यंदाच्या फिजिक्स नोबेल पुरस्कार विजेत्याने या भारतीय शास्त्रज्ञाच्या इक्वेशनचा आधार घेतलाय

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


नुकतीच भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून रॉजर पेनरोज या भौतिकशास्त्रज्ञाला हा पुरस्कार रेनहार्ड गेनजेल आणि अँड्रिया गेझ यांच्या समवेत त्यांच्या कृष्णविवरा संबंधित मूलभूत संशोधनासाठी प्रदान केला जाणार आहे.

रॉजर पेनरोज यांच्या संशोधनानुसार कृष्णविवराच्या निर्मीतीचा जनरल थियरी ऑफ रिलेटिव्हीटीच्या अनुमानांशी संबंध आढळून आला आहे.

आपल्यापैकी अनेकांना माहिती देखील नसेल की पेनरोज यांच्या या संशोधनाचे भारताशी आणि त्यातल्या त्यात भारतातील कोलकाता शहराशी एक नाते जोडले गेले आहे. पेनरोज यांनी आज जे काही अद्वितीय संशोधन केले आहे, त्याच्या पाया ज्या सिद्धांतावर रचण्यात आला आहे, त्या सिद्धांताच्या निर्मात्याचा जन्म भारतात झाला आहे.

अमल कुमार रायचौधरी या भारतीय भौतिकशास्त्रज्ञानाने रचलेल्या एका गणितीय ‘समीकरणाच्या’ आधारवर कृष्णविवरा (ब्लॅक होल) संबंधित हे संशोधन रॉजर पेनरोज यांनी केले आहे.

ज्यावेळी स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने २०२० सालच्या नोबेल पुरस्काराची रॉजर पेनरोज यांच्या संशोधणासाठी घोषणा केली, त्यावेळी विज्ञान विश्वात पेनरोज यांच्या संशोधनाचा आधार असलेल्या रायचौधरी इक्वेशन ऑफ जनरल रिलेटिव्हीटीची चर्चा सुरु झाली, जे अमल कुमार रायचौधरी यांनी शोधून काढले होते.

पेनरोज यांनी दिवंगत महान भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या समवेत १९५५ सालच्या फिजिक्स रीव्हीव या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रायचौधरी समीकरणाचा वापर आपल्या संशोधनासाठी केला आहे. १९६९ साली त्यांनी समीकरणाच्या आधारावर कृष्णविवराचे गणितीय प्रारूप स्पष्ट केले होते.

महत्वपूर्ण बाब ही आहे की या दोघांच्या संशोधनावर सुरुवातीच्या काळात अल्बर्ट आईन्स्टाईन या जनरल थियरी ऑफ रिलेटिव्हीटीच्या जन्मदात्याचा विश्वास नव्हता.

अमल कुमार रायचौधरी यांनी ज्यावेळी या समीकरणावर काम करायला सुरुवात केली त्यावेळी ते आशुतोष कॉलेजमध्ये शिक्षकाची नोकरी करत होते. त्यांचा शोध प्रबंध सुरुवातीला इंडियन असोसिएशन ऑफ कल्टीव्हेशन ऑफ सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आला.

प्रेसिडेन्सी कॉलेजात त्यांना टीचर ही पदवी बहाल करण्यात आली होती.

१९८७ साली जादवपूर विद्यापीठात रायचौधरी आणि पेनरोज यांची भेट झाल्याचा दावा आयसरच्या फिजिकल सायन्स विभागाच्या नारायण बॅनर्जी यांनी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

बॅनर्जी म्हणतात की रायचौधरी यांनी भौमितिक संकल्पना वापरून एका अशा विशिष्ट भौतिक संरचनेची निर्मिती केली होती जी गुरुत्वाकर्षण आणि स्पेस टाइम यांच्या तुलनेत विशालकाय होती. खरंतर भौतिकशास्त्राशी संबंधित हि फार जटिल संकल्पना आहे पण हीच संकल्पना पुढे हॉकिंग आणि पेनरोज यांच्या १९६९सालच्या संशोधनाचा आधार बनली होती.

पेनरोज आणि हॉकिंग या दोघांनी रायचौधरी यांच्या समीकरणामुळे मिळालेली मदत आणि रायचौधरी यांचे संशोधन यांना नावाजले आहे. स्टीफन हॉकिंग यांनी तर आपल्या पुस्तकात त्यांचा उल्लेख केला आहे.

रायचौधरी यांनी जागतिक भौतिकशास्त्राच्या विश्वात किमया घडवली असली तरी त्यांना मायभूमीवर मिळायला हवी इतकी प्रसिद्ध मिळाली नाही आणि जी मिळाली ती मिळवायला अनेक वर्ष वाट बघावी लागली.

१९५५ साली रायचौधरी यांच्या समीकरणासारखे एक समीकरण एक समीकरण लेव्ह लेंडाऊ या रशियन संशोधकाने तयार केल्यावर रायचौधरी प्रकाश झोतात आले होते.

आज पेनरोज यांच्या नोबेल पुरस्कार प्राप्त शोध निबंधात जरी रायचौधरी यांचे नाव नसले तरी आजही भारताच्या थियरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या अभ्यासक विश्वात रायचौधरी यांचे नाव कायमच सन्मानाने घेतले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!