ही जाहिरात लागली की आईवडील पोरांना पाणी घ्यायला पाठवायचे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


भारतामध्ये लैंगिक शिक्षणाची सुरुवात तशी भरपूर उशिरा झाली. आपला देश तसा परंपरावादी म्हणून ओळखला जातो. शिवाय सेक्स बद्दल किंवा लैंगिक संबंधांबद्दल उघड उघड बोलणे धर्माच्या विरुद्ध समजले जाते, किंवा शिष्टसंमत मानले जात नाही.

आता ही परिस्थिती केव्हापासून आली माहित नाही साधारणपणे साठ ते सत्तर वर्षांपूर्वीच्या जर लग्न पत्रिका बघितल्या तर त्या लग्न पत्रिकांवर अमुक-अमुक मुलीचा अमुक-अमुक मुलाबरोबर शरीर संबंध करावयाचे योजले आहे अशा तऱ्हेची एक ओळ असे.

जिथे लग्नपत्रिकेवर प्रत्यक्ष रुपाने शरीर संबंध योजनांच्या गोष्टी बोलल्या जात तिथे नंतर शरीर संबंधांबद्दल बोलणे पाप कधीपासून झाले ते ठाऊक नाही.

ऐंशीच्या दशकामध्ये एड्स नावाचा महाभयंकर रोग पृथ्वीवर अवतीर्ण झाला. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे हा रोग पसरतो. आपला भारत देश आज एड्सबाधित लोकसंख्येबाबत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

२०२०मध्ये जवळपास २४ लाख लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून जगत आहेत असा डेटा उपलब्ध आहे.

या रोगामुळे का होईना परंतु भारतामध्ये लैंगिक शिक्षण ही काळाची गरज बनली आणि तेव्हापासून कंडोमचे महत्व लोकांना पटायला सुरुवात झाली.

पुन्हा इथेही प्रश्न होताच. भारतभर अगदी तळागाळापर्यंत कंडोम या विषयाची कुणालाही जास्त माहिती नव्हती. त्यामुळे दूरदर्शनवर जाहिरात हा कंडोमबद्दलची जागृती करण्यासाठीचा एकमेव पर्याय होता. सुरक्षित लैंगिक संबंध हाच एड्स रोखण्याचा उपाय आहे आणि त्यामुळेच कंडोम महत्त्वाचा आहे हा संदेश भारतीय जनतेच्या मनावर ठसवायचा होता त्या दृष्टिकोनातून दूरदर्शनवर कंडोमच्या जाहिराती येत गेल्या.

कंडोमची सगळ्यात पहिली जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये कोणाचाही चेहरा दाखवण्यात आलेला नव्हता. फक्त एक मुलगा आणि मुलगी रस्ता चालत आहेत आणि त्यांचे फक्त पाय जाहिरातीमध्ये दाखवले गेले.

त्याच्या बॅकग्राऊंडला ‘दांतों तले क्या इश्क़ कट रहा है, दिल बेईमान, बेईमान, बेईमान है’ हे स्लोगन वाजवले गेले.

त्यानंतर अनेक दिवसांनी अभिनेता शेखर सुमनला घेऊन अजून एक जाहिरात बनवली गेली. यामध्ये शेखर सुमन केमिस्टच्या दुकानात जातो परंतु त्याला निरोध हवा हे सांगताही येत नसते. लोक त्यावेळी निरोध असे नाव घेण्यास सुद्धा घाबरत असत. जरी निरोधची पाकीटे औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध होती तरी तिथपर्यंत जाऊन लोक निरोध विकत घेण्याचे धाडस करत नसत.

हीच मध्यवर्ती कल्पना घेऊन शेखर सुमनची ही जाहिरात बनलेली होती. ज्यामध्ये प्रचंड भीती आणि शरम याच्यामुळे शेखर सुमनला आपल्याला काय हवे हे दुकानदाराला सांगता येत नसते.

या जाहिरातीचे स्वरूप एक प्रकारे प्रबोधनाचे होते. लोकांनी खुलेआम दुकानांमध्ये जावे आणि न लाजता दुकानदाराकडे निरोधची मागणी करावी. निरोध वापरणे हे काही पाप नाही. उलट तो एडस सारख्या महाभयानक रोगापासून वाचण्याचा एक उपाय आहे हे या जाहिरातींमधून लोकांच्या मनावर बिंबवायचे होते.

त्याच्यानंतर कोहिनूर कंपनीच्या कंडोमची जाहिरात सिरीजदेखील दूरदर्शनवर आली त्याचे ‘इस रात की सुबह नही’ हे स्लोगनदेखील खूप गाजलेले होते.

८० च्या दशकात जितक्या कंडोमच्या जाहिराती आल्या त्या साधारणपणे प्रबोधनपर किंवा सूचक स्वरूपाच्या असायच्या. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अंगप्रदर्शन नसायचे. या जाहिरातींमध्ये क्रांती आली १९९१ साली आलेल्या कामसूत्र कंडोमच्या जाहिरातीने.

या जाहिरातीने आत्तापर्यंतच्या भारतात निरोधसंदर्भात दाखवल्या गेलेल्या सर्व जाहिरातींचे रेकॉर्ड मोडले होते. अभिनेत्री पूजा बेदीला घेऊन ही जाहिरात केली गेली होती.

यावेळी प्रथमच जाहिरातीमध्ये नायक आणि नायिका दाखविण्यात आले होते. संपूर्ण जाहिरात ही उत्तेजक स्वरूपाची होती. या जाहिरातीचे संपूर्ण चित्रीकरण बाथरूममध्ये करण्यात आलेले होते.

पूजा बेदी बाथरूममध्ये स्वतःच्या अंगावर शॉवर घेत आहे. दुसरीकडे एक उमदा नायक बाहेरून येतो. स्वतःचा शर्ट काढून बाथरूममध्ये जातो जिथे आपल्या जाहिरातीची नायिका आंघोळ करत आहे. ही जाहिरात त्या काळामध्ये प्रचंड बोल्ड जाहिरात म्हणून नावाजली गेली.

‘Pleasure of making love’  अशी कामसूत्र कंडोमची टॅगलाईन होती.

ही जाहिरात बनवली होती प्रसिद्ध जाहिरात गुरू अलेक पदमसी यांनी. त्यावेळी या जाहिरातीच्या विरोधात बऱ्याच ठिकाणी निदर्शने झाली. यासंदर्भात सेंसर बोर्डाकडे अलेक पदमसी यांची तक्रार देखील करण्यात आली.

परंतु अलेक पदमसी यांनी आपला स्टॅंड कायम ठेवला होता. त्यांनी आपल्याला विरोध करणाऱ्या लोकांना चोख प्रत्युत्तर दिले.

त्यांचे म्हणणे होते जेव्हा आपण एखाद्या लहान मुलाला चॉकलेट खाऊ नको असं म्हणतो त्यावेळी ते लहान मुल चॉकलेट खायचे थांबत नाही. उलट चोरून-लपून अजून जास्त चॉकलेट खाऊ लागते. सेक्स हा एक स्फोटक विषय आहे.

या संदर्भात आपल्याकडे तशीही फार मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली जाते. लोकांनी या विषयावर मनमोकळेपणाने व्यक्त झाले पाहिजे. त्यांची कंडोमबद्दलची भीती, असुरक्षितता आणि लज्जा गेली पाहिजे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या जाहिराती येणे काही गैर नाही.

कामसूत्रपासून भारतामध्ये कंडोम दाखवण्याच्या जाहिरातींमध्ये आमुलाग्र बदल झाले. कंडोमच्या जाहिराती अधिक अधिक बोल्ड, ठळक आणि अंगप्रदर्शन करणार्‍या बनू लागल्या.

त्याच्यामुळे भारत सरकारने सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कंडोमच्या जाहिराती टिव्हीवर दाखविण्यात येणार नाही असा एक फतवा देखील काढला. सरकारच्या मते कंडोमच्या जाहिरातीमधून अधिकधिक अंगप्रदर्शन केले जाते. त्यामध्ये सेक्स एज्युकेशन हा विषय कुठेही घेतला जात नाही. या दाव्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे.

विषयाची गरज म्हणून अधिक अधिक बोल्ड जाहिराती येत राहतात. त्यामुळे शाळकरी वयाच्या मुलांमध्ये उत्सुकता ताणली जाते. पण, ज्या संयमितपणे हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तो कदाचित पोहोचत नाही.

म्हणून, ज्यामधून फक्त अंग प्रदर्शन न होता एक चांगला संदेश देखील दिला जाईल अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण जाहिराती येणे गरजेचे आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!