पंतप्रधान होण्यासाठी ज्योतिषाच्या सांगण्यावरून एन. टी. आर. रात्री बायकांचे कपडे घालून फिरायचे

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


दक्षिण भारतातील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी राजकारणातही आपला ठसा छबी उमटवला. या अभिनेत्यांना आणि अभिनेत्रींना एक नेता म्हणूनही लोकांनी डोक्यावर घेतले. चित्रपट क्षेत्रातून आलेले आणि राजकीय क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवलेले असेच एक नेतृत्व म्हणजे एन. टी. रामाराव.

एन. टी. आरचा आंध्रप्रदेशच्या राजकारणावर इतका प्रभाव होता की जनता अक्षरश: त्यांना परमेश्वराचेच रूप मानत असे. दक्षिण भारतातील एक प्रभावी आणि लोकप्रिय नेते म्हणून त्यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाईल. त्याकाळी कॉंग्रेस विरोधी सरकार स्थापन झाल्यास त्याचे राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व एन. टी.च करू शकतील असा विश्वास त्यांच्याबद्दल व्यक्त केला जात असे.

कॉंग्रेसविरोधात कोणी आघाडी सरकार स्थापन केल्यास रामारावच पंतप्रधान पदाचे दावेदार असतील असा दावा केला जात असे.

एन. टी. रामाराव तेलगूतील एक प्रसिद्ध अभिनेते होते. तेलगुदेसम या पक्षाची स्थापना करून त्यांनी राजकरणात उडी घेतली. १९८४ साली ते बहुमताने निवडून आले आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बनले.

एन. टी. रामाराव यांचा जन्म २८ मे १९२३ रोजी आंध्रप्रदेशातील एक छोट्याशा गावात झाला. तेंव्हा हा प्रदेश मद्रास प्रेसिडेन्सीचा भाग होता. त्यांचे कुटुंब एक शेतकरी कुटुंब होते. नंतर त्यांना त्यांच्या मामांनी दत्तक घेतले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षीच म्हणजे १९४७ साली त्यांना मद्रास सर्विस कमिशनमध्ये सब रजिस्ट्रारची नोकरी मिळाली होती. पण, तेंव्हा त्यांच्या डोक्यात अभिनयाचे वेड होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी फक्त तीनच आठवड्यात आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला.

रामाराव यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. शालेय जीवनापासूनच ते नाटकांत काम करायचे. १९४९ साली नाम्म देशम नावाचा त्यांचा पहिला चित्रपट आला. या चित्रपटात त्यांनी पोलिसाची भूमिका केली होती. एन.टी.आर. यांचे अधिकतर चित्रपट हे धार्मिक कथांवर आधारलेले असत. त्यांनी तब्बल १७ चित्रपटांत कृष्णाची भूमिका केली आहे.

एन.टी.आर यांचे बालपण त्याकाळातील सामान्य मुलांप्रमाणेच होते. घराचा आर्थिकभार पेलण्यासाठी ते घरोघरी जाऊन दुध विकत असत. १९४२ साली त्यांचा मामाच्याच मुलीशी विवाह करण्यात आला. एन. टी.आर यांनी दोन विवाह केले. त्यांना एकूण १२ मुले होती. यात आठ मुले आणि चार मुली होत्या. १९९३ साली वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी तेलुगु लेखिका लक्ष्मी पार्वती यांच्याशी विवाह केला होता. परंतु त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या या दुसऱ्या पत्नीचा कधीच स्वीकार केला नाही.

एक अभिनेते म्हणून लोकांनी त्यांना जितके प्रेम दिले तितकेच प्रेम त्यांना राजकारणात आल्यावरही मिळाले. १९८३ पासून १९९४ या काळात ते तीन वेळा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बनले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर संपूर्ण देशात कॉंग्रेसविषयी सहानुभूतीची लाट उसळली. या लाटेतच राजीव गांधी बहुमताने निवडून आले आणि देशाचे पंतप्रधान झाले.

सगळीकडे कॉंग्रेस आघाडीवर असली तरी, आंध्रप्रदेशात मात्र कॉंग्रेसला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आंध्रप्रदेशमध्ये एन. टी. आरचेच वर्चस्व राहिले. त्यांच्या तेलगुदेसम पक्षाला लोकसभेत विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्यात यश मिळाले.

१९८४ साली त्यांना काही कारणास्तव राज्यपालांनी सत्तेवरून पदच्युत केले आणि त्यांच्याऐवजी रामलाल यांच्या अल्पमतातील पक्षाचे सरकार बनवले. यावेळी एन. टी. आर. स्वतः राष्ट्रपती झैलसिंह यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. विशेष म्हणजे ते एकटे गेले नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांचे १५० आमदार देखील होते. त्यावेळी अतिरिक्त विमानसेवा नव्हती म्हणून या सर्व आमदारांसोबत त्यांनी हैद्राबाद ते दिल्ली हा प्रवास रेल्वेने केला.

दिल्लीच्या सरकारने देखील त्यांच्या या लावाजाम्याच्या येण्याच्या धसका घेतला आणि त्याच्या रेल्वेची गती कमी करून प्रतीतास २० किमी केली. रेल्वे तब्बल दहा तास उशिरा दिल्लीला पोहोचली. तोपर्यंत राष्ट्रपतींनी दिलेली भेटीची वेळ टळून गेली होती. परंतु पत्रकार आणि प्रसार माध्यमांच्या दबावामुळे राष्ट्रपतींनी एन.टी.आर यांची भेट घेतली. एन.टी.आर व्हीलचेअर वरून राष्ट्रपतींना भेटायला गेले. राष्ट्रपतीसोबतच्या या बैठकीनंतर रामलाल यांनी राजीनामा दिला आणि एन. टी. आर पुन्हा मुख्यमंत्री झाले.

देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचेही त्यांचे स्वप्न होते, मात्र हे स्वप्न अधुरेच राहिले. जेडीयूचे वरिष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी एन. टी. आर. यांच्यावर नवभारत टाइम्सच्या एका अंकात लेख लिहिला होता. ज्यात त्यांनी एन. टी.ना पंतप्रधान होण्याची किती जबरदस्त इच्छा होती याचा किस्सा सांगितला आहे.

त्यागी आपल्या लेखात लिहितात, ‘त्याकाळी अशी चर्चा केली जात असे की पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे आपले स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून कुणा ज्योतिषाच्या सांगण्यावरून एन. टी. रात्रीच्या वेळी स्त्रियांप्रमाणे पोशाख करतात. देशाचे नेतृत्व करायचे म्हणजे हिंदी आवर्जून आलीच पाहिजे. म्हणून हिंदी शिकण्यासाठी त्यांनी आपल्या घरी दोन हिंदी शिक्षकांची नेमणूक केली होती.’ एन. टी. आर. एक कलंदर व्यक्तिमत्व होते याची प्रचीती यावरून येते.

अभिनेता म्हणून त्यांनी बरीच वर्षे चित्रपट सृष्टीत घालवली. स्क्रीनप्ले लिहिण्याचे कुठलेही रीतसर शिक्षण घेतले नसले तरी एन. टी. आर. यांनी अनेक चित्रपटांचे स्क्रीनप्ले लिहिले. अनेक नवख्या अभिनेत्रींसोबतही त्यांनी काम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री श्रीदेवी हिच्यासोबतही त्यांनी तेलगु चित्रपटात काम केले होते. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, श्रीदेवी आणि एन. टी. आर. यांच्यात ४० वर्षांचे अंतर होते.

१९८९ साली आंध्रात सत्ताविरोधी लाट होती. त्यामुळे तेलगुदेसमला नामुष्कीजनक हार पत्करावी लागली. त्यावर्षी कॉंग्रेस पुन्हा सत्तेत आली.

परंतु १९९४ सालच्या निवडणुकीत पुन्हा एकदा एन. टी.च्या तेलगुदेसम पक्षाने बाजी मारली आणि पुन्हा एकदा एन. टी. आर. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र अवघ्या नऊ महिन्यातच त्यांना सत्तेतून पाय उतार व्हावे लागले. तेलगुदेसमचे नेते आणि त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू यांनी पक्षांतर्गत राजकारण करून पक्षात फुट पाडली. एन.टी.आर यांच्याकडून पक्षाचे अध्यक्षपद आणि मुख्यमंत्रीपद दोन्हीही काढून घेण्यात आले. घरच्याच भेदीने त्यांचा घात केला.

राजकारणातील एक जादुई व्यक्तिमत्व आणि केंद्रीय राजकारणातही दबदबा राखणारे एक वजनदार नेते म्हणून एन. टी. आर. कायम स्मरणात राहतील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!