आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
जगाच्या इतिहासात अनेक उत्कृष्ट दर्जाचे शिक्षक होऊन गेले. अनेकांनी आपापल्या परीने विद्यार्थांना ज्ञानदान करण्याचं काम केलं आणि आपल्या विद्यर्थ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. एकविसावं शतक हे तिसऱ्या औद्योगिक क्रांतीचं शतक आहे, ही औद्योगिक क्रांती म्हणजे माहिती तंत्रज्ञानावर आधारलेली औद्योगिक क्रांती.
आज असं एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये संगणकाचा वापर केला जात नसेल, मूलभूत शिक्षणाबरोबरच संगणक साक्षरता आता महत्वाची बनली आहे. आजच्या तरुणांच्या पिढीला तर संगणकाचं शिक्षण पहिल्या इयत्तेच्या आधीपासून दिलं जात असेल. आणि जरी शाळेत तसं शिक्षण व्यवस्थित मिळालं नाही तर घरोघरी आज संगणक आहेतच!
कोविड-१९ साथीच्या काळात जगभरातील शिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु झालं. तेव्हाही भारताच्या काही भागात ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा संगणक नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आत्मह्त्या केल्याचं दिसून आलं. पण २०१७-१८ पर्यंत आणि आजही जगातील काही अशा शाळा आहेत ज्यामध्ये संगणक पोहोचलेच नाहीत.
विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ही अतिशय चिंतेची बाब आहे. काही भागातील विद्यार्थी तर मूलभूत शिक्षणापासून वंचित राहिलेत, मग त्यांना संगणक साक्षरता कुठून येणार? आणि पुढच्या पिढीला संगणक-तंत्रज्ञानाचं महत्व कसं पटवून दिलं जाईल?
जगातील काही पालकच आज संगणक साक्षरतेला प्रोत्साहन देत नाहीत, याचं महत्वाचं कारण म्हणजे आज ते स्वतः समाजाच्या मुख्य प्रवाहात नाहीत. हीच दुष्ट साखळी पुढे सुरु राहिली तर समाजाचं भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. कुटुंब-समाज-गाव-राष्ट्र या क्रमाने विचार केला तर संगणक-साक्षरतेआभावी राष्ट्राच्या प्रगतीला ‘ब्रेक’लागण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
पण जगातील असे अनेक गरीब आणि पिछाडलेले देश आहेत ज्यांमध्ये मूलभूत शिक्षणच कसबसं मिळतं. तर संगणक शिक्षण अवघडच. पण काही शिक्षक आणि शिक्षण संस्था चिकाटीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करतात आणि आपापल्या स्तरावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतात. मग जगालाही त्यांच्या या कार्याची दखल घ्यावी लागते. अशाच आफ्रिकेतील घाना या देशात विद्यार्थ्यांबद्दल तळमळ असणारा एक हुशार मास्तर आहे. रिचर्ड आपियाह इकोटो.
घाना येथील बेटेनीज एम-ए जुनियर हायस्कूल येथे इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी शिकवणारा रिचर्ड काही वर्षांपूर्वी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात वायरल झाला. त्याने त्याच्या वर्गाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. शाळेत कम्प्युटर्स नसल्याने फळ्यावरच मायक्रोसॉफ्ट वर्डचा इंटरफेस काढून तो विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचे ते फोटोज होते. अगदी मोजक्या वेळेत आणि तंतोतंत वर्ड इंटरफेस तो फळ्यावर काढायचा आणि विद्यार्थ्यांना त्यातील प्रत्येक फ़ंक्शन बद्दल सविस्तरपणे सांगायचा. वेगवेगळ्या रंगांचे खडू वापरून तो वर्ड बरोबरच अनेक सॉफ्टवेअर्सचं वर्किंग विद्यार्थ्यांना सांगत.
त्याचबरोबर रिचर्डला सामाजिक माध्यमांचा प्रभावसहली वापर कसा करावा याचंही ज्ञान होतं. सामाजिक माध्यमांच्या मदतीनेच तो जगातील अनेक प्रगत कंपनींपर्यंत आपलं कार्य पोहोचवू शकला.
सोशल मीडियावर फोटोज वायरल झाल्यानंतर घाना मध्ये असलेल्या एन.आय.आय.टी. या भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षक कंपनीने रिचर्ड आणि त्याच्या शाळेला काही कम्प्युटर्स, लॅपटॉप्स आणि पुस्तकं देऊ केली. एन.एन.आय.टी. संस्थेच्या सी.इ.ओ. कपिल गुप्ता यांनी कोर्पोरेट-सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून एन.एन.आय.टी. संस्थेने घानामधील या शाळेला ५ डेस्कटॉप कम्प्युटर्स, रिचर्डसाठी एक लॅपटॉप आणि काही पुस्तकं दान केली होती.या बरोबरच शाळेच्या क्षेत्रातील जिल्हा प्रामुखाने आय.सी.टी. सेंटर स्थापन करण्याचं आश्वासन दिलं.
रिचर्डला त्याच्या प्रयत्नांमुळे मिळालेली ही काही पहिली मदत नव्हती, याबरोबरच मायक्रोसॉफ्टने सुद्धा काही कम्प्युटर्स दान करून, रिचर्ड यांची शिकवण्याची तळमळ पाहून त्यांना सिंगापुर येथे अन्युअल मायक्रोसॉफ्ट एज्युकेटर एक्सचेन्जला विनामूल्य उपस्थिती लावता आली. अशा प्रकारे जगातील अनेक व्यक्तींनी पुढे येऊन रिचर्ड आणि त्याच्या विद्यार्थ्यांना मदत देऊ केली.
पण प्रश्न अजूनही संपलेला नाही. रिचर्ड सारख्याच जगात दुर्गम भागांमध्ये असे अनेक शिक्षक आणि शिक्षणसंस्था असतील, ज्यांना संगणक-तंत्रज्ञानाचं शिक्षण द्यायला हजारो अडचणींना समोर जावं लागत असेल. अशा विद्यार्थ्यांचं काय? आज स्वतःला ज्ञानाधिष्ठित समजणाऱ्या समाजाने या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणं कितपत योग्य आहे? पश्चिमी देशांत आणि भारतातही आय.टी. क्षेत्रात अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करतात. त्यांनीही वैश्विक बंधुत्वाच्या भावनेने आफ्रिकेतील आणि जगातील इतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सढळ हाताने मदत करायला काही हरकत नाही.
जर जगाने अशा विद्यार्थ्यांना आणि शिक्षण संस्थांना वाऱ्यावर सोडलं, तर पुन्हा एकदा जगात दारिद्र्य वाढण्याची शक्यता आहे. आणि दारिद्र्याच्या तसेच बेरोजगारीच्या समस्येबरोबरच देशाला आणखीही समस्या ‘बोनस’ म्हणून मिळतात. वाढती गुन्हेगारी, दहशतवाद, हिंसाचार अशा अनेक समस्यांना त्या देशाला सामोरं जावं लागतं.
याशिवाय येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑटोमेशन आणि मशीन लर्निंग या माहिती तंत्रज्ञानावर आधारलेल्या गोष्टींचा आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर ऑटोमेशन होऊन बेरोजगारी वाढण्याचा धोका आहेच. त्यातही जर विद्यार्थ्यांना संगणकाचं मूलभूत ज्ञान नसेल तर भविष्यात गोष्टी कठीण होऊन बसतील.
त्यामुळे सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन या समस्येची उकल काढणं महत्वाचं आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने अशा विद्यार्थ्यांना मदत करायचा प्रयत्न करावा.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.