आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
सगळ्यांकडेच सरकारी ओळखपत्र असतं, अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आपण ते ओळखपत्र वापरतो. हे ओळखपत्र प्रामुख्याने आपली स्वतंत्र आणि विशिष्ट ओळख सिद्ध करण्यासाठी वापरलं जातं. यातही अनेक प्रकार असतात. पण तुम्ही कधी गायींना ओळखपत्र असल्याचं ऐकलं आहे का? भारतात मात्र अशी ओळखपत्रं गायींना देण्यात येतात.
मूळ भारतीय संस्कृतीत घरी गायी असण्याला गो-धन म्हणून संबोधलं आहे. घरीच गायी असल्या की घरात दूध-दुभतं चांगलं राहतं असंही आपण अनेकदा ऐकतो. भारतात तर दूध हे खऱ्या अर्थाने ‘धन’ आहे. भारतीयांचा एकही दिवस दुधाशिवाय किंवा दुग्धजन्य पदार्थांशिवाय जात नाही. शिवाय भारतात दुधावर अवलंबून असलेले अनेक उद्योग-धंदे आहेत.
भारतीय वंशाच्या गायींचं दूध हे जगात सर्वश्रेष्ठ गुणवत्तेचं आहे हे तर अनेकदा सिद्ध होताना आपण पाहतो. बाजारात देशी गायींचं दूध जर्सी गायींच्या दुधापेक्षा महाग विकलं जातं, याचं हेच कारण. दुधाबरोबरच गोमूत्र आणि शेणाचे मानवी जीवनात होणारे अगणित फायदे आहेत.
असे अगणित फायदे देऊनही गायीचा स्वभाव अत्यंत शांततेचा असल्याने भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे.
अगणित फायदे असल्याने ‘गाय’ अमूल्य आहे, आणि म्हणूनच जगातील अनेक भागात गायींची तस्करी होते. बहुतांश भागात गोमांसासाठी तर काही भागात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी. भारतातही मोठ्या प्रमाणावर गायीची तस्करी होते, विशेषतः सीमावर्ती भागांतून, गोमांसासाठी!
काही संस्था गायींच्या संगोपनासाठी कार्यरत आहेत, त्यांच्याद्वारे काही वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये गायींची संख्या मोजण्याचे अभियान सुरु करण्यात आले होते. या अभियानाद्वारेच त्यांनी गायींना एक विशिष्ठ ओळख क्रमांक देण्याचे ठरवले. त्यावेळी अनेक माध्यमातून याचा विरोध झाला.
आता हे काम भारतीय सीमा सुरक्षा दलाद्वारे चालवले जाते. २०१७ साली पश्चिम बंगालला लागून असलेल्या बांग्लादेशातून मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी सुरु होती. वाढत्या तस्करीमुळे सीमा सुरक्षा दलाने प्रत्येक गाय आणि बैलाला एक विशिष्ट आणि स्वतंत्र क्रमांक देण्याचे ठरवले, आणि त्यासाठी आधार कार्डसारखे एक विशिष्ट ओळखपत्र देण्याचे ठरवले.
भारतातील बहुसंख्य हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी गोमांस खाण्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे भारतातून त्यावर्षापासून रोज हजारो गायींची तस्करी होत असे. मोठ्या प्रमाणात गायींची तस्करी होत असलेल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात सीमा सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी ओळखपत्र देण्याची ही संकल्पना प्रायोगिक तत्वावर राबवली.
बांग्लादेशच्या सीमेला लागून असलेल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हजारो गावकऱ्यांनी आपल्या गायीचा फोटो काढण्यासाठी स्टुडिओच्या बाहेर गर्दी केली होती. गावकऱ्यांनी केलेल्या या गर्दीतून तस्करीची समस्या किती गंभीर आहे याचे चित्र स्पष्ट होत होते.
एका स्थानिक अहवालानुसार भारतातून “दररोज” वीस ते तीस हजार गायींची तस्करी होते. यातील बहुतांश तस्करी पश्चिम बंगालच्या वाटेने होत असल्याचं समोर आलं. भारतातील कायद्यानुसार गायींच्या निर्यातीवर बंदी आहे, असं असलं तरी भारतातून मोठ्या प्रमाणावर गायींची तस्करी करण्यात येते. बहुतांशी गोमांसासाठी ही तस्करी बांग्लादेश आणि पाकिस्तानातून चालते. इस्लामी सणांच्या वेळेला तर या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, तस्करीला आळा घालण्याच्या दृष्टीने सरकारने उचललेलं हे महत्वाचं पाऊल होतं.
फक्त पश्चिम बंगाल मधूनच नाही तर पंजाब आणि हरियाणासारख्या लांबच्या ठिकाणांवरूनसुद्धा गायीची तस्करी बांग्लादेशात ट्रकद्वारे केली जाते. स्थानिकांच्या मते काही लोकांना तस्करीमध्ये मदत करण्यासाठी पैसे मिळतात, त्याचप्रमाणे काही स्थानिकांच्या मते आय. डी. कार्डची ही संकल्पना वेळ घालवणारी आहे. पण अधिकाऱ्यांच्या मते तस्करी रोखण्यासाठी या पेक्षा अधिक सुकर मार्ग कोणताही नाही.
दोन वर्षांसाठी वैध असलेल्या या ओळखपत्रावर जनावर आणि मालकाच्या फोटो बरोबरच रंग, उंची, लिंग, आकार, मालकाचा पत्ता आणि शिंगांची लांबी इत्यादी महत्वपूर्ण माहिती असते. त्याचबरोबर त्या जनावराची एखादी विशेषता उदाहरणार्थ, एक शिंग नसलेलं, अर्धी शेपूट नसलेलं इत्यादी माहितीही त्या ओळखपत्रात असते.
भारतीय सीमा सुरक्षा बलांनी चालवलेलं हे अभियान यशस्वितेला पोहोचल्याची चिन्ह दिसताहेत. या अभियानामुळे गायींच्या तस्करीमध्ये कमालीची घट झालेली दिसून येते.
या पूर्वीही बंगालच्या ‘पश्चिम बंगाल गो-संपाद बिकाश संस्था’ नावाच्या संस्थेद्वारे गायींना आधार कार्ड प्रमाणेच विशिष्ट ओळख प्रमाणपत्र द्यायला २०१४ साली सुरुवात झाली होती. या बरोबरच गायीची संख्या मोजण्याचा उपक्रमही कोलकात्यामध्ये या संस्थेने सुरु केला होता. विरोधाच्या प्रसंगातही संस्थेने आपले काम सुरु ठेवले आणि अभियानाची समाप्ती २०१४ सालीच झाली.
भारतातील गो-धन जपणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे. फक्त हिंदुद्वेषासाठी गायींचं महत्त्व नाकारणं म्हणजे चिंतामणी पायाखाली तुडवण्यासारखं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.