आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
सध्या कोरोनामुळे सगळी सार्वजनिक ठिकाणं बंद आहेत. एकूणच सगळ्या व्यवसायांवर आणि साहजिकच अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा वाईट परिणाम झालेला दिसून येतोय. टीव्हीवरील मालिकांचेही चित्रीकरण थांबवण्यात आले होते. चित्रपटगृहदेखील बंद असल्याने बरेच दिवस नवीन चित्रपट प्रदर्शित झाला नाही. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा कल ऑनलाइनच चित्रपट आणि मालिका बघण्याकडे झुकला.
नेटफ्लिक्स, अमेझोन प्राईम, डिस्ने हॉटस्टार इत्यादी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आता नवीन चित्रपटही प्रदर्शित होतायत. नुकतेच त्यावर शकुंतला देवी, दिल बेचारा, गुंजन सक्सेना आदी चित्रपट प्रदर्शित झालेत.
फक्त भारतातचच नाही तर इतर देशातही या प्लॅटफॉर्म्सवर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अर्थात इथे १०० करोड, ५०० करोड, बॉक्स ऑफिस अशा भानगडी नाहीयेत.
पण मग हे प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेले चित्रपट कमाई कसे करतात?
तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर अर्थातच त्यांना चित्रपट प्रदर्शित करण्याचे राईट विकावे लागतात. प्रत्येक प्लॅटफॉर्मचे रेट्स वेगवेगळे असतात. आता तुमचा चित्रपट जर का वेगवेगळ्या भाषेत उपलब्ध असेल तर प्रत्येक व्हर्जनची किंमतही वेगवेगळी असते.
आता काहीकाही चित्रपटांच्या सुरुवातीला लिहून येतं बघा “Netflix Original” असं किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघत असाल त्याचं नाव आणि पुढे ओरिजिनल. मग ही काय भानगड आहे?
तर, बरेचदा काय होतं हे प्लॅटफॉर्म निर्मात्यासोबत चित्रपट बनवण्यासाठी डील करतात. म्हणजे एक रकम ठरवायची आणि त्यात चित्रपट बनवायचा या प्लॅटफॉर्मच्या नावाने. आता यातील चित्रपट बनवण्यासाठी किती वापरायचे आणि नफा किती काढायचा हे त्या निर्मात्याच्या स्किल्सवर अवलंबून असतं.
हे झालं निर्मात्यांचं. पण मग निर्मात्याला द्यायला हे प्लॅटफॉर्म पैसे कुठून आणतात? तुम्ही समोरच्याला तेव्हाच नफा मिळवून देऊ शकता जेव्हा तुम्हाला स्वतःला नफा मिळत असेल.
यासाठी तीन मार्ग असतात.
SVOD (सब्स्क्रीप्शन व्हिडिओ ऑन डिमांड)
यामध्ये प्रेक्षकांकडून एक विशिष्ठ रकम दर महिन्याला किंवा वर्षाला घेतली जाते. त्याबदल्यात त्यांना या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले व्हिडिओ बघायला मिळतील. यातही वेगवेगळे पॅक्स उपलब्ध असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईम.
AVOD (ऍडव्हर्टाइसिंग व्हिडिओ ऑन डिमांड)
याचं उदाहरण म्हणजे युट्यूब. युट्युबच्या व्हिडीओमध्ये ज्या जाहिराती लागतात त्या जाहिरातींमधूनच त्यांची कमाई होते.
TVOD (ट्रान्सॅक्षनल व्हिडिओ ऑन डिमांड)
यामध्ये तुम्हाला फक्त जे व्हिडीओ तुम्ही बघणार आहात त्याच व्हिडीओसाठी पैसे भरावे लागतात. उदाहरणार्थ, गुगलप्ले आणि आयट्युन्स.
एकूणच या प्लॅटफॉर्म्सचं बिझनेस मॉडल खुप साधं आहे आणि कामही फार हेक्टिक आहे.
जरी आपल्याला घरच्या घरी नवनवीन चित्रपट बघायला मिळत असले तरीही आता सगळ्यांनाच चित्रपटगृह कधी सुरु होतात याची चाहूल लागलीये. जी मजा मोठ्या पडद्यावर चित्रपट बघण्यात आहे ती मजा हातात फोन घेऊन त्यावर बघण्यात नाही कारण इथे लोकांची कमेंट्री, शिट्ट्या ऐकू येत नाही ना!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.