माणसाची उत्क्रांती माकडापासून झाल्याचा दावा डार्विनने कधीही केला नव्हता

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


उत्क्रांतीचा सिद्धांत म्हटले की एकच गोष्ट आठवते ती म्हणजे माणूस माकडापासून निर्माण झाला. पण, उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणाऱ्या डार्विनने खरेच माणूस माकडापासून निर्माण झाल्याचा दावा केला होता काय? माणूस माकडापासून उत्क्रांत झाला असा समज पसरवणारी माहिती मात्र जोरात पसरवली जात आहे.

माकड हाच माणसाचा पूर्वज आहे, अशा आशयाचे अनेक जोकही नेहमीच समाज माध्यमांतून व्हायरल होत असतात. अनेकजण हे मान्य करतात ही माकड हाच माणसाचा पूर्वज होता. या पार्श्वभूमीवर डार्विनचा मूळ सिद्धांत नेमका काय होता हे पाहून घेऊया.

डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पीशीजमध्ये त्याने कुठेही माणूस हा माकडापासून उत्क्रांत झाल्याचे म्हटलेले नाही. या पुस्तकात त्याने सर्वायव्हल ऑफ द फिटेस्टची थेअरी सांगितली असली तरी, ही थेअरी देखील त्याची नाही.

डार्विनने बीगल या जहाजावरून चार-पाच वर्षे प्रवास केला. या जहाजावर डार्विन सोबतच इतरही अनेक जैवशास्त्रज्ञ होते. १८३१ साली या जहाजाने प्रवासाला प्रारंभ केला आणि १८३६ साली या जहाजाचा प्रवास संपला. या पाच वर्षात या जहाजाने जगातील कोपरा न कोपरा पालथा घातला.

या पाच वर्षाच्या प्रवासात डार्विनने अनेक ठिकाणाहून विविध प्राण्यांच्या प्रजातींचे मृत अवशेष, लाकडे, पक्ष्यांची हाडे, कवठ्या, प्राण्यांची हाडे, असे कितीतरी साहित्य गोळा केले.

या प्रत्येक वस्तूचे निरीक्षण करून त्याने काही अनुमान काढले. पाच वर्षाच्या या प्रवासानंतर डार्विन घरी परतला तेंव्हा त्याने जमा केलेल्या वस्तू त्याचे नोंदवलेले अनुमान, यांच्या सहाय्याने ओरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक लिहिले. पण चर्चच्या भीतीने ते पुस्तक प्रकाशित करण्याचे त्याचे धाडस झाले नाही.

या पुस्तकात त्याने असे लिहिले होते की, प्राण्यांच्या विविध प्रजातींच्या विकासात काही प्राणी हे जमिनीवरच राहू लागले तर काही प्राणी हे झाडांवर राहू लागले. त्यांच्या या वेगवेगळ्या अधिवासानुसार त्यांना अनुकूल अशी त्यांची शरीर रचना बनत गेली.

याचवेळी ब्रिटनच्या आल्फ्रेड वॉलेसने देखील आपल्या निरीक्षणातून डार्विनच्या निरीक्षणाशी मिळते जुळते निष्कर्ष काढले होते. त्याने आपले निष्कर्ष डार्विनला पाठवले. तेंव्हा डार्विनने आपल्या पुस्तकाचा गोषवारा त्याला पाठवला. शेवटी वॉलेसने ही थिअरी दोघांच्या नावांवर प्रकाशित करण्याचा आग्रह धरला आणि उत्क्रांतीचा हा सिद्धांत जगासमोर मांडण्यात आला.

या सिद्धांतात डार्विनने असे कुठेही म्हटले नव्हते की, माणूस माकडापासून उत्क्रांत झाला.

उत्क्रांतीवादाचा सिद्धांत सांगतो की, सर्व सजीव पृथ्वीवर निसर्ग नियमाने जन्माला येतात. जे सजीव निसर्गातील बदलांना तोंड देत विकसित होतात त्याच जाती कालोघातात टिकतात.

ज्या जाती असा बदल विकसित करण्यात अपयशी ठरतात त्या काळाच्या ओघात नष्ट होतात. परंतु हे बदल घडण्यासाठी कोट्यावधी वर्षे जावी लागतील.

नैसर्गिक बदलणं तोंड देत जे आपले वंश सातत्य टिकवतात, तेच सजीव जगण्यायोग्य असतात. त्यांना सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट म्हटले जाते. ही संकल्पना ब्रिटीश प्राणीशास्त्रज्ञ टॉमस हक्सली याने पुढे विकसित केली.

याचाच अर्थ जंगलात राहणारे एप्स, प्राणीसंग्रहालयातील चिपांझी आणि शेतात घुसून पिकांचे नुकसान करणारी माकडे आणि माणूस यांचा पूर्वज एक होता. हे सगळे प्राणी एकाच पूर्वजापासून विकसित झाले पण, यांच्या राहण्याच्या अधिवासानुसार त्यांच्या शरीरात बदल होत गेले. याचा अर्थ माकड हा माणसाचा पूर्वज होऊ शकत नाही. तर तो चुलत किंवा चुलत चुलत किंवा मावस मावस भाऊ होऊ शकतो.

यातील एक भाऊ जमिनीवर उभा राहून शेती करू लागला. आणि माकडे, ओरांग उटांग, चिपांझी हे जंगलातच राहू लागले. त्यामुळे या माकडांचे आणि माणसांचे पूर्वज एकच आहेत असे म्हणायला वाव आहे.

सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट हे पण डार्विनच्या उत्क्रांतवादाच्या सिद्धांताशी जोडले जाते. कारण, त्याने स्वतःत बदल घडवून आणणारे सजीवच टिकू शकतात असा सिद्धांत मांडला. पण, हा वाक्प्रचार फ्रेंच तत्ववेत्ता हर्बर्ट स्पेंसर याच्या साहित्यातील आहे.

डार्विनने सांगितले की निसर्ग सर्वात योग्य अशा प्राण्याचीच उत्क्रांतीसाठी निवड करतो.

परंतु, एकाच प्रजातीच्या प्राण्यात एकाच वेळी असे विविध बदल का घडून येतात याचे स्पष्टीकरण डार्विनही देऊ शकला नव्हता. म्हणजे आफ्रिकेत दोन प्रकारचे जिराफ होते. यातील एकाची मान लहान होती आणि दुसऱ्याची मान उंच होती.

पण त्याकाळात त्या प्रदेशात फक्त उंच उंच झाडेच जगत होती. अर्थातच या उंच झाडांची पाने तोडणे फक्त उंच मान असणाऱ्या जीराफांनाच शक्य होते. आखूड मानेच्या जीराफांना उंच झाडाची पाने खाता येत नसत. त्यामुळे हळूहळू ही आखूड मानेच्या जिराफांची प्रजाती अपोआपच नष्ट झाली.

परंतु मुळात एकाचवेळी दोन प्रकारचे जिराफ कसे विकसित झाले याचे स्पष्टीकरण डार्विनलाही माहित नव्हते.

ब्रिटनमधील शास्त्रज्ञ आल्फ्रेड वॉलेस यांनी देखील डार्विनप्रमाणेच विश्व भ्रमंती केली. त्यांनीही आपल्या निरीक्षणातून डार्विनच्या सिद्धांतात काही भर घातली. हे दोन्ही दस्तावेज एकत्र करून ओरिजिन ऑफ स्पीशीज हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

सुरुवातीला या पुस्तकाच्या १२०० प्रती छापण्यात आल्या होत्या. या सगळ्या प्रती एकाच दिवसात संपल्या होत्या. मात्र यावर चर्चकडून आक्षेप नोंदवण्यात आला.

अर्थात डार्विनला हे अपेक्षितच होते. कारण देवाने ही सृष्टी स्वतःच्या हाताने बनवली या बायबलमधील वर्णनाला त्यामुळे धक्का लागत होता. चर्चला आपले म्हणणे पटणार नाही हे डार्विनला चांगलेच माहित होते.

आल्फ्रेड वॉलेस आणि ले डी हूकरसारखे शास्त्रज्ञ डार्विनच्या पाठीशी उभे होते. बिशपने जेंव्हा डार्विनच्या या पुस्तकाचा निषेध करण्यासाठी सभा बोलावली तेंव्हा ले डी हूकरने डार्विनची बाजू उदाहरणासह आणि सडेतोडपणे मांडली. त्यामुळे बिशपला माघार घ्यावी लागली आणि त्याने डार्विनचा हा सिद्धांत मान्य केला.

आजही डार्विनच्या या सिद्धांतावर आक्षेप नोंदवले जातात. पण, मूळ सिद्धांत केवळ आपल्याला मान्य नाही म्हणून त्याला नाकारता येत नाही. तर मूळ सिद्धांताविरोधात सबळ पुरावे आणि नव्या सिद्धांताची त्याच आधारे वैज्ञानिक मांडणी करता येणे गरजेचे असते.

अजून तरी डार्विनच्या सिद्धांताला आव्हान देणारी वैज्ञानिक मांडणी पुढे आलेली नाही. मात्र, त्याचे निष्कर्ष आणि निरीक्षण बरोबर असल्याचे अनेक सिद्धांत नंतरच्या काळात मांडले गेले. ज्यामुळे डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला बळ मिळाले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!