ज्या काळात समुद्र ओलांडणे हे ब्रिटनमध्ये पाप मानले जायचे त्यावेळी त्यांनी समुद्रातून प्रवास करून जगातील कित्येक भूभाग शोधून काढले.
जगभरातील साम्राज्याचे मुख्य केंद्र ब्रिटन हेच होते. थोडक्यात जगाची राजधानी होती ग्रेट ब्रिटन. त्यामुळे अनेक नकाशे बनवताना या राजधानीलाच केंद्रबिंदू मानून नकाशे तयार केले गेले.
पृथ्वीवरील अक्षांश, रेखांश या काल्पनिक रेषा मानल्या जातात आणि त्या सरळ नाही तर वर्तुळाकार आहेत, हे आपल्याला माहिती आहेच. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे विषुववृत्तापासूनचे उत्तर किंवा दक्षिणेकडील अंशात्मक अंतर अक्षांश याप्रमाणे मोजले जाते. अक्षांश या आडव्या रेषा आहेत. त्या वर्तुळाकार आहेत आणि विषुववृत्ताला छेदणाऱ्या काल्पनिक रेषांना रेखावृत्त असे म्हणतात.
हे मुख्य रेखावृत्त ब्रिटनमधील ग्रीनिच या शहरातून गेले आहे. इथून जगाचे दोन विभाग झाले आहेत. विमान प्रवास करताना इथे वेळ बदलली जाते. येथे जगातील प्रमाणवेळ ठरलेली आहे. कुणी ठरवली ही प्रमाणवेळ? कोणाचं होता हा निर्णय? त्याचा परिणाम काय झाला? आज हीच वेगळी माहिती तुमच्यासाठी.
१८८४ साली जगातील २२ सत्ताधीशांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला, की ग्रीनिच शहरातून मुख्य रेखावृत्त जाईल.
असं का केलं त्यांनी?
साधारणपणे १८०० साली वसाहतवाद सगळीकडे पसरत होता. त्यामुळे नकाशा बनवण्याची गरज अगदी टोकाला पोचली होती. कारण आंतरखंडीय प्रवास करायचा तर त्यासाठी नकाशा असणे आवश्यक होते. युरोपियन व्यापारी व्यापारासाठी बाहेर पडताना त्या वसाहतींवर आपली सत्ता कशी प्रस्थापित करता येईल हा छुपा हेतू ठेवूनच होते. आता गरज होती ती व्यापार सहजपणे होण्याची. बहुतेक नकाशे हे ब्रिटनच्या अधिपत्याखालीच तयार केले होते आणि ब्रिटनसोबत सलोख्याने हे व्यवहार केले की सारे सुटसुटीत होणार होते.
त्याशिवाय अजून एक प्रश्न होता तो म्हणजे प्रमाणवेळ बनवण्याचा. औद्योगिक क्रांतीमुळे रेल्वेमधून बरेच लोक कामानिमित्त प्रवास करत. त्यांना वेळेवर इच्छित जागी पोहोचवणे तसे कठीण होत होते. कारण प्रत्येक देशाची वेळ ही वेगवेगळी होती. अमेरिकेतच दहा वेळा दिसायच्या. इतर देशांचीही तीच कथा. मग वेळ प्रमाणित करणे अत्यावश्यक होते. म्हणून मग एक मोठी आंतरराष्ट्रीय परिषद घ्यायचे ठरले. ती परिषद होती आंतरराष्ट्रीय रेखावृत्त परिषद.
अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे ही परिषद १८८४ च्या ऑक्टोबर महिन्यात घेतली गेली. या परिषदेत जगातील २५ प्रभावी राष्ट्रांनी आपले प्रतिनिधी पाठवून सहभाग दर्शवला. यामध्ये प्रमुख विषय प्रमाणवेळ निर्धारित करणे आणि मुख्य रेखावृत्त ठरवणे हे होते.
२२ दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर या परिषदेत अनेक निर्णय घेतले गेले. त्यातील मुख्य निर्णय होतं मुख्य रेखावृत्ताची जागा ठरवणे. याची जागा ग्रीनिच शहरात निश्चित करण्यात आली. २२ विरुद्ध २५ मतांनी हा ठराव पास झाला.
डॉमिनिकन रिपब्लिक, फ्रान्स आणि ब्राझील या राष्ट्रांनी या गोष्टीला विरोध केला. फ्रान्सच्या मते मुख्य रेखावृत्त हे जगाच्या मधोमधच असले पाहिजे. त्यासाठी विविध पर्याय दिले गेले. पण त्याला मान्यता मिळाली नाही.
हा निर्णय होऊन आज १०० वर्षे उलटली. पण आजही याचा परिणाम आपल्या जीवनावर झालेला दिसतो. आजही आपण ग्रीनिच हेच आपले मुख्य रेखावृत्त मानतो आणि बहुतेक सर्व सॅटेलाईट सिस्टिम्स आजही हीच प्रमाणवेळ मानून आपली कामे अचूक पद्धतीने करत आहेत. त्यावेळी जर हे वेळेचे प्रमाणीकरण केले गेले नसते तर या सिस्टिम्स चालणे जवळपास अशक्य झाले असते.
इतिहास हा खूप लोकांना आवडत नाही. त्याला भूतकाळात रमणे असे म्हणून हेटाळणीही पण केली जाते. दरवेळी फक्त लढाया, रक्तरंजित युद्धे हाच इतिहास नसतो. कधी कधी प्रगतीची मुळे एखाद्या निर्णयात दडलेली असतात. हा ग्रीनिच प्रमाणवेळ आणि मुख्य रेखावृत्त करण्याचा निर्णय हा असाच एक. इतिहासात घेतले गेलेले निर्णय आपल्या जीवनावर काहीवेळा कसे सकारात्मक परिणाम करतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.