छतावरच्या शेतात तब्बल ३५ प्रकारच्या भाज्यांची सेंद्रिय शेती करणारा नाशिककर!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


मनुष्याच्या कल्पकतेला कुठलंही बंधन नसतं असं म्हटलं जातं. आता नाशिकच्या एका माजी पत्रकाराने आपल्या अशाच कल्पकतेतून मिल्क पाऊचमध्ये देखील एक झाड उगवलं आहे इतकंच नाही तर ह्या माणसाने जुन्या बाटल्यात अनेक भाज्यांची लागवड करून आपल्या गच्चीत सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आहे.

 तब्बल ३५ प्रकारच्या विविध भाजांची लागवड त्यांनी आपल्या गच्चीत केली असून कुठल्याही रासायनिक स्पर्शाविना कमी जागेत त्यांनी ही भाजांची बाग फुलवली आहे.

संदीप चव्हाण असे या नाशिकच्या अवलियाचे नाव आहे ज्याने हा चमत्कार केला आहे.

जेव्हा संदीप यांनी आपल्या गच्चीत भाज्यांना उगवायचा प्रयोग हाती घेण्याचे ठरवले तेव्हा समाजाकडून अनेक इतर चांगल्या गोष्टींना येते तशी नकारात्मक प्रतिक्रीयाच आली. पण आपल्या ३ टायर आणि मल्टी लेयर फार्मिंगचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवलाच इतकंच नाही तर त्यांनी काही पद्धती देखील सांगितल्या ज्या माध्यमातून त्यांना हे शक्य झालं होतं.

१) एखादी झाड लावायची कुंडी घ्या. त्यात मध्य भागी फळभाजी जसे टोमॅटोची लागवड करा.

२) त्याच्या डाव्या बाजूला कुठल्याही पालेभाजीची लागवड करा आणि उजव्या बाजूला कुठल्याही कंदमुळाची लागवड करा.

३) त्यांच्या पोषणासाठी सेंद्रिय खतांचा वापर करा.

४) किचनमधील ओला कचरा आणि पाला पाचोळ्याचा खत म्हणून वापर करणे.

५) कुंडीला दिवसातून दोनवेळा पाणी द्या.

अशाप्रकारे आपल्या गच्चीतच अनेक फळभाज्या, पालेभाज्या आणि कंदमुळं यांचे उत्पादन घेण्याचा सोप्पा मंत्र संदीप चव्हाण यांनी समाजाला दिला आहे.

ते म्हणतात की, बाल्कनी आणि गच्चीमधील ह्या अशा प्रकारच्या शेती साठी फार कमी पाणी लागते.

तब्बल ६० टक्के पाण्याची बचत या माध्यमातून करणे सहज शक्य होते. जेव्हा कडक ऊन पडते तेव्हा सुकलेल्या पत्त्यांचा वापर आद्रता शोषून घेण्यासाठी करता येतो.

आपल्या ३५० चौरस फुटाच्या गच्चीत त्यांनी ३५ प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेतले असून इतकंच नाही तर त्यांनी घरातील सांडपाणी आणि ओल्या कचऱ्याचा वापर यासाठी केला आहे. त्यांच्या गच्चीवर वांगे, पपया, टमाटे, मिर्ची, हळद, मिरी, पालक, दुधीभोपळा, कोबी आणि फुल कोबी ह्या फळभाज्या, भाज्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे.

मल्टिलेयर शेतीच्या मदतीने ५० किलो हळदीचे उत्पादन ६ बाय ६ च्या पट्ट्यात घेतल्याचा दावा, संदीप यांनी केला आहे. प्रत्येक दिवशी ह्या शेत पद्धतीच्या माध्यमातून चार ताज्या भाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे. २००० साली सहज एक आवड म्हणून संदीप यांनी सुरू केलेला हा प्रयोग आता त्यांचा प्रमुख व्यवसाय बनला आहे. त्यांना आता नैसर्गिक आणि रासायनिक पद्धतीने घेतलेल्या भाज्यांमधील फरक लक्ष्यात येतो आहे.

त्यांच्या मुलाने सर्वात आधी त्या दोन भाज्यांमधील फरक ओळखला होता. संदीप यांच्या मते वयाने लहान असल्यामुळे त्याचा जिभेवरील चवीच्या ग्रंथी ह्या चांगल्या प्रकारे फळातील चवीच्या फरकाचा भेद लक्षात घेऊ शकतात.

त्यांच्या पत्नीने एक दिवस बाजरातून आणलेले टमाटे आणि घरी गच्चीत उगवलेले टमाटे त्यांच्या मुलाला खायला दिले. त्यांच्या मुलाने मोठ्या चवीने त्या टमाट्याचा आस्वाद घेतला. त्याला घरच्या ताज्या टमाट्यातील आणि बाहेरच्या टमाट्यातील फरक सहज लक्षात आला आणि त्यांनी आपल्या नैसर्गिक टमाट्याला पसंती दर्शवली.

यानंतर संदीप यांनी आपल्या गच्चीवरच्या शेतीतील प्रयोग चालूच ठेवले. त्यात खत तयार करण्यासाठी त्यांनी एक वेगळं कंम्पोस्ट युनिट विकत न घेता, खताची निर्मिती आपल्या घरातील प्लास्टिकचे जुने टब आणि ड्रम यांचा वापर करून केली आहे.

ते आधी सर्व ओला कचरा आणि सांड पाणी एकत्र करून ते कुजवतात आणि शेण – गोमूत्राचा वापर करून जीवामृत नामक नैसर्गिक खताची निर्मिती त्यांच्या घरातच करतात. त्यांचा मताने गाईच्या शेणाने व गोमूत्राच्या मिश्रणाने जौविक क्रिया जलद गतीने होण्यास मदत होते. आपल्या किचनमधील सांडपाण्याचा वापर करून कंपोस्ट खताची निर्मिती ते केवळ ३० दिवसात करतात आणि त्याचा वापर भाज्यांना वाढवण्यासाठी करतात.

संदीप हे खूप कल्पक असून आपल्या घरातील जुन्या बुटा चपलांपासून ते दुधाच्या पिशवी पर्यंत सर्व गोष्टींचा यथोचित वापर करून त्यांनी त्यात झाडं लावली आहे.

त्यांनी सात दुधाचे पाऊच घेऊन त्यांना एकमेकांवर ठेवले, त्यात त्यांनी पालक लावली. ते म्हणतात निसर्गाच्या कशातही आपल्याला झाड उगवता येते. सुरूवातीला अनेकवेळा अपयश आल्यानंतर देखील त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आणि काही महिन्यांनी त्यांना नित्याने भाजीपाला प्राप्त होऊ लागला.

काही वर्षांपूर्वी संदीपने स्वतःच्या शेतीच्या प्रयोगांचे प्रमाण वाढवले आणि पाच लेयर्सची शेती करायला सुरुवात केली, यासाठी चार फुटाचा बेड त्यांनी तयार केला त्यात त्यांनी पाच प्रकारची झाडं लावली.

यासाठी त्यांनी आधी प्लास्टिक अंथरलं, त्यावर तीन विटा ठेवून त्यावर नारळाच्या करवंटीच्या शेंड्या पसरवल्या. त्यावर सुकलेल्या पानांची चादर अंथरली. त्यावर कम्पोस्ट आणि माती पसरली व त्यात मग बीजारोपण केले. यानंतर बाग ही मोठ्या प्रमाणात फुलली.

संदीप यांच्या ह्या उपक्रमाच्या यशानंतर त्यांच्याकडे अनेक लोक त्यांच्या गच्ची बगीचा संकल्पनेची माहिती घ्यायला येत असतात. ते त्यांना आपल्या अनुभवातून हा बगिचा कसा सांभाळायचा याचे मार्गदर्शन करत असतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!