आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
अमर्यादित आनंदामुळे ‘वर्षे अमृताचा घनु’ ज्ञानेश्वरांनी ही कल्पना केली, पण भारतात आद्यपही अज्ञात कारणासाठी ‘शस्त्रांची वर्षा’ झालेली घटना कदाचित आपल्याला माहीतही नसेल. हा कोणताही कल्पनाविलास नाही अथवा प्रस्तुत लेखामध्ये अनर्थ तर्काचे इमले उभे केले गेलेले नाहीत. ही पूर्णतः सत्य घटना असून तत्कालीन सरकार आणि माध्यमांनी याची दखल घेतली होती. तर आजही या घटनेसंबंधी सी.बी.आय.ने तपास केला होता.
१८ डिसेंबर १९९५ ची सकाळ. बंगालमधील शेतकरी आणि शेतातील मजूर कामगार आपापल्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेले. पण एरवी रिकाम्या असलेल्या शेतांनी त्या सकाळी मात्र वेगळंच रूप धारण केलं होतं. या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी खोकी होती. कुतूहलाने लोकांनी ही लाकडी खोकी उघडली. पण त्या लाकडी खोक्यांमध्ये जे काही होतं, त्यानं मात्र या लोकांची झोप उडवली. कदाचित पिस्तूलही नीट न पाहिलेल्या पश्चिम बंगाल येथील पुरुलिया जिल्ह्यातील लोकांना प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा सापडला होता.
बघता बघता ही बातमी संपूर्ण देशात पोहोचली. केंद्रीय राजकीय नेतृत्व तसेच राज्याचं राजकीय नेतृत्वही या बाबतीत उत्तरदायी होतं. कारण कायदा आणि सुव्यवस्था हा भाग संविधानाच्या स्टेट लिस्टमध्ये येतो तर राष्ट्रीय सुरक्षेचा भाग युनियन लिस्टमध्ये आहे. याठिकाणी एखाद्या विमानाने भारताच्या हवाई हद्दीचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र पॅरॅशूटच्या मदतीने पुरुलिया जिल्ह्यात टाकली होती. एक प्रकारे सुरक्षा विभाग आणि भारत सरकारच्या कार्यक्षमतेवरच या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं.
या घटनेनंतर काही दिवसातच, अर्थात ३१ डिसेंबर १९९५ रोजी थायलंडहून कराचीला जाणारं एक अज्ञात विमान भारताच्या आकाशात असल्याचं भारतीय गुप्तहेर संस्थांना दिसून आलं. भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ या विमानाने ए.एन. – २६ या सैनिकी मालवाहू विमानाला भारताच्या हवाई हद्दीतच अटकाव केला आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करण्यास सांगितले.
या ए.एन.-२६ सैनिकी मालवाहू विमानातून पिचर ब्लिच या ब्रिटिश शस्त्रास्त्रांचा काळाबाजार करणाऱ्या दलालास अटक करण्यात आली. पिचर ब्लिच बरोबरच त्याच्या आणखी पाच साथीदारांना जेरबंद करण्यात आलं. याच विमानाने १७ डिसेम्बर १९९५च्या रात्री पश्चिम बंगाल येथील पुरुलिया जिल्ह्यात शास्त्रास्त्राने भरलेली लाकडी खोकी फेकली होती.
मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर हे ए.एन.-२६ विमान उतरल्यानंतर त्यात पिचर ब्लिचसह सहा जणं, म्हणजेच एकूण सात जणं असल्याचा काही लोकांनी दावा केला, पण याबद्दल निश्चित माहिती मिळू शकत नाही. विचित्र आणि आश्चर्यकारक घटना म्हणजे ए.एन.-२६ आणि त्या बरोबर सापडलेल्या लोकांना काहीच दिवसांत भारताबाहेर जायला अनुमती मिळाली. शिवाय तपासामध्ये हे ए.एन.-२६ विमान बनारस विमानतळावर इंधन भरण्यासाठी तसेच अन्य काही कारणांसाठी सुमारे आठ तास थांबल्याची माहिती समोर आली.
तपासावरून आणि मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलेल्या त्या सहा जणांच्या चौकशीतून या प्रकारामागे किम डेव्हीचा हात असल्याचे समोर आले. सूत्रधार कोणीही असो पण या घटनेत तब्बल २००हुन अधिक एके-४७ आणि एके-५६ स्वयंचलित राय*फल्स, या राय*फल्सची १६ हजारांहून अधिक जिवंत काड*तुसं, ७८ रणगाडा-प्रतिबंधक स्फो*टकं (अँटी-टॅंक ग्रेनेड्स), ५९ हातबॉ*म्ब (हॅन्ड-ग्रेने*ड्स), ६ रॉकेट लॉन्चर्स आणि रात्री स्पष्टपणे दिसू शकेल अशी साधनं (नाईट-व्हिजन डिव्हायसेस) अशी प्रचंड यु*द्धावश्यक सामग्री उघड्यावर टाकून देण्यात आली होती.
स्थानिक पोलिसांनी नागरिकांना तीन दिवसांचा अवधी दिला, आणि तीन दिवसात त्यांच्याकडे असलेली शस्त्रं पोलिसांच्या ताब्यात न आल्यास घरोघरी शोध घेण्याचा इशारा दिला. सुदैवाने यादरम्यान कोणतीही हिं*सा झाल्याची बातमी आली नाही. याठिकाणी पश्चिम बंगाल पोलिसांचे विशेष कौतुक करण्याची आवश्यकता आहे. इतक्या प्रचंड धुमश्चक्रीत आणि वरिष्ठांच्या दबावानंतरही त्यांनी अत्यंत संयम ठेऊन आणि जीवाची पर्वा न करता काम केले.
जेव्हा शासन आणि प्रशासनाला असे प्रकार टाळता येत नाहीत तेव्हा मात्र वर्दीतील पोलीस, अन्य सुरक्षा कर्मचारी आणि भारतीय सैन्य आपल्या जीवाची बाजी लावून कोणताही विचार न करता आणि कोणताही दुजाभाव न बाळगता आपले कर्तव्य पार पाडते. याची प्रचिती २६/११च्या मुंबईच्या द*हश*तवादी ह*ल्ल्यात आपल्याला आली. पुढचे काही दिवस माध्यमं आणि वृत्तपत्रांमध्ये पुरुलिया हे नाव ‘ट्रेंडिंग’ला होतं, पण नेहमीप्रमाणे काही दिवसातच समाजाने आणि शासनाने पुरुलियाची घटना पूर्णपणे विस्मरणात आणली.
तब्बल १६ वर्षांनी, २०११ मध्ये टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील एका चर्चेदरम्यान किम डेव्ही याने पुरुलियाच्या घटनेला भारताचं तत्कालीन केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आश्चर्यजनक दावा केला. त्याच्यामते, केंद्रात तत्कालीन प्रधानमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पश्चिम बंगालमधील कम्युनिस्टांचे सरकार संकटात आणायचे होते. म्हणूनच तत्कालीन केंद्र सरकारने ब्रिटिश गुप्तहेर संस्था एम. आय. 5 आणि भारतीय गुप्तहेर संस्था ‘राॅ’च्या मदतीने हा डाव रचला होता.
या चर्चेनंतर सी.बी.आय.ने डेन्मार्कमध्ये अस्तित्वात असलेल्या डेव्हीच्या हस्तांतरणाची मागणी केली. पण डेन्मार्क प्रशासनाने हस्तांतरणाला नकार दिला. कारण त्याच्या अटकेच्या वॉरंटची तारीख कधीच एक्सपायर झाली होती. त्यानंतर आजतागायत डेव्ही भारताच्या ताब्यात आला नाही. तर मागच्याच महिन्यात (ऑगस्ट २०२४) डेन्मार्कमधील हिलरोड जिल्हा न्यायालयाने डेव्हीला भारतात पाठवता येणार नाही, कारण तिथे त्याच्या अधिकारांचे उल्लंघन होऊ शकते असा निर्णय दिला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.