आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
मध्यन्तरी कोविड-१९ च्या साथीने संपूर्ण जगात कहर केला होता. कारण हा व्हायरस एका प्रकारावर न थांबता त्याचे वेगवेगळे प्रकार किंवा स्ट्रेन्स तयार होऊन स्वतःला अधिकाधिक शक्तिशाली करून घेत आहे. कोविड-१९ च्या जागतिक साथीप्रमाणेच संबंध जगामध्ये एकेकाळी प्लेगची साथ पसरली होती.
आज आपल्याकडे कोरोनाव्हायरस रोगाच्या उद्रेकादरम्यान पीपीई किट्स आणि मास्क आहेत. परंतु पूर्वी, बुबोनिक प्लेगच्या सुरुवातीच्या दिवसांपासून चोच असलेले फेस-मास्क वापरले जात होते. ही केवळ एक विचित्र फॅशनच नव्हती, तर हा वेष डॉक्टरांना ‘मियास्मा’पासून वाचवण्यासाठी होता. यालाच सामान्यतः’ अशुद्ध किंवा खराब हवा ‘असेही म्हणतात.
तत्कालीन परिस्थितीत आजसारखी आधुनिक व्यवस्था, आधुनिक औषध आणि लस निर्मिती शक्य नसल्याने प्लेगने अनेकांचा जीव घेतला. पीडितांना वेदनादायक सूजलेला गळा, काळी पडलेली कातडी आणि इतर भीषण लक्षणांना सामोरं जावं लागत असे. पी.पी.इ. किट्स प्लास्टिकच्या आच्छादनासारखे दिसतात. एन-९५ मास्क्स, हातमोजे, फेस शील्ड, शू कव्हरिंग्ज आणि असे बरेच काही कव्हरिंग्स सध्या उपलब्ध आहेत. पण, पूर्वीच्या साथीच्या काळात, यापैकी काहीही अस्तित्वात नव्हते.
१३४७ च्या ऑक्टोबरमध्ये सुरू झालेला बुबोनिक प्लेग हा मानवी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वांत घातक साथीचा रोग आहे. याला ‘ब्लॅक डेथ’, ‘पेस्टिलेंस’ आणि ‘ग्रेट मॉर्टॅलिटी’ असेही म्हणतात, यामुळे युरेशिया आणि उत्तर आफ्रिकेत १० ते २० कोटी लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर सुमारे सोळाव्या-सतराव्या शतकातही प्लेगने युरोपमध्ये धुमाकूळ घातला होता. युरोपमध्ये शतकानुशतके वारंवार उद्भवणारी ही साथ आहे.
मग या बुबोनिक प्लेगपासून डॉक्टरांनी स्वसंरक्षण कसे केले? पीपीई किट ही एक आधुनिक संकल्पना असल्याने, बुबोनिक प्लेगपासून बचाव करणारी ‘बुबोनिक प्लेग डॉक्टर’ची वेशभूषा. हा वेष भीतीदायक दिसत. यात डॉक्टरांनी स्वत:ला नखशिखांत झाकले असायचे आणि लांब पक्ष्यासारख्या चोचीचा मुखवटा, डोक्यापासून पायापर्यंत पांघरूण, तसेच गोल टोपी आणि लांब नखं असलेले हातमोजे हे डॉक्टर्स घालत असत.
चोचीच्या प्लेग मास्कमागील कारण म्हणजे या धोकादायक रोगाबद्दल एक चुकीचा समज होता. आज आपल्याकडे एन-९५ मास्क्स आहेत, पण तेव्हा, चोचीचा मुखवटा बुबोनिक प्लेग हवेत पसरतो या “गैरसमजामुळे” बनवला गेला होता. प्लेग ‘विषारी हवे’द्वारे पसरतो आणि एकदा प्लेगग्रस्त हवेत श्वास घेतल्यावर शरीरात असंतुलन निर्माण होऊ शकते असा डॉक्टरांचा गैरसमज होता.
विषारी हवा आत जाण्यापासून रोखण्यासाठी, धूप आणि परफ्यूम्स वापरणे सोयीचे होते आणि ‘अशुद्ध हवा’ फिल्टर करण्यासाठी चोच या सगळ्याचे मिश्रण साठवण्याचे ठिकाण म्हणून काम करत असत. हे मिश्रण साधारणपणे सापांच्या मांसाची पावडर, दालचिनी, मध, थेरियाक आणि अन्य ५५ औषधी वनस्पतींपासून तयार केले जात. बाहेरील हवा डॉक्टरांच्या नाकपुड्या किंवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापूर्वी मुखवटाच्या आतील संरक्षक औषधी वनस्पती हवा शुद्ध करण्यासाठी मदत करतील असे मानले जात असत.
सतराव्या शतकात अनेक युरोपीय राजघराण्यांचे ‘डॉक्टर चार्ल्स डी लॉर्म’ यांनी अशा प्रकारचे पोषाख परिधान करण्यास सुरुवात केली. या पोषाखामध्ये सुगंधी मेणाने झाकलेला कोट, बूटाशी जोडलेले ब्रीच, टक-इन शर्ट, बकरीच्या चामड्यापासून बनवलेली टोपी आणि हातमोजे यांचा समावेश होता.
प्लेगचे डॉक्टर्स एक रॉड घेऊन फिरत असत, ज्यामुळे ते कळत-नकळत जवळ येत असलेल्या रुग्णांना धक्का देत स्वसंरक्षण करीत असत. आजच्याच परिभाषेत सांगायचं झालं तर सोशल डिस्टंसिन्ग पाळण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न होते.
खरंतर प्लेगचे कारण कोणतीही अशुद्ध हवा नव्हतीच. या रोगाचे कारण म्हणजे प्रत्यक्षात ‘येरसिनिया पेस्टिस’ नावाचा एक जीवाणू होता आणि हा जिवाणू मानवी शरीरात पिसूच्या चाव्यामुळे पसरतो. हे पिसू उंदरांद्वारे वाहून आणले जातात. प्लेगच्या तीन मोठ्या साथी येऊन गेल्या, तेव्हा कुठे प्लेगचं डायग्नोसिस करण्यात यश आलं होतं. दूषित द्रवपदार्थांच्या संपर्कात येऊन, शिंकताना किंवा खोकल्याने न्यूमोनिक प्लेग असलेला संसर्गजन्य थेंब शरीरात गेल्यानेही प्लेग संक्रमित होऊ शकतो.
तर या भितीदायक पोशाखात आता मोठा बदल घडून आला आहे. आता हे पोशाख हॅलोविन या उत्सवासाठी व्हेनिस, स्पेन याठिकाणी वापरण्यात येतात. पण शेवटी, या पोशाखाने डॉक्टरांचे रोगापासून संरक्षण तर झाले नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.