आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान १९६६ साली झालेल्या शांतता कराराला ‘ताश्कंद करार’ म्हणून ओळखले जाते. १० जानेवारी १९६६ रोजी हा करार करण्यात आला होता, पण या करारानंतर लगेचच दोन दिवसांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथे रहस्यमयपणे निधन झाले.
‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ हे बिरूद मिरवणारे शास्त्रीजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर १९६४ साली भारताचे पंतप्रधान बनले होते.
देशाच्या सैन्याच्या बळावर त्यांनी १९६५ साली पाकिस्तानच्या आक्र*मणाला परतवून लावत, पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं होतं. त्यांच्या राजकीय नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने अगदी लाहोरवर देखील तिरंगा फडकावला होता.
यु*द्धविरामानंतर लालबहादूर शास्त्री जानेवारी १९६६ मध्ये सोव्हिएत संघात सामील असलेल्या उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात पाकिस्तानसोबत शांतता करार करायला गेले होते. तिथेच त्यांचे अत्यंत रहस्यमय पद्धतीने त्यांचे निधन झाले.
ज्यावेळी शास्त्रीजी शांतता करारासाठी ताश्कंदला गेले, त्यावेळी त्याठिकाणी पाकिस्तानचा लष्करी हुकुमशहा अय्युब खान देखील उपस्थित होता. सोव्हिएत संघाचे राष्ट्रपती अलेक्सी कोसिगन यांच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान दरम्यान चर्चा सुरु होती. सोव्हिएत संघ त्याकाळी अमेरिका आणि सहकारी नाटो राष्ट्रांच्या ताकदीचा आणि बरोबरीचा देश होता.
या बैठकी दरम्यान लालबहादूर शास्त्रींवर दबाव निर्माण करण्यात आला होता की भारताने यु*द्धादरम्यान बळकावलेला पाकिस्तानचा प्रदेश परत करावा. या दबावातच त्यांनी ताश्कंद करारावर स्वाक्षरी केली.
त्या रात्री ते झोपी गेले, ते कायमचेच!
दुसऱ्या दिवशी ११ जानेवारी १९६६ रोजी लालबहादूर शास्त्रींचे निधन झाल्याची वार्ता सर्वदूर पसरली, शव विच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण हृदयविकार असे सांगण्यात आले होते. परंतु कोणाचाच त्यावर विश्वास बसत नव्हता.
भारतात त्यांच्या पत्नी लतिका शास्त्री आणि त्यांचे मुलं यांना शास्त्रींचे निधन हृदयविकाराने झाले हे स्वीकार नव्हते. त्यांनी दावा केला की शास्त्रींचा मृतदेह काळा निळा पडलेला आहे.
यावर एका शोध कमिटीचे गठन देखील करण्यात आले होते, परंतु ही शोध कमिटी कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहचू शकली नव्हती.
इकडे शास्त्रींच्या मृत्यूवरून वादंग सुरु होता, दुसरीकडे भारताचे लोक आपल्या लाडक्या पंतप्रधानाच्या निधनाने फार कष्टी झाले होते. ठिकठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहिली जात होती. ज्यावेळी त्यांच्या अस्थि विसर्जनासाठी हरिद्वार आणि प्रयागला नेण्यात आल्या, त्यावेळी असंख्य लोकांनी त्या अस्थि कलशाचे दर्शन घेतले होते.
दिल्लीतील शांतिवन भागात शास्त्रीजींची समाधी आज देखील आहे. पण अजूनही त्यांच्या मृत्युमागचे रहस्य कायम आहे.
काय ठरले होते ताश्कंद करारात?
ताश्कंद करारात शास्त्रीजींनी नमूद केले होते की भारत आणि पाकिस्तान एकमेकांच्या विरोधात शक्तीचा वापर करणार नाहीत, चर्चेतून प्रश्न सोडवतील.
दोन्ही देशांनी २५ जानेवारी १९६६ रोजी आपले सैन्य मागे घ्यावे, भारत-पाकिस्तान एकमेकांच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये दखल देणार नाहीत.
दोन्ही देश आपल्या देशातील शरणार्थीवर विचार विनिमय सुरूच ठेवतील आणि यु*द्धात मिळवलेली संपत्ती परत करतील.
खरंतर शास्त्रीजींना भारतीय सैन्याने यु*द्धात कमावलेला पीर पंजालचा प्रदेश पुन्हा भारतात समाविष्ट करायचा होता. त्यांच्या मनात तो भाग पाकिस्तानला परत करण्याची मनीषा नव्हती, पण करारात त्याला मान्यता देण्यात आली होती.
याचाच परिणाम शास्त्रीजींच्या आरोग्यावर झाला आणि ते आपल्या प्राणास मुकले. आजही उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात लाल बहादूर शास्त्रींचे नाव असलेला एक रस्ता आहे.
१९९० साली सोव्हिएत संघाचे विघटन झाले, त्यावेळी उझबेकिस्तान हा नवीन देश अस्तित्वात आला. सोव्हिएत संघाने आपल्या देशातील संस्कृती नष्ट केल्याचा दावा उझबेकिस्तानच्या नागरिकांचा होता. त्यांना सोव्हिएत संघाच्या राजवटीशी निगडीत कुठल्याच खुणा आपल्या देशात नको होत्या.
त्यांनी देशातील सर्व कम्युनिस्ट झेंड्यांची होळी केली, कम्युनिस्ट नेत्यांच्या पुतळ्यांना नेस्तनाबूत केले.
कम्युनिस्ट नेत्यांच्या नावाने असलेल्या रस्त्यांचे नामांतर केले. सर्वत्र सोव्हिएत संघाशी संबंधित सर्व आठवणी मिटवल्या जात असतांना, लाल बहादूर शास्त्रींच्या नावाच्या रस्त्याचे नामांतर तिथल्या जनतेने केले नाही.
आजदेखील त्या रस्त्याला शास्त्रीजींचे नाव आहे. इतकेच नाही तर तिथल्या लोकांनी एका चौकाला देखील शास्त्रीजींचे नाव दिले आहे.
उझबेकिस्तानच्या नागरिकांच्या मनात आजही शास्त्रीजी आणि भारताच्या संस्कृतीविषयी मोठा आदर आहे. उझबेकिस्तानमध्ये आजही बॉलिवूडचे चित्रपट बघितले जातात. राज कपूर यांचा आवारा हा चित्रपट उझबेकिस्तानमध्ये खूप चालला होता, या चित्रपटाने मोठी कमाई देखील केली होती. उझबेकी नागरिकांना आजही भारताच्या माजी पंतप्रधानासाठी प्रेम आहे.
एकवेळ भारतातील नागरिक लालबहादूर शास्त्री आणि त्यांचे कार्य विसरतील पण उझबेकी लोकांना अजूनही शास्त्रीजींचा आदर आहे. हा आदर तसाच कायम राखण्यासाठी आणि शास्त्रीजींच्या स्मृती जपण्यासाठी एक संस्था उझबेकिस्तानमध्ये कार्यरत असून ही संस्था दरवर्षी शास्त्रीजींची जयंती आणि पुण्यतिथी अभिमानाने साजरी करत असते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.