट सेंसिंग व सॅटेलाईट कम्युनिकेशन्स’चे प्रणेते म्हणूनसुद्धा ओळखले जातात.
त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे भारत हा रशिया, अमेरिका, चीन या देशांप्रमाणे अंतराळाला आपल्या कवेत समावून घेणाऱ्या देशांपैकी एक बनला.
आपल्या अविरत प्रयत्नांनी त्यांनी ‘इन्सॅट – अ टेलीकम्युनिकेशन सॅटेलाईट, आय. आर. एस (इंडियन रिमोट सेंसिंग सॅटेलाईट, व पोलर सॅटेलाईट लॉन्च वेहीकल (पी.एस. एल. वी.)’ अंतराळात प्रक्षेपित करून भारताच्या विज्ञान व अंतराळ इतिहासात एक नवीन विक्रम घडवला.
जितके यशशिखर धवन यांनी अनुभवले पण अपयशाचे खाचखळगे त्यांनासुद्धा चुकले नाहीत. इतके कर्तुत्ववान असूनसुध्दा धवन यांना कधीच आपल्या यशाचा गर्व झाला नाही. यशाप्रमाणेच अपयशाची संपूर्ण जबाबदारी देखील धवन एकटे स्वीकारीत. श्रेय वाटून घेणारे तर भरपूर असतात, पण अपयश पचवण्याची क्षमता बाळगून, पुन्हा उठून उभे राहण्याची हिंमत धवनांच्या जिगरी होती.
‘चंद्रयान १’ला अंतराळात प्रक्षेपित करण्याचे स्वप्न जरी विक्रम साराभाईंचे असले तरी, ते प्रत्यक्षात उतरवण्याचे कष्ट डॉ. सतीश धवन यांनी घेतले. या प्रकल्पासाठी त्यांनी वेगवेगळ्या विभागांमधील अतिशय ज्ञानी लोकांना हेरून या प्रकल्पाला आपले सर्वस्व अर्पण केले. जेव्हा हे प्रक्षेपण अयशस्वी ठरले तेव्हा त्यांनी निडरपणे, एक टीम लीडर म्हणून आपली जबाबदारी न झिडकारता, अपयशाबद्दल पत्रकार परिषदेला ते एकटे सामोरे गेले.
विरंगुळा घेण्यासाठी देखील धवन ‘अभ्यासच’ निवडत. एकदा विरंगुळा म्हणुनच त्यांनी ‘बर्ड फ्लाइट’ चा अभ्यास केला. पुढे हा अभ्यास बऱ्याच प्रयोगांमध्येसुध्दा उपयुक्त ठरला. निसर्गाच्या सानिध्यात ते जास्त रमत. डॉ. धवन यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन स्पेस व एरॉनॉटिक क्षेत्राने विविध उच्चांक गाठले.
त्यामुळे ०३ जानेवारी २००२ साली त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी, आंध्र प्रदेशातील, श्रीहरीकोटा येथील ‘इंडियन सॅटेलाईट लॉन्च सेंटर’ चे नामकरण ‘सतीश धवन स्पेस सेंटर’ करण्यात आले. त्यांच्या या कारकिर्दीवरून, ‘असा सतीश पुन्हा होणे नाही’ असेच म्हणावे लागेल.
असे हे थोर व्यक्तिमत्व चिरस्मरणात राहो हीच प्रार्थना!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.