शब्बीर सय्यद : ५५ वर्षांपासून अव्याहतपणे १२५ गायींचा सांभाळ करणारा अवलिया

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


बीडपासून पाथर्डी मार्गे अहमदनगरला जाणार्‍या रस्त्यावर अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर शिरूर कासार हे तालुक्याचे गाव असून येथून ५०० मीटर दूर असलेल्या दहिवंडी गावातील जवळपास शे-सव्वाशे गायींना सांभाळणार्‍या सय्यद शब्बीर सय्यद बुढ्ढन उर्फ छबू मामू यांना भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ मिळाला.

खरंतर बीड जिल्ह्यातील दोन विभूतींना पद्मश्री पुरस्कार प्रथमच मिळत असल्याने जिल्हावासियांना या गोष्टीचा विशेष आनंद झाला.

दरडवाडी, ता. धारूर येथील नाट्यकर्मी वामन केंद्रे आणि दहिवंडी, ता. शिरुर कासार येथील शब्बीरभाई सय्यद यांना हा सन्मान मिळाल्याने सर्वच बाबतीत पिछाडीवर समजल्या जाणार्‍या बीड जिल्ह्याची मान निश्चितच अभिमानाने उंचावली आहे यात तिळमात्र शंका नाही.

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षांपासून शब्बीर सय्यद यांनी गोपालनाचे हे व्रत मनोभावे स्वीकारलंय.

 

shabbir sayyad the postman

 

खरंतर त्यांना हा वारसा त्यांचे वडील बुढ्ढन सय्यद यांच्याकडून मिळाला आहे. बुढ्ढन सय्यद यांनीही आयुष्यभर गोपालनाचेच काम केले परंतु त्यावेळी त्यांच्याकडील गायींची संख्या ही बोटावर मोजण्याएवढी होती.

वडिलांच्या पश्‍चात त्यांच्या या निस्वार्थ सेवेचा वसा घेऊन शब्बीर मामूंनी खर्‍या अर्थानं गोपालनाचं हे पवित्र कार्य नेटानं पुढे चालवलं.

वयाच्या ६५ व्या वर्षी शासनाला जाग आली. त्यामुळे ‘देर आये, दुरूस्त आये’ असंच काहीसं मामूंना पुरस्कार जाहीर केल्यावर शासनाच्या बाबतीत वाटतं.

शब्बीर सय्यद यांच्या या नेक कामात त्यांची धर्मपत्नी अशरफबी यांनी मोलाची साथ दिली.

आपला होणारा नवरा काही कामधंदा न करता फक्त गाई-गुरे सांभाळतो हे माहीत असूनही अशरफबींनी कसलेही आढेवेढे न घेता मोठ्या आनंदाने छबूमामूंशी निकाह केला आणि सासरी आल्यानंतर पतीच्या या कामात उत्साहाने स्वत:ला झोकूनही दिले.

कोणत्याही पुरुषाच्या यशात त्याच्या आयुष्यातील स्त्रीचा मोठा वाटा असतो हे तत्त्वज्ञान अशरफबींनी अक्षरशः सिद्ध केलं असंच म्हणावं लागेल.

या कुटुंबाची माळरानावर २-३ एकर कोरडवाहू जमीन आहे परंतु गोपालनाच्या छंदापायी त्यांनी ती जमीन कसण्याचाही नाद केला नाही.

एवढंच नाही तर छबूमामूंना असणार्‍या दोन्ही मुलांतील थोरला रमजान हा या गाई-गुरांच्या छंदापायी कधीच शाळेत जाऊ शकला नाही तर धाकट्या युसूफला आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

स्वत:च्या कुटुंबाची पूर्ण वाताहत झाली तरीही हा अवलिया गोपालनाच्या व्रतापासून तसूभरही ढळला नाही हे आश्‍चर्यच होय.

७२ चा दुष्काळ असो की त्यानंतर मराठवाड्यावर साधारण दर ८-१० वर्षांनी पडणारे भीषण दुष्काळ असो! तशा कठीण परिस्थितीतही या कुटुंबाने गोपालन हेच आद्य कर्तव्य मानून अगदी निष्ठेने आपलं काम चालूच ठेवलं.

वेळप्रसंगी या गाईंच्या चार्‍यासाठी त्यांनी लोकांसमोर हात पसरले, भीक मागितली पण स्वत:च्या पदरी असलेल्या एकाही गाईला कधी बाजार दाखवला नाही. केवढी ही जिद्द, केवढी ही चिकाटी! त्यांच्या या धीरोदात्तपणाला सलाम!!

या परिवाराकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. घरात कोणी नोकरीला नाही. कोणीही व्यवसाय किंवा शेती करत नाही. दारात शंभरावर गाई असूनही त्यांचे दूध काढून कधी विकलं नाही.

 

sayyed the postman

 

मनात आणलं असतं तर एकावेळी मामू ४००-५०० लीटर दूध काढून ते बाजारात विकू शकले असते आणि त्यातून पैसा कमावून श्रीमंतही झाले असते परंतु असं करणं हे त्यांच्यातील व्रतस्थ सेवाभाव जपणार्‍या फकीराला ते कदापिही मान्य नव्हतं.

‘‘तुम्ही दुधाचा व्यवसाय का केला नाही?’’ यावर त्यांनी अगदी साध्या सोप्या भाषेत सांगितले की,

‘‘गाय के छोटे छोटे बच्चों का पेट भरने के वास्ते मैंने उनका दुध निकालकर नहीं बेचा. बच्चों को भुखा रखके दूध बेचना पाप है! मेरे भाईबंद और बाकी के बहुत लोगोंने मुझे नाम रखा, भला-बुरा कहा लेकीन जन्नत में दुवां मिलेगी ये ध्यान में रखकर मैंने अपना काम नहीं छोडा!’’

या गाईंना होणार्‍या कालवडी शब्बीर मामू कधीच विकत नाहीत आणि गोर्‍हे मोठे झाल्यानंतर शेती करणार्‍या शेतकर्‍यांनाच ते देतात आणि त्याबदल्यात जो काही थोडाफार चारा मिळेल तो घेतात पण मामूंनी या मुक्या प्राण्यांची कधी पैशात किंमत केली नाही.

पत्र्याच्या सर्वसाधारण घरात राहणार्‍या छबूमामूंच्या कुटुंबियांना कित्येकदा एक वेळच्या जेवणाची भ्रांत पडते परंतु त्यांनी दारातल्या शे-सव्वाशे गायींना कधीच उपाशीपोटी ठेवले नाही.

अगदी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन त्यांनी गोपालनाचे हे कार्य आजतागायत अविरतपणे सुरू ठेवले आहे.

शब्बीर सय्यद यांचे हे काम पाहून परिसरातील काही दानशूर व्यक्ती त्यांना अधूनमधून चारापाण्याची मदत करत असतात पण ही मदत बेभरवशाची असते. एवढ्या सगळ्या गाई घेऊन मामू दररोज किमान 4-5 किलोमीटरची पायपीट करत त्यांना डोंगर शिवारात चरण्यासाठी घेऊन जातात.

ऊन, वारा, पाऊस, गारा याची कसलीही तमा न बाळगता रोजच्या रोज पायाला भिंगरी लावून शंभर-सव्वाशे गायींबरोबर रानोमाळ पायी भटकंती करणं हे काम वाटतं तेवढं नक्कीच सोपं नाही.

‘‘भारत सरकारकडून तुम्हाला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे?’’ या प्रश्‍नावर ते निर्विकारपणे म्हणतात, ‘‘पुरस्कार क्या होता है मुझे मालूम नहीं!’’ आणि त्यांच्या मुलाला याविषयी विचारले असता त्यांनीही पुरस्कार म्हणजे पेपरमध्ये फोटो छापून येणे यापलीकडे काही माहिती नाही असे उत्तर दिले.

स्वत:चं अख्खं आयुष्य खर्ची घालून कधीही कसली अपेक्षा न करता मुक्या जनावरांची सेवा करत सुखी, समाधानी आयुष्य फक्त एखादा साधूच जगू शकतो आणि त्या अनुषंगाने विचार केला तर छबूमामू हे हयातभर फकिराप्रमाणेच जगले.

कसलाही पैसा, मान-सन्मान, पुरस्कार, मोठेपणा यांचा गंधही नसलेला हा शब्बीर सय्यद मामू आज ‘पद्मश्री’ झाला याचा समस्त जिल्हावासियांना मनस्वी आनंद आहे.

अल्लाताला त्यांना जन्नत में दुवा कुबूल करेल की नाही हे माहिती नाही पण आजतरी त्यांना या मुक्या प्राण्यांची दुवा नक्कीच मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही.

आणि दुर्बल, उपेक्षित, वंचित घटकातील अत्यंत विनम्र अशा सेवाव्रती व्यक्तीस हा पुरस्कार देण्याचे दिल्याबद्दल भारत सरकारचेही मनापासून हार्दिक आभार!


लेखक – अनंत कराड
(साहित्य चपराक दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित)


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!