आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताचा इतिहास फार प्राचीन आहे, भारतीय इतिहासाची पाळेमुळे खोदून काढण्यात अनेक इतिहासकारांनी मोठे योगदान दिले आहे. पण भारतीय इतिहासाच्या प्राथमिक संशोधनाचे जनक हे भारतीय नाहीतर ब्रिटीश होते. ब्रिटीश लोकांनी सर्वप्रथम भारताच्या प्राचीन इतिहासाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
“द लॉन्गर यु कॅन लुक बॅक द फर्दर यु कॅन लुक फॉरवर्ड!” ब्रिटनचा माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिलचे हे बोल ब्रिटिश साम्राज्याने त्याच्याही आधीपासून सार्थ करून दाखवले आहेत. भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशावर राज्य करायचं तर या भारतीय समाजाचा इतिहास समजून घेऊन, त्यातील लूपहोल्सचा फायदा घेत, विशेषतः ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीने दीर्घकाळ त्यांच्यावर राज्य करता यावं या दृष्टीने ब्रिटिशांनी भारतीय इतिहासाचा अभ्यास केला. त्यामुळे हडप्पा संस्कृतीचा शोध देखील ब्रिटिशांनी लावला, त्या संस्कृतीवर सर्वप्रथम पुरातत्व संशोधन देखील ब्रिटिशांनी केलं होतं. मराठ्यांचा इतिहास हा जेम्स ग्रॅण्ट डफ या ब्रिटिश माणसाने लिखित स्वरूपात आणला.
स्वातंत्र्यानंतर भारतीयांनी या क्षेत्रात मोठं संशोधन केलेलं असलं तरी ब्रिटिशांनी केलेल्या कामाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.
१८५८ साली, हेन्री गियोघेगन नावाचा पुरातत्व अधिकारी असाच तमिळनाडूच्या तिरुचरापल्ली उर्फ त्रिची येथे पुरातत्व खात्यात कामाला होता.
तो आपले पुरातत्त्व संशोधनाचे कार्य करत असताना अचानक त्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. ब्रिटिश शासनाने त्याच्या जागेवर २४ वर्षांच्या नवख्या रॉबर्ट ब्रुस फुटे याची संशोधक म्हणून नेमणूक केली. रॉबर्ट हा त्याच्या राणीचा आणि ब्रिटिश साम्राज्याचा इतर अधिकाऱ्यांप्रमाणेच सच्चा सेवक होता, पण इतिहास हा त्याचा अत्यंत आवडीचा विषय, त्यामध्ये तो समर्पित भावनेने काम करायचा. पण त्याच्याकडे भौगोलिक संशोधनाची जबाबदारी असल्यामुळे आपल्या राणीच्या मुकुटात बसवता यावे म्हणून तो उत्खनन करून हिरे माणके शोधत होता. त्याला याची त्यावेळी पुसटशी देखील कल्पना नव्हती की तो जे कार्य करत आहे, त्यामुळे एकदिवस त्याला भारतीय प्रागैतिहासिक संशोधनाचा पितामह म्हणून ओळखले जाणार होते.
२२ सप्टेंबर १९३४ रोजी इंग्लंडच्या चेलटनहॅम भागात रॉबर्टचा जन्म झाला, पुढे तो मद्रासच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये भूगोलाचे अध्यापन करू लागला आणि सोबतच त्रिचीच्या दगडी माळरानाच्या जमिनीखाली असलेल्या खनिजांचा शोध तो घेत होता.
मद्रासमध्ये एकदा त्याची भेट पीटर पर्सीव्हल नावाच्या एका मिशनरी कार्यकर्त्याशी झाली, ते प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तमिळ आणि तेलगू भाषेचे प्राध्यापक होते.
त्यांच्या दोघांची मैत्री पुढे नात्यात बदलली आणि रॉबर्टने पर्सिव्हल यांच्या कन्येशी विवाह केला. १८६३ साली आपलं नियमित काम करत असताना रॉबर्टच्या हाती एक दगड लागला होता, हा दगड व्यवस्थिपणे निरखून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की तो एका कुऱ्हाडीच्या आकाराचा आहे. रॉबर्टला तो दगड विशेष वाटला आणि त्याने तो दगड लंडनला पुढील संशोधनासाठी पाठवला.
तिकडून त्याला माहिती मिळाली की त्याच्या हाती लागलेला हा दगड अत्यंत प्राचीन असून अतिप्राचीन अश्मयुगीन काळात त्यावर कोरीवकाम करण्यात आले आहे.
तब्बल १२ हजार वर्षांपूर्वीचा तो दगड असल्याचे त्याला समजले.
त्याने आपलं हे संशोधन आपला मित्र विल्यम किंगला दाखवलं, त्यानेही या संशोधनात रस घ्यायला सुरूवात केली. दोन्ही मित्रांनी असंख्य पुरातन अवशेषांचा शोध लावला.
पुढे जानेवारी १८६४ मध्ये रॉबर्ट पल्लकमला गेला त्याठिकाणी त्याने संशोधन केले आणि त्याच्या हाती अजून काही पुरातत्व अवशेष लागले.
या अवशेषांमुळे एक नवीन वळण मानवी इतिहासाला मिळाले होते. चार्ल्स डार्विनचा सिद्धांत खरा ठरला होता. १ लाख वर्षांपूर्वी पृथ्वीचा उगम सांगणाऱ्या चर्चच्या धर्मवादी लोकांच्या कानफडात मारणारं हे संशोधन होतं. ओरिजिन ऑफ स्पेसिस या ग्रंथात डार्विनने मांडलेला मानवी इतिहास खरा ठरला होता. रॉबर्टच्या संशोधनाने जगाला नवी दिशा मिळाली होती.
त्याने देवाने मानवाची निर्मिती केली नव्हती हे संशोधनाअंती सिद्ध केले होते. रॉबर्टने त्याचे संशोधन त्याच्या वरिष्ठाला सोपवले. थॉमस ओल्डमी असे त्याच्या वरिष्ठाचे नाव होते, ज्याने त्याचे हे संशोधन कधीच जगासमोर जाहीर होऊ दिले नाही. रॉबर्टला विश्वास होता, जर हे संशोधन त्याच्या मायभूमीत प्रसिद्ध झाले तर मोठा गदारोळ उडाला असता, पण थॉमसने ते संशोधन गुपित ठेवलं.
पुढे रॉबर्टने आपल्या एका पुस्तकात लिहून ठेवले आहे की त्याने लावलेल्या या प्राचीन अवशेषांचे शोध जगभरातील भौगोलिक, पुरातत्व आणि वंशशास्त्रीय संशोधकांना उल्हासीत करणारे आहेत तरी देखील थॉमस ओल्डमी ते प्रसिद्ध करू देत नाहीत, त्यांना जप्त करून ठेवले आहे.
रॉबर्ट यामुळे व्यथित झाला होता. पण न थकता त्याने संपूर्ण दक्षिण भारत पालथा घातला होता.
तब्बल ५३ हजार किलोमीटर फिरून त्याने अनेक वस्तू आणि अवशेष जमा करायला सुरुवात केली होती.
बेल्लारी, चिकमंगळूर आणि गुडियामीच्या लेण्यांच्या परिसरात संशोधन करून त्याने अनेक पुरातन अवशेष जमा केले होते. जे प्रागैतिहासिक काळातील होते.
तब्बल शतकभराने २०११ साली त्याने केलेल्या संशोधनाला दोन भारतीय पुरातत्व शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे, आज अट्टीरमपार्कम येथे या दोन भारतीय संशोधकांनी आपले संशोधन केले असून तब्बल १५ लाख वर्षांपूर्वीचे अवशेष त्यांच्या हाती लागले आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रॉबर्ट फूटचे संशोधन हे फारच वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या केले गेले असल्याचे मत शास्त्रज्ञ व्यक्त करतात. त्याने दिलेल्या नोंदी आणि त्याने त्याकाळी उत्क्रांतिवादी संशोधनाचा घेतलेला आढावा हा अत्यंत अनपेक्षित होता.
त्याने फक्त अवशेष शोधले नाही तर त्याच्यावर व्यवस्थित संशोधन करून त्याचा नोंदी देखील केल्या आहेत. आजही त्याच्या नोंदी आणि पुस्तके शास्त्रज्ञांना संशोधनसाठी मदत करत आहेत.
फुटेने आपल्या मुलाला सोबत घेऊन आंध्र प्रदेशात बिल्लासुरगम गुहांमध्ये जाऊन प्राचीन दगडी हत्यारं आणि अवशेष जमा केले होते. ते भारतात आजवर झालेल्या पुरातत्व संशोधनात सर्वांत प्राचीन संशोधन मानले गेले आहे.
आठ वर्षं सेवा केल्यानंतर रॉबर्टने आपल्या नोकरीतून निवृत्ती घेतली, पण त्याला म्हैसूरच्या राजाने भूगर्भीय संशोधनासाठी आमंत्रण दिले.
त्याने काम केले आणि आणखी पुरातत्व अवशेष शोधून काढले. त्याने सर्वांत प्राचीन नियोलिथिक दगडाचा शोध देखील लावला, जे भारतीय पुरातत्व संशोधनात मोलाचे योगदान ठरले आहे. आपली नऊ मुलं आणि दोन बायका, ज्यापैकी एकीच्या निधनांनंतर त्यानी दुसरे लग्न केले होते, यांचा सांभाळ करत असताना त्यांनी तमिळनाडू बरोबर कर्नाटक पिंजून काढत ४७६ जुने पुरातत्त्व अवशेष शोधून काढले आणि ते मद्रासच्या वस्तू संग्रहालयाला ३३ हजाराला विकले होते.
२९ डिसेंबर १९१२ रोजी तो मरण पावला, ७८ वर्षांचे समृद्ध आयुष्य तो जगला होता. त्याला येरकॉडच्या चर्चमध्ये पुरण्यात आले आहे. त्याचा मार्गदर्शक पर्सिव्हील याच्या शेजारी त्याला पुरण्यात आले आहे.
मी माझं आयुष्य पुरेपूर जगलो, हे त्याच्या कबरीवर लिहले आहे, आणि ते शंभर टक्के सत्य आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.