The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

by ऋजुता कावडकर
18 April 2022
in इतिहास, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सन १९१५. संपूर्ण युरोप युद्धाच्या होरपळीत भाजून निघत होता. ठिकठिकाणी इंग्लंड, फ्रान्स ही दोस्त राष्ट्र आणि जर्मनी हे शत्रू राष्ट्र यांच्या चकमकी झडत होत्या. गोळीबारांचे आवाज, किंकाळ्या, जखमी सैनिकांचं विव्हळणं, मृतदेहांचा खच, त्याचे लचके तोडायला आकाशात भिरभिरणाऱ्या घारी आणि जमिनीवर उंदीर हे बीभत्स दृश्य नेहेमीचंच झालं होतं.

आजचा दिवस मात्र जरा वेगळा होता. जर्मन आणि दोस्तांची अशीच एक चकमक सुरू होती. दोन्ही बाजूंचे सैनिक कोणी खंदकात तर कोणी टेकाडामागे आपापला पवित्रा घेऊन शत्रूंवर गोळीबार करत होते. जर्मनांच्या बाजूला नेहेमीच्या अधिकाऱ्यांबरोबर आणखी एक वेगळाच खास अधिकारी तिथे उपस्थित होता.

बुटका, थोडंसं पोट सुटलेला, एप्रिल महिन्यातल्या संध्याकाळच्या थंडीत उब मिळवण्यासाठी त्याने फरचा कोट परिधान केला होता. त्याने समोरच्या शत्रुसैन्यावरून आपल्या चष्म्यातून नजर फिरवली. त्यानं एक विकट हास्य केलं. घड्याळ बघितलं. सहा वाजले होते. त्यानं इशारा केला आणि म्हणाला, ‘हे देवा! इंग्रजांना शिक्षा कर’.

त्याच्या समोर असलेल्या कंटेनरचा व्हॉल्व्ह उघडला गेला. तब्बल १६८ टन क्लोरीन वायू हवेत सोडला गेला. वाऱ्याची साथही ‘श्रेष्ठ’ जर्मनांना होती. हिरवट पिवळ्या रंगाचा ढग घेऊन वारा समोरच्या शत्रूंच्या गोटाकडे निघाला. काही मिनिटातच त्या वायूने त्या सगळ्यांची फुप्फुसं भरून टाकली. वेदना असह्य होऊ लागल्या. चेहरे काळे निळे पडायला सुरुवात झाली. तोंडातून पिवळा फेस वाहायला लागला आणि त्यांची वाटचाल सुरू झाली नरकाकडे!

नव्या अधिकाऱ्याने समाधानाने त्याच्या आवडत्या व्हर्जिनियन सिगारला ट्रिम केलेल्या मिशांखाली ओठात सरकवत धूर हवेत सोडला. त्याच्या ‘ऑपरेशन जंतुनाश’ची चाचणी यशस्वी झाली होती. नंतर मोजणी केली तेव्हा किमान ५ हजार शत्रू सैनिकांनी नरकाची वाट धरली होती. त्यांचे चेहेरे काळे ठिक्कर पडले होते. गणवेशाच्या चिंध्या चिंध्या झाल्या होत्या. दृश्य विदारक होतं. पण तो खुश होता.

‘ऑपेरेशन जंतुनाश’ ही योजना होती त्या नव्या अधिकाऱ्याची. फ्रिट्झ हॅबर त्याचं नाव. त्याने स्वतःहून पत्र पाठवून जर्मन हायकमांडला ही योजना सुचवली. ही योजना युद्धाच्या आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचं सांगत कुठल्या तरी जर्मन अधिकाऱ्याने मोडता घालायचा प्रयत्न केला. मात्र, हाय कमांडने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. फ्रिट्झ हॅबरला त्याचा मार्ग मिळाला. दि. २२ एप्रिल १९१५ रोजी त्याने शत्रूंसाठी नरकाची वाट सोपी केली.

त्यानंतर अवघ्या तीन वर्षांत फ्रेट्झ याला रसायनशास्त्रासाठी सन १९१८ चा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 

त्याचं कारण मात्र वेगळं होतं. फ्रिट्झ हॅबरच्या या जग बदलणाऱ्या शोधापूर्वी शास्त्रज्ञांना जगाच्या उपासमारीची चिंता भेडसावत होती. त्यांना भीती होती की जगाची लोकसंख्या लवकरच दीड अब्जांवर जाईल आणि नंतर एवढ्या लोकसंख्येला पुरे पडेल एवढे अन्न धान्य उपलब्ध असणार नाही. अर्थात भूकबळींची संख्या वेगाने वाढेल. फ्रिट्झने आपल्या संशोधनातून अख्ख्या मानवजातीची एका मोठ्या संकटातून सुटका केली.

हे देखील वाचा

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

या नकाशाने अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी संपवण्यास भाग पाडले!

जगाला रासायनिक अस्त्रं तयार करून देऊन लाखोंचे बळी घेणारा आणि रासायनिक खतांची निर्मिती करून अन्नधान्याचं उत्पादन कैक पटीने वाढवणारा; पर्यायाने कोट्यवधींना उपासमारीतून वाचवणारा माणूस एकच होता. फ्रिट्झ हॅबर! 

फ्रिट्झ हॅबरचा जन्म ९ डिसेंबर १८६८ रोजी झाला. तो एका व्यापाऱ्याचा मुलगा. छोट्या शहरात कुंठीत जीवन जगण्यापेक्षा मोठ्या महत्त्वाकांक्षा ठेऊन स्वतःला घडवण्याचा त्याचा निर्धार होता. कैसर विल्हेल्मच्या जर्मनीतल्या ज्यूंमध्ये सामाजिक गतिशीलता होती. आपले आई, वडील आणि आजोबा कोण आहेत यापेक्षा आपल्या स्वतःच्या क्षमता आणि कर्तृत्वावरच आपण घडू शकतो, असा या पिढीचा विश्वास होता.

ब्रेस्लाऊमध्ये शिक्षण घेताना फ्रिट्झला रसायनशास्त्रात विशेष रुची होती. सन १८९० मध्ये रसायनशास्त्र आणि विद्युत रसायनशास्त्राचं उच्च शिक्षण पूर्ण करून हॅबर कार्लश्रुहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रसायनशास्त्र आणि विद्युत रसायनशास्त्राचा प्राध्यापक बनला. त्याच वर्षी हॅबर एका नृत्यप्रशालेत क्लारा इमरवारला भेटला आणि प्रथमदर्शनीच तिच्या प्रेमात पडला. विविध विषयात रस घेणारी क्लारा एका ज्यू जमीनदाराची मुलगी. ती देखील रसायनशास्त्राची विद्यार्थिनी होती. फ्रिर्ट्झला भेटल्यावर क्लाराच्या मनातही क्षणार्धात प्रेमाची ठिणगी चमकून गेली. मात्र, उच्च शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य यासाठी तिने लग्नाला नकार दिला.

सन १९०१ मध्ये त्या दोघांची पुन्हा भेट झाली तेव्हा क्लारा रसायनशास्त्रात प्री-डॉक्टरल अभ्यासक्रमासाठीची कठीण राष्ट्रीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेली जर्मनीतली पहिली महिला ठरली होती, तिला कोणत्याही जर्मन विद्यापीठात रसायनशास्त्रात डॉक्टरेटला प्रवेश मिळणार होता. हॅबरने तिला पुन्हा लग्नासाठी मागणी घातली. त्यांच्यातलं नातं पुन्हा जागृत झालं. क्लाराने त्यांच्या दुसऱ्या भेटीनंतर लगेचच हॅबरशी लग्न केलं.

जानेवारी १९०२ पर्यंत त्यांचा मुलगा हर्मनचा जन्म झाला आणि ते दक्षिण जर्मनीत कार्लश्रुहे इथे स्थायिक झाले. विवाह आणि मातृत्वामुळे ती संशोधनाकडे लक्ष देऊ शकली नाही. आजारी मुलाची काळजी घेण्याबरोबरच, तिच्या पतीच्या महत्त्वाकांक्षी आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे वारंवार होणाऱ्या मेजवान्यांची जबाबदारी तिच्यावरच असे.

क्लाराने तिच्या संशोधनाला विराम दिला असला तरी पतीला त्याच्या संशोधनात मदत करून विज्ञान आणि संसार यांच्यात समतोल साधला. गॅस रिऍक्शनच्या थर्मोडायनामिक्सवर त्याने केलेल्या संशोधनग्रंथाच्या अर्पणपत्रिकेवर तिचं नाव होतं.

दरम्यान, फ्रिट्झ हॅबर सन १९०० च्या उत्तरार्धात जर्मनीसमोर उभ्या ठाकलेल्या संकटाचं निराकरण करण्यासाठी काम करत होता. देशात सूर्यप्रकाशाची कमतरता नव्हती. ३० कोटी लोकांना पोट भरण्यासाठी धान्य पिकवणारी जमीन होती. मात्र , पिकांची उत्पादकता वाढवता आली नाही तर २० दशलक्ष नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागणार होता.

जस्टस वॉन लीबिग यांनी वनस्पती पेशींच्या भिंतींच्या निर्मितीसाठी नायट्रोजन आवश्यक असल्याचे सन १८४० मध्ये सिद्ध करून दाखवलं होतं. पिकाच्या उत्पादकतेचा थेट संबंध पिकाला किती नायट्रोजन दिला जाऊ शकतो, याच्याशी असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, हा नायट्रोजन हवेतून वेगळा काढून पिकांना द्यायचा कसा हा यक्षप्रश्न होता.

२० व्या शतकाच्या सुरूवातीस फ्रिट्झ हेबरने नायट्रोजनचे बंध कसे तोडायचे हे तंत्र शोधून काढलं. प्रचंड उष्णता आणि दबावाखाली मोठ्या लोखंडी टाकीत हवा भरल्यानंतर त्याने टाकीत हायड्रोजन मिसळला. यामुळे नायट्रोजन अणू वेगळे झाले आणि अमोनिया तयार केला. 

टाकीतून द्रव खत टाकले. हवेतून खेचून आणलेला नायट्रोजन द्रवरुपाने पिकांना जमिनीतून देता येतो हे संशोधन फ्रिट्झने सन १९०९ मध्ये जगासमोर आणलं. कदाचित हे संशोधन जगासाठी सर्वात जास्त उपयुक्त संशोधन होतं. त्यामुळे करोडोंची उपासमार टळणार होती.

हे फ्रिट्झ हॅबरचे स्वप्न होते. त्याच्या कामगिरीची प्रशंसा होत होती. त्याने आपल्या जन्मभूमीची खूप सेवा केली होती. जर्मन नागरिक म्हणून त्याने आपल्या देशाचं नाव उंचावलं होतं. छोट्या शहरात जन्माला आलेल्या एका ज्यू मुलासाठी हा अभिमानाचा क्षण होता. फ्रिट्झ सतत कामात मग्न होता.

ADVERTISEMENT

त्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे क्लारा आणि त्यांचा मुलगा यांना त्याची उणीव भासत होती. तरीही त्याची महत्त्वाकांक्षा आणि देशाबाबत समर्पणभावना पूर्ण झाली. फ्रिट्झने हॅबरने सन १९११ मध्ये बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू व्हायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं आपलं कुटुंब तिकडे हलवलं.

फ्रिट्झ आता राजधानीतला उच्च वर्तुळातला महत्वाचा माणूस झाला होता. देशाचे मंत्री, एवढंच नव्हे तर स्वतः कैसर यांच्याशी त्याच्या नियमित भेटी व्हायच्या. त्याला ही नवी जीवनशैली आवडत होती. त्याला त्याचा अभिमान वाटत होता. त्याचा अहंकार सुखावत होता. जर्मनीवर त्यांचं मनापासून प्रेम होतं. या देशानं त्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवला होता. इथे तो फक्त ज्यू नव्हता. तो एक जबाबदार आणि प्रतिष्ठीत जर्मन नागरिक होता.

जसजशी जर्मनीची अर्थव्यवस्था समृद्ध होत होती तसतशी तिथली लोकसंख्या वाढत गेली. नव्याने जडणघडण झालेल्या जर्मनीची महत्त्वाकांक्षाही वाढत गेली. बेल्जियममार्गे फ्रान्सवर हल्ला करून जगाला जर्मनीचं सामर्थ्य दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दोस्त राष्ट्राच्या सैन्यानं त्यांना मरेन इथे रोखून धरलं. 

सतत छोट्या-मोठ्या चकमकी झडत होत्या. मोठ्या संख्येने सैनिक मारले जात होते. मित्र राष्ट्रांच्या नौदलाने केलेल्या नाकेबंदीमुळे युद्धसामग्रीसाठी आवश्यक कच्च्या मालाचा पुरवठा बंद झाला. जर्मनीसाठी परिस्थिती आणखी बिकट झाली. जर्मनांचं नियोजन फसलं होतं. परिस्थिती खालावत होती. जर्मनांना मागे जायचं नव्हतं आणि पुढे जाता येत नव्हतं.

देशभक्तीनं भारलेल्या फ्रिट्झने युद्ध विभागाला पत्र पाठवून आपली योजना कळवली. त्यासाठी स्वयंसेवी वृत्तीने काम करण्याची इच्छा प्रकट केली. आपल्या पत्रात त्याने जर्मन अधिकाऱ्यांना समजावून सांगितलं की तो खतनिर्मितीसाठी वापरली जाणारी रासायनिक अभिक्रिया उलटून तो स्फोटके बनवू शकतो.

नायट्रोजनचे अणू वेगळे करण्यासाठी जेवढी ऊर्जा वापरली जाते, तेवढीच ऊर्जा ते अणू परत जोडले तर मुक्त होऊ शकते, हे सूत्र त्याच्या डोक्यात होतं. फ्रिट्झचा शोध आणि त्याने तयार केलेल्या अफाट अमोनिया कारखान्यांनी युद्ध तीन वर्षांनी लांबवलं.

मात्र, केवळ स्फोटकांमुळे जर्मनी दोस्त राष्ट्रांना मात देऊ शकणार नाहीत. दोस्तांकडे जर्मनीएवढीच; कदाचित त्यांच्यापेक्षा अधिक शस्त्रास्त्र आणि सैन्य होतं. फ्रिट्झला त्याची जाणीव होती. त्यामुळे त्यानं हवेतून डिस्टिल्ड केलेला अमोनिया क्लोरीनमध्ये मिसळून विषारी वायू शत्रुसैन्यावर सोडण्याची आणखी एक योजना मांडली. जर्मनीच्या कुंठीत परिस्थितीतून बाहेर पडण्याचा तो एकमेव मार्ग होता. जर्मन हायकमांडने त्यांची विनंती मान्य केली.

क्लारा ही एक शांततावादी, विचारी महिला होती. फ्रिट्झची योजना ऐकून तिच्या अंगावर काटा उभा राहिला. ती स्वतः रसायनशास्त्राची संशोधक होती. पुढच्या परिणामांचं गांभीर्य तिला कळत होतं. विज्ञानाचा हा विकृत गैरवापर तिला मान्य नव्हता. तिने आपल्या पतीच्या योजनेचा जाहीर निषेध केला.

फ्रिट्झ मात्र देशप्रेमानं आंधळा झाला होता. त्याने क्लारावर देशद्रोहाचा आरोप केला. त्याच्या मते, तो शांततेच्या काळात जगासाठी वैज्ञानिक असतो. युद्धाच्या काळात मात्र तो फक्त देशासाठीच असतो.

फ्रिट्झ आणि क्लाराच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. आता फ्रिट्झ देशासाठी ‘वाहून घ्यायला’ मोकळा होता. आपण जे काही करत आहोत ते योग्य आहे, असा त्याला विश्वास होता. विजिगिषु देशाला विजयी करण्यासाठी तो झटत होता.

जगातल्या पहिल्या गॅस हल्ल्यासाठी सज्ज असल्याचं त्यानं हाय कमांडला कळवलं. दि. २२ एप्रिल १९१५ च्या संध्याकाळी, ५-६ हजार शत्रू सैनिक रणांगणावर मृतावस्थेत पडलेले पाहून फ्रिट्झ आनंदित झाला. मात्र, ही नुकतीच चाचणी झाली होती. पुढची तयारी काहीच झाली नव्हती. 

गॅस हल्ल्याने हबकून गेलेलं दोस्त राष्ट्राचं सैन्य लवकरच सावरलं. ‘ऑपरेशन जंतुनाशक’मुळे हॅबरला कॅप्टन म्हणून बढती मिळाली. आपल्या देशवासीयांच्या नजरेत तो नवा नायक ठरला. तो बर्लिनमध्ये आपल्या कुटुंबासह काही दिवस घालवण्यासाठी घरी गेला. दि १ मे रोजी त्याच्या नवीन यशाच्या सन्मानार्थ मेजवानी आयोजित करण्यात आली.

क्लारा सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये नव्हती. मेजवानीमध्येच क्लारा आणि फ्रिट्झमध्ये जोरदार वादावादी झाली. क्लाराने फ्रिट्झ नैतिकदृष्ट्या दिवाळखोर असल्याचं त्याच्या तोंडावर सांगितलं. हॅबरने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तो त्याच्या देशभक्तीची प्रशंसा करणाऱ्या मित्रांमध्ये रमला. त्याला आपल्या देशाची सेवा करण्यात वाईट काहीही वाटत नव्हतं. फ्रिट्झने क्लाराची देशद्रोही म्हणून हेटाळणी केली.

क्लारा अस्वस्थ झाली. अशा दुष्ट माणसाशी लग्न करून ती तिच्या तत्त्वांनुसार जगू शकत नव्हती. त्या रात्री, फ्रिट्झ झोपेत असताना क्लाराने रिव्हॉल्व्हर घेतलं. बाहेर बागेत एक चक्कर मारली आणि स्वतःच्या छातीत गोळी झाडली. 

तिला तिच्या १३ वर्षाच्या मुलाने शोधून काढलं. पण, यामुळे जराही विचलित न होता दुसर्‍या दिवशी सकाळी पुढच्या गॅस हल्ल्यांचच नियोजन करण्यासाठी फ्रिट्झ पूर्वेकडच्या आघाडीवर परत गेला. त्याचा मुलगा हर्मन याने सन १९३० च्या उत्तरार्धात अमेरिकेत स्थलांतर केलं आणि तिथेच त्यानेही स्वत: ला संपवलं.

दरम्यान, दोस्त राष्ट्रांच्या सैन्यानेही विषारी वायूचं स्वतःच तंत्रज्ञान विकसित केलं आणि जर्मन सैन्यावर गॅस हल्ले सुरू केले. दोन्ही बाजूंच्या गॅस हल्ल्यांनी एक लाख जणांचा बळी घेतला. आणखी लाखभर विकलांग झाले. फ्रिट्झने बनवलेल्या स्फोटकांमुळेही एक लाख लोक मरण पावले. आता या विध्वंसक युद्धाच्या शेवटाची सुरुवात होती. अखेर ११ नोव्हेंबर १९१८ रोजी सकाळी ११ वाजता युद्धाचे शेवटचे बार उडाले. जर्मनीचा पराभव झाला.

सन १९३३ मध्ये हिटलर चान्सलर बनल्याने हॅबर आणि एकूण जगासाठीच जीवन आणखी दुष्कर ठरलं. नाझींनी एक आदेश जारी केला की, कोणत्याही ज्यूंना नागरी सेवेत परवानगी दिली जाणार नाही. ‘द ग्रेट वॉर’च्या काळात केलेल्या लष्करी सेवेमुळे फ्रिट्झला यातून सूट देण्यात आली होती. मात्र, ही सूट त्याच्या कर्मचाऱ्यांना नव्हती. त्याच्या कर्मचाऱ्यांपैकी ७५ टक्के लोक ज्यू होते. त्यांच्याशिवाय काम करणं फ्रिट्झला पटलं नाही. त्यानं राजीनामा दिला.

आपण आपली जन्मभूमी गमावली आहे, याची जाणीव झाल्यानं फ्रिट्झ जर्मनीतून निघून गेला. तो युरोपभर फिरला आणि अखेरीस इंग्लंडच्या केंब्रिजमध्ये प्राध्यापकी केली. मात्र, त्याला ब्रिटीशांनी मनापासून स्वीकारलं नाही. 

फ्रेंचांनीही त्याला एक तिरस्करणीय युद्ध गुन्हेगार मानलं. अखेर तो युरोपमध्ये निरुद्देश फिरला, त्याची तब्येत बिघडली. स्वित्झर्लंडला उपचार घेण्यासाठी निघाला असतानाच त्याचं हृदय निकामी झालं. फ्रिट्झ हॅबर १९३४ मध्ये एका हॉटेलमध्ये एकाकी मरण पावला. त्याने युद्धासाठी आपले मन, बुद्धी आणि प्रतिभा वापरल्याबद्दल त्याला आयुष्याच्या शेवटी पश्चात्ताप झाला.

विषारी वायू आणि रासायनिक अस्त्रांची निर्मिती करणाऱ्या आणि लाखोंच्या मरणाला कारणीभूत ठरणाऱ्या फ्रिट्झ हेबरला सैतान म्हणावं की रासायनिक खतांची निर्मिती करून करोडोंची उपासमार टाळणाऱ्या फ्रिट्झ हॅबरला देवदूत म्हणावं? तो सर्जनशीलही होता आणि विध्वंसकही! प्रेमळ मनाचाही होता आणि निर्दयही! त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही! कुणाचंच आयुष्य केवळ पांढरं नसतं किंवा केवळ काळं. कुणाचंही पाप आणि पुण्य तराजूवर तोलण्याचा मार्ग सोपा नाही आणि कदाचित त्यात काही अर्थही नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

३००० वर्षांपूर्वी माया संस्कृतीतील लोकांनी प्राण्यांचा व्यापार का केला?

Next Post

ही आहे जगातील पहिली संघटित दहशतवादी चळवळ!

ऋजुता कावडकर

ऋजुता कावडकर

Related Posts

मनोरंजन

भारतातल्या पहिल्या वहिल्या स्पोर्ट्स कारचं पुढे काय झालं..?

31 January 2023
इतिहास

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

4 June 2022
इतिहास

या नकाशाने अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी संपवण्यास भाग पाडले!

2 June 2022
विज्ञान तंत्रज्ञान

न्यूटनचा हा प्लेगवरचा इलाज वाचून किळस आल्याशिवाय राहणार नाही!

22 April 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

20 April 2022
इतिहास

ही आहे जगातील पहिली संघटित दहशतवादी चळवळ!

20 April 2022
Next Post

ही आहे जगातील पहिली संघटित दहशतवादी चळवळ!

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)