काय आहे तामिळनाडूमधील मंदिरावर कोरलेल्या सायकलस्वाराच्या व्हायरल फोटोमागचं सत्य?

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


जिओनी इंटरनेट स्वस्त केल्यापासून आणि स्मार्टफोनच्या किमती कमी झाल्यापासून जवळपास प्रत्येकाच्या खिशात स्मार्टफोन सापडतो. दारावर येणाऱ्या भाजीवाल्यापासून ते एखाद्या मोठ्या कंपनीच्या मालकापर्यंत सगळेच आज सोशल मीडियावर “ऍक्टिव्ह” असतात. एखाद्या ग्रंथालयापेक्षा जास्ती “ज्ञानाचा साठा” आज सोशल मीडियावर सापडतो.

दिसला फोटो टाक फेसबुकवर. कोणीतरी काहीतरी मेसेज केला त्याची शहानिशा न करता दे पुढे पाठवून. सुरुवातीला हा मेसेज 10 लोकांना पाठवा नाही तर तुमच्यासोबत चांगलं काही घडणार नाही असे अध्यात्मिक मेसेज यायचे, मग अचानक सगळे “सुविचार” बनले आणि इनबॉक्स सुविचारांनी भरून वाहू लागला.

गेल्या काही काळापासून सगळे तज्ज्ञ झालेत. सगळ्याच बाबतीत. मग आरोग्य असूदेत किंवा राजकारण असूदेत नाहीतर मग अजून काही. व्हाट्सएपचा इनबॉक्स असाच तुम्हाला ‘हे माहिती आहे का’ वाल्या ज्ञानात भर पडणाऱ्या मेसेजेस नी भरलेला दिसतो. यातले अर्ध्याहून अधिक मेसेज अर्थातच फेक असतात. कोणीतरी अर्धवट माहितीतून काहीतरी खरडतो आणि ते पुढे सरकत राहतं. या फेक मेसेजेसच्या बातम्या बनणे हे आजकाल नेहमीचं झालंय.

असाच एक मेसेज गेल्या काही दिवसांपासून फिरतो आहे. फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील “हिंदुत्व से बढकर कोई धर्म नही, गौ गीता और गायत्री” या पेजवर एक पोस्ट पडली होती. त्यात एका माणसाचं शिलाचित्र होतं. हा माणूस सायकलवर बसून कुठेतरी जातो आहे अशाप्रकारचं ते चित्र होतं. त्याबरोबर एक मेसेज लिहिला होता. तो असा-

“तामिळनाडूमध्ये पंचवर्णस्वामी मंदिर आहे. त्याच मंदिरातील ही दोन हजार वर्षांपूर्वीची मूर्ती आहे असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. असे असूनही सायकलचा शोध लावल्याचा मान मात्र दुसऱ्याच कोणाला तरी दिला जातो.
भारताच्या या सोनेरी इतिहासाला विसरून केवळ भिकारी आणि मांत्रिकांचा देश असे चित्र उभे करण्याचे पाप कोणी केले???”

या फोटोमध्ये एक माणूस सायकलवर बसला आहे त्याच्या आजूबाजूला फुलं आहेत, डोक्यावर टोपी आणि कानाच्या मागे फुल असं भिंतीवर कोरलेलं आढळून येतं. यानंतर ही पोस्ट अनेक ठिकाणी शेअर झाली. कित्येक लोकांनी याचं समर्थन केलं आणि आपली संस्कृती मोठीच होती अशा आशयाचे बोलणे सुरू झाले. पण यातल्या एकानेही ही माहिती कितपत खरी आहे याची खात्री करून घेतली नाही.

याची पडताळणी केली इंडिया टुडे या वृत्तसंस्थेच्या अँटी फेक न्युज वॉर रूम (AFWA) या विभागाने. ही पोस्ट जेव्हा व्हायरल होऊ लागली तेव्हा त्यांनी याची सत्यता तपासली. त्यात त्यांना आढळून आलं की हा फोटो तामिळनाडूचा नाही. खरंतर हा फोटो भारतातील नाहीच. इंडोनेशियामधील एका मंदिरातील हा फोटो आहे.

आणि राहिला मुद्दा सायकलचा तर सायकलचा शोध जर्मनीमध्ये 1817 लागल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.

या AFWA ने जेव्हा याचा शोध घेतला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे कोरीवकाम बाली, इंडोनेशिया येथील Pura Meduwe Korang या मंदिरातील आहे. हा फोटो तुम्हाला tripsavy आणि bali local guide या वेबसाईटवर देखील सापडेल.

Lonely planet च्या म्हणण्यानुसार हे शिलाचित्र 1904 साली काढलेलं असून एका डच माणसाचं आहे जो बालीला सायकलवरून भटकंती करत होता. 

या पोस्टमध्ये उल्लेख केलेलं पंचवर्णस्वामी हे शिवमंदिर तामिळनाडू मधील तिरुचिरापल्ली येथील आहे. शोध घेत असताना the hindu या वृत्तपत्राच्या एका लेखात या मंदिरात असलेल्या सायकलवरील माणसाच्या शिलालेखाचा उल्लेख आढळतो. पण त्यातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे शिलाचित्र साधारण 1920च्या दरम्यान मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या वेळी कोरण्यात आलेले आहे.

आता राहिला प्रश्न सायकलचा शोध कोणी लावला याचा तर हा शोध Barl Karl von Drais यांनी 1817मध्ये जर्मनी येथे लावला. आणि याला पुष्टी देणारे पुरावे देखील उपलब्ध आहेत.

तात्पर्य हे शिलाचित्र भारतातील मंदिरातील नाही आणि सायकलचा शोधही जर्मनमध्ये लागला आहे.

इंटरनेटने जग जवळ आणलं, आपल्यासाठी ज्ञानाचं भांडार खुलं केलं हे जरी खरं असलं तरी पण त्याचा योग्य वापर करून खरी माहिती लोकांपर्यंत पोहचवणे मात्र आपल्याच हातात आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!