आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब |
१५ ऑगस्ट १९४७ हाच तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी आपल्याला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून आपली मुक्तता झाली. हा दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. भारताचे स्वातंत्र्य असेच अबाधित राहो याची आपण नेहमी प्रार्थना करतो.
१५ ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन असतो हेच आपल्याला शाळेतही शिकवले जाते. पण कोण्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे भारतातील काही जिल्हे १५ ऑगस्ट ऐवजी १८ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतात.
आश्चर्य वाटलं ना?
झालं असं की, १२ ऑगस्ट १९४७ रोजी रेडिओवरून एक बातमी देशभरात प्रसारित करण्यात आली ती म्हणजे “स्वतंत्र भारताची घोषणा”. त्या बातमीनुसार भारत आता एक स्वतंत्र राष्ट्र बनणार होता. तसेच या बातमीत स्वतंत्र भारतात समाविष्ट होणाऱ्या राज्यांची यादीही सांगण्यात आली होती.
राज्यांचा समावेश सांगणे गरजेचे होते कारण त्यावेळेला नुकतीच फाळणी झाली होती व भारत-पाकिस्तान वाद सुरू होते. त्यामुळे कोणते राज्य भारतात होते व कोणते पाकिस्तानचा भाग बनवले हे देखील त्या बातमीत सांगितले जात होते.
त्याच बातमीत, पश्चिम बंगाल येथील नादिया जिल्ह्याचा समावेश पाकिस्तानात केला आहे व आजपासून ते पूर्व पाकिस्तानचा एक भाग असेल असे घोषित करण्यात आले.
स्वातंत्र्यापूर्वी नादिया जिल्ह्यात कृष्णानगर सदर, मेहरपुर, कुष्टिया, चुआडांगा आणि राणाघाट हे पाच विभाग होते. या संपूर्ण पाचही विभागांना पूर्व पाकिस्तानात समाविष्ट केल्याची घोषणा सरकारने केली. पण नादियाच्या प्रत्येक गल्ली बोळात, चौकाचौकात याचे पडसाद उमटले.
या बातमीमुळे संपूर्ण नादिया जिल्ह्यात एकच गदारोळ माजला व तेथील हिंदू जनतेने, या निर्णयाविरुद्ध मोठा विद्रोह पुकारला. हे प्रकरण इतके चिघळले की दोन दिवस फाळणीनंतरच्याच घटनांची पुनरावृत्ती सगळीकडे होत होती. जाळपोळ, दंगली सुरू झाल्या.
हिंदू-मुसलमान वाद पुन्हा विदारक रूप घेत होता. अशातच, नादियातील मुस्लिम लीगच्या काही नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी ब्रिटिश सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत, कृष्णानगर येथील पब्लिक वाचनालयावर पाकिस्तानी झेंडे फडकवले.
याच नेत्यांनी व तेथील काही मुस्लिम रहिवाशांनी मोठमोठी प्रदर्शने केली व पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा व नारे तिथे ऐकू येऊ लागले. या सगळ्यामुळे परिस्थिती अजूनच बिघडली व सरकारच्या हाताबाहेर गेली.
दोनच दिवसांत नादियाचा कायापालटच झाला. कित्येक लोकांचे जीव गेले, कित्येक गंभीर रूपाने जखमी झाले.
स्त्रिया देखील सरकारच्या या निर्णयाचा जोमाने निषेध करून नादिया पाकिस्तानात नाही तर भारताचा भाग आहे, जगाला हे दाखवून देण्यात सडकेवर उभ्या राहिल्या.
पण सरकारची ही एक चूक झाली आहे वारंवार असे स्पष्टीकरण देण्यात येत होते. या सगळ्या गदारोळाला भारत व पाकिस्तानला फाळणी करून कायम स्वरुपी शत्रू देश बनविणारे सर रेडक्लिफ यांनी केली. त्यांनी भारताचा चुकीचा नकाशा बनवला ज्यात नादियाला पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवले होते.
या निर्णयावरून नादियात किती गदारोळ मजला आहे याची बातमी जेव्हा भारताचे शेवटचे ब्रिटिश वायसराय लॉर्ड माउंटबेटन यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी सर रेडक्लिफ यांना आपला निर्णय मागे घेऊन आपली घोडचूक सुधारण्याचे आदेश दिले.
यानंतर रेडक्लिफने नकाशात काही बदल केले व नवीन नकाशा जाहीर केला. ज्यानुसर राणाघाट, कृष्णानगर, आणि करीमपुरच्या शिकारपुर या भागांचा भारतात समावेश केला होता.
या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागला व १७ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री हा नवीन नकाशा जनतेसमोर मांडण्यात आला. जनतेने या निर्णयाचे समर्थन केले व दंगली थांबल्या. वातावरण स्थिरावले जाऊ लागले.
दुसऱ्या दिवशी १८ ऑगस्ट १९४७ लाच कृष्णानगर येथील पब्लिक वाचनालयावर फडकवलेले पाकिस्तानी झेंडे उतरवण्यात आले व तिथे भारताचा तिरंगा पहिल्यांदा फडकला. त्या दिवशी खऱ्या अर्थाने नादियाला स्वातंत्र्य मिळाले.
पण जुन्या आदेशानुसार २३ जानेवारी, २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या तीन दिवशीच सामान्य नागरिक तिरंगा फडकवू शकत होते. नदियतील लोकांना त्यांना स्वातंत्र्य मिळालेल्या तरखेवर म्हणजेच दरवर्षी १८ ऑगस्टला ध्वजारोहण करायचे होते.
यासाठी स्वातंत्र्यसेनानी प्रमथनाथ शुकुलचे नातू अंजन शुकुल यांनी संघर्ष केला व शेवटी १९९१ साली केंद्र सरकारने त्यांची मागणी मंजूर करत नादियाला १८ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची व त्याच दिवशी ध्वजारोहण करण्याची परवानगी दिली.
तेव्हापासून आजपर्यंत, नदिया जिल्ह्यातील प्रत्येक शहरात आजही १५ ऑगस्ट ऐवजी १८ ऑगस्टला स्वतंत्र दिवस साजरा केल्या जातो.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.