अशाप्रकारे रिसर्चच्या नावाखाली औषध कंपन्या फसवत आहेत

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


सध्या जगात सगळ्यात जास्त उत्सुकता असेल तर ती आहे कोरोना विषाणूच्या लसीची. चातकाने पावसाची वाट बघावी तशीच वाट सगळे जग आज कोरोनाच्या लसीची बघत आहे. परंतु आता लस बनवण्याचे काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये आपापसांत स्पर्धा बघायला मिळत आहे. लवकरात लवकर लस बनवुन पैसा कसा कमवता येईल याचा विचार करणाऱ्या काही संस्थासुद्धा आहेतच.

मानवतेच्या सेवेसाठी कार्य करणाऱ्या याच संस्थांच्या अंतर्गत कारभाराची माहिती आज आपण बघणार आहोत. एखाद्या मोठ्या आजाराची लस महागच असेल असा आपला अंदाज कसा चुकीचा असतो ? भिती निर्माण करून औषधांच्या किंमती कशा वाढवल्या जाऊ शकतात याबद्दल आज आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करुयात.

मध्यमवर्गीय व्यक्तीला एखाद्या खाजगी रुग्णालयात उपचार करणं म्हणजे खूप महागडी गोष्ट आहे. रुग्णालयाचे बिल तर आहेच परंतु त्यापेक्षाही जास्त खर्च असतो तो औषधं विकत घेण्याचा. कधीकधी अव्वाच्या सव्वा किंमतीत विकत घ्यावी लागणारी ही औषधं मध्यमवर्गीय कुटूंबाच्या खिशास भगदाड पाडण्यास पुरे असतात.

एवढ्या महाग असलेल्या या औषधांना बनवण्यासाठी खरंच एवढा खर्च येत असेल का ? काही तज्ञांच्या मते औषधे बनवताना येणारा खर्च कमी असुन त्या औषधांची जाहीरात करण्यासाठी आता जास्त खर्च केला जातो.

बऱ्याच औषधी कंपन्या संशोधनापेक्षाही जास्त खर्च आपल्या औषधाच्या बाजारीकरणावर करतात. त्या औषधीतुन शरीरावर होणारा वैद्यकीय उपचार कमी असला तरीही मार्केटिंगच्या मार्फत तो जास्त दाखवून ग्राहकांना फसवतात.

संशोधनावर होणारा खर्च म्हणजे तरी नेमकं काय..?

प्रत्येक वेळी कंपनीच्या नवीन औषधांच्या मागे फार संशोधन असेलच असे नाही. कधी कधी फक्त औषध बनवण्याचे सूत्र विकत घेतले जाते. यामागे कंपनीचे स्वत:चे काही संशोधन नसते. जुनीच औषधे नवीन नावाने विकली जातात. संशोधन आणि मार्केटिंग मधला फरक आता खुप धुसर होत चालला आहे.

संशोधनासाठी लागणाऱ्या पैशांचा वापर मार्केटिंगसाठी केला जातो हे अनेकदा उघडकीस आले आहे. 

औषधांच्या व्यवसायात सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे डॉक्टर. औषधे आणि रुग्णांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारे डॉक्टर जेवढ्या जास्त गोळ्या लिहुन देतील तेवढा होणारा फायदा जास्त. या फायद्यासाठीच कंपनींकडुन डॉक्टरांवर भरपुर खर्च केला जातो. औषधांची विक्री वाढावी म्हणून डॉक्टरांना प्रोत्साहीत करण्याचे कामही कंपन्या करतात.

मार्केटिंगचे हिशोब आता संशोधनाच्या नावाखाली दाखवले गेले तर एक प्रकारची चलाखी समजली जाते. औषधांचे मानांकन करणारया संस्थांपैकी एक असणारी एफडीए. अमेरिकेतील एफडीएच्या एकुण बजेटपैकी ६५% रक्कम ही औषधं कंपन्यांमार्फत येतात.

थोडक्यात काय तर औषधांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न न करता ती औषधे बाजारात चांगल्या पध्दतीने कशी दाखवता येतील यावर आज जास्त पैसे खर्च केले जात आहेत. ‘द ग्रेट अमेरीकन हेल्थकेअर स्कैम’ या पुस्तकात अमेरीकन डॉक्टर डेव्हिड बेल्क आणि पॉल बेल्क लिहितात,

“एकुण काय तर, खूप सारी मार्केटिंग, जास्ती नफा आणि थोडसं संशोधन. याच सूत्रावर आता औषधं निर्माण केल्या जातात. म्हणजेच जुन्याच औषधांमध्ये थोडासा बदल करून बाजारात आणतात. यात आश्चर्याची गोष्ट अशी की औषध तेच असलं तरी त्याची किंमत मात्र जास्त असते.”

औषधी उद्योगात होणारऱ्या काही फसवणूकीच्या बाबी खालीलप्रमाणे असू शकतात.

  1. डॉक्टरांना अतिरिक्त पैसे देऊन गरजेपेक्षा जास्त औषधे रुग्णांना घेण्यास सांगणे.
  2. वेगवेगळ्या चाचण्या घेतल्यानंतर मंजुरीसाठी एफडीएला चुकीची माहिती पुरवणे.
  3. एफडीएकडुन मंजुरी मिळालेली नसतानाही बाजारात औषधं विकण्यासाठी आणणे.
  4. सीजीएमपी (Current Good Manufacturing Practices) यांचे पालन न करता बनवली गेलेली औषधं बाजारात आणणे.
  5. एकापेक्षा जास्त औषधं एकत्र करून किंवा औषध देण्याची पध्दत बदलणे.
  6. डॉक्टरने सांगितलेल्या औषधांऐवजी दुसऱ्या कंपनीचं औषध अवैधरित्या रुग्णास देणे.
  7. सरकारी अनुदान असतानाही औषधांच्या किंमतीवर कसलीही सूट न देता ती औषधे विकणे.

या सगळ्या स्वार्थी पध्दतींमुळे अनेक लोकांचे बळी दरवर्षी जातात. २०१५मध्ये अमेरीकेत डॉक्टरांनी लिहुन दिलेल्या औषधांचा वापर करूनही २ लाख लोकांचे बळी गेले आहेत. यातील निम्म्या मृत्युंचे कारण तर औषधांमुळे होणारे साईड इफेक्ट होते. बाकीचे अर्धे बळी हे डॉक्टरांनी दिलेल्या चुकीचं औषधांमुळे झालेले आहेत.

अमेरिकन डॉक्टर पिटर गोएत्ज्शे यांच्या मते औषध उद्योग हा जगातील सर्वात जास्त मृत्यूस कारणीभुत असणाऱ्या उद्योगात तिसऱ्या क्रमांकावर येतो. हृदयविकार आणि कँसरसारख्या रोगात होणारे मृत्यू या औषध उद्योगाच्या चुकीच्या कार्यप्रणालीचाच परिणाम आहे असे ते म्हणतात. ‘डेडली मेडिसीन अँड ऑर्गनाईज्ड क्राइम’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी ३ मुद्दे मांडले आहेत.

  1. सध्या प्रचलित असलेल्या संशोधन पध्दती या औषध कंपन्यांनी ठरवलेल्या आहेत, त्यामध्ये प्रामाणिकता आणि दुरदर्शी विचारसरणीचा अभाव आहे.
  2. औषधे आणि लसी यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया कठोर नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे बरीच दुय्यम दर्जाची औषधं बाजारात येतायत.
  3. एका सक्षम आणि स्वतंत्र व्यवस्थेची स्थापना झाली नाही तर औषधांचा हा काळाबाजार असाच चालू राहील.

औषध उद्योगात फक्त खोटेपणा आणि फसवणुकच बघायला मिळतं असं नक्कीच नाही. काही वेळा अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त शोधही लागतात. परंतु त्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे.

आता कोरोनाच्या बाबतीत सगळ्या जगात एक ‘फार्मावॉर’ चालू आहे. लवकरात लवकर लस बाजारात कशी आणली जाईल यासाठी सगळ्यांची धडपड सुरु आहे. नेहमीप्रमाणे याबाबतीतही जर गुणवत्तेच्या बाबतीत कुचराई करण्यात आली तर त्याची खूप मोठी किंमत जगाला मोजावी लागेल एवढं मात्र नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!