आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मराठी सिनेमासृष्टीच्या अगदी उगमपासूनच खेड्यातल्या कथा असणारे चित्रपट बनले गेले आणि त्यांना लोकप्रियता ही मिळत गेली.
सहज बदल म्हणून मराठीमध्ये शहरी बाज असणारे चित्रपट बनतात पण अजूनही जास्तीत जास्त प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारे चित्रपट कुठले? असं विचारलं तर त्यातली ७०% नावं ही ग्रामीण भागातल्या कथा असणारेच चित्रपट असतात.
अगदी पिंजरा, सामनापासून नंतर दादा कोंडकेचे चित्रपट, लक्ष्या-अशोक-महेश यांचे चित्रपट यांनी मराठी सिनेमासृष्टीला समृद्ध केलं. नंतरच्या काळात मकरंद अनासपुरेंनी विनोदाच्या आपल्या विशेष शैलीने त्यात अजून भर घातली आणि गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, निशाणी डावा अंगठा, गाढवाचं लग्न या कलाकृती आपल्या वाट्याला आल्या.
अगदी अलीकडची उदाहरणं द्यायची तर श्वास, अगबाई अरेच्चा, पकपक पकाक, दे धक्का वगैरे चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता गावांचंही शहरीकरण झालंय पण तरी मराठी प्रेक्षकांना गावठी बाज असणारे चित्रपट जास्त आवडतात.
उमेश कुलकर्णीच्या रूपानं बदलणाऱ्या गावाचं चित्र आपल्याला सिनेमात दिसलं तर नागराज मुळं बदलणाऱ्या गावातल्या न बदलणाऱ्या समस्यांची जाणीव करून देणारे सिनेमे बघायला मिळाले. गावाकडचे पिच्चर हा आपला असा एक सिनेमातला वेगळा जॉनर तयार झालाय. याच प्रकारात मोडणाऱ्या पण काहीशा अंधारात असणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलूयात.
बनगरवाडी
व्यंकटेश माडगूळकरांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट अगदी थक्क करणार आहे. चित्रपट मास्तरच्या भूमिकेत असणाऱ्या चंद्रकांत कुलकर्णीच्या भोवती फिरत असतो. या गावात त्याची बदली झाल्यापासून कथा पुढे सरकते. एक छोटं धनगर समाजाचं गाव कमी वस्ती म्हणता येईल अशा बनगरवाडीत लोक पशुपालन आणि शेतीवर अतिसामान्य आयुष्य जगत असतात. चंद्रकांत मंदारे यांनी कारभारीची (गावचा प्रमुख) भूमिका चोख बजावलीए. या कारभारीच्या मदतीने मास्तर त्याच्या पातळीवर शाळा सांभाळून गावातले प्रश्न हाताळत असतो.
कोणाला बंद झालेली नाणी बदलून पाहिजेत, कोणाचा एक बैल मेलाय, कोणाला सहारा नाही, शिक्षणासाठी मदत, तर कोणाची फक्त करमणूक असा बहुउपयोगी माणूस म्हणजे हा मास्तर. सगळ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील. आयबु, चंद्रा, यांची पात्रं मुख्य प्रवाहाला आधार म्हणून काम करतात.
यातल्या प्रत्येक पात्राचा आयुष्याकडे बघण्याचा एक स्वतंत्र असा दृष्टिकोन आहे, आणि तो कथा पुढे सरकताना आपल्याला समजत जातो.
गावातला प्रत्येक जण आपाआपल्या दृष्टीकोनाची भर कथेत घालतो, आणि मास्तरच्या नजरेतून आपण प्रेक्षक म्हणून त्याची सहज प्रतिक्रिया बनतो.
ख्वाडा
मराठीत पुरस्कार आणि जागतिक पातळीच्या समीक्षेस पात्र ठरणाऱ्या चित्रपटांचा प्रवाह मागच्या दशकात वाढला. कोर्ट, किल्ला, कासव या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांच्या गर्दीत भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या “ख्वाडा” चित्रपटाचं नावही घेतलं गेलं.
यातलं कथानक एका धनगर कुटुंबाभोवती फिरत असतं. पुरस्कारांच्या गर्दीत हा सिनेमा असला तरी संथ नाहीए, स्क्रीनप्ले तुम्हाला परिस्थितीजन्य विनोदातून खिळून ठेवतो.
शशांक शेंडे, भाऊसाहेब शिंदे आणि इतर सगळ्यांचाच अभिनय जागतिक दर्जाचाच म्हणावा लागेल. शेळीला लागलेलं गोचीड काढून मारण्यापासून तर, कुस्ती, शेळ्यांचा कळप हाकणे, जत्रा, लग्न या सगळ्यात खरेपण खूप जपलंय. फक्त सिनेमा आहे म्हणून सगळंच चकाचक न करता, धूळ, घाण, अस्पष्ट संवाद, जसं असतं तसंच ठेवलंय.
राष्ट्रीय पुरस्कारात “sync sound” साठी या चित्रपटाला पुरस्कार आहे. रेकॉर्ड केलेले आवाज न वापरता शूटिंग दरम्यानचं हवा, वाजणारी भांडी, गर्दी, यात कमी आवाजात ऐकू येणारे संवाद यामुळं चित्रपट बघताना तिथल्या वातावरणाशी आपण पटकन कनेक्ट होतो. अशी ही मदमस्त सत्तेच्या विरोधात केलेल्या विद्रोहाची कहाणी, आणि त्यात परिस्थितीने टाकलेला “ख्वाडा”.
वळू
उमेश कुलकर्णीचं दिग्दर्शन आणि गिरीश कुलकर्णीचा अभिनय हे समीकरण बदलत्या ग्रामीण जीवनाची चित्रभाषा बनवतंय असंच म्हणाव लागेल. विहीर, जाऊद्या ना बाळासाहेब, देऊळ यांतून त्यांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागाकडे बघितलं आणि उत्तमोत्तम कलाकृती प्रेक्षकांना दिल्या.
“वळू” मध्ये अतुल कुलकर्णी, ज्योती सुभाष, मोहन आगाशे यांच्यासारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्यांमुळे प्रसिद्धी मिळायला सोपं गेलं. गावाकडचं वातावरण, पिसाळलेल्या बैलाला पकडण्याचे प्रयत्न आणि त्यात होणारे विनोद हे एकंदर समीकरणच मराठी प्रेक्षक नेहमीच डोक्यावर घेतात.
पण या चित्रपटात हे फक्त दाखवायचे दात आहेत. या सवयीच्या साखरेसोबत महत्त्वाचा संदेश औषधासारखा प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यात निर्मत्यांना यश आलंय. इथं वळू फक्त गावातल्या शाश्वत मूल्यांचं प्रतीक म्हणून घेतलाय. तो काहीसा चिडलाय, चांगली काळजी न घेतल्यामुळे आणि काहीश्या गैरसमजांमुळे तो त्रासदायक वाटू लागला आहे, म्हणून त्याला पकडून बाहेर न्या, असं सांगताना जणू गावकरी त्यांच्यातल्या त्या मूळ गावठी स्वभावालाच कैद करा आणि आम्हाला “मॉडर्न” करा असं सांगताय की काय असं वाटतं.
पण सगळे गावकरी तसे नसतात, एक म्हातारी आणि एक वेडी बाई असते, ज्या वळूला वाचवायला प्रयत्न करत असतात. हे सगळं करताना मुख्य नायकाचा गावाकडे बघण्याचा बदलणारा दृष्टिकोन आपल्यालाही बदलतो.
फँड्री
“सैराट” गाजल्यामुळं नागराज मंजुळेची ओळख तीच झाली. पण त्याचं मराठी चित्रपटातलं तेवढंच मोठं योगदान मला फँड्री हा चित्रपट वाटतो. १४ फेब्रुवारीला किशोरवयीन मुलांची प्रेमकथा रिलीज झाली आणि नागराजचं सिनेमासृष्टीतलं स्थान पक्क झालं.
किशोर कदम, छाया कदम, नागराज मंजुळे अशी एक दोन नावं सोडली तर सिनेमात मुख्य भूमिकेत कोणीच अभिनय माहीत असणार नाही. सगळे अगदी घरातून उठून कॅमेरासमोर उभे केलेत. आणि त्यांचा अभिनयही तसाच रॉ वाटतो. खालच्या जातीतील “जब्या” वरच्या जातीतल्या एका मुलीवर प्रेम करत असतो.
तिला मिळवायला प्रसंगी तो अंधश्रद्धाळूही बनतो. मुलगी नाही तर त्या रूपाने तो त्याच्याकडे नसणाऱ्या “स्वाभिमानाला” मिळविण्यासाठी झगडत असतो. पण लहान वयात, व्यवस्थेचं भान नसल्याने तो स्वतःचा झगडा त्या प्रेमाच्या इच्छेपासून सुरू करतो.
अशा छोट्या विद्रोहाचं व्हायचं ते होतं, त्याला आणि त्याच्या मुक्त होण्याच्या इच्छेला चिरडायला घर, गाव सगळेच तयार असतात. त्याने शेवटी कंटाळून, रागावून, जीव पणाला लावून मारलेला दगड त्या शोषक व्यवस्थेवर निर्माण केलेला प्रश्नच आहे.
चित्रपटात मूळ कथानकाला रंग यायच्या आधी वेळ घेतो आणि जब्याला राग येण्यासाठीची कारण आपल्याला सांगतो. हा प्रवास खिन्न करणारा आहे पण तो अत्यंत अडकवून ठेवणाऱ्या कथेत गुंफलाय. प्रेमकहाणीमुळं You didn’t see that coming असंही वाटू शकतं.
देऊळ
या प्रकारातला सर्वोत्तम चित्रपट कुठला असेल? तर उत्तर अर्थातच देऊळ हेच असेल. जसं की वळूबद्दल लिहिताना सांगितलं की, उमेश कुलकर्णीचं दिग्दर्शन आणि गिरीश कुलकर्णीचा अभिनय हे समीकरण बदलत्या ग्रामीण जीवनाची चित्रभाषा बनवतय असंच म्हणावं लागेल.
चित्रपटात नायकाला दत्तांच्या दर्शनाचा साक्षात्कार होतो असा भ्रम होतो आणि तिथून पुढे त्या एका घटनेमुळं गावातलं वातावरण बदलतं. दत्त येण्यापूर्वी गावात आळस होता. किती आळस? तर टपरीवर “ए हेमड्या मुंगळा उडीव की रे” असं म्हणणाऱ्या टॉम्यावरून आपल्याला कळतं.
ज्या गावातलं संथ आयुष्य काही केल्या प्रवाही होत नसतं तिथं दत्त आल्याने लोकांच्या त्या बोर, गावठी, गरीब आयुष्यापासूनच्या पलायनवादाला एक प्रतिष्ठेचा चेहरा मिळतो.
गावातली शांतता जाते आणि अंधश्रद्धेचं बोट धरून आधुनिकता येते. ही सगळी प्रक्रिया निर्मात्यांनी खूप वेगवेगळ्या दृष्टिकोनातून दाखवल्यामुळे एकंदर परिस्थिती खूपच सविस्तर प्रकारे समजते. अगदी १० घरांतल्या १० समस्या कुठल्याही पडद्याशिवाय सविस्तरपणे आपल्या समोर मांडल्यावर त्या गावकऱ्यांनी या अंधश्रद्धेचा केलेला स्वीकार आपल्याला योग्य वाटायला लागतो.
पण तेव्हा “अण्णा” या दिलीप प्रभावळकरांच्या पात्राचं महत्त्व कळतं. होतंय ते का अयोग्य आहे, हे आपल्याला त्यांच्यामुळे कळतं. पण तेही न भांडता निघून जातात आणि अशावेळी आपला नायक आपल्या भोळेपणाला शस्त्र करून स्वतःच्या श्रद्धेच्या बळावर हे चित्र सुधारण्याचा प्रयत्न करतो. त्याची ही भन्नाट विनोदी कथा. रूपकं, दुधारी संवाद, insecurities, between the lines म्हणतात तो अर्थ, असं बघाल तितकं कमी, आणि कितीही वेळेस बघितलं तरी जुनं होणार नाही एवढं महान काम निर्मात्यांनी केलंय.
दुनियादारीनंतर पुस्तक आणि नाटकांवर येणारे चित्रपट बनायचा ट्रेंड आला. हे सिनेमे पुणे-मुंबई-नाशिक वगैरे भागात चालतात पण इतर महाराष्ट्रातल्या सामान्य प्रेक्षकांनी मात्र या सिनेमांना फारसं डोक्यावर घेतलं नाही. जणू या अभिजनवादाला हा कधीच न संपणारा आंतरिक विद्रोहच आहे.
शेवटी “सैराट” च्या रुपानं मराठीला पहिला १०० कोटी कमावणारा चित्रपट मिळाला तो ही ग्रामीण भागातल्या कथेवरच आधारलेला आहे. असा हा मराठी गावठी जॉनर म्हणूनच लोकप्रिय आणि महत्वाचा आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.