ससून हॉस्पिटलचा ‘फुटपाथ वॉर्ड’ : दैन्यावस्थेत जगणाऱ्या या रुग्णांच्या जीवाचा कुणीच वाली नाही?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

पुणे स्टेशन परिसरातील ससून रुग्णालयाच्या बाहेरील फुटपाथवर नजर टाकली तर एक अत्यंत विदारक चित्र दिसून येत असतं. अनेक विविध आजारांनी पीडित असलेले रुग्ण, ज्यांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बेताची असते, हे ह्या रुग्णालयाच्या बाहेर बसून भीक मागण्याचे काम करतात. आपल्यावर उपचार करण्यासाठी लागणारी पुरेशी रक्कम आपल्याकडे नाही असं म्हणत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या दयेचा पैशावर हे लोक आपला रहाटगाडा चालवत असतात. एका वर्तमानपत्राने ही परिस्थिती समोर आणली आहे. 

जेव्हा ह्या रुग्णांच्या अवस्थेबाबत रुग्णालयात चौकशी केली जाते तेव्हा कळते की ह्या रुग्णांना गरीबीमुळे निवासात स्थान मिळत नसल्यामुळे त्यांना फुटपाथवर आयुष्य काढावं लागत आहे.

बिहारच्या पटनावरून आलेला एक असाच मजूर जो आपल्या पोटापाण्यासाठी काम शोधत पुण्यात आला, काम करत असतांना झालेल्या एका गंभीर जखमेमुळे ससून रुग्णालयात दाखल झाला. सुरुवातीच्या काळात करण्यात आलेल्या उपचारांनंतर त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली काही दिवस ठेवण्यात आलं, त्याचा अंगावरचे शस्त्रक्रियेचे व्रण भरले देखील नव्हते, अशा वेळी एका रुग्णवाहिकेच्या मदतीने त्याला ह्या फुटपाथवर सोडण्यात आले.

तेव्हापासून तो याच ठिकाणी आपल्या शस्त्रक्रियेच्या जखमा दाखवत लोकांच्या सहानुभूतीतुन मिळणाऱ्या पैशावर स्वतःचे उपचार करतो आहे. हे असं अत्यंत दरिद्री आयुष्य जगणारा तो एकमेव नसून त्याच्या सोबत अजून ८ रुग्ण आहेत ज्यांना कोणी वाली नसल्यामुळे ते फुटपाथवर आपल्यावर उपचार करण्यात यावे यासाठी चाकरमान्यांची याचना करत असतात.

हे ८- १० रुग्ण जे त्या फुटपाथवर आपलं आयुष्य कंठत आहेत त्यांची परिस्थिती इतकी वाईट आहे की दगडाला ही पाझर फुटेल.

पण आपल्या रोजच्या कामाच्या व्यापात गढून गेलेल्या लोकांना याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही आहे, अगदी ज्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांना देखील ह्या रुग्णांच्या दयनीय अवस्थेबद्दल काहीही वाटत नसून त्यांनी अत्यंत निष्ठुर धोरण स्वीकारल्या नंतर आता ह्या फुटपाथवरच ह्या लोकांनी आपला वेगळा वॉर्ड थाटला आहे. आपण अदखलपात्र असल्याचा संपूर्ण ग्रह ह्या मंडळीचा झाला असून आता ह्या लोकांनी आपलं दारिद्र्य लक्षात घेऊन ह्या फुटपाथवरच्या रुग्णालयाशी स्वतःला जुळवून घेतलं आहे.

एकीकडे दुर्धर आजारांशी संघर्ष तर दुसरीकडे जगण्याचा संघर्ष अशा दुहेरी संघर्षाचे आयुष्य हे रुग्ण जगत आहेत.

ह्या फुटपाथ वॉर्डचा असाच एक पेशंट, त्याला ना घर आहे ना दार, ना चौकशी करणारे नातेवाईक ना विचारपूस करणारा मित्रपरिवार आहे. बालपणी आंध्र प्रदेशातून इकडे पळून आला होता, आता तिकडे आपले नातेवाइक कोण याची त्याला स्मृतिच उरलेली नाही. तो रोज आपल्या जखमा घेऊन रुग्णालयात जातो, त्यांच्यावर ड्रेसिंग झाली की मग पुन्हा येऊन फुटपाथवर आपला निवास सुरू करतो. निदान याला आपल्यावर उपचार होत असल्याचे समाधान आहे, पण असे देखील अनेक आहेत ज्यांना रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे ते फुटपाथवर आपलं आयुष्य जगतात आणि एकदिवस गतप्राण होता.

ह्या फुटपाथ वॉर्डच्या लोकांच्या मते दर आठवड्याला कमीतकमी तीन रुग्ण ह्या ठिकाणी दगावतात.

पोलीस अशा परिस्थितीत त्यांच्या मृत शरीरांची विल्हेवाट लावतात. बऱ्याचदा त्या मृतदेहातून इतका उग्र वास येत असतो की पोलिसांना ते हटवण्यासाठी भाड्याने लोकांना पाचारण करावं लागतं. एकंदरीत जिवंतपणी नरकानुभूती हे फुटपाथ वॉर्ड वरील पेशंट घेत असतात.

आता ह्या रुग्णांच्या दयनीय अवस्थेबद्दल सरकारात चर्चा करायला गेल्यावर सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि रुग्णालयाचे पदाधिकारी यांच्यात ‘तू तू मै मै’ सुरू होते. ह्या परिसरातील एका नगरसेवकाला ज्यावेळी ह्या संदर्भात विचारणा करण्यात आली त्यावेळी त्याने सरळ ह्याचं खापर रुग्णालय प्रशासनावर फोडलं आणि स्वतः देखील त्या प्रशासनाचा भाग आहे याचा विसरच त्या नगरसेवकाला पडला होता. नगरसेवकाच्या मते ह्या लोकांनी रुग्णालयाच्या आत राहून उपचार घेणे अपेक्षित आहे, पण त्यांची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाने टाकून दिल्यामुळे त्यांना फुटपाथवर रहावं लागत आहे. ह्या लोकांचे तत्काळ स्थलांतर एखाद्या निवासशाळेत करण्यात यावे.

पुण्यातील नर्हे गावातील एका अशाच शासन पुरस्कृत निवासशाळेच्या अधिकाऱ्यांच्या मते तर त्यांना असा कुठला गरजू रुग्ण असल्याचेच माहिती नाही.

त्यांच्या मते जर त्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर त्यांनी हॉस्पिटलमध्ये राहणे हे जास्त योग्य असणार आहे. जेव्हा त्यांचे उपचार पूर्ण होतील तेव्हा त्यांच्या अर्जाच्या आधारावर आम्ही त्यांना निवासशाळेत ठेवून घेऊ, पण त्यासाठी त्यांचे उपचार पूर्ण होणे गरजेचे आहे.

ससून रुग्णालयातील पदाधिकाऱ्यांच्या मते तर हे रुग्ण जेव्हा त्यांना हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेरात दिसतात तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेण्यात येते परंतु ते बहुतांश वेळा पुन्हा बाहेर जाऊन बसतात.

एकंदरीत ह्या फुटपाथ वॉर्डबद्दल सर्वत्र सावळा गोंधळ असून रुग्णालय प्रशासन, निवासशाळा, राजकीय कार्यकर्ते ह्यांच्यात फक्त एकमेकांना बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. परंतु यामुळे ह्या कोणताही वाली नसलेल्या ह्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून त्यांना जगण्यापेक्षा मरण स्वस्त झालं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!