आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
लडाख, शित वाळवंट, पण तरीही सजीव व पृथ्वीवरील स्वर्ग. लडाखची समुद्रसपाटीपासूनची उंची ३००० मीटर आहे. शिवाय -१७ (उणे १७) अंश सेल्सियस तापमान, गारठवणारी थंडी व १०० मिलिमीटर पाऊस असे नैसर्गिक वातारण लाभलेल्या लडाखमध्ये वर्षभर शेती करणे आव्हानातमक होते, पण भारताच्या वैज्ञानिकांनी यावर देखील उपाय शोधून काढला.
लडाखमध्ये वर्षातून चार महिनेच शेतीसाठी अनुकूल आहेत, इतर ऋतुंमध्ये बर्फामुळे शेती करणे अशक्य आहे.
भाज्या, फळे फक्त उन्हाळ्यातच उपलब्ध असतात. त्यामुळे इतर महिन्यांत मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. श्रीनगर ते लडाख हे अंतर ४८० किमी आहे, तर मनाली वरून ५२० किलोमीटर. त्यामुळे आयातीसाठी मोठी रक्कम द्यावी लागते, शिवाय वायू प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे यावर उपाय शोधणे आवश्यक होते.
हे आव्हानात्मक कार्य ‘डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ म्हणजेच डी. आर. डी. ओ.च्या वैज्ञानिकांनी स्वीकारलं. डॉ. सेरिंग स्टोबदन यांनी या प्रकल्पाच नेतृत्व केलं.
कुठल्याही रसायनाचा उपयोग न करता शेती उत्पादन वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट त्यांच्यासमोर होते. यासाठी त्यांनी शेतीसाठी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढले. यात काळया प्लॅस्टिकचा उपयोग करतात. जमिनीवर काळी प्लॅस्टिक अंथरून त्यात ५ सेंटिमीटरचे गोल छिद्र करून झाडे लावली जातात. काळे प्लॅस्टिक उष्णता आकर्षित करते. त्यामुळे जनिमीचे तापमान ५ ते ६ अंशाने कमी होते. या तंत्रामुळे झाडे अधिक वेगाने वाढतात.
शिवाय काळ्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे मातीतल्या पाण्याचं वाफेत रुपांतर होत नाही. यामुळे पाण्याचा वापर ६० टक्क्यांनी कमी झाला व कमी पाण्यात शेती करणे शक्य झाले.
या तंत्रज्ञानामुळे लडाखच्या शेतकऱ्यांना अनेक फायदे झाले. आधी दर आठवड्यात त्यांना सिंचनातून पाणी पुरवठा करणे आवश्यक होते. पण या नवीन तंत्राने शेती केल्यास त्यांना १०-१२ दिवसातून एकदाच सिंचनातून पाणी पुरवठा करावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांचा बराच वेळ वाचतो व ते इतर व्यापाराकडे आणि शेतीतील इतर गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ शकतात. आणखी एक फायदा म्हणजे, काळं प्लॅस्टिक जमिनीवर अंथरल्यामुळे सूर्यकिरण जमिनीवर पडत नाहीत व अनावश्यक गवत वाढत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे गवत कापण्याचे अधिकचे कष्ट वाचतात. हे तंत्र थंड वातारणात वाढणाऱ्या भाज्या जसे सिमलामिर्ची, टोमॅटो पिकवण्यासाठी वापरण्यात आले.
शिवाय उष्ण वातावरणात वाढणाऱ्या भाज्या जसे वांगी, भोपळा, काकडी, मिर्ची पिकवण्यासाठीसुद्धा वापरण्यात आले. शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे टोमॅटोचे उत्पादन दुपटीने वाढले तर सिमलामिर्चीचे तिपटीने !!
पण या तंत्रज्ञानात एक त्रुटी आहे. जास्त प्रमाणात प्लॅस्टिक शीटचा वापर झाला तर हिमालयात प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. माती प्रदूषित होऊ शकते. हा महत्त्वाचा प्रश्न वैज्ञानिकांसमोर आहे, पण तरीही या आव्हानाला स्वीकारत प्लॅस्टिक शीटला पर्याय शोधणे सुरु आहे. अर्थात आयातीमुळे होणारं प्रदूषण यामुळे नक्कीच कमी झालं आहे…!
याव्यतरिक्त पॅसिव ग्रीनहाऊसमध्ये योग्य ते बदल सुचवून लडाखच्या शेतकऱ्यांना मदत केली.
पॅसिव ग्रीनहाऊस १९६४ साली खास थंड वातावरणात शेती करण्यासाठी आणले होते. तापमान जेव्हा -२० अंश सेल्सियस असते तेव्हा या पॅसिव ग्रीनहाऊसमध्ये शेती करता येते. या पॅसिव ग्रीनहाऊसच्या तीन भिंती माती आणि विटांनी बनवल्या जात असत तर चौथ्या भिंतीला प्लॅस्टिकने झाकले जायचे. तापमान जेव्हा -७ अंश सेल्सियसपर्यंत जायचं तेव्हा पालेभाज्यांची वाढ होत नसे. त्यामुळे यावर पर्याय किंवा यात बदल करणे आवश्यक होते.
डी. आर. डी. ओ.ची लेह मधील शाखा अर्थात The Defence Institute of High Altitude Research (DIHAR ) यांनी हे बदल करून पॅसिव ग्रीनहाऊसला नवीन रूप दिलं.
पॅसिव ग्रीन हाउसच्या भिंती माती आणि विटांच्या ऐवजी दगड आणि सिमेंटने बनवल्या, व चौथी भिंती पॉली कार्बोनेट शीटने बनवली. तसेच हाऊसचा आकारसुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आकार योग्य त्या मापदंडात नसल्यास उपयोग नाही. त्यामुळे हाऊसचा आकार निर्धारित केला आहे. ग्रीन हाऊस 60×27 फुट व उंचीला 9 फुट असायला हवं. यामुळे पॅसिव ग्रीनहाऊसमध्ये उष्णता टिकून राहते व भाज्यांची शेती करता येते. लद्दाखमध्ये हे एकमेव पॅसिव ग्रीन हाऊस आहे, जिथे कुठल्याही अतिरिक्त उष्णतेशिवाय शेती केली आहे.
इथे मुख्यतः पालेभाज्या पिकवल्या जातात. शेतकऱ्यांना वापरण्यास सोयीचं जावं या दृष्टीने ग्रीन हाऊस तयार केले आहेत. त्यामुळे कमीत कमी कष्टात शेतकरी हे दोन्ही तंत्रज्ञान वापरू शकतात.
अटल टिंकरिंग लॅब, अर्थात विज्ञान क्षेत्रात आवड असणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येणारा एक अभिनव उपक्रम. या उपक्रमाव्दारे अनेक नव नवीन कल्पना पुढे येत आहेत व डी. आर. डी. ओ. त्यांचं स्वागत करत आहे. कचरा व्यवस्थापन ते शेती, पर्यावरण, कारखाने अशा अनेक क्षेत्रांसंबंधी शोधासाठी एक व्यासपीठ आहे….!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.