हा गांधीवादी उपोषणाला बसला नसता तर आज आंध्र प्रदेश अस्तित्वात नसता!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांना हौतात्म्य आले होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भाषावार प्रांत रचनेचे धोरण अंगिकारण्यात आले. मग त्यावेळी भारतभरात विविध भाषिकांनी खासकरून दक्षिण भारतीयांनी आपल्या भाषेला अनुरूप वेगळ्या राज्यांच्या निर्मितीसाठी लढा देण्यास सुरुवात केली. मुंबई प्रांतातून मराठी भाषिकांचा महाराष्ट्र वेगळा करण्यात यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी व्हावी यासाठी १०७ कार्यकर्त्यांनी हौतात्म्य पत्करले होते. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जसा लढा उभारण्यात आला होता अगदी तसाच लढा तेलगू भाषिकांनी मद्रास प्रांतातुन तेलगू भाषिकांचे वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी उभारला होता.

तेलगू भाषिकांचा वेगळ्या प्रांतासाठी गांधीजींच्या एका शिष्याने उपोषण सुरू केले होते, जोपर्यंत तेलगू भाषिकांचे वेगळे राज्य निर्माण केले जात नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा त्या गांधीवाद्याने घेतला आणि अखेरीस तो उपोषणामुळे मृत्युमुखी पडला.

स्वतंत्र तेलगू भाषिकांच्या राज्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या या गांधीवाद्याचे नाव होते ‘पोट्टी श्रीरामुलू’.

महात्मा गांधी एकदा पोट्टी श्रीरामुलु यांच्याबद्दल बोलताना म्हणाले होते की, “जर त्यांच्यासारखे अजून काही कार्यकर्ते असते तर भारताला फार आधीच स्वातंत्र्य मिळाले असते”. इतके निष्ठावान राष्ट्रभक्त पोट्टी श्रीरामुलु होते.

१६ मार्च १९०१ साली मद्रास म्हणजेच आजच्या चेन्नई शहरात पोट्टी श्रीरामुलू यांचा जन्म झाला. गुंटूर जिल्ह्यातील त्यांचे घरदार सोडून श्रीरामुलू यांचा परिवार मद्रासला स्थायिक झाला होता. श्रीरामुलू यांनी मुंबईच्या व्हीजेटीआय या तंत्रशिक्षण महाविद्यालयातुन सेनेटरी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला.

ब्रिटिश दरबारी मिळालेली सरकारी नोकरी असताना देखील श्रीरामुलू यांचे मन त्या आरामदायी आयुष्यात रमत नव्हते. महात्मा गांधींच्या प्रेरणेने ते स्वातंत्र्यता संग्रामात उतरले पण त्यांच्या आयुष्यात अशा काही दुर्दैवी घटना घडत गेल्या ज्यामुळे त्यांना त्यांच्या सर्व संपत्तीवर पाणी सोडावे लागले. १९२८ साली श्रीरामुलू यांच्या पत्नीचा बाळंतपणावेळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने कष्टी झालेल्या श्रीरामुलूनी १९३० साली आपली सरकारी नोकरी त्यागली आणि महात्मा गांधींच्या सत्याग्रहात उडी घेतली. १९४२ पर्यंत त्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्त्वात अनेक आंदोलन केले आणि तुरुंगवास देखील भोगला.

महात्मा गांधींच्या ग्राम स्वराजच्या कल्पनेने प्रेरित होऊन श्रीरामुलू यांनी आंध्रातील कृष्णा जिल्ह्यातील येरेनी सुब्रमण्यम यांच्या गांधी आश्रमात त्यांनी प्रवेश घेतला. तिथे ग्रामीण भागाच्या लोकांसाठी काम करण्यास सुरुवात केली.

पुढे त्यांनी महात्मा गांधींसोबत साबरमती आश्रमात व नंतर वर्धा आश्रमात कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन दरिद्री नारायणाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले.

श्रीरामुलू यांनी दलितांच्या आर्थिक आणि सामाजिक उत्थानासाठी प्रयत्न केले. त्यांनी मद्रास प्रांतातील मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी अनेक सत्याग्रहांचे नेतृत्व केले.

मद्रास प्रांतातील सर्व मंदिरांमध्ये अस्पृश्याना प्रवेश मिळायला हवा यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांना हे उपोषण मागे घेण्यासाठी महात्मा गांधींना विनंती करावी लागली होती.

नेल्लोरच्या वेणूगोपाल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी पुन्हा १० दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले होते. पुढे १९४८ आणि १९४९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाच्या माध्यमातून दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते.

गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी तेलगू भाषिक राज्याच्या मागणीसाठी श्रीरामुलू यांनी प्रयत्न सुरू केले. खरंतर स्वतंत्र तेलगू राज्याची मागणी ही १९१० पासून केली जात होती. १५ ऑगस्ट १९५१ ला काँग्रेस नेते स्वामी सीताराम यांनी तेलगू भाषिक राज्यासाठी ३५ दिवसांचे उपोषण सुरू केले.

आचार्य विनोबा भावेंनी या उपोषणाकडे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी नेहरूंना कळवले की ही मागणी मान्य केली नाहीतर इथे मोठी विचित्र परिस्थिती निर्माण होईल. नेहरूंनी लगेचच सीताराम यांना वचन देऊन त्यांना उपोषण सोडण्यास भाग पाडले. परंतु नेहरूंनी वचन पाळले नाही. नेहरूंना भाषेच्या आधारावर प्रांताची रचनाच मंजूर नव्हती.

नेहरूच नाही तर तत्कालीन मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री असलेल्या चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना देखील भाषिक प्रांतांचा प्रस्ताव मंजूर नव्हता. ते देखील स्वतंत्र आंध्र प्रदेशच्या निर्मितीच्या विरोधात होते. ते म्हणाले जर तसं झालंच तर चेन्नई शहरावर फक्त तमिळ जनतेचा अधिकार आहे. नेहरूंनी संसदेत त्यांना वैयक्तिक दृष्ट्या प्रांत रचना मंजूर नसल्याचे स्पष्ट केले. त्याला प्रतिक्रिया देताना आंध्रचे नेते नारायण राव म्हणाले की नेहरूंची ही भूमिका अत्यंत चुकीची आणि आंध्र प्रदेशातील लोकांवर अन्याय करणारी आहे. पण नेहरूंनी त्याकडे दुर्लक्ष केले.

नेहरूंच्या या भूमिकेमुळे नाराज असलेल्या श्रीरामुलू यांनी स्वतंत्र तेलगू प्रांतासाठी १९ ऑक्टोबर रोजी उपोषण करण्यास सुरुवात केली. हे उपोषण सुरू झाल्यावर ६ आठवडे नेहरू आणि राजगोपालाचारी यांनी श्रीरामुलू यांना भेटायची तसदीसुद्धा घेतली नाही.

परंतु त्यानंतर परिस्थिती चिघळत गेली. लोक जाळपोळ करू लागले. अखेरीस नेहरू दबावापुढे नमले आणि त्यांनी राजगोपालाचारीना १२ डिसेंबरला या संदर्भात पत्र लिहिले. परंतु हे पत्र पोहचण्यास आणि राजगोपालाचारी यांची प्रतिक्रिया येणार याच्या अगोदरच १५ डिसेंबरला श्रीरामुलू यांचे उपोषणामुळे निधन झाले. त्यांनी तब्बल ५८ दिवस उपवास केला होता.

त्यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली, विजयवाडा, विशाखापट्टणम आणि आंध्र प्रदेशातील अनेक प्रमुख शहरात हिंसक प्रदर्शने करण्यास लोकांनी सुरुवात केली. अनेक ठिकाणी पोलिसांच्या गोळीबारात लोक मृत्युमुखी पडले. परिस्थिती अधिक चिघळू न देता नेहरूंने वेगळ्या तेलगू भाषिक प्रांताच्या निर्मितीसाठी मान्यता दिली.

१ ऑक्टोबर १९५३ला आंध्र प्रदेशाला मद्रास प्रांतातुन वेगळे करण्यात आले. पुढे तीन वर्षांनी १ नोव्हेंबर १९५६ला आंध्र प्रदेश राज्य अस्तित्वात आले.

इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात की, “आंध्र प्रदेशच्या बाहेर कोणी श्रीरामुलू यांना ओळखत नसले तरी त्यांनि आधुनिक भारताच्या इतिहासात एक महत्वपूर्ण योगदान दिले आहे. भारताच्या भाषावार प्रांत रचनेला मार्ग दाखवण्यात त्यांचे योगदान अमूल्य असे आहे.”

अशा या महान देशभक्त पोट्टी श्रीरामुलू यांचा स्मृतीला विनम्र अभिवादन!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!