इस्राईलच्या मोसादने इराकमध्ये घुसून मिग-21 चोरून आणलं होतं

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


१९५९ साली सोव्हिएत संघाच्या मिकोयान- गुरेविच ब्युरोने त्यांचा मिग १९ या विमानांच्या जागेवर मिग २१ या विमानांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. मिग २१ विमान हे विशेष बनावटीचे सुपरसोनिक जेट विमान होते. प्रचंड वेगाने उड्डाण करू शकणारे मिग २१ हे शत्रूला सहज चकवा देण्यात सक्षम होते. त्याकाळी १३,००० मिग २१ विमानांची निर्मिती करण्यात आली होती.

१९६० च्या दशकात मध्य पूर्वेतील इजिप्त, सीरिया आणि इराक या देशांच्या वायुसेनांनी मोठ्या प्रमाणात या लढाऊ विमानांचा वापर केला होता. हे सर्व देश या लढाऊ विमानांचा वापर एका देशाच्या विरोधात करायचे, त्या देशाचे नाव आहे ‘इस्त्राईल’.

या विमानाच्या बळावर इराक, इजिप्त आणि सीरियाच्या सैन्याने इस्त्राईलच्या मिराज III आणि एफ ४ या लढाऊ विमानांना व त्यांच्या प्रशिक्षित वैमानिकाना खाली पाडले. हे विमान इस्त्राईलच्या सैन्यासाठी मोठी कटकट बनले होते.

मिग २१ च्या समस्येवर तोडगा काढणे इस्त्राईलच्या सैन्याचे सर्वात मोठे लक्ष बनले होते. यासाठी इस्त्राईलने एका गुप्तचर मोहिमेची आखणी केली, ‘ऑपरेशन डायमंड’.

इस्राईलची गुप्तचर संस्था असलेल्या मोसादने ही मोहीम कशी पार पाडली ते आपण जाणून घेऊ!

इस्त्राईलच्या या ऑपरेशनची सुरुवात १९६० च्या दशकात करण्यात आली. जीन थॉमस या अधिकाऱ्यावर या मोहिमेची धुरा सोपविण्यात आली. जीनला एखाद्या पायलटच्या मदतीने इजिप्तमधून हे विमान इस्राईलमध्ये आणण्याचे दायित्व सोपवण्यात आले. हे काम करणाऱ्या पायलटला १० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. परंतु ही मोहीम यशस्वी होण्या आधीच बारगळली कारण या मोहिमेचा पत्ता इजिप्तला लागला होता व त्यांच्या अधिकाऱ्यांनी काही विपरीत घडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. इजिप्त सरकारने जॉन थॉमस सकट तीन जणांना या प्रकरणी अटक केली होती आणि पुढे १९६२ ला जीनसोबतच इतर दोन जणांना इजिप्त सरकारने फासावर लटकवले.

पहिली मोहिम अयशस्वी ठरली म्हणून हार मानेल ती मोसाद कसली! खरंतर त्यांचा उद्देश वेगळाच होता..

ही मोहिम पुन्हा करण्याचे ठरवण्यात आले. फक्त यावेळी इजिप्तऐवजी इराकची निवड करण्यात आली आणि तिथल्या पायलट्सच्या मदतीने विमान इस्राईलला आणणे शक्य आहे का याची चाचपाणी करण्यात आली. त्यांनी त्या इराकी पायलटला भरमसाठ पैशाचे आमिष दाखवले. तो पायलट तयार देखील झाला पण ऐनवेळी त्याने कचखाऊपणा केला. यामुळे मोसादची मोहिम दुसऱ्यांदा बारगळली. आता मोसादकडे या मोहिमेला आकार देण्याची शेवटची संधी होती.

१९६४ साली इराक आणि इस्त्राईलचे संबंध सुधारले, याच काळात एका ज्यू युवकाने इस्त्राईलमधील मोसादच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्या ज्यू युवकाकडून त्यांना ख्रिस्ती मूळ असलेल्या मुनिर रेडफा नावाच्या इराकी वायुदलातील पायलटची माहिती मिळाली.

हा पायलट इराकी वायुदलावर नाराज होता. त्याला वायुदलात पदोन्नती मिळत नव्हती आणि त्याने ख्रिश्चन मुलीशी विवाह केला म्हणून त्याच्या परिवाराला भेदभावाचा सामना करावा लागत होता.

मुनिरला इस्राईलच्या मोहिमेत काम करण्यासाठी मोसादच्या एका महिला गुप्तचराने मोठी भूमिका बजावली होती. या महिलेने मुनिरशी मैत्री केली आणि त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मग त्याला युरोपात घेऊन गेली व तिथे त्याची इस्त्राईलच्या अधिकाऱ्यांशी भेट घडवून आणली. मुनिरने इस्त्राईलच्या कमांडर जनरल मोर्देबरोबर मिग २१ च्या अधिग्रहणावर चर्चा केली आणि त्यासाठी गुप्त बैठकीत योजना आखण्यास सुरुवात केली.

या मोहिमेच्या बदल्यात मुनिरला सर्वकाही देण्यात येणार होते, जे त्याला हवे होते. त्याला १० लाख डॉलर, इस्त्राईलमध्ये रोजगार याशिवाय त्याच्या परिवाराला सुरक्षेची हमी प्रदान करण्यात आली. मुनिरला त्याचा परिवार खूप प्रिय होता, त्यामुळे ही मोहीम पार पाडण्याची त्याची तयारी झाली होती. आता फक्त मोहिम फत्ते करायची राहिली होती.

मुनिरला इराक सरकारने लांब पल्ल्यासाठी मिग २१ विमान उडवण्याची परवानगी दिली नव्हती. पण त्याला या विमानाची व्यवस्थित इत्थंभूत माहिती असल्याने त्याने त्याचा फायदा उचलण्याचे निश्चित केले.

१६ ऑगस्ट १९६६ रोजी इराकमधून रेडफाने मिग २१ विमानात इंधन भरून उड्डाण केले. ठरल्यानुसार त्याने पश्चिम दिशेने उड्डाण केले.

तो जेव्हा जॉर्डनच्या हवाई हद्दीत पोहचला त्यावेळी इराकी वायुदलाने त्याला विमान पुन्हा परत आणायला सांगितले. पण विमान परत नेण्यासाठी त्याने उड्डाण केलेच कुठे होते? त्याने विमान इस्त्राईलच्या हवाई हद्दीत आणले. तिथे इस्त्राईलने विमानाच्या संरक्षणासाठी दोन विमाने आधीच तैनात केली होती.

सरतेशेवटी दक्षिण इस्राईलच्या एयरबेसवरील धावपट्टीवर हे विमान मुनिरने सक्षमपणे उतरवले गेले. मुनिरच्या आधी मोसादने युरोप पर्यटनाच्या बहाण्याने त्याच्या परिवाराला इस्त्राईलमध्ये आणून सोडले होते. ज्यावेळी मुनिरने मिग २१ इस्राईलच्या धावपट्टीवर उतरवले तेव्हा त्यात फक्त एक थेंब इंधन शिल्लक होते.

आपले विमान इस्त्राईलला पोहचले म्हणून इराकने मोठा तांडव केला आणि त्याने सोव्हिएत संघाकडे धाव घेतली. सोव्हिएतने इस्त्राईलला विमान परत करायला सांगितले, आता इस्त्राईलने परत करण्यासाठी विमान थोडी चोरले होते. त्यांनी लगेचच त्या विमानाचे जेम्स बॉण्डच्या चित्रपटवरून ००७ असे नामकरण केले आणि हे विमान आमचेच आहे असा दावा केला.

डॅनी शपिरो या संशोधकावर इस्त्राईलने या विमानाचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी या विमानाची टेस्ट फ्लाईट घेतली आणि या विमानाच्या बारीक बारीक उपकरणांना समजून घेतले. त्यांना वायुदलातील इतर विमानांपेक्षा हे विमान वेगळे कसे आहे हे तपासायाचे होते. त्यांचा अभ्यासपूर्ण झाल्यावर त्यांनी इस्त्राईलच्या वैमानिकांना प्रशिक्षणसुद्धा दिले. भविष्यात जर प्रसंग उद्भवला तर विमान उड्डाणासाठी इस्त्राईलचे वैमानिक सर्वस्वी तयार असायला हवे या उद्देशातून ट्रेनिंग देण्यात आली होती.

इस्त्राईलसाठी हे मिग २१ फायद्याचे ठरले. १९६७ मध्ये झालेल्या सीरिया सोबतच्या युद्धात गोलनच्या डोंगराळ भागात इस्त्राईलच्या या मिग २१ चा पराक्रम सर्वांनीच बघितला.

७ एप्रिल १९६७ ला इस्त्राईल आणि सीरियादरम्यान झालेल्या या युद्धात इस्त्राईलच्या या एका मिग २१ ने सीरियाच्या ६ मिग २१ ला जमीनदोस्त केले होते. या युद्धात इस्त्राईलची कुठलीच हानी झाली नाही. यानंतर १९६७ ते १९७३ या काळात चाललेल्या अरब-इस्त्राईल युद्धात मिग २१ विमान इस्त्राईलला मोठ्या कामी आले. या युद्धात इस्त्राईलला या विमानाने विजय मिळवून दिला होता.

जानेवारी १९६८ ला इस्त्राईलने अमेरिकेशी एक करार केला आणि मिग २१ विमान अमेरिकेला सुपूर्द केले. याच्या मोबदल्यात अमेरिकेने इस्त्राईलला मैकडोनल डगलस एफ-4 फैंटम हे लढाऊ विमान दिले. आधी हे विमान १९६५ मध्ये अमेरिकेने इस्त्राईलला देण्यास नकार दिला होता.

आज जगभरात अनेक देशांकडे मिग २१ विमान आहेत. भारताने देखील मिग २१ विमानाचा वापर आपल्या अनेक पाकिस्तान विरोधी ऑपरेशन्ससाठी केला आहे. या विमानाच्या उपयुक्ततेमुळेच इस्त्राईलने त्यांचा युद्धासाठी वापर केला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!