पारलेने देशाला फक्त स्वदेशी कोलाच नाही दिला तर ‘रेखा’सारखी सदाबहार अभिनेत्रीही दिली

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


पारले हे नाव ऐकलं की, आपल्याला आठवतं ग्लुकोज असलेलं बिस्कीट “पारले-जी”. भारतीय लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या पारले कंपनीनं आपलं एक शीतपेय बाजारात आणलं होतं असं आजच्या तरुण मुलांना विचारलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४९मध्ये पारले कंपनीनं आपलं शीतपेय भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलं होतं.

आधीच बिस्कीट क्षेत्रात आपलं वर्चस्व निर्माण केल्यानंतर १९४९ मध्ये पारले कंपनीनं याचाच फायदा घेऊन आपलं शीतपेय बाजारात आणलं. संत्र्याच्या चवीचं हे पेय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छापील जाहिरातीचा आधार घेण्यात आला.

ही जाहीरात छापण्यासाठी प्रसिध्द व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची मदत घेण्यात आली.

शीतपेय बाजारात येण्याची तयारी पुर्ण झालेली असतानाच अमेरिकन कंपनी, कोका कोलानं मधेच विघ्न आणलं.

पारलेनं आपल्या शीतपेयाचं नाव ठेवलं होतं-ग्लुको कोला.

कोका कोलानं अजून आपलं शीतपेय अजून बाजारात आणलं नसलं तरी त्यासाठी रजिस्टर केलं होतं. यामुळे पारलेला आपल्या शीतपेयाचं नाव बदलण्यास सांगण्यात आलं. पारलेनी ग्लुको कोला बदलून पारले कोला असं केलं. तरीही कोका कोलाने ही गोष्ट मान्य केली नाही. न्यायालयीन खटल्यात पैसे आणि वेळ दोन्ही खर्च या कारणानी पारलेनं आपलं शीतपेय १९५१मध्ये बंद केले.

पण इतक्यात हार मानेल ती पारले कसली. पारलेने १९५२मध्ये संत्र्याच्या चवीचं नवीन शीतपेय ‘गोल्ड स्पॉट’ नावानं बाजारात आणलं. पारलेच्या प्रसिध्द पेपरमिंटचा प्रकार असलेल्या पारले गोल्ड स्टार यावरुन हे नाव ठेवण्यात आलं होतं.

गोल्ड स्पॉट लगेच लोकांच्या पसंतीस उतरलं. मुख्यतः लहान मुलांच्या. संत्र्याची चव असल्याने हे पेय लहान मुलांना जास्त आवडायला लागलं. पुढे याची प्रसिध्दी वाढतच गेली.

पुढच्या काही वर्षात शीतपेय व्यवसायात पारलेनं खुप लक्ष दिलं. संपूर्ण भारतात बाटल्या निर्मितीचे कारखाने आणि छोट्या छोट्या खेड्यात माल पोहचवण्यासाठी तयार केलेलं व्यवसायिकांचं जाळं यामुळे पारलेचा व्यवसाय भरभराटीस आला. १९७०च्या दरम्यान पारलेने आपलं दुसरं शीतपेय बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. लिंबाच्या चवीच्या या शीतपेयास त्यांनी ‘लिमका’ असं नाव दिलं.

सुरुवातीला साबणाच्या पाण्यासारखं दिसतं म्हणुन लोकांनी लिमकाची टीका केली. नंतर मात्र याच लिमकानं धुमाकुळ घातला. विशेषत: स्त्रियांना मध्यस्थानी ठेवून लिमकाची जाहिरात करण्यात आली होती.

७०च्या दशकाच्या मध्यात गोल्ड स्पॉट आणि लिमकाने भारतीय बाजारात आपला जम बसवला होता. त्याच बरोबर कोका कोलासुध्दा भारतात आपला पाय रोवण्यात यशस्वी झाली होती.

कोका कोला आणि पारलेमधील हे युध्द तीव्र होत चाललं होतं. दोन्ही कंपन्या जाहीरातींवर अमाप पैसा खर्च करत होत्या. त्यावेळच्या तरुण वर्गावर विदेशी वस्तूंचा असलेला प्रभाव यामुळे कोका कोला या शर्यतीत नक्की पुढे होती. पारलेसुध्दा आपल्या जाहीरातीत विविध बदल करून या शर्यतीत पुढे राहण्याचा प्रयत्न करत होती.

जम बसला असला तरी पारलेने हे यश आपल्या डोक्यात जाऊ न देता जाहीरात विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. अजुन नवीन शीतपेय घेऊन आलो तर कोका कोलाशी स्पर्धा करणं अवघड जाईल हे पारलेला कळालं. त्यामुळे त्यांनी पुन्हा कोणतही नविन शीतपेय बाजारात न आणण्याचा निर्णय घेतला.

आधीच असलेल्या गोल्ड स्पॉट आणि लिमका या दोन पेयांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं काम पारलेनं मनावर घेतलं. फक्त लहान मुलं आणि स्त्रियांसाठी मर्यादित न राहता प्रत्येक वर्गातील लोकांसाठी जाहिरात बनवण्यात आली.

जाहीरातीत मसालेदारपणा आणण्यासाठी त्यावेळी पारलेनं एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला आपल्या जाहीरातीत दाखवलं. भारतात पहिल्या वेळेस अशा प्रकारची जाहीरात प्रसिध्द केली गेली होती. पुढे या जाहिरातीत असलेल्या अभिनेत्रीची चर्चा सर्वत्र सुरु झाली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसुन आज बॉलीवुड मधील एक दिग्गज अभिनेत्री असलेली रेखा होती. या जाहीरातीतुनच त्यांनी बॉलीवुड क्षेत्रात आपले पदार्पण केले.

“लिव लिटल हॉट, सिप गोल्ड स्पॉट” या वाक्याबरोबर असलेला रेखाचा शीतपेय पितानाचा फोटो अशी ती छापील जाहिरात होती.

अजुन पुढे जात पारलेनं रस्त्यावर विविध महत्त्वाच्या ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पाट्या लावल्या. पाट्यांवर लिहिलेल्या वाक्यांमधून लोकांना गोल्ड स्पॉट पिण्यासाठी उत्तेजित करण्यात येत असे.

१९७५ची आणीबाणी लागू करण्यात आली. आणीबाणीमुळे लोकांच्या उत्पन्नात विलक्षण घट झाली साहजिकच लोकांचा खर्च कमी झाला. परिणामी शीतपेय व्यवसायात मंदी आली. यात कोका कोलासारखी मोठी विदेशी कंपनी तग धरु शकली. पण पारले मात्र या मंदीच्या काळात तग धरण्यात अयशस्वी ठरली.

आणीबाणी उठल्यानंतर कोका कोला पुन्हा भारतात परत आली. त्यावेळी पेप्सीने सुद्धा भारतात प्रवेश केला. वाढत चाललेल्या या शर्यतीत आपला निभाव लागणार नाही हे लक्षात आल्यावर पारलेनं कोकबरोबर ४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा करार केला आणि शीतपेयांचं उत्पादन थांबवलं.

कोका कोलाने गोल्ड स्पॉट बंद करून आपलं स्प्राइट आणि फंटा हे नविन शीतपेय बाजारात आणलं. शेवटी टक्कर देण्यात यशस्वी न ठरताही कोका कोलासारख्या मोठ्या कंपनीला एवढे वर्ष धारेवर धरण्यासाठी मात्र पारलेच्या गोल्ड स्पॉटची वाहवा करावीच लागेल एवढं नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!