आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
घाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक प्रजासत्ताक देश आहे. या देशाचा बहुतेक भाग व्होल्टा नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. ‘घाना’ हा देश पूर्वी ‘गोल्ड कोस्ट’ ह्या नावाने ओळखला जाई. याचे कारण ह्या देशाच्या किनारपट्टीलगतच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे होते. या देशाचा अधिकृत आणि ज्ञात इतिहास १४७१ पासूनचा.
१४७१ मध्ये सर्वात आधी सोन्याच्या, हस्तीदंताच्या व मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी पोर्तुगिजांनी या देशात प्रवेश केला. त्यांनी १४८२ मध्ये घानाच्या समुद्रकिनाऱ्यानजीक एक किल्लाही बांधला. त्याचे नाव एल्मिना.
पोर्तुगीजांनंतर ब्रिटिश, फ्रेंच, डच, स्वीडिश असे इतर युरोपीय लोकही या देशात व्यापारासाठी येऊ लागले. त्यांनीही काही प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन आपापले किल्ले बांधले. मुळात हे सर्व युरोपीय व्यापारी येथे आले ते कापड, धातूंच्या वस्तू, मणी, मद्ये, शस्त्रे व दारूगोळा यांच्या बदल्यात सोन्याचा व हस्तिदंताचा व्यापार करण्यासाठी. पुढे मात्र त्यांनी त्यांच्या दृष्टीने फायदेशीर असा एक सौदा निवडला. तो म्हणजे गुलामांचा व्यापार.
आफ्रिकेतील स्वस्तात उपलब्ध होणारी माणसे त्यांनी गुलाम बनवली आणि त्यांना आपल्या वसाहतींमध्ये शेतीच्या कामासाठी वापरायला सुरुवात केली. हे गुलाम मिळवण्यासाठी घानाच्या जंगली प्रदेशात राहणारी ‘अशांटी’ नावाची जमात युरोपियनांना मदत करत असे. मात्र इंग्रजांनी हळूहळू सर्व युरोपीय व्यापाऱ्यांना हुसकावून लावले आणि स्वतःचा व्यापार वाढवण्यास सुरुवात केली.
एकोणिसाव्या शतकापासून व्यापाराला खरे कायदेशीर वळण लागले. मात्र या प्रदेशात आपली एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी इंग्रजांना अशांटी लोकांशी लढावे लागले. हे अशांटी लोक बोनो व बांडा नावाच्या राज्यांवर ताबा मिळवून आणि किनारी प्रदेशातील फांटी लोकांवर दबाव आणून प्रबळ झाले होते. त्यांच्या इतर स्थानिक जमातींबरोबर कायम लढाया होत.
अशांटी लोक युरोपीयांना करत असलेला गुलामांचा पुरवठा हे या लढायांचे कारण असे. पुढे इंग्रजांनी गुलामांचा व्यापार बंद केला. त्यामुळे डेन आणि डच लोकांनी आपले किल्ले ब्रिटिशांच्या ताब्यात दिले आणि गोल्ड कोस्टला रामराम ठोकला. त्यानंतर अशांटी लोकांचे व इंग्रजांचे पुन्हा बिनसले. १८०६ ते १९०० दरम्यान अशांटी व इंग्रज यांच्यात सात यु*द्धे झाली. शेवटी अशांटी प्रदेशावर इंग्रजांनी वर्चस्व प्रस्थापित केले.
या अशांटी जमातीची एक लढवय्यी, शूर वीरांगना म्हणजे या असांतेवा. ही अशांटी जमातीमधील एक प्रभावशाली राणी होती. तिचा कार्यकाळ एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचा मानला जातो. आजही तिची नक्की जन्मतारीख ठाऊक नाही. परंतु १८४० ते १८६० च्या दरम्यान तिचा जन्म झाला असावा असे अनेकांचे म्हणणे आहे.
आजही ही राणी राष्ट्रनिष्ठा, धैर्य, शौर्य आणि स्वाभिमान यांचे प्रतीक म्हणून अजरामर आहे. १८८० मध्ये तिला क्वीन मदर हा किताब बहाल करण्यात आला. त्यापूर्वी या असांतेवा एक कुशल शेतकरी होती. त्याकाळी अशांटी जमातीत मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. शिवाय तिचा मोठा भाऊ नाना अकावासी अफरेन ओकापासे हा अशांटी जमातीचा एक प्रबळ राजा म्हणून जमातीत प्रसिद्ध होता. त्याने तिच्यावर ही राणीपदाची जबाबदारी सोपवली, असे मानले जाते.
एक राणी म्हणून या असांतेवाने अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. यामध्ये अगदी गोल्डन स्टूलच्या रक्षणाचीही जबाबदारी होती. गोल्डन स्टूल हे अशांटी राजसत्ता, तिचे सामर्थ्य आणि अशांटी जमातीची सांस्कृतिक मूल्ये यांचे प्रतीक होते. क्वीन मदर ही राज्यकर्त्या राजासाठी आईसमान असल्यामुळे या आसनावर बसण्यासाठी उमेदवारही तीच निवडत असे आणि एक प्रकारे राज्याचे रक्षण करीत असे.
क्वीन मदर ही राजाची मुख्य सल्लागार असल्यामुळे तिचे पद त्या साम्राज्यामध्ये राजाच्या खालोखालच्या दर्जाचे मानले जाई. १८९६ मध्ये अशांटी जमातीच्या लोकांनी तेथे असलेल्या ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. ब्रिटिश गोल्ड कोस्ट येथे वसाहत स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते, हे यामागील कारण होते.
त्याला प्रत्युत्तर म्हणून ब्रिटिशांनी अशांटी राजा प्रेमपेह आणि त्याचा नातू कोफी यांना पकडले आणि अज्ञातवासात रवाना केले. कोफी स्वतः एक सामर्थ्यशाली नेता होता. ब्रिटिशांनी राजाची उचलबांगडी केली आणि गोल्डन स्टूलचा ताबा मिळवण्यासाठी इतर नेत्यांची सेशेल्स बेटांवर रवानगी केली.
ब्रिटिशांचा प्रतिनिधी असलेल्या सीनियर फ्रेडरिक मिशेल हॉजसन याने अशांटी जमातीसाठी वंदनीय आणि अभिमानाचा मानबिंदू असलेल्या गोल्डन स्टूलवर हक्क सांगितला आणि संघर्षाला सुरुवात झाली. हॉजसनच्या या कृतीबद्दल असांतेवाला समजले तेव्हा तिने त्याच्या विरोधात बंड पुकारले. जेव्हा जमातीचे इतर नेते इंग्रजांशी कसे दोन हात करायचे यावर चर्चा करत होते, तेव्हा राणी असांतेवा आपल्या सैन्यानिशी सज्ज झाली.
तिचे नेतृत्व आणि तळमळ बघून तिची अशांटी सैन्याची कमांडर इन चीफ म्हणून नेमणूक करण्यात आली. २८ मार्च १९३० रोजी अशांटी आणि इंग्रज यांच्यातील पाचवे आणि अखेरचे यु*द्ध सुरू झाले. इतिहासात हे यु*द्ध या ‘असांतेवा स्वातंत्र्ययु*द्ध’ किंवा ‘द वॉ*र ऑफ द गोल्डन स्टूल’ म्हणून प्रसिद्ध आहे.
या लढाईमध्ये १००० ब्रिटिश आणि सहकारी आफ्रिकन सैनिक आणि २००० अशांटी यो*द्धे मृत्युमुखी पडले. यापूर्वी ब्रिटिशांबरोबर झालेल्या इतर कोणत्याही यु*द्धापेक्षा या यु*द्धामध्ये अधिक मनुष्यहानी झाली होती. आपल्या जमातीच्या नेत्यांना प्रेरणा देण्यासाठी असांतेवाने असे जाहीर केले, की जर तिच्या जमातीच्या पुरुषांनी गोऱ्या लोकांविरोधात दंड थोपटले नाहीत तर हे काम महिलांना करावे लागेल. यामुळे पुरुषांना आव्हान तर मिळालेच, शिवाय परंपरेने चालत आलेल्या जमातीच्या मूल्यांनाही धक्का बसला. या प्रसंगी तिने उच्चारलेले शब्द होते :
“गोरे लोक आपला राजा, आपले नेते पकडत असताना आणि गोल्डन स्टूलवर आपला हक्क सांगत असताना अशांटींसारखे स्वाभिमानी लोक शांत कसे राहू शकतात? गोऱ्यांसाठी गोल्डन स्टूल म्हणजे केवळ पैसा आहे, त्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले आहे. पण मी सुद्धा गव्हर्नरला एक कवडीपण नेऊ देणार नाही. आणि तुम्ही नेते असे हातावर हात ठेऊन गप्प बसणार असाल तर तुमची लुंगी मला द्या, माझे कपडे तुम्ही घाला.”
या बंडाचे नेतृत्व करून तिने आपल्या अंगी असलेल्या अचाट साहसाचे आणि धैर्याचे दर्शन घडवले. दुर्दैवाने या उठावाच्या दरम्यानच ती पकडली गेली आणि तिचीही रवानगी सेशेल्स येथे करण्यात आली. सेशेल्समध्ये असतानाच १९२१ मध्ये तिचा मृत्यू झाला.
आजही या असांतेवा ही अशांटी जमातीमध्ये एक सामर्थ्यशाली लढवय्यी म्हणून प्रसिद्ध आहे. ऑगस्ट २००० मध्ये तिच्या स्मरणार्थ घानामध्ये एक म्युझियम उभारण्यात आले. याशिवाय तिच्या स्मरणार्थ ‘नाना या असांतेवा अवॉर्ड’ या पुरस्काराने असांतेवाची मूल्ये आणि नेतृत्वक्षमता अंगी असलेल्या आणि अतुलनीय कामगिरी करून दाखवणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला जातो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.