जगातील सगळ्यात मोठ्या प्रयोगशाळेत नटराजाची मूर्ती का ठेवण्यात आली आहे..?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


हिंदू धर्मात भगवान शिवाला अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदू धर्मात भगवान शिवाला ब्रह्मांडाचा आधार मानले जाते. शिव म्हणजे सर्वात मोठी उर्जा आहे असं म्हणतात. सर्व विश्वाचा आदी आणि अंत (निर्मिती आणि संहार) त्याच्यातच सामावलेला आहे. हिंदू धर्मात शिवाबद्दल ज्या काही कल्पना आहेत त्याला. विज्ञानातही अनेक शास्त्रज्ञांनी अनन्य साधारण महत्व दिले आहे.

स्वित्झर्लंड येथे जगातील जी सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे, तिथे शिवाची नटराज रूपातील मोठी मूर्ती पाहायला मिळते. स्वित्झर्लंडच्या जगप्रसिद्ध सर्न प्रयोगशाळेत ही मूर्ती स्थापित केलेली आहे.

या हिंदू देवतेच्या मूर्तीचे प्रयोगशाळेत काय काम असा प्रश्न उपस्थित करण्यात आला तेंव्हा शास्त्रज्ञांनी याचे आपल्या पद्धतीने काही तर्कशुद्ध विश्लेषण केले आहे. श्रद्धा आणि विज्ञान यांचा एक अनोखा संगम इथे पाहायला मिळतो.

२००४ साली भारत सरकारनेच सर्न प्रयोगशाळेला ही मूर्ती भेट दिली होती. १८ जून २००४ रोजी या प्रयोगशाळेत या मूर्तीची स्थापना करण्यात आली. सर्न प्रयोगशाळेतील ही मूर्ती २ मीटर उंच आहे. जीनिव्हातील भारताचे राजदूत के. एम. चंद्रशेखर यांच्या हस्ते या मृतीचे अनावरण करण्यात आले. शिवशंकराचे नृत्य हे सबऍटोमिक कणांच्या नृत्याचेच प्रतीकात्मक रुप असल्याचा सिद्धांत येथील शास्त्रज्ञांनी मांडला होता. भारतीय अध्यात्माशी या वैज्ञानिकांनी जी नाळ जोडली त्याचा आदर राखण्यासाठीच भारत सरकारच्या वतीने ही मूर्ती भेट देण्यात आली आहे.

हजारो वर्षांपूर्वी भारतीय कलाकारांनी शिवाची नृत्य करणारी प्रतिकृती बनवली. शिवाच्या विविध मुद्रेतील अशा अनेक मुर्त्या भारतात पाहायला मिळतात. अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ फ्रिटजॉफ कॅप्रा याच्या मते पाश्चिमात्य भौतिकशास्त्र आणि पौर्वात्य अध्यात्मिकशास्त्र या दोन्हींचे अभ्यासविश्व एकच आहे. आधुनिक भौतिक शास्त्रात शास्त्रज्ञ जो कॉस्मिक डान्सचा सिद्धांत मांडतात तो शिवाच्या नृत्य शैलीच्या वर्णनाशी मिळताजुळता आहे, असे फ्रिटजॉफ कॅप्रा म्हणतो. भौतिकशास्त्रातील कॉस्मिक डान्सची कल्पना पुराण कथेतील शिवाच्या वर्णनाशी तंतोतंत जुळते.

फ्रिटजॉफ कॅप्राने ‘द ताओ ऑफ फिजिक्स’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे ज्यात त्याने शिव आणि आधुनिक भौतिक विज्ञान यातील साम्य अधोरेखित केले आहे. शिवाचे नृत्य आणि सबऍटोमिक कणांचे नृत्य यांची तुलना या पुस्तकात केली आहे. हे पुस्तक १९७५ साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकात त्याने म्हटले आहे, “नृत्य करणाऱ्या शिवाचे रूप हे ब्रह्मांडाचे अस्तित्वच अधोरेखित करते. शिव आम्हाला हेच सांगतो की जगात काहीच मूल्यवान नाही. हे जग एक माया (भ्रम) आहे आणि इथली प्रत्येक गोष्ट अनित्य आहे. आधुनिक भौतिकशास्त्र देखील याच बाबींची पुष्टी करते. पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांना जीवन आहे आणि मृत्यूही आहे. जीवन-मरणाची ही प्रक्रिया पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या उगमापासून निरंतर सुरु आहे. हा नियम निर्जीव/अजैविक पदार्थांना सारखाच लागू होतो.” सर्नच्या प्रयोगशाळेत बसवण्यात आलेल्या या मूर्तीच्या शेजारी या पुस्तकातील काही अवतरणे दिलेली आहेत.

फ्रिटजॉफ कॅप्राने पुढे लिहिले आहे, क्वांटम फिल्ड थेअरीनुसार कोणत्याही पदार्थाचे अस्तित्व, त्याची निर्मिती आणि अंत हा सबऍटोमिक कणांच्या नृत्यावरच अवलंबून आहे. आधुनिक भौतिकशास्त्रानुसार पदार्थाच्या अणूतील उपकण हे नृत्य करत असतात या नृत्याच्या लयातूनच पदार्थाची निर्मिती आणि अंत होतो.

आधुनिक भौतिकशास्त्राच्या मते शिवाचे नृत्य हे या अणूतील उपकणांच्या नृत्याचेच प्रतिक आहे. सर्व प्रकारच्या पदार्थांना प्राप्त होणाऱ्या अस्तित्वाची ही नैसर्गिक कल्पना आहे. फ्रिटजॉफ कॅप्राचे द ताओ ऑफ फिजिक्स या पुस्तकाने विसाव्या शतकातील बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत स्थान पटकावले आहे. या पुस्तकाच्या आत्तापर्यंत ४३ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, जगातील २३ भाषांत या पुस्तकाचे भाषांतर झाले आहे. कॅप्राचे हे पहिलेच पुस्तक होते ज्यात त्याने आधुनिक वैज्ञानिक संकल्पना आणि पौर्वात्य अध्यात्मिक संकल्पना यातील समांतर विचारधारा अधोरेखित केली.

नटराजाच्या मूर्तीतून शास्त्रज्ञांना प्रेरणा मिळते. सर्नच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या एका संशोधकाने म्हटले होते की, त्याला या मूर्तीतून काम करण्याची प्रेरणा मिळते. दिवसा जेंव्हा सर्नच्या प्रयोगशाळेत जीवनाचा ताल शोधण्याचा प्रयत्न केला जातो तेंव्हा त्यांना असे जाणवते की, भगवान शिव याच तालावर नृत्य करत आहेत. शिवाच्या या मूर्तीकडे पाहून ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू, पदार्थ अनित्य आणि मर्त्य आहे याची जाणीव होते.

पदार्थातील सर्वात छोटा कण म्हणजे अणू असे मानले जाते. पण या अणूचेही तीन भाग आहेत – न्युट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. यात आता आणखी एका चौथ्या घटकाची भर पडली आहे, ते म्हणजे फ्युट्रॉन, हा घटक संपूर्णत: वजनरहित असतो. यातील न्युट्रॉनव्यतिरिक्त इतर सर्व पार्टिकल हे स्थिर असतात. मात्र न्युट्रॉनचे सतत विघटन होत असते. न्युट्रॉनच्या या सतत होणाऱ्या विघटनामुळे पदार्थात एक लय तयार होते, ज्याला भौतिकशास्त्रात डान्स ऑफ सबऍटोमिक पार्टिकल असे म्हटले जाते.

स्वित्झर्लंडमधील या जगप्रसिद्ध प्रयोगशाळेला अनेक देश योगदान देतात. भारत देखील या प्रयोगशाळेतील एक निरीक्षक देश आहे. इतर देशातील शास्त्रज्ञही या प्रयोगशाळेशी स्वतःला जोडून घेऊ शकतात. सर्नची उदार बहुसांस्कृतिकता यातून अधोरेखित होते.

२०१३ मध्ये जो बिगबँग थेअरीचा प्रयोग झाला होता. त्यासाठी याच प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला होता. या प्रयोगातच हिग्ज बोसॉन म्हणजे गॉड पार्टिकलचा शोध लागला होता.

शिवाचे नृत्य हे विश्वाची निर्मिती आणि संहाराचे तसेच जन्म-मरणाचेही चक्र दर्शवते. या विश्वातील असंख्य सजीव आणि निर्जीव वस्तू कालांतराने नष्ट होतच असतात. म्हणजेच त्या भ्रामक आहेत. आधुनिक भौतिकशास्त्रही शिवाच्या नृत्यातून मिळणाऱ्या या संदेशाची पुष्टी करते. पदार्थातील डोळ्यांनाही न दिसणाऱ्या मुलकणांचे जे अखंड नृत्य चाललेले असते ते शिवाच्या नृत्याचेच प्रतिक आहे. बबल चेंबरमध्ये दिसणारे हे नृत्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाहता येते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!