आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
पावसाळा हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा ऋतू. पावसाळा ना आवडणारे लोक क्वचितच असतात. हाच जणू माणसाच्या जगण्याला कारणीभूत ठरलेला ऋतू आहे. पावसाळ्याबद्दल आपण आजपर्यंत अनेक विचित्र गोष्टी ऐकल्या असतील. अवकाळी पाऊस हा शब्द तर आजच्या युगात सर्रासपणे वापरला जातो. तसंच ‘आम्लाचा पाऊस’सुद्धा (ॲसीड रेन) प्रदूषणामुळे होताना दिसतो. ज्वालामुखीतील राख आणि धुरामुळेही विशिष्ट प्रकारचा पाऊस पडल्याचे दिसून येते.
पण २५ जुलै ते २३ सप्टेंबर २००१ दरम्यान केरळ राज्यातील लोकांनी बऱ्याच वेळा पावसाचे विलक्षण दृश्य पाहिले. रक्ताच्या रंगाचा पाऊस! केरळमध्ये २००१ साली घडलेली घटना कदाचित ज्ञात मानवी इतिहासात प्रथमच घडली असावी. बहुतेक अहवालांनुसार पावसाचा रंग फक्त रक्तासारखा दिसला असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी काही लोकांनी हिरवा, काळा आणि पिवळा पाऊस देखील पाहिल्याचे दावे केले आहेत.
रंगीत पावसाच्या सुरुवातीच्या घटनांमध्ये ढगांचा प्रचंड गडगडाट आणि वीजेचा झगमगाट होता असेही काही प्रत्यक्षदर्शी सांगतात. हा विचित्र पाऊस पहिल्यांदा झाल्यानंतर अनेक झाडांची पानगळ झाली, ही पाने राखाडी झाली होती आणि काही अंशी जळालेली दिसली. हा प्रकार प्रचंड कुतूहलाचा आणि तितकाच भीतीदायक होता.
कोणताही अहवाल अतिशयोक्त नव्हता, रंगीत पाऊस हे एक वैज्ञानिक कुतूहल होतं आणि शास्त्रज्ञांना या घटनेमागचा कार्यकारणभाव जाणून घ्यायचा असल्याने त्यांनी या घटनेचा सखोल अभ्यास करायचे ठरवले. सुरुवातीच्या निरीक्षणातून प्रत्येक मिलिलिटर पावसामध्ये सुमारे ९० लाख लाल कण असल्याचे आढळून आले. या लाल कणांमध्ये बरेच कण हिरवे, पिवळे आणि राखाडी असल्याचंही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं.
केरळमधील ‘सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज्’च्या निरीक्षणातून पावसाचे पी.एच. गुणोत्तर ‘न्यूट्रल’ असल्याचे दिसून आले. (सामान्यतः शुद्ध पाण्याचे पी. एच. गुणोत्तर न्यूट्रल असते) पण या पावसात निकेल, मॅंगनीज, टायटॅनियम, क्रोमियम आणि तांब्याचे कण मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळले. लाल कणांमध्ये मुख्यतः कार्बन आणि ऑक्सिजन असल्याचे दिसून आले. तसेच या लाल कणांमध्ये अत्यल्प प्रमाणात लोह आणि सिलिकॉनचे प्रमाण असल्याचेही दिसून आले.
वरील निरीक्षणांच्या अनुमानांनुसार केरळच्या ‘सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज’च्या मते, रंगीत पावसाचे संभाव्य कारण विस्फो*ट झालेली उल्का असावी हे सांगण्यात आले. पुढील संशोधनात मात्र कणांमध्ये स्पोअर्स म्हणजेच बीजाणू असल्याचे दिसून आले. काही शास्त्रज्ञ या पावसाच्या कणांमध्ये पृथ्वीबाहेरील बीजाणू असण्याच्या मतावर ठाम नव्हते, कारण या बीजाणूंमध्ये अद्याप डी.एन.ए. सापडला नव्हता. काही शास्त्रज्ञांना उल्केचा सिद्धांतच बरोबर वाटत होता.
अखेरीस हे कण ट्रेंटेपोहलिया वंशाशी संबंधित एक लायकेन-तयार करणारा अल्गाचे बीजाणू होते असे ‘उष्णकटिबंधीय वनस्पति उद्यान आणि संशोधन संस्थे’ला आढळून आले. मुसळधार पावसामुळे लायकेनची व्यापक वाढ झाली, ज्यामुळे कदाचित हवेत बीजाणूंची संख्या वाढली असती असे मत त्यांनी मांडले. तरीही लायकेन रंगीत कणांचा पाऊस होण्याइतके बीजाणू कसे सोडू शकतात हा प्रश्न उद्भवलाच.
अनेक वर्षे रंगीत पावसाच्या या रहस्याचा उलगडा झालाच नाही. रंगीत पाऊस कसा झाला हा प्रश्न शास्त्रीयदृष्ट्या अनुत्तरीतच होता. दरम्यान केरळमधील काही शास्त्रज्ञांनी पावसाच्या पाण्याचे नमुने विदेशात पाठवून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून याचा शोध घेण्याचे मत व्यक्त केले. २००१ मध्ये झालेल्या त्या रंगीत पावसामुळे अफवांना उधाण आले होते आणि यावर पुढील संशोधन होणे गरजेचे बनले होते. काहींच्या मते हे परग्रही जीव पृथ्वीवर येत असल्याची लक्षणं होती.
या घटनेनंतर सुमारे दीड दशकानंतर काही रहस्यांचा उलगडा झाला. २०१३ मध्येसुद्धा शास्त्रज्ञांनी या घटनेचा अभ्यास करणे सुरू ठेवले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि पावसाच्या त्या नमुन्यामध्ये डीएनए सापडला. इतकंच काय तर संशोधकांनी एका शेवाळामुळे हा रंगीत पाऊस झाल्याचे उघड केले. शेवाळाची अचूक प्रजाती ट्रेंटेपोहलिया एन्युलाटा होती, भारतामध्ये शेवाळाची ही प्रजाती आढळून येत नाही. यानंतर संशोधकांच्या अंदाजानुसार ऑस्ट्रियावरून या शेवाळाचे बीजाणू आल्याचे स्पष्ट झाले.
पृथ्वीवर विचित्र पावसाची घडलेली ही पहिलीच घटना नाही तर यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. केंटकीला १८७६ साली ढगाळ वातावरणामध्ये देखील मांसाचे तुकडे अक्षरशः आकाशातून पडले. २०१५च्या सुरुवातीला, आयडाहो, ओरेगॉन आणि वॉशिंग्टनच्या काही भागांवर एक विचित्र, दुधाळ पाऊस पडला. दक्षिण ओरेगॉनमधील धुळीच्या वादळामुळे झाले हा पाऊस झाला असल्याचे शास्त्रज्ञांना अखेरीस समजले.
जलाशय किंवा चक्रीवादळ अशा गोष्टी शोषतात आणि नंतर त्यांना इतरत्र टाकतात. म्हणून बेडूक (किंवा मासे, साप, दगड किंवा मांस) अधूनमधून आकाशातून पडतात. असा या गोष्टींचा तर्क लावता येतो.
मोठ्या धूळ कणांच्या बाबतीत, हजारो मैलांचा प्रवास करून आणि पावसाद्वारे जमिनीवर पडल्याची नोंद अनेकदा केली गेली आहे. १९९८ मध्ये वॉशिंग्टन राज्यातील गोबी वाळवंटातून पिवळी धूळ आणि सहारा वाळवंटातील धूळ अटलांटिक महासागर ओलांडून गेली असल्याच्या नोंदी आहेत. धुळीचा हा वातावरणातील प्रवास सुमारे ५६०० मैल इतका होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.