आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारत हा कृषीप्रधान देश असला तरिही त्याचं उत्पन्न इतर कृषीप्रधान देशांच्या तुलनेत कमी आहे. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या साठवणीचं, वाहतुकीचं तुलनेनं अप्रगत तंत्र. यामुळे माल खराब होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. परिणामी छोट्या शेतकर्यांचं होणारं आर्थिक नुकसान. यावर उपाय शोधला बिहारच्या निक्की कुमार झा आणि रश्मी झा या भावंडानी.
भारतात जितक्या मुबलक प्रमाणात, विविध प्रकारच्या भाज्यांचं उत्पादन होतं तितकं जगात इतरत्र होत नाही. मात्र इथल्या शेतकर्यांची मुख्य डोकेदुखी आहे ती या भाज्या दोन-तीन दिवसाच्यावर टिकवण्याची. आजच्या घडीला यासाठी जे पर्याय उपलब्ध आहेत ते सामान्य शेतकर्यांना परवडणारे नाहीत त्यामुळे खराब मालाचं प्रमाण मोठं आहे. परिणामी नुकसानही जास्त आहे. यावर उपाय शोधला बिहारच्या निक्कीकुमार झा यांनी.
त्यांच्या सप्तकृषी अंतर्गत असलेल्या “सब्जीकोठी”नं शेतकर्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. सब्जीकोठी हे एक भंडारण (साठवणूक) आणि परिवाहन समाधान आहे. त्यांच्या या शोधाची दखल घेत अलिकडेच त्यांना बिहार इंडस्ट्रीज असोसिएशन (इबिआ)आयोजित समारंभात उद्यमी रत्न २०२० हा पुरस्कार दिला.
आय आय टी कानपूर आणि आय आय टी पाटणा यांनी ही संकल्पना उचलून धरत यावर अधिक विस्तारानं काम करण्यास सुरवात केली असून सध्या सशुल्क प्राथमिक चाचण्य़ा चालू आहेत. निक्कीकुमार झा आणि रश्मी झा यांव्यतिरिक्त या प्रकल्पावर अभियांत्रिकी आणि पर्यावर क्षेत्रातील दहा अनुभवी तज्ज्ञ या तंत्रावर काम करत आहेत. आय आय टी आणि देशातील इतर मान्यवर बिझनेसस्कूलमधील तज्ज्ञ या अनोख्या आणि भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरू शकेल अशा प्रकल्पावर काम करत आहेत.
बिहारमधील एका छोट्या खेड्यात निक्कीकुमार झा यांचा जन्म झाला. मोठ्या प्रमाणात बागायती शेती असणारा असा हा प्रदेश त्यामुळे निक्कीकुमार लहानपणापासूनच बागायती शेतकर्यांच्या समस्या बघत आले आहेत. यातली सर्वात महत्त्वाची समस्या त्यांना जाणवली ती म्हणजे, या उत्पादनातला बराच मोठ्ठा हिस्सा ग्राहकांपर्यंत पोहोचतच नाही. याचं कारण वाहतुकी दरम्यान होणारी नासधूस आणि या उत्पादनांचं आयुष्य मर्यादित असणं. या समस्येवर उपाय शोधायला हवाय असं त्यांना मनापासून वाटत होतं ज्याला निमित्त झाला त्यांचा मास्टर्ससाठीचा शोधप्रबंध.
बिहारमधील भागलपूर येथे रहाणारे निक्कीकुमार झा इंजिनियर तर आहेत शिवाय त्यांनी पर्यावरणशास्त्रात मास्टर्स केलेलं आहे. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून निक्कीकुमार यांनी ऑफ़ ग्रीड कोल्ड स्टोअरेज यंत्राची निर्मिती केली. ही निर्मिती करताना त्यांनी बिहारमधील वीजपुरवठा यंत्रणा, अडचणी आणि मर्यादाही लक्षात घेतली. शेतकर्यांनी कष्टानं पिकवलेल्या भाज्या सडून वाया जाताना बघून यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे असं त्यांना वाटत असे.
यावर उपाय म्हणून जे यंत्र विकसीत केलं गेलं आहे त्यात एक मोठी उणीव ही आहे की, पावसाळ्यात हे यंत्र बिनकामी होतं. यावर कशी मात करावी या विचारात ते असतानाच एक दिवस रात्री जेवता जेवता सहज गप्पांच्या ओघात त्यांनी त्यांची ही समस्या घरातील इतर सदस्यांजवळ बोलून दाखवली. निक्कीकुमार झा यांची लहान बहिण, रश्मी, जी बायोटेक्नॉलॉजिस्ट आहे. तिनं सांगितलं की तूही तीच गोष्ट करत आहेस जी सध्या इतर अनेकजण करत आहेत, कृत्रिम थंडावा देत भाज्या टिकवणं. याऐवजी असं यंत्र किंवा यंत्रणा बनवायला हवी आहे ज्यात भाज्या आणि फ़ळं दीर्घकाळ टिकवून ठेवता येतील, भाज्या-फ़ळं यांचं “शेल्फ़लाईफ़” वाढेल.
या चर्चेनंतर दोघांनी यावर एक रितसर रिसर्च करण्याचं ठरवलं. या रिसर्चचंच फ़लीत म्हणजे या दोघांनी चालू केलेला स्टार्ट अप “सप्तकृषी”. सप्तकृषीनं एक अनोखं साठवण मशिन बनवलं, “सब्जीकोठी”. तंबूसारखी रचना असणारी सब्जी कोठी भाज्या आणि फ़ळफ़ळावळ यांचं आयुष्य रेफ़्रिजरेटरशिवाय तीन ते तीस दिवसांपर्यंत वाढवू शकते.
सब्जी कोठी या यंत्राची रचना सुटसुटीत तर आहेच शिवायस वापर करणशी इतकं सोपं आहे. हे lo T-enabled साठवणूक मशिन केवळ १० वॅट (ऑन/ऑफ़ ग्रीड) इतक्या वीजेवर चालतं. यासाठी दिवसाकाठी केवळ एक लिटर पाणी लागतं. खिशाला परवडणारं तंत्र असल्यानं सामान्य शेतकर्यांनाही त्यांची भाजी, फ़ळफ़ळावळ टिकवणं सहजशक्य झालेलं आहे. यात विजेचिही मोठ्या प्रमाणात बचत होते कारण हे केवळ एका छोट्या लेड बॅटरीवर चालतं, जी १० वॅट उर्जा निर्मिती करते.
याचा सर्वात मोठा फ़ायदा हा आहे की हातगाडी असो अथवा रिक्षा याला कोठेही घेऊन जाणं सोपं आणि सुटसुटीत आहे. आता हे इतकं किफायतशीर असं सब्जीकोठी नेमकं कसं काम करत असेल? हा तुम्हाला पडलेला प्रश्न असेल. सब्जीकोठीमधे आद्रता योग्यप्रकारे नियंत्रीत केली जाते ज्यायोगे नाशवंत असा बागायती माल दीर्घकाळ ताजा राहू शकतो. थोडक्यात सांगायचं तर एथलिनच्या स्वयं क्षरण सिद्धांतावर (ज्यामुळे भाज्या आणि फ़ळं खराब होतात) आधारीत ही यंत्रणा विकसीत केली गेली आहे.
छोटे शेतकरी जे आपला भाजीपाला घेउन रोज शहरातल्या भाजीमंडईत जातात त्यांचा वाहतुकी दरम्यान भाजीपाला खराब होतो. परिणामी त्याची किंमत कमी होते. कधीकधी तर चक्क हा भाजीपाला जनावरांना खायला घालून टाकावा लागतो किंवा उकिरड्यावर फ़ेकून द्यावा लागतो. यामुळे छोट्या शेतकर्याला बसणारा आर्थिक फ़टका मोठा असतो. यावर आता सब्जी कोठी हा उपाय सापडल्यानं छोट्या शेतकर्यांसाठी दिलासादायक चित्र आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.