अनोळखी गडकिल्ले हुडकायची हौस असेल तर तुम्ही ताहुलीला गेलंच पाहिजे!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


महाराष्ट्रामध्ये जेवढे गड-किल्ले आहेत तेवढे संपूर्ण भारतात कोठेही नाहीत. महाराष्ट्रातील या सर्व किल्ल्यांना खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. या किल्ल्यांची भटकंती करायची सवय एकदा लागली की कोणीही स्वस्थ मात्र बसत नाही. या किल्ल्यांमुळे इतर डोंगर, दऱ्या, घाटवाटा यात भटकणे देखील सुरु होते.

असाच एक, ‘ताहुलीचा डोंगर’. हा पुणे-मुंबईपासून अगदी एका दिवसात बघून येण्यासारखा आहे. माथेरानपासून उत्तरेला हाजी मलंग गडापर्यंत लांबलेल्या डोंगररांगेत मलंगगडाच्या अगदी पूर्वेला ताहुली डोंगर आहे.

या ताहुलीच्या डोंगरावर जायचे झाल्यास आपल्याला पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील कल्याण हे स्टेशन गाठावे लागते. कल्याणमधून आपल्याला हाजी मलंगगड येथे जाणारी बस पकडून कुशिवली गावात उतरावे. या कुशिवली गावामधून ताहुली येथे आपल्याला जाता येते.

पहायला गेले तर ताहुली येथे जायचे असेल तर रुळलेली वाट ही हाजी मलंगगड आणि ताहुली या दोघांच्या खिंडीतून जाणारी वाट ही पूर्णपणे मळलेली आहे. कुशिवली गावामधून ताहुली येथे जाण्यासाठी व्यवस्थित मळलेली वाट असल्याने चुकण्याचा धोका अजिबात नाही. सुरुवातीला एक धबधबा लागतो तेथून आपली वाट जाते. पावसाळ्यात या धबधब्याला भरपूर पाणी असते.

‘कुशिवली’ गावातून दिसणारे दृश्य आणि ‘हाजीमलंगगड’

इथूनच पुढे आपण परत जिथे दिशादर्शक खुणा केल्या आहेत तो रस्ता पकडायचा आणि चालायला लागायचे. 

थोडेसे जंगल आपल्याला लागते परंतु आपण मुळातच कोकणात असल्याने या जंगलामध्ये आपल्याला दमटपणा चांगला जाणवतो. या जंगलातून थोडे पुढे उंचीवर गेले असता आपल्याला एका बाजूला बदलापूर शहर आणि परिसर दिसू लागतो. परंतु ट्रेक अजून सुरु व्हायचा असतो.

येथे थोडा दम खाऊन आपण पुढे परत चालत निघायचे थोडेसे आपण चालत गेल्यावर एका पठारावर पोहोचतो तिथे आपल्याला ‘ताहुली’ डोंगराचा ‘बामण’ सुळका दिसतो. परंतु त्याच्याकडे जाणारी वाट आपल्याला पकडायची नाही इथून थोडेसे आपल्याला पुढे चालत जावे लागते.

थोड्या वेळात आपण दगडांनी व्यवस्थित रचलेल्या पायऱ्यांच्या इथे येऊन पोहोचतो. तिथेच एक जवळ महादेवाचे नव्याने जीर्णोद्धार केलेले मंदिर आपल्याला पहायला मिळते. या महादेवाच्या मंदिरापासून जवळपास दीड तासाने आपण ताहुलीला पोहोचतो.

या शिवलिंगाचे दर्शन घेऊन आपण पुढे चालू लागायचे इथून पुढे चालत गेल्यावर आपल्याला एक पठार लागते त्यामुळे वाट बऱ्यापैकी सपाट आहे. तसेच या पठारावर झाडी बरीच आहेत त्यामुळे जास्त थकवा जाणवत नाही.

येथून जवळपास अर्धा तास चालत आलो की आपण ताहुली शिखराच्या पायऱ्यांच्या वाटेवर येऊन पोहोचतो आणि येथून आपली शेवटची चढाई सुरु होते.

पायथ्यापासून दिसणारा ‘ताहुली’

जेव्हा आपण ताहुली शिखराच्या माथ्यावर जाऊन पोहोचतो तेव्हा आपल्याला तिथेच एक समोर मोठे पाण्याचे टाके पहायला मिळते. तसेच इथून पुढे समोरच संत गाडगेबाबा धर्मशाळा आपल्याला पहायला मिळते. ज्यांना कोणाला ‘ताहुली’ येथे मुक्काम करायचा असेल तर तुम्ही इथे नक्की करू शकता.

इथून पुढे आपण थोडेसे चालत गेलो असता आपल्याला एक शिवलिंग देखील बघायला मिळते. येथून पुढे आपण चालत आलो कि ‘ताहुली’ शिखराच्या माथ्यावर असणाऱ्या थडग्यांच्या इथे येऊन पोहोचतो.

ताहुलीवर जाण्याचा  मार्ग आणि ताहुली येथे असणारे ‘शिवलिंग’.

या थडग्यांचे २ गट आपल्याला बघायला मिळतात. एका गटामध्ये पाच थडगी असून दुसऱ्या गटामध्ये तीन थडगी आहेत. यामध्ये पाच थडग्यांचा जो गट आहे तो सर्व पंचक्रोशीमध्ये ‘पाचपीर’ या नावाने ओळखला जातो. या पाच पिरांची नावे मामू, भांजा, दादी माँँ, बालापीर अशी सांगितली जातात. ‘ताहुली’ शिखरावर असलेल्या धर्मशाळेत कधीकधी या थडग्यांचे मुजावर देखील येतात.

या ‘ताहुली’ शिखरावरून आपण दक्षिणेकडे पाहिले असता आपल्याला नाखिंद, पेब उर्फ विकटगड, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा हे सगळे किल्ले पहायला मिळतात. त्यापैकी ‘नाखिंद’ हा किल्ला नाही.

‘ताहुली’ येथून पूर्वेकडे आपल्याला ‘बारवी धरण’ पहायला मिळते तसेच पश्चिमेकडे आपल्याला ‘पारसिक’ डोंगररांग बघायला मिळते. येथून उत्तरेकडे आपल्याला ‘काकुलीचा तलाव’ देखील बघावयास मिळतो. असा हा सुंदर एकदिवसीय ‘ताहुलीचा ट्रेक’ करून आपण आलेल्या वाटेने ‘कुशिवली’ गावामधून परत जायचे.

ताहुलीवरील पाण्याचे टाके आणि ‘पाच पीर’.

असे हे सुंदर आणि ‘निसर्गरम्य’ असलेले ‘ताहुली शिखर’ आपल्याला गिर्यारोहणाचा नक्कीच एक वेगळा अनुभव देते. अशा या ‘ताहुली’ डोंगरावर येऊन एक निवांत वेळ घालवून आजूबाजूच्या सह्याद्रीच्या रांगा अभ्यासायला जी मजा येते ती नक्कीच वेगळी आहे. असे हे ‘ताहुली’ डोंगर एकदा तरी नक्की सगळ्यांनी सैर करावे.

कसे जाल:-

पुणे – पिंपरी – लोणावळा – तळोजा – कुशिवली.


सदर लेख महाराष्ट्राची शोधयात्रावर पूर्वप्रकाशित.

महत्वाचे:-

  • सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.
  • कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.
  • सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा कि त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.
  • धबधब्या मध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :
 फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!