आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे असं आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय. भारताच्या प्रत्येक प्रांतात वैविध्य आढळून येतं. मग ते खाद्यसंस्कृतीत असो किंवा पेहराव्यात, परंपरेत असो वा भाषेत असो. आपल्या इथे अगदी मैलामैलावर बोलीभाषा बदलताना दिसते. महाराष्ट्राचंच घ्यायचं झालं तर पुण्याची मराठी आणि आमच्या नागपूरची मराठी यात केवढातरी फरक आहे. भारतात अशा कितीतरी भाषा आहेत. जशा भारतात आहेत तशा जगातही असंख्य भाषा आहेत. कित्येक ठिकाणी तर एक भाषा दुसऱ्या भाषेत इतकी मिसळून गेलेली आहे की त्यातली ‘वर्जिनल’ भाषा कोणती हे लक्षातच येत नाही.
इतर प्राणी वेगवेगळे आवाज काढून एकमेकांशी संपर्क साधतात तर माणूस भाषेच्या जोरावर आपल्या भावना व्यक्त करतो, वेगवेगळ्या कल्पना मांडतो, माहितीचा प्रसार करतो. जसजशी माणसाची उत्क्रांती होत गेली तसतशी लाखो वर्ष झाले माणसाची भाषासुद्धा विकसित होत गेली. काही भाषांमधून अनेक नवीन भाषाही जन्माला आल्या.
काही भाषा संपूर्णतः कालबाह्य ठरल्या. पण काही भाषा अशा आहेत ज्या आजही जगात आपलं स्थान टिकवून आहेत. जसं की आपल्या भारतातली तमिळ किंवा संस्कृत. यांसारख्या कितीतरी पुरातन भाषा जगात आजही बोलल्या जात आहेत. कोणत्या? तेच आपण जाणून घेणार आहोत.
१. हिब्रू
हिब्रूचा जन्म १०व्या शतकात इस्राईल येथे झाला असं मानलं जातं. आज जगभरात जवळपास ९० लाख हिब्रू भाषिक आहेत. काही पुरातन कहाण्यांनुसार आजचा इस्राईल, जॉर्डन, सीरिया, पॅलेस्टाईन, लेबनन या भागाला कॅनाईन म्हणत. आज त्यांच्या कॅनाइन भाषांपैकी फक्त हिब्रू ही भाषाच अजूनही प्रचलित आहे.
असं म्हणतात, साधारण इसवीसन २०० ते ३००च्या दरम्यान लोकांनीच हिब्रूचा वापर बंद केला होता आणि भाषा हळूहळू नष्ट व्हायला लागली. पण पुन्हा १९व्या शतकात झिओनिझमच्या प्रचारानंतर हिब्रूचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. आज हिब्रू इस्राईलची राजभाषा आहे.
२. बास्क
प्रागैतिहासिक इंडो-युरोपीयन भाषांपैकी ज्या भाषा आज अस्तित्वात आहेत त्यापैकी एक म्हणजे बास्क. बास्क देशात याचा उगम झाल्याचं सांगण्यात येतं. ही भाषा कधी उदयास आली याबद्दल अभ्यासकांचं दुमत आहे. प्रागैतिहासिक युरोपमध्ये याचा उगम झाला असावा असं सगळ्यांचं मत आहे.
आज ही बास्क भाषा बास्क लोक, जे फ्रांस आणि स्पेनमध्ये राहतात त्या लोकांमध्ये बोलली जाते. पश्चिम युरोपमधील सर्वांत जुन्या भाषांपैकी एक म्हणजे बास्क भाषा.
३. तमिळ
प्रामुख्याने दक्षिण भारत आणि श्रीलंकेमध्ये बोलली जाणारी तमिळ जागातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक आहे. इसवीसन पूर्व ३००च्या दरम्यान या भाषेचा उगम झाल्याचे कागदोपत्री आढळून येते. इसवीसन पूर्व ३०० दरम्यानचे अनेक कागदपत्र उत्खननात सापडले आहेत.
२००० वर्षांपेक्षाही जास्त जुनी अशी ही भाषा श्रीलंका आणि सिंगापूर या देशांची तर भारतातील तमिळनाडू राज्याची अधिकृत भाषा आहे. याशिवाय ही भाषा मलेशिया, मॉरिशियस, दक्षिण आफ्रिका इथे देखील बोलली जाते.
४. अरबी
आज अरबी ही जगातील पाचवी सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. जवळपास २७० दशलक्ष लोकांपेक्षा जास्त लोक आज ही भाषा बोलतात. जवळपास २६ राज्यांची ही अधिकृत भाषा आहे. इस्लामचं बरंचसं साहित्य हे अरबी भाषेतच आहे. अरबी द्वीपकल्पात उगमास आलेली ही भाषा हळूहळू मध्य आशिया आणि उत्तर आफ्रिकेमध्ये पसरू लागली.
कितीतरी युरोपियन भाषा आज अरबीतून उगमास आल्या आहेत. इतकंच काय पण अरबीचा प्रभाव आपल्याकडील हिंदी, बंगाली, उर्दू याशिवाय स्पॅनिश भाषेवरही आढळून येतो.
या होत्या जगातील काही सर्वात जुन्या भाषा ज्या आजही बोलल्या जातात. याशिवाय तुम्हाला काही भाषा माहिती असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.