माणूस हैदराबादला गेल्यावर चारमिनार पाहणार नाही, पण पॅराडाईजची बिर्याणी न खाता परत येणं अशक्यच!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


हिंदीत अशी म्हण आहे की “दिल का रास्ता पेट से होकर जाता है|” थोडक्यात काय तर तुम्हाला एखाद्याचं मन जिंकायचं असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या आवडीचा खाद्यपदार्थ खाऊ घाला! तो तुमच्यावर खुश होऊन जाईल. आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी असे अनेक पदार्थ आहेत जे आपल्या लोकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवत आहेत, मग त्यात मिठाई असेल, मांसाहारी जेवण असेल किंवा अजून काही असेल.

पण या सगळ्या पदार्थांना हैदराबादमध्ये काहीच महत्व नाहीये हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. हो, हैदराबादमध्ये जर तुम्हाला एखाद्याला खाद्यपदार्थ देऊन आपलसं करायचं असेल तर तिथे फक्त एक पदार्थ आहे आणि तो पदार्थ म्हणजे बिर्याणी. हैदराबाद म्हटलं की खवय्यांच्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट येते ती म्हणजे हैदराबादमधली स्पेशल दम बिर्याणी.

आज जगभरात पसरलेलं हे बिर्याणीपुराण हैद्राबादमधल्या पॅराडाईज बिर्याणीशिवाय अपूर्ण आहे.

जसं हैद्राबादला बिर्याणीची राजधानी असणारं शहर म्हणून ओळखलं जातं तसंच पॅराडाईज बिर्याणीला या बिर्याणीच्या राजधानीचा आत्मा म्हणून ओळखतात. संपूर्ण हैद्राबाद बिर्याणीसाठी प्रसिद्ध असताना लोक पॅराडाईज बिर्याणीलाच का पसंती देतात तर त्यामागे असणारे कारण आहे वर्षानुवर्षे टिकून असलेला विश्वास, आणि गुणवत्ता.

चला तर मग, आपल्या चवीने खाद्यसेवेत यशशिखरे गाठलेल्या पॅराडाईज बिर्याणीच्या आजपर्यंतच्या लज्जतदार प्रवासावर नजर टाकूयात.

हुसैन हेमाती आणि गुलाम हुसैन यांनी हे पॅराडाईज १ सप्टेंबर १९५३ साली हैद्राबाद येथील सिकंदराबादमध्ये पॅराडाईज थिएटरजवळ सुरू केलं. याच दिवशी योगायोगानं हुसैन हेमाती यांच्या मुलाचा अली हेमातीचा जन्म झाला. जसं जसं अली मोठे होत गेले तसं तसं हुसैन आपल्या या पॅराडाईजची जबाबदारी अलींवर सोपवत गेले. बालपणी पायलट बनण्याची इच्छा होती, पण आईवडिलांच्या नकारामुळे त्यांनी तो विचार सोडला. पुढे थोडं मोठं झाल्यावर आपण अमेरिकेला जाऊन तिथं नवीन जीवन सुरू करावं असं त्यांना वाटलं पण इथे देखील त्यांच्या आईने त्यांना जाण्यास नकार दर्शवला.

एक वेळ अशी आली जेव्हा वडिलांच्या तब्येतीमुळं अलींना पूर्णपणे या वडिलोपार्जित व्यवसायात उतरावं लागलं. फेब्रुवारी १९७८ च्या आसपास पूर्ण व्यवसाय ते स्वतः पाहू लागले.

सुरवातीच्या काळात ४० ते ५० माणसं हाताखाली ठेऊन शंभर-एक गिऱ्हाईक बसतील अशा जागेत त्यांचा व्यवसाय सुरू होता आणि दिवसाचे जवळपास २००० रुपये त्या वेळी रोज मिळत होते. १९६० च्या आसपास दुकानाचे रूपांतर एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये झाले होते. व्यवसायाची फारशी सवयही नाही आणि नवीनच व्यवसायात उतरल्याने त्यांनी त्यांचे काका गुलाम हुसैन यांच्या सल्ल्याखाली आपला व्यवसाय सांभाळला. त्यांनी आपल्या या पॅराडाईजमध्ये वेगवेगळे बदल करून एक वैशिष्ट्यपूर्ण वाटेल असं पॅराडाईज तयार केलं.

सुरुवातीच्या काळात त्यांनी त्यांच्याच क्षेत्रातील वेगवेगळी दुकानं पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं की बिर्याणीच्या दुकानात जास्त करून कुटुंब परिवार एकत्र येत नाही याचं कारण म्हणजे त्या दुकानांमध्ये बिर्याणीबरोबरच मद्यपानही असायचं.

अली हुसैन यांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यांनी आपलं स्वतःचं फॅमिली रेस्टॉरंट बनवायचं ठरवलं. आज दरवर्षी फक्त देशातूनच नाही तर वेगवेगळ्या देशांतून लोकं इथे बिर्याणी खायला येतात. जो माणूस हैद्राबादला येतो तो पॅराडाईजला भेट देऊनच जातो. कित्येक मोठमोठी आणि प्रसिद्ध माणसं या पॅराडाईजमध्ये येऊन गेली. स्वतः दिग्गज अभिनेता आमिर खान यांनीही इथे येऊन इथल्या स्वादिष्ट बिर्याणीचा आस्वाद घेतला. शाकाहारापासून मांसाहारापर्यंतच्या सगळ्या प्रकारच्या चविष्ट बिर्याणी इथे मिळतात.

व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, कबाब या डिशेसना तर रोज मोठ्या प्रमाणात मागणी येते. हैद्राबादी दम बिर्याणी ही इथली खूप प्रसिद्ध बिर्याणी आहे.

पॅराडाईजची मुख्य शाखा सिकंदराबादला आहे. एवढंच नाही तर मागल्या वर्षीच्या पाहणी नुसार संपूर्ण देशभरात पॅराडाईजच्या ३६ वेगवेगळ्या शाखा आहेत ज्या आपल्या ग्राहकांना त्यांची स्वादिष्ट बिर्याणी खाऊ घालण्यास सज्ज असतात. आज याच पॅराडाईजमुळे जवळ जवळ ३५०० लोकांना रोजगार मिळतो. त्यांचा हा व्यवसाय इतका अफाट पसरला आहे की वर्षाला कित्येक कोट्यवधी रुपयांची उलाढाल या व्यवसायाद्वारे होते.

काय ती गरमागरम बिर्याणी.. त्यातल्या मिश्रित तिखट आणि चटाकेदार मसाल्यांचा वास.. आणि त्याबरोबर बिर्याणीवर टाकायचा पातळ रस्सा.. अहाहा..!! अगदी हे ऐकल्याबरोबरच तोंडाला पाणी सुटतं!

फक्त रेस्टॉरंट पुरतेच नाही तर पॅराडाईज आपल्या ग्राहकांसाठी अगदी घरपोच सेवा देखील पुरावतं. फारच कुठे कामात असाल किंवा थकला असाल तर घरबसल्या देखील तुम्ही पॅराडाईजच्या बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता! आज कुठल्याही बाबतीत पॅराडाईज मागे नाही. सगळ्या ऑनलाइन सेवाही पॅराडाईज आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देतं. रेस्टॉरंटमध्येही अतिशय उत्कृष्ट सेवा तिथल्या वेटर्स कडून ग्राहकांना दिली जाते. आणि रोज इतकी गर्दी पॅराडाईजच्या सर्व रेस्टॉरंटना असते की लोकांना शेवटी आपल्या स्वादिष्ट बिर्याणीचा आस्वाद घ्यायला बऱ्याचदा ताटकळत उभं राहावं लागतं.

अली हेमाती यांच्या अपार कष्टामुळे आणि त्यांच्या जिद्द-चिकटीमुळे आज “पॅराडाईज” हे एक जगविख्यात ब्रँड बनले आहे.

या ब्रॅंडला देशभरातल्या बऱ्याच पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडिया, burrp अशा बऱ्याच बऱ्याच पब्लिकशन्स कडूनही पॅराडाईजला सन्मानित करण्यात आलं. एवढं नावाजलेलं ब्रँड ऐकल्यावर तर बिर्याणी खायची इच्छा आणखी वाढते.

अशी ही पॅराडाईझ बिर्याणी त्यांच्याकडे जाणाऱ्याला नक्कीच भुरळ घालते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!